सून मी या घरची

कथा घराला बांधणाऱ्या सूनेची


सून मी या घरची..


"हे आमचे कुटुंब. हे मोठे काका, या काकू. ही माझी लाडकी आत्या. ही माझी धाकटी काकू आणि हा काका. या दोघांना तर तू भेटली आहेसच." विशाल आपल्या कुटुंबाची ओळख संहिताला करून देत होता.

" अरे, जरा थांब.. मला श्वास तर घेऊ दे. केवढं मोठं कुटुंब आहे तुमचं. कोण कोणाचं कोण ते तर समजू दे. आणि दोन काका ,एक आत्या आणि बाबा यांतले मोठं कोण? आजींना चार मुले होती?" संहिता विशालच्या कुटुंबाचा फोटो बघून चक्रावली होती.

" एवढं काही अवघड नाहीये हां." विशाल फुरंगटत बोलला. "आजीला चार मुले? हे जे मधूकाका आहेत ना, ते आणि धाकटे चंदूकाका ते बाबांचे चुलतभाऊ. आणि ही मीना आत्या माझी सख्खी आत्या." विशाल परत संहिताला समजावण्याचा प्रयत्न करू लागला.

" एवढे सगळेजण एकत्र राहता?" संहिताच्या घशाशी आवंढा आला.

" म्हटलं तर एकत्र नाहीतर वेगळं. तू घरी आली होतीस तेव्हा बघितली नाहीस का बिल्डिंग? दोन काका वरच्या मजल्यावर राहतात. आपण खालच्या मजल्यावर." विशाल संहिताला आपल्या घराचे स्वरूप समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. "आम्ही ना सणासुदीला एकत्र असतो. इतर वेळेस सगळं स्वतंत्र."

संहिता ऐकत होती आणि विशाल अभिमानाने त्याच्या घरच्यांबद्दल सांगत होता. ते ऐकताना दुसरीकडे संहिताचे विचारचक्र सुरू झाले होते. एका लग्नात विशालच्या घरच्यांनी तिला बघितले. रितसर बघण्याचा कार्यक्रम झाला, सगळे पसंत पडले आणि आता लवकरच दोघांचे लग्न होणार होते. कुटुंबाची माहिती देताना विशाल, त्याची लग्न झालेली बहिण समीरा, आईबाबा, आजीआजोबा एवढंच कुटुंब सांगितलं होतं. तसे त्याचे धाकटे काका काकूही घरी आले होते पण सोबत म्हणून आले असतील असे तिला वाटले होते. आईबाबा , भाऊ पराग आणि ती या चौघांचं छोटंसं कुटुंब होतं. नातेवाईक असले तरी फक्त सुट्टीत, लग्नात अशी कधीकाळी भेट व्हायची. आता हे विशालचे भलेमोठे कुटुंब. आपल्याला जमेल इथे रहायला?

" अग ए, कुठे हरवलीस?" विशालने संहिता समोर चुटकी वाजवत विचारले.

" मला जमेल का तुमच्या कुटुंबात ॲडजस्ट व्हायला? मला सवय नाही एवढ्या मोठ्या कुटुंबाची."

" मी आहे ना? आता आपणही अनोळखीच होतो की एकमेकांसाठी. पण दोनचार भेटीतच मला तर असं वाटू लागलं आहे की इतके वर्ष तुझ्याशिवाय कसं जगलो मी.. कॉफी संपव. तुला घरी सोडतो. मग काव्यालाही आणायला जायचे आहे." विशाल लाडीगोडी लावत म्हणाला.

" काव्या?" संहिताने प्रश्नार्थक बघितले.

" माझी बहिण. चंदूकाकाची मुलगी. डान्स शिकते. नाचून दमते मग घरी आणायची जबाबदारी माझी असते." विशाल सांगत होता. तो अजून पुढे काही बोलायच्या आत संहिताने कॉफी संपवली.

" चल निघू."
विशालने संहिताला तिच्या घरी सोडले.

" आत येतोस ना आईबाबांना भेटायला?" तिने विचारले.

" नको.. उशीर झाला तर काव्या ओरडेल. तसंही पुढच्या रविवारी भेटणार आहोतच. तेव्हा येतो." बाय करत विशाल गेला. संहिता आपल्याच नादात घरात आली.

" अग ए.. अशी काय जादू केली जिजूंनी, की आमच्याकडे न बघताच चालली आहेस." पराग संहिताचे केस ओढत म्हणाला.

" आई, सांग ना याला." संहिताने आईला आवाज दिला.

" नको रे तिला त्रास देऊस. तसेही महिन्याभरात लग्न आहे तिचं. जरा न भांडता रहा. उद्या ती सासरी गेली की रडशील मग." स्वातीताई परागला ओरडत म्हणाल्या. "पण तुला काय झालं? तुझा चेहरा का एवढा उतरला आहे?"

" आई, मला खूप टेन्शन आलं आहे ग. विशालचं एवढं मोठं कुटुंब. मी कशी राहू शकेन तिथे? इथे आपण चार माणसं. तिथे त्याचे आजीआजोबा, आईबाबा, काकाकाकू, चुलत भावंडं. बापरे." संहिता रडवेली झाली होती.

"अग त्याचं कुटुंब मोठं असलं तरी तुम्ही एकत्र राहणार आहात का? मला सुनिताताई सांगत होत्या, महिन्यातून एकदा कधीतरी भेटतात सगळे. आणि थोडा दुसर्‍या बाजूने विचार कर, काही लागलं अडीअडचणीला तर आजूबाजूला हक्काची माणसे आहेत. आपले आठव किती हाल व्हायचे, जेव्हा बाबांची सतत बदली व्हायची तेव्हा. मला विचारशील तर असं स्थळ शोधून सापडणार नाही. मुलगा चांगला आहे. घरातले चांगले आहेत. मग या गोष्टीचा नको एवढा विचार करूस." आईने संहिताला प्रेमाने जवळ घेतले.


" सुनिता, झाल्या का लग्नाच्या याद्या करून?" विमल आजींनी विचारले.

" नाही आई.. करते आहे. लग्न आटोपशीर करायचे म्हटलं तरी जवळचे नातेवाईकच शंभरेक होत आहेत." सुनिताताई सांगत होत्या.

" ते तर होणारच. बरं.. सगळं एकटं करण्यापेक्षा मीना, शैलाला बोलव मदतीला. नेहा तर असेलच ना."

"आई.." सुनिताताई अडखळल्या.

" बोला." आजींना अंदाज होताच.

" शैलावहिनींना दोनदा फोन केला होता. त्यांनी उचललाच नाही. आणि मीनाताईंना वेळ नाही."

" या शैलाचे ना हे नेहमीचे असते. कामाच्या वेळेस पाठी आणि मानपान घ्यायला पुढे. आणि मीनाचेही वय वाढले आहे पण डोक्यातली भुतं काही उतरत नाही. त्यांना म्हणावं नवीन सून येणार आहे घरी. तिच्यासमोर तरी नीट वागा. तू काय बोलणार? मीच ओरडते थांब त्यांना." आजी बोलत होत्या.

" आजी, आधी चहा घेता का?" आतून नेत्रा चहा घेऊन आली. तिला बघून आजी खुश झाल्या.

" गुणाची ग माझी नातसून. त्या शैलाला म्हणावं शिक जरा स्वतःच्या सुनेकडून काही. एवढ्या मोठ्या घरची लेक पण कशी मन जपते बघ." आजी कप हातात घेत म्हणाल्या.

" वहिनी.. मी काय म्हणते, आपण ना जेवणाचे कंत्राटच देऊन टाकूया. म्हणजे बघा ग्रहमुख, पूजा. आपल्याकडे इतर तयारीच इतकी असते ना, स्वयंपाक करणार कधी, आणि बाकीची कामे करणार कधी?" नेहाकाकू हातात यादी घेऊन आल्या आणि आजींना बघून चपापल्या.

" घरी स्वयंपाक नाही करायचा. नका करू. बसा हाताला मेंद्या लावून." आजी बोलल्या.

" अरे हो.. त्या दिवशी पण लागेलच की जेवण. आपण हातावर मेंदी काढल्यावर स्वयंपाक कोण करणार?" हसत नेहाकाकू बोलल्या.

" जे करायचे ते करा. तसेही मला म्हातारीला काय करायचे आहे? बरं सुनिता बस्ता बांधायला कधी जायचे? मला कधीपासून पैठणी घ्यायची आहे. या अनिशच्या लग्नात घेतली तेवढीच." आजींचं बोलणं ऐकून नेत्रा आणि नेहाकाकूला हसू आले.

" आई, रविवारी जाऊ. संहिताला पण विशाल सांगणार होताच. सगळी खरेदी करून टाकू."

" बरं.. आणि तिच्यासमोर जास्त बोलू नका. नाहीतर ती पोर लग्नाच्या आधीच तुमच्या कुरबुरींना घाबरायची." सल्ला देऊन आजी मंदिरात गेल्या.

हे आहे विशालचे भलेमोठे कुटुंब. मोठं कुटुंब, कुटुंबातली माणसे याचे संहिताला आले आहे टेन्शन. ते टेन्शन ती उगाचच घेते आहे की खरंच या घरातली माणसे समजायला अवघड आहेत. ते बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all