सुन माझी भली

A Short Story Of A Family

सुन माझी भली- कौटुंबिक लघुकथा
शालिनीचा गृहप्रवेश झाला अन् मोठ्या घराचं मोठेपण शालिनी डोळे विस्फारून पाहत होती. सरलाताईंनी आपला एकुलता एक मुलगा सतिशसाठी मुद्दाम गरीबाघरची मुलगी बायको म्हणून पसंत केली होती. घरात आपलं वर्चस्व राहावं, आपल्या पैशाची रग तिला दाखवता यावी, आपण जे म्हणू ते तिने निमूटपणे ऐकून घ्यावं अशी त्यांची टीपीकल त्रास देणाऱ्या सासूची विचारसरणी होती आणि शालिनी होतीही तशीच,गरीब घरची, नवरा, सासू म्हणेल ते ऐकणारी, उलटून उत्तर न देणारी, पडेल ते काम करणारी.

घरात सरलाताई म्हणतील ती पूर्व दिशा होती. घरात निरनिराळ्या महागा-मोलाच्या वस्तू घेण्याची आणि चार लोकांत त्या वस्तू किंमती सहित मिरवायची हौस सरलाताईंना होती. सतीश आणि त्याचे बाबा संपतराव यांचा कपड्याचा व्यवसाय होता. सरलाताईंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी एक जागा विकत घेऊन तिथे कपड्याचे दुकान टाकले होते. शालिनी-सतीशच्या लग्नाला एक वर्ष होईपर्यंत दुकान बऱ्यापैकी चालत होते पण नंतर त्यांचा व्यवसाय नीट चालणासा झाला.  सरलाताईंच्या दिखाऊपणाच्या वृत्तीपुढे आलेला पैसाही कमी पडत होता. पण पैसे नाहीत ही सबब सरलाताई ऐकून घेत नव्हत्या. त्यांना जे हवं ते त्या मिळवायच्याच.

अशातच एक दिवस घरावर बँकेची जप्ती आली. संपतराव आणि सतीश यांनी एक वर्षापूर्वी बँकेतून मोठ्या रकमेचे कर्ज घेतले होते. सुरवातीचे एक -दोन हफ्ते सोडले तर त्यांनी एकही हफ्ता भरला नव्हता. बँकेने वारंवार नोटीस देऊनही त्यांनी त्यावर काहीच उपाययोजना केली नव्हती. बँकेने घर, दुकान सगळं सील केलं होतं. सरलताईंच्या दिखाऊपणाच्या वृत्तीमुळे सगळे रस्त्यावर आले होते. अंगावरचे कपडे आणि घालायला अजून दोन-चार जोडी कपड्यांशिवाय त्यांना घरातून अजून फक्त एक गोष्ट मिळाली होती. ती म्हणजे जुनी शिलाई मशीन.

शालिनीच्या लग्नाच्यावेळी आईची आठवण म्हणून ती ही शिलाई मशीन सोबत घेऊन आली होती. त्या मशीनवरूनही सरलाताई किती बोलायच्या शालिनीला. शालिनीला उसवलेलं सुद्धा कधी शिवू दिल नव्हतं त्यांनी त्या मशीनवर. आताही घर-दार सगळं गेलं होतं पण रग अजून होतीच.

"फेक ती मशीन. ती अवदसा मशीन घरात आली अन् माझं घर भिकेला लागलं. आणि तू एक..कर्मदरिद्री कुठची."  शिलाई मशीन पाहून त्या शालिनीवर गरजल्याच. आता मात्र शालिनीच्या सहनशीलतेचा अंत झाला होता.

"सासूबाई, मी ऐकून घेते म्हणून मला वाट्टेल ते बोलता नेहमी. माझ्यामुळे काय गरिबी आली हो तुमच्यावर. तुम्हीच सांगा, लग्न झाल्यापासून किती पैसा तुम्ही खर्च केलात माझ्यावर किंवा मी खर्च केला स्वतःवर. अन् गरिबीची म्हणाल तर सवय आहे आम्हाला. आमच्या माय बापाजवळ नव्हतं म्हणून आम्ही कधी दुःखात नव्हतो अन् सासरी मिळालं म्हणून कधी माजलो ही नव्हतो." शालिनीच्या डोळ्यात अंगार होता. तिचं हे कालिकेच रूप पाहून सरलाताई चपापल्याच.

"मी जातेय, बाजूच्या गावात माझी बालमैत्रिण आहे. तिच्याकडं काही मदत मिळाली तर बघते. ज्याची कष्ट करायची तयारी असेल ते माझ्यासोबत येऊ शकता." शालिनी आपली शिलाई मशीन उचलून बस स्थानकाच्या दिशेनं निघाली होती. सतीशसुध्दा तिच्या मागे मागे निघाला होता.

"निघाला लगेच बायकोचा बैल." सरलाताई सतीशला जाताना पाहून चिडून बोलल्या.

"हो आहेच तो बायकोचा बैल. शेवटी त्याच्या बापाचं रक्त आहे न त्याच्या अंगात. सरला तुझ्यामुळे सगळं हातातलं गेलं आता तरी सुधार." संपतराव सरलाताईंवर चिडून बोलले.

"मी! माझ्यामुळे कस काय झालं हे? कर्ज तुम्ही घेतलं होतं का मी?" सरलाताई.

"हो तुझ्याचमुळं. सारखं आपलं हे घ्यायचं, ते घ्यायचं.. कोणाजवळ कोणती वस्तू दिसली की आपण पण लगेच त्याच्यापेक्षा महाग वस्तू घ्यायची. लोकांना कमी दाखवायसाठी तू तुझ्या पैशांनी समोरच्याला तोलायची. अगं, धंदा कधीचाच मंद झाला होता. तुला सांगितलं सुद्धा होतं पण तू ऐकतेस का कोणाचं काही. सगळे सोंगं आणता येतात सरला, पैशाचं सोंगं नसत आणता येत. माझंच चुकलं म्हणा योग्यवेळी तुला आवर घातला असता तर ही वेळ आलीच नसती. आता मला माझी सून बरोबर वाटतेय. आणि मी तिच्यासोबत जाणार. कदाचित हेच चांगलं प्रायश्चित्त असेल."  संपतराव.


सरलताईंकडे न बघताच संपतराव आपल्या लेकाच्या-सुनेच्या मागे गेले. तिघेही बस स्थानकावर बसून बसची वाट पहात बसले होते. इतक्यात सरलाताई तिथे आल्या. शालिनी त्यांनाही सोबत घेऊन आपल्या मैत्रिणीच्या गावी गेली.

शालिनीच्या मैत्रिणीची स्थिती पण गरिबीचीच होती पण ती मनाने श्रीमंत होती. तिने तिच्या घरात या चौघांना दुसरं घर मिळेपर्यंत  राहायला जागा दिली. तिच्या घरच्याजवळच दोन खोल्या शालिनीला भाड्याने मिळाल्या. घरमालकही सुस्वभावी होते. तिथे गेल्यावर शालिनीने आपली शिलाई मशीन थोडी दुरुस्त करून घेतली. आईचं शिवणकाम पाहून पाहूनच तीही शिवणकाम शिकली होती. मैत्रिणीच्या, घरमालकिणीच्या ओळखीने तिला हळू हळू शिवणकाम मिळत गेले. सतीशही तिला घरकामात, शिवणकामात मदत करत होता. खाण्यापिण्याचा खर्च आणि घरभाडे देऊन काही पैसा शिल्लकही पडत होता. काही महिन्यांनी शालिनीने एक गाळा दुकानाच्या जागेसाठी भाड्याने घेतला.  सतीशला पुरुषांच्या कपड्यांचा शिवणकामाचा कोर्स करायला लावला होता.दोघांचा मिळून आता व्यवसाय उत्तम चालत होता. तिने छोटीशी जागा विकत घेऊन त्यावर टुमदार घर बांधले होते. शालिनीने कपडे शिवण्याच्या आधुनिक पध्दती, प्रकार वगैरे सगळं शिकून घेतलं होतं. भाड्याचा गाळा सोडून आता तिने स्वतःचं बुटीक टाकलं होतं. मध्यंतरी सतीश शालिनीच्या संसार वेलीवर अश्विनी नावाचं फुलही फुललं.


सरलाताईंचा स्वभावही आता खूप बदलला होता. सुनेच कौतुक करता करता त्याही थकत नव्हत्या. पैशांच्या, मोठ्या गोष्टींच्या बढाया मारणाऱ्या सरलताई आता येणाऱ्या-जाणाऱ्याला सांगत होत्या, "सुन माझी भली."


© डॉ. किमया मुळावकर