Feb 23, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

सून बोले,लेक शिके( गुरूने दिला ज्ञानरुपी वसा)

Read Later
सून बोले,लेक शिके( गुरूने दिला ज्ञानरुपी वसा)


"अगं वहिनी..काय सांगू तुला? आता मी इकडे आली आहे ना तर अख्या घराची उलथापालथ करून ठेवतील बघ!" सुप्रिया कपाळावर आठ्या आणत बोलली.


"जाऊद्या हो ताई आपण नाही लक्ष द्यायचं." स्मृती समजावणीच्या सुरात बोलली.


"अगं पण किती वहिनी? आल्या की एकीची बॅग सासूच्या खोलीत, दुसरीची आमच्या खोलीत,बदली केलेले कपडे एकीचे हॉल मध्ये तर दुसरीचे गॅलरीमध्ये. घरी या.. मी काही नाही म्हणत नाही तुमचं पण घर आहे ते, पण किती तो घरभर पसारा? आम्ही सुना आहोत म्हणून काय राबवुन घ्यायचं का नुसतं? या तेवढ्या सासरी कामं करतात आणि आमच्या घरी जश्या बायाचं आहेत प्रत्येक कामाला." मगापासून तिसर्यांदा वेगवेगळ्या तीन ग्लासात पाणी पिऊन तिन्ही ग्लासं किचनच्या साफ केलेल्या ओट्यावर ठेवत सुप्रिया बोलली.

नंनदेच्या या बोलण्यावर स्मृती एक नजर किचनवर फिरवते आणि खोलीत जाते. सुप्रियाच्या बॅग चा पसारा आवरत बोलते."अहो ताई..सगळीकडे तीच परिस्थिती आहे. आता आम्ही सात जणी बहिणी,आमचे नवरे म्हणजे झाले किती चौदा जण. त्यात मोठ्या ताईची तीन मुलं आणि आमच्या प्रत्येकीच्या एक मुली. झाले किती तेवीस जण. माझा भाऊ आणि त्याची बायको झाले कीती पंचवीस जण आणि आई बाबा धरून सत्तावीस. दरवर्षी गणपतीचे दोन दिवस,दिवाळी आणि मे महिन्यात आम्ही गावी जमतो.""काय सांगता वहिनी? बापरे एवढ्या जणांच तुमची भावजय करते का हो?" सुप्रिया जरा शंकेने विचारत होती.


"हो करते ना. तिचं काय आम्ही पण सगळं करतो. सकाळी उठल्यावर आंघोळीपासून नाश्ता ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं आम्ही सगळ्याजणी मिळून करतो. माहेरी आलो म्हणून कुणाची तरी मुलगी असणाऱ्या वहिनीला राबवून नाही घेत. आपला पसारा आपण आवरायचा हा माझ्या आईचा नियम आहे. वहिनी भांडी घासते म्हणून उगाच काढ चमचा टाक घासायला,काढ प्लेट टाक घासायला असलं काही करत नाही."स्मृती बोलत होती."असचं पाहिजे गं वहिनी तर मज्जा येते. नाहीतर बाकी सगळे मज्जा करताहेत आणि आपण तेवढं मरमर करतोय!


"हो ना, माझ्या माहेरी नियमचं आहे असा.. माझ्या आईने घालून दिला आहे.परक्याची पोरं आपल्या घरी येते आणि आपण तिला मुलगी नाही मानली.. तरी निदान सून म्हणून तरी चांगली वागणूक दिली पाहिजे ती पण माणूसचं असते ना.. आपण आपलं हवं तेंव्हा माहेरी यायचं आणि भावजयला कामाला लावायचं..का? तर ती सून आहे म्हणून! आत्ताच बघा ना.. तुम्हीच म्हणालात ना तुमच्या नणंदा येतात आणि जिकडे तिकडे पसारा करून ठेवतात. तुम्ही पण तुमच्या माहेरी आला आहात ना?जरा इकडे तिकडे नजर फिरवा बरं घरावरून... मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला लगेच समजेल!" स्मृती एवढं बोलून कपडे धुवायला निघून जाते.


सुप्रिया घरावरून नजर फिरवते आणि तिला लक्षात येत. आपण घरात आलो तेंव्हा सगळ्या वस्तू जिथल्या तिथे होत्या आणि आपण आल्यानंतर काही वेळातचं मात्र घरभर पसारा झाला आहे. तिची बॅग सोफ्यावर होती, पर्स, शोकेसवर, मोबाईल टीव्ही जवळ होता तर मुलांचे कपडे खुर्चीवर... तिला ओशाळल्यागत झाले. ती पटकन उठली आणि सगळं जिथल्या तिथे करून ठेऊन पुन्हा आईच्या खोलीत जाऊन बसली.


"काय गं सुप्रिया..काय झालं?" प्रमिलाताईंनी म्हणजे सुप्रियाच्या आईने विचारलं.


"आई..सॉरी गं.."सुप्रिया डोळ्यात आसवं आणत बोलली.


"अगं पण काय झालं? कोणी काही बोलल का तुला?"


"नाही आई, पण आई इतकी वर्षे मी येत होते तेंव्हा तू कधीच मला माझी चूक दाखवून नाही दिलीस. मी इकडे आली की हवं तसं वागले आहे, पण कधीच टोकल नाहीस पण आज वहिनीने डोळे उघडले माझे. मी किती त्रास दिला अगं तुला. मी माहेरी आल्यावर तुला थोडी मदत करायची सोडून नुसती ऑर्डर देत राहिले. मला हवं नको ते सगळं करून खायला घातलसं पण त्याच कौतुक न करता नेहमी चुका काढत राहिले. माझ्या नणंदा कस वागतात हे सांगून पण कधीच तू मला नाही सांगितलंस की मी सुद्धा तशीच वागते. का आई? का?" सुप्रिया पोटतिडकीने विचारत होती.


"बाळा, ही गोष्ट खरतरं सांगण्यासारखी नसते. मुळात प्रत्येक मुलीने ही गोष्ट अंगिकारली पाहिजे. माहेर सुटलं म्हणून जेंव्हा जाऊ तेंव्हा मनमर्जीप्रमाणे न वागता आपलेपणाने वागावं. लहानाचे मोठे झालो असतो आपण तिकडे. एवढ्यात स्मृती आत येते.


"आई.. त्यांना त्यांची चूक उमगली आहे आता आणि ताई मला तुम्हाला दुखावण्याचा हेतू अजिबात नव्हता. ही गोष्ट कोणीतरी तुम्हाला सांगितली...शिकवली पाहिजे होती.आईंना ते नाही जमलं कारण त्यांना तुम्हाला दुखवायचं नव्हतं."


"वहिनी.. खरचं थँक्यु गं.. तुझ्या रुपात माझी चूक दाखवून देणारा नवीन गुरू मला भेटला आणि आई सुद्धा.. प्रेमाने समजवणारी आईच असते ना गं आणि आज तू माझी फक्त गुरु नाही तर आईही झालीस. असं म्हणत सुप्रिया तिच्या वहिनीला आणि आईला मिठी मारते. बाहेरून बघणार स्मृतीचा नवरा मात्र मनोमन तिघींच प्रेम बघून सुखावतो.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading

//