Jan 26, 2022
नारीवादी

सुन असावी तर अशी

Read Later
सुन असावी तर अशी

" काकू तुम्हाला काही त्रास होत नाहीये ना?" माधुरीने जोशी काकूंना विचारले.

जोशी काकू म्हणाल्या,"आज सकाळी उठल्यापासूनच जरा अशक्तपणा जाणवत आहे."

माधुरी म्हणाली," काकू सकाळी काही खाल्लं होतं की नाही?"

जोशी काकू म्हणाल्या," सकाळी माझ्या सुनेने काजू बदाम घालून शिरा केला होता, मला जास्त खाण्याची इच्छा नव्हती पण तिने बळजबरी स्वतःच्या हाताने मला खाऊ घातला."

माधुरी म्हणाली," काकू तुम्हाला डॉक्टरांनी काजू बदाम जास्त खाण्यास मनाई केलेली आहे बरं नाहीतर अजून त्रास होईल."

जोशी काकू म्हणाल्या," माझ्या पेक्षा माझी सून माझं व्यवस्थित पथ्यपाणी ठेवते, तिला सगळं काही माहीत आहे."

जोशी काकूंच्या बेडजवळ एक स्टूल होता त्यावर माधुरी बसली व म्हणाली," काकू मला तुम्हाला कधीचा एक प्रश्न विचारायचा होता. मी गेल्या दहा वर्षांपासून नर्स म्हणून काम करत आहे आणि माझी ड्युटी जास्तीत जास्त डायलिसिस वॉर्डलाच होती तर जे वयस्कर पेशंट डायलिसिस करण्यासाठी येतात त्यांच्या घरचे सर्वच जण वैतागलेले असतात, कोणीच त्यांच्याकडे प्रेमाने बघत नाहीत, सुरवातीच्या एक दोन डायलिसिसला सोबत कोणीतरी येऊन बसतं पण नंतर ते पेशंट एकटेच यायचे. ते डायलिसिस पेशंट एक्सपायर झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक सुटलो बाबा एकदाचे असा अविर्भाव असायचा. विशेष म्हणजे जर एखादी लेडीज पेशंट असेल तर बिचारीचे खूप हाल असतात, तिला कितीही त्रास झाला तरी एकटीलाच सहन करावा लागतो,त्यातील बऱ्याच जणी माझ्याकडे त्यांच्या लेक सुनाचे गाऱ्हाणे करत बसतात. ते सगळं ऐकून वाईट वाटतं पण मी स्वतः त्यांची जास्त मदत करु शकत नाही कारण मलाही एवढ्या पेशंट्स कडे लक्ष द्यावे लागते.

तुमचं डायलिसिस सुरु होऊन जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होत आले असतील बरोबर पण तुम्ही एकदम प्रसन्न मनाने येतात आणि प्रसन्न मनाने जातात. तुमची सून तुम्हाला नियमितपणे घ्यायला आणि सोडायला येते. सुरवातीला मला तर वाटले होते की ती तुमची मुलगी असेल म्हणून. तुम्ही सकाळी नाश्ता करुन येतात शिवाय सोबत डबाही घेऊन येतात, एवढं सगळं तुमच्या सुनेला कसं जमतं? आणि ती खरंच चांगली आहे की फक्त दिखाऊगिरी साठी हे सगळं करते."

जोशी काकू म्हणाल्या," माधुरी माझी सून लाखात एक आहे, तिला दिखाऊगिरी हा शब्द सुद्धा माहीत नाहीये. मुलगी जेवढं करणार नाही तेवढं माझी सून माझ्यासाठी करते आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले तेव्हा मी मनातून खूप खचले होते, तेव्हा माझ्या सुनेने मला आधार दिला. डायलिसिस सुरु केलं तेव्हा मला आठ दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते त्यावेळी माझी सून माझ्या सोबत राहिली होती. दिवसभर माझा मुलगा माझ्यासोबत रहायचा तेव्हा ती घरी जाऊन स्वयंपाक करुन डबा घेऊन यायची व रात्रीची माझ्या सोबत थांबायची. माझ्या सुनेचे नाव विनिता आहे. विनिता माझं सर्व अगदी मनापासून करत होती. हॉस्पिटल मधून घरी गेल्यावर वेळच्या वेळी मला औषधे देणे, माझं पथ्यपाणी सांभाळणे याकडे ती जातीने लक्ष द्यायची. विनिता इंजिनिअर आहे आणि ती एका कॉलेजात प्राध्यापक आहे. कॉलेजची हेक्टिक नोकरी सांभाळता सांभाळता ती माझी सेवा करते, आमचं घर सांभाळते. मला एक नात व एक नातू आहे, त्यांची शाळा, अभ्यास याकडे ती जातीने लक्ष देते. मला स्वयंपाक वाल्या बाईच्या हातचं जेवण आवडत नाही म्हणून ती माझ्यासाठी स्वतः स्वयंपाक करते.

विनिताने आजवर कोणत्याच गोष्टीबद्दल तक्रार केलेली नाहीये. विनिताला गाडी चालवता येत नव्हती, मला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी दरवेळी माझ्या मुलाला म्हणजे कुणालला सुट्टी घ्यावी लागायची मग तो चिडचिड करायचा म्हणून विनिताने ड्रायव्हिंग क्लास केला व ती गाडी चालवायला शिकली. माझं डायलिसिस असेल त्यावेळी ती बरोबर त्यावेळेत कॉलेज मधून निघून मला घ्यायला येते. डायलिसिसच्या दिवशी रात्री माझे हातपाय दुखले तरी ती माझ्या हातापायांना मालिश करुन देते. गेल्या दोन वर्षात विनिता माहेरी सुद्धा गेलेली नाहीये. माझा मुलगा तरी माझ्या दुखण्याला कंटाळला असेल पण विनिता कधीच कंटाळली नाही. ती एवढा संयम कुठून आणते ते देवच जाणे. कुणाला कधी कधी खूप चिडचिड करतो तेव्हा विनिता त्याला शांतपणे समजावून सांगते. 

कोरोना आल्यापासून तर विनिताचं काम दुप्पट झालंय. वर्क फ्रॉम होम असल्याने दोघेजण घरुनच काम करतात त्यामुळे कुणाल डायलिसिसला मला घेऊन यायचा व पुन्हा घरी घेऊन जायचा. आम्ही घरी गेल्याबरोबर विनिता दोघांनाही अंघोळीला पाणी द्यायची,आमचे कपडे लगेच धुवून टाकायची त्यावेळी तर कामवाली बाई पण बंद होती. बिचारी विनिता दिवसभर मुलांना सांभाळून आपले कॉलेजचे काम करायची आणि त्यात घरातील सर्वच कामे तिच्यावर येऊन पडायची.

विनिता आजवर माझ्यावर कधीच चिडली नाहीये. एखादी दुसरी सून असते तर ती सतत बडबड करत बसली असती पण विनिता काहीच बोलत नाही. उलट मी जेव्हा म्हणते ना की देवा मला हा त्रास सहन होत नाहीये आतातरी मला तुझ्याकडे घेऊन जा त्यावेळी विनिता डोळयात पाणी आणून म्हणते, 'आई असं अजिबात बोलायचं नाही, आम्हाला तुम्ही अजून हव्या आहात.' माधुरी मी खूप नशिबवान आहे की मला विनिता सारखी सून भेटली आहे. माझी मुलगी अमेरिकेत राहते ती एक वर्षापूर्वी मला भेटायला आली होती तेव्हाच ती मला म्हणाली होती की 'आई विनिता वहिनी जेवढी तुझी सेवा करत आहे तेवढी मी सुद्धा करु शकणार नाही. तुझ्या तब्येतीच्या सर्व तक्रारी ती किती संयमाने ऐकून घेते.' माझी मुलगी माझ्या रडगाण्याला थोड्याच दिवसांत कंटाळली होती. माधुरी आपल्याकडे तोच नवरा सात जन्म मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करतात पण मी मात्र मला विनिता सून म्हणून सात जन्म मिळू दे ही प्रार्थना सतत देवाकडे करत असते. सून असावी तर माझ्या विनिता सारखी असावी."

जोशी काकू व माधुरीच्या गप्पा सुरु होत्याच तेवढ्यात विनिता तिथे येऊन म्हणाली," माधुरी ताई आईंचं डायलिसिस अजून संपलं नाही का? आज त्यांना काही त्रास झाला का? सकाळपासून त्यांचा चेहरा खूप हिरमुसलेला वाटतो आहे."

माधुरी हसून म्हणाली," तुमच्या सारखी सून असताना तुमच्या सासूबाईंचा चेहरा कधी हिरमुसलेला असू शकतो का, दहा मिनिटांत काकूंचं डायलिसिस संपेल. तुम्ही आज लवकर आल्याच आहात तर माझ्या मनातला एक प्रश्न विचारते. तुम्हाला असं आठवड्यातून दोनदा हॉस्पिटलला येताना तुमची चिडचिड होत नाही का? आणि काकूंनी सांगितलं की तुम्ही न थकता त्यांची सेवा करत आहात. तुम्हाला खरंच या सगळयाचा कंटाळा येत नाही का? तुमच्यात एवढी सहनशक्ती कुठून आली आहे?"

विनिता म्हणाली," आईंनी तुम्हाला माझं जरा जास्तचं कौतुक सांगितलेलं दिसतंय. मी जे काही करत आहे ते माझं कर्तव्य म्हणून करत आहे, उपकार म्हणून नाही. माधुरी ताई माझ्या वडिलांची आई म्हणजे माझी आजी जवळजवळ सहा ते सात वर्ष एक जागेवर होती, तिचा स्वभाव भयानक होता, सतत बडबड करत असायची. माझ्या आईने काहीही तक्रार न करता तिचं सर्व केलं होतं तेव्हा मी एकदा आईला तुम्ही विचारला तशाच आशयाचा एक प्रश्न विचारला होता त्यावर आईने उत्तर दिले होते की हे बघ तुझ्या आजींचं माझ्यासोडून करणार कोणीच नाहीये आणि त्यांची सेवा करणे हे मी माझं कर्तव्य मानते. मला त्यांचं आजारपण काढणं चुकणार नाही तेव्हा चिडचिड करत, रडत खडत दिवस काढण्यापेक्षा आनंदाने आपलं कर्तव्य पार पाडायचं त्यामुळे ज्याची सेवा आपण करतोय त्यांनाही चांगलं वाटतं आणि आपल्यालाही मानसिक समाधान लाभतं, त्यांच्या जागी जर माझी आई असती तर मी हे सगळं केलंच असतं ना. माधुरी अश्या सहनशील आईची मी मुलगी आहे तेव्हा मला ही सहनशक्ती कुठून आली हे तुम्हाला कळलंच असेल. आमच्या आई माझ्या आजीच्या पाच टक्के पण नाहीत. 

आईंनी फक्त माझंच कौतुक केलं असेल त्या काय करतात हे सांगितलं नसेल ना? मला लग्नाआधी स्वयंपाक येत नव्हता तर आईंनी मला सर्व स्वयंपाक शिकवला, त्यांनी मला आईची माया दिली म्हणून तर मी त्यांना मुलीची माया देऊ शकले. माझ्या कुठल्याचं चुकीवर आई रागावल्या नाहीत. माझ्या सर्व चुका त्यांनी पोटात घातल्या असतील,माझं माहेर लांब असल्याने माझ्या दोन्ही डिलीवरी आईंनीच केल्या होत्या. हे सगळं एक आईचं करु शकते ना? मग अश्या आईची आपण थोडी फार सेवा केली तर कुठे बिघडणार आहे. मला सासुरवास ही गोष्टचं माहीत नाहीये. आमच्या नात्यात आईंनी त्यांचं कर्तव्य निभावलं आहे, आता कर्तव्य निभावण्याची माझी जबाबदारी आहे. माधुरी ताई आईंचं डायलिसिस संपलं आहे आणि मला कॉलेजमध्ये जायला सुद्धा उशीर होत आहे तर उरलेल्या गप्पा मारण्यासाठी तुम्ही आमच्या घरी या."

माधुरी म्हणाली," हो नक्कीच."

विनिता आपल्या सासूबाईंचा हात धरुन त्यांना डायलिसिसच्या वॉर्डबाहेर घेऊन गेली तेव्हा माधुरी मनातल्या मनात म्हणाली," सून असावी तर अशी."

©®Dr Supriya Dighe
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now