सुन असावी तर अशी भाग १

सासू-सुनेचं नातं

सुन असावी तर अशी भाग १


" काकू तुम्हाला काही त्रास होत नाहीये ना?" माधुरीने जोशी काकूंना विचारले.


"आज सकाळी उठल्यापासूनच जरा अशक्तपणा जाणवत आहे." जोशी काकूंनी उत्तर दिले.


" काकू सकाळी काही खाल्लं होतं की नाही?" माधुरीने विचारले.


जोशी काकू म्हणाल्या," सकाळी माझ्या सुनेने काजू बदाम घालून शिरा केला होता, मला जास्त खाण्याची इच्छा होत नव्हती पण तिने बळजबरी स्वतःच्या हाताने मला खाऊ घातला."


" काकू तुम्हाला डॉक्टरांनी काजू बदाम जास्त खाण्यास मनाई केलेली आहे बरं, नाहीतर अजून त्रास होईल." माधुरीने काकूंना आठवण करुन दिली.


जोशी काकू म्हणाल्या," माझ्या पेक्षा माझी सून माझं व्यवस्थित पथ्यपाणी ठेवते, तिला सगळं काही माहीत आहे. ती डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी पाळते. तिच्यामुळे मला काहीच लक्षात ठेवावं लागतं नाही."


जोशी काकूंच्या बेडजवळ एक स्टूल होता त्यावर माधुरी बसली व म्हणाली," काकू मला तुम्हाला कधीचा एक प्रश्न विचारायचा होता. मी गेल्या दहा वर्षांपासून नर्स म्हणून काम करत आहे आणि माझी ड्युटी जास्तीत जास्त डायलिसिस वॉर्डलाच होती तर जे वयस्कर पेशंट डायलिसिस करण्यासाठी येतात त्यांच्या घरचे सर्वच जण वैतागलेले असतात, कोणीच त्यांच्याकडे प्रेमाने बघत नाहीत. 


सुरवातीच्या एक दोन डायलिसिसला सोबत कोणीतरी येऊन बसतं पण नंतर ते पेशंट एकटेच यायचे. ते डायलिसिस पेशंट एक्सपायर झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक सुटलो बाबा एकदाचे असा अविर्भाव असायचा. विशेष म्हणजे जर एखादी लेडीज पेशंट असेल तर बिचारीचे खूप हाल असतात, तिला कितीही त्रास झाला तरी एकटीलाच सहन करावा लागतो. त्यातील बऱ्याच जणी माझ्याकडे त्यांच्या लेक सुनाचे गाऱ्हाणे करत बसतात. ते सगळं ऐकून वाईट वाटतं पण मी स्वतः त्यांची जास्त मदत करु शकत नाही कारण मलाही एवढ्या पेशंट्स कडे लक्ष द्यावे लागते.


तुमचं डायलिसिस सुरु होऊन जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होत आले असतील बरोबर पण तुम्ही एकदम प्रसन्न मनाने येतात आणि प्रसन्न मनाने जातात. तुमची सून तुम्हाला नियमितपणे घ्यायला आणि सोडायला येते. सुरवातीला मला तर वाटले होते की, ती तुमची मुलगी असेल म्हणून. तुम्ही सकाळी नाश्ता करुन येतात शिवाय सोबत डबाही घेऊन येतात, एवढं सगळं तुमच्या सुनेला कसं जमतं? आणि ती खरंच चांगली आहे की फक्त दिखाऊगिरी साठी हे सगळं करते."


जोशी काकू माधुरीच्या प्रश्नाचं काय उत्तर देतील ते बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all