सून आहे ती माझी

गोष्ट सूनेवर अविश्वास दाखवणाऱ्या सासूची
"रमा, ऑफिसला जाताना माझ्या पोस्टाच्या खात्यावर हे पैसे भर." सासुबाई म्हणाल्या आणि रमाच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"आई, उद्या भरते पैसे. आधीच उशीर झाला आहे. लेट मार्क पडला की पगार कट होतो मग."
रमा भराभरा आवरत म्हणाली.

"बरं, राहू दे बाई. मी माझ्या मुलाला सांगेन. तू तुझं आवरून जा ऑफिसला." सासुबाई चिडून म्हणाल्या.

"आई, मी उद्या भरेन नक्की." रमा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली आणि पाच मिनिटांत घराबाहेर पडली.

"आम्ही काय नोकऱ्या केल्या नाहीत की काय? सगळं सांभाळून नोकरी करत होतो आम्ही. आता यांची नोकरी काय निराळी आहे, देव जाणे!" उषा ताईंनी आपल्या मुलाला हाक मारली.
"आशिष, जाता जाता हे एवढे पैसे पोस्टाच्या खात्यावर जमा कर. मला होत असतं तर मीच गेले असते."
आशिष ऐकून न ऐकल्यासारखं करत आईच्या हातातून पैसे आणि पासबुक घेत तोही बाहेर पडला.

'शेवटी आपलं मूल ते आपलं मूल. परक्याच्या मुली सुना म्हणून घरी आल्या तरी त्या परक्या राहतात." उषाताई जाणाऱ्या आपल्या मुलाला खिडकीतून न्याहाळत राहिल्या.

संध्याकाळी आशिष आणि रमा दोघे एकत्र घरी आले. उषाताई अजूनही रमावर चिडून होत्या. ते रमाला जाणवलं होत. पण तिने फार लक्ष दिलं नव्हतं तर उषाताईंनी आशिषच्या आवडीचा स्वयंपाक कधीच करून ठेवला होता.

"आई, आज काय विशेष?" आशिष जेवणाचे ताट वाढून घेत म्हणाला.

"काही नाही..शेवटी मुलं आपल्या आईचं सगळं ऐकतात म्हणायचं. आईचे वय झाले तरी तिचा शब्द खाली पडू देत नाहीत. काहीही झालं तरी आपलं ते आपलचं आणि परकं ते परकंच." उषाताईंनी केलेला गोड पदार्थ आशिषच्या ताटात वाढला.

"हे काय? दोनच पानं का वाढली? रमाचं ताट कुठे आहे?" आशिष रमाला हाक मारत म्हणाला.

"ती घेईल वाढून. तू जेव." उषाताई तोंड वाकडं करत म्हणाल्या.

"रमा येऊ दे. मग सगळे एकत्र बसू." असे म्हणत
आशिष आपल्या मोबाईलमध्ये गुंग झाला.

"आई, एवढा घाट कशाला घालत बसलात? मी केलं असतं ना आल्यावर. तुम्हाला होत नाही आता. तुमचे पाय पुन्हा दुखायला लागतील अशाने." रमा फ्रेश होऊन बाहेर येत म्हणाली.

"तर..एक दिवस मुलासाठी करावं वाटलं मला आणि माझ्या पायाची काळजी तू करू नको. नोकरी करून घर सांभाळतेस हेच खूप आहे." उषाताई तोंड वाकडं करत म्हणाल्या.

आईचं बोलणं ऐकून आशिषने मोबाईल बंद केला. 'आता हिला काय झालं?' अशा नजरेने तो रमा कडे पाहू लागला. डोळ्यांनीच रमाने शांत रहा असे सांगतच तो मुकाट्याने जेवू लागला. रमा आपले ताट वाढून घेऊन आशिष समोर बसली.

"अगंबाई, किती ते बायकोच्या धाकाखाली राहायचं? तुम्हा दोघांच्या काय खाणाखुणा चालल्या आहेत ते कळत नाही की काय मला?" उषाताई रागाने म्हणाल्या.

"आई, काय चाललं आहे तुझं? आम्ही काय लहान आहोत का आता? आमच्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायला?" आशिष चिडलेला पाहून उषाताई गप्प बसल्या.

"ते सगळं जाऊ दे. आई, तुमचं पोस्टाचं पासबुक आणि पैसे द्या. उद्या नक्की भरून येईन." रमा खाली मान घालून जेवत म्हणाली.

"त्याची काही एक गरज नाही. आशिषने भरले पैसे सकाळीच." उषाताई अजूनही रागातच होत्या.
"आशिष, ते पासबुक माझ्याकडे दे. पुढच्या महिन्यापासून तुलाच भरावं लागेल."

पैशाचं नाव काढताच आशिषला ठसका लागला.
"अरे, काय झालं? पाणी पी आधी." उषाताई त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या.

जेवण झाल्यावर रमाने आवराआवर केली आणि ती आपल्या खोलीत आली. आशिष काहीतरी शोधत होता.

"काय हवं आहे?"

"ते पोस्टाचे पासबुक आणि पैसे.." आशिष ओशाळलेल्या नजरेने म्हणाला.

"हरवलं की काय? म्हणजे तू.. तू पैसे भरलेच नाहीस?" रमाला हसू येऊ लागलं आणि रागही आला.

"हो. बहुतेक. कामाच्या व्यापात विसरलं गं." आशिषचा गोंधळ ऐकून उषाताई त्यांच्या खोलीत आल्या.

"आई, ते पोस्टाचे पैसे आणि पासबुक हरवलं बहुतेक." आशिष उषाताईंना म्हणाला.

"पैसे हरवले म्हणजे? तू भरले नाहीस की काय?" उषाताईंना काहीच कळत नव्हतं.

"कामाच्या गडबडीत विसरलो मी. उद्या भरायचे म्हणून गाडीच्या डिक्कीत ठेवले वाटतं." असे म्हणत आशिष गाडीची किल्ली घेऊन बाहेर पळाला.

"काय म्हणावं या मुलाला? तूही तशीच आणि तुझा नवरा तर तुझ्या वरचढ निघाला!" उषाताईंना आता काय बोलावं हेच सुचेना. खाऊ की गिळू या नजरेने त्या आशिष गेला त्या दिशेला पाहत राहिल्या.

काही वेळात आशिष पैसे आणि पासबुक घेऊन आला. उषाताईंनी पैसे आणि पासबुक त्याच्या हातातून काढून घेतलं आणि थोडा विचार करून रमाच्या हातात दिलं.
"तूच भर बाई..एकवेळ उशीर झाला तरी चालेल. पण असा धसमुसळेपणा तुझ्या हातून व्हायचा नाही. हे ठाऊक आहे मला." उषाताईंना आपलं तोंड कुठे लपवावं हे कळेना.
'आता माफी मागावी तर कोणत्या तोंडाने? सकाळपासून उगीच रागराग केला हिचा. किती अविश्वास दाखवला हिच्यावर? परकी असली तरी माझी सून आहे ती. आपला मुलगा आपलं काम टाळेल. ही स्पष्ट बोलेल. पण काम टाळायची नाही.शेवटी कितीही झालं तरी सून आहे ती माझी.'

"आई, मी पैसे भरतो उद्या." आशिष उषाताईंकडे पाहत म्हणाला.

"काही नको. राहू दे. आता इथून पुढे मी माझ्या सुनेला सांगेन." उषाताईंच्या या वाक्यावर रमा मनमोकळं हसली आणि उषाताईही त्यात सामील झाल्या. या हसण्याने त्यांच्या मनातला कडवटपणा पार विरघळून गेला..अगदी कायमचा!

समाप्त
©️®️सायली जोशी.