सुमा आजी आणि तिचा बांगडी व्यवसाय भाग 3

सुमा आजी आणि तिचा बांगडी व्यवसाय भाग ३

कथा मालिका

शीर्षक- सुमा आजी आणि तिचा बांगडी व्यवसाय भाग 3

आजी, किती छान माहिती आहे तुला आणि मला एक सांग आता. तू कसे सांभाळणार हे सर्व. एवढ्यात रूपाची आई सुद्धा तिथे आली. अगं रुपा कां सतावतेस आजीला. रूपाची आई म्हणाली. अहो, आपल्या सर्व स्त्रिया, मुलींमध्ये एक दैवी शक्तीच असते बघा. अगं रूपा सकाळपासून घरची सगळी काम करताना, सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना स्त्रिची किती दमछाक होते. पण ती सर्व करतेच नां कारण ते करण्यातच तिला आनंद वाटतो. सुमा आजी म्हणाल्या. 


तुम्ही सर्वजण म्हणजे माझा परिवाराचं आहे तुझे आजोबा नसले म्हणून काय झाले. मी मुळूमुळू रडत बसणाऱ्यांपैकी नाही. आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड देता आलं पाहिजे. सुमा आजी तळमळीने बोलत होत्या. तर मी तुला बांगड्यां विषयी सांगत होते नां. वास्तविक काम करणाऱ्यांच्या हातात काचेच्या बांगड्या कमी टिकतात. पण तरीही काम करणाऱ्या स्त्रियांचे हात काचेच्या बांगड्यांनी भरलेले दिसतात. पूर्वी बांगड्यांचे फार प्रकार नव्हते. लग्नकार्यात नवरीला हिरवा चुडा भरतात. इतर स्त्रिया मग त्यांच्या मनाप्रमाणे वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या भरतात.


बांगड्या भरण्याची वेळ कोणती तर पाण्याने हात फुगला नसेल तर अगदी हळुवारपणे कासारीन बांगड्या भरायची. बांगड्या भरण्याचा जो हातखंडा असायचा त्यामुळे जास्त बांगड्या फुटायच्या देखील नाही. कासारणीची बांगडी बिलवर अशी हाळी ऐकली की चार-पाच घरच्या स्त्रिया बांगड्या भरण्यासाठी जमायच्या कारण शक्यतोवर परिचित व्यक्तीच्या हातूनच बांगड्या भरल्या जायच्या. बांगड्यांचे माप इंच, सेंटीमीटर याच्यात नसून "गाळा" या शब्दात मोजले जायचे. सव्वा दोन, दोन अशी माप. हाताचा पंजा दाबून नेमका तिचा गाळा ओळखणाऱ्याचे कौतुक करावे तेवढे थोडे. काचेची बांगडी हातात चढवताना ती फुटू नये याची दक्षता. पण फुटली तरी खंत नाही. कधी चुकून बांगडी चढवताना काच जर हाताला लागली तर भरणारीलाच जास्त वाईट वाटायचं. सुमा आजी सांगत होत्या.


अगं रुपा, तुला माहित आहे कां? मध्येच रूपाची आई म्हणाली. पूर्वी या कासारणीकडे ज्या फुटलेल्या बांगड्या असतात त्या आणून आम्ही खेळ खेळायचो. वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्यांचे काच एकत्र आणून मग त्या त्या रंगाच्या बांगड्या जोडल्या जायच्या. जो आधी बांगड्यांची रंग व माप जुळवेल तो विजयी. तसंच पूर्वी मातीची अंगणं असायची. घराच्या भिंती ही मातीच्याच असायच्या. अशा वेळी मग ओल्या मातीत त्या बांगड्यांच्या काचांची सुबक रांगोळी सुद्धा काढली जायची. माती वाळल्यावर ती काच मातीत घट्ट बसायची व त्यामुळे अंगणाची शोभा वाढत असे. इतकेच नाही तर घरांच्या भिंतीवर सुद्धा मातीत घट्ट करून त्या काचेच्या वेगवेगळ्या डिझाईन काढत. अशी ही बहुगुणी काचेची बांगडी.

क्रमशः

लेखिका - सौ. रेखा देशमुख


🎭 Series Post

View all