सुमा आजी आणि तिचा बांगडी व्यवसाय भाग २

सुमा आजी आणि तिचा बांगडी व्यवसाय भाग २

कथा मालिका

सुमा आजी आणि तिचा बांगडी व्यवसाय भाग २

हो गं रुपा, आता मलाही थोडासं सावरायला हवं. किती दिवस दुःख करत बसणार. मला असं दुःखी पाहून वरून तुझे आजोबाही दुःखी होतील. पूर्वी आमचा कासार समाजाचा बांगड्यांचा पिढीजात व्यवसाय असायचा. बांगड्यांचे घट्ट पॅकिंग असलेली बुरुडाची टोपली डोक्यावर घेऊन आम्ही गल्लीबोळातून फिरायचो. 'बांगडी बिलवर'अशी हाक ऐकली की स्त्रिया आम्हाला आवाज देऊन बांगड्या भरायच्या. आता विविध नामकरण झालेली पूर्वीची 'काकणं'आता वेगळीच प्रतिष्ठा घेऊन बाजारपेठेत दिसतात.


टोपलीत अतिशय कौशल्याने केलेली बांगड्यांची गुंफण, पॅकिंग बघतच राहायचे सर्वजण. गल्ली गल्लीत 'बांगडीवाली' म्हणत फिरताना मी सर्वांच्या ओळखीचे होऊन गेलेली. लग्नकार्यात तर आम्हाला भारी मान. पहिल्यांदा बांगडीच्या टोपलीला कुंकू लावून नंतर कासारणीला म्हणजेच मला कुंकू लावून  खणा नारळाने ओटी भरली जायची. आणि मग मी लग्नाच्या हिरव्या मंडपात बसायची आणि प्रत्येकीला तिच्या हाताच्या मापानुसार बांगड्या भरायची.


बांगडी भरताना आधी मनगट पकडून'तुझा हात तर खूपच नरम आहे गं बाई.'असं म्हणत सरसर बांगड्या भरून द्यायची अगदी एकही बांगडी न फुटता. मात्र एखादीचा हात थोडा कडक वाटला तर मोठं माप घेऊन बांगड्या भरल्या जायच्या यात बऱ्याच बांगड्या फुटायच्या सुद्धा. अलिकडे बाजारात खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या मिळतात. अत्यंत कल्पकतेने मांडलेल्या पुठ्ठ्यातून जास्त किमतीच्या तर कधी नुकत्याच बाजारात आलेल्या बांगड्यांमुळे स्त्रियांना जास्त शोधा शोध करून वेळ गमवावा लागत नाही.


' हात भुंडे नको ठेवू ग बाई' बघायला नाही बरं वाटत. अशी पूर्वीची धारणा आणि आताही अन् अजूनही अनेकांच्या मनामध्ये घर करून बसलेली. इतकेच नव्हे तर कधी कधी शब्दातून व्यक्त होणारी. कारण त्यांच्या मते सवाष्ण स्त्री ने बांगड्या घातल्याच पाहिजे. नाहीतर अपशकुन वगैरे वगैरे. अशावेळी कुणी लग्न झालेली स्त्री भुंड्या हाताने दिसली तर लगेच पाहणाऱ्यांमध्ये कुजबुज सुरू. अर्थात उघड उघड नाही. आज पेशा ,व्यवसायाची गरज म्हणून आधुनिक विचारांच्या स्त्रियांना बांगड्या अडचणीच्या वाटतात .


मात्र याच स्त्रिया लग्न समारंभ, सणवार ,धार्मिक विधी, उत्सव, नातेवाईकांच्या घरच्या कार्यक्रमात जाताना मात्र अगदी विविध रंगसंगतीच्या हातभर बांगड्या घालतात. म्हणजेच कोणत्याही स्त्रिचा मूळ स्वभाव नटण्याचा. मग त्यात बांगड्या ही आल्याचं.कारण त्यामुळे त्या स्त्रिचे सौंदर्य आणि आणखीनच खुलून दिसतं. काचेच्या बांगड्यांचे सौंदर्य हे सर्वात जास्त छाप पडणारे आहे. बांगड्यांमध्ये प्लास्टिक, लाख वगैरेच्याही बांगड्या असतात. पण काचेच्या बांगड्यांची मजा इतर बांगड्यांमध्ये नाही.

क्रमशः

लेखिका -सौ.रेखा देशमुख



🎭 Series Post

View all