सुमा आजी आणि तिचा बांगडी व्यवसाय भाग १

सुमा आजी आणि तिचा बांगडी व्यवसाय भाग १

सुमा आजी आणि तिचा बांगडी व्यवसाय भाग १

रूपा अगं ए रूपा...

अगं बाई, हा तर सुमा आजीचा आवाज. रुपा लगबगीने बाहेर आली. अगं आजी किती दिवसांनी आलीस. अगं माझं लग्न ठरलं. परवा साक्षगंध आहे. मला तुझ्या जवळच्या बांगड्या हव्या होत्या. सुमा आजीला पाहताच रूपा एका दमात सर्व बोलून गेली. अगं रुपा  दमानं घे जरा. सर्वप्रथम तुझं अभिनंदन. सुमा आजी म्हणाल्या.हे गं काय आजी. कुठे गेली होती एवढे दिवस? आम्ही सर्वजण तुझी आठवण काढत होतो. रूपा म्हणाली.


तुला माहीतच आहे रूपा. तुझ्या आजोबांना दम्याचा आजार.  तरी देखील ते कधी रिकामे बसले नाहीत.  अलिकडे त्यांचा दमा जास्तच वाढला. डॉक्टरांनी उपचार केले. पण एक दिवस ते मला एकटीला टाकून निघून गेले. असे म्हणत सुमा आजी रडू लागली. बापरे! आणि आम्हाला काहीच माहित नाही. पण तू रडू नकोस. आधी पाणी पी. शांत हो. आणि मग सांग सगळं. रूपाने असं म्हणताचं सुमा आजी शांत झाली.


रूपा अगं आई कुठे गेली?

आई मंदिरात गेली आहे आजी. रूपा म्हणाली. एवढ्यात रूपाची आई देखील घरी आली. आता हा व्यवसाय स्वतःच्या बळावर मी पुढे चालूच ठेवणार आहे. आज सर्वप्रथम मी तुझ्या घरी आले. मला कालच कुणाकडून तरी कळलं तुझ्या लग्नाबद्दल. सुमा आजी म्हणाल्या.हो नां गं आजी. तुला बघून खूप आनंद झाला मला.रुपा म्हणाली. आम्हाला मुलबाळ नाही. तरी आम्ही त्या गोष्टीचे दुःख मानून घेतले नाही. तुम्ही सगळी मंडळी म्हणजेच आमची मुले, मुली, सूना, नातू.सुमा आजी म्हणाल्या.


खरंच हो सुमा आजी. रूपाची आई म्हणाली. मी खूप वर्षापासून तुम्हाला पाहत आहे. कुणाकडे लग्न असेल किंवा इतर कार्यक्रम तुम्ही बोलावताचं हजर राहायच्या. इतकंच नव्हे तर प्रत्येक घरी नवरीचा चुडा तुमच्याकडूनच ठरलेला. एखाद्या गरीब घरी तर तुम्ही अगदी एक पै ही न घेता बांगड्या भरून द्यायच्या. समाजात तुमच्यासारख्या व्यक्ती आहेत म्हणूनच समाज टिकून आहे. खरंच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे तुमचं. 


मलाही खूप आनंद मिळतो बघा या सर्व गोष्टीतून. आणि रूपा हे समाजसेवेचं व्रत मी तुझ्या आजोबांकडूनच घेतलं. तुझे आजोबा म्हणजे अगदी साधं व्यक्तिमत्व. कुणाच्याही हाकेला धावून जाणं हा त्यांचा स्वभाव. पण आता मला एकटीला टाकून ते निघून गेले. सुमा आजीला दुःखी पाहून रूपाने विषयांतर करण्याच्या उद्देशाने सुमा आजीला म्हटले, आजी थोडं तुझ्या बांगड्यांच्या व्यवसायाविषयी माहिती दे नां.

क्रमशः

लेखिका 

सौ.रेखा देशमुख




🎭 Series Post

View all