सुलीची गौराई

Gaurai mazi ladachi

सुलीची गौराई

सुलेखा व सुयोगचं लग्न झालं,सत्यनारायणाची पूजा झाली. मांडवपरतणी झाली. दोघंजणं ठरल्याप्रमाणे हनिमुनला जाऊन आले. नवी सून संसारात रुळू लागली. 

शहरात असुनही मोठा वाडा होता त्यांचा. तिचे सासरे श्री. अभिजीत इनामदार हे सुविख्यात वकील होते. सासू ग्रुहिणी होती. वाड्याच्या सभोवताली मेंदीचं कुंपण होतं. बागेत क्रुष्णकमळीचा वेल होता. लालपिवळ्या फुलांची  कर्दळी होती.सासरेबुवा सकाळी स्वतः बागकाम करायचे. 

पपईच्या झाडाला पिवळ्याधम्मक पपई लगडल्या होत्या. आवळा,पेरु,चिकू,आंबा..सगळी झाडं लावली होती सासऱ्यांनी. एक कपभर कडक चहा दिला की खूष व्हायचे ते. सुलेखाही त्यांना झाडांविषयी बरेच प्रश्न विचारायची व तेही तितक्याच जिज्ञासेने त्यांची उत्तरं द्यायचे. 

सुलेखाच्या सासुबाईंचा जास्त तो वेळ स्वैंपाकघरातच जायचा व त्यांना आवडायचंही चवीढवीचं करुन वाढायला. मोदक तर इतके सुबक,कळीदार वळायच्या की पहातच रहावेत. मऊसूत पुरणपोळी,मसालेभात सारं काही आवडीनं करायच्या. सुलेखाही त्यांच्या हाताखाली शिकत होती. 

 इतक्या सुखाने ओतप्रोत भरलेल्या घरातही सुलेखाला एक गोष्ट खटकत होती,ती म्हणजे तिची नणंद. सुयोगने तिला एवढंच सांगितलं होतं की सात वर्ष मोठी त्याची बहीण आहे व तिचं लग्न झालं आहे पण तिने नणंदेबद्दल काही विचारलं तर तो सांगायला टाळाटाळ करायचा. 

सुलेखाला तिची आत्या आठवायची. किती आतुरतेने वाट पहायची ती आत्याची!  आत्या आली की तिच्या घरी  चैतन्य यायचं. 

आत्या माजघरात,ओट्यावर..सारीकडे फिरायची. सुलेखा व तिच्या मैत्रिणींसोबत त्यांच्या वयाची होऊन जायची. त्यांच्यासोबत लंगडी,खोखो,फुगडी,आंधळी कोशिंबीर कित्ती खेळ खेळायची ती. खेळ खेळताना आपलं लग्न झालंय..आपण आता मोठे झालोय हेच मुळी विसरुन जायची.

 आत्या बाळंतपणाला आली तेव्हा तिचं हळूहळू मोठं होणारं पोट पाहून किती प्रश्न पडायचे सुलीला. आत्याला ती बिनधास्त विचारायची कोणताही आडपडदा न ठेवता. आत्याही मग गोड लाजायची. म्हणायची,"सुले,तुही माझ्यासारखीच गं. या घरची गौराई. बघता बघता मोठी होशील. एक राजकुमार येईल पांढऱ्या घोड्यावरुन अन् तुला दूर देशी घेऊन जाईल. हे घर पुन्हा उसासे देईल.

 माझ्यासारखीच मग तुझीही आठवण काढेल. सुले,तुला माहित नसेल पण मी आले न् की आपल्या अंगणातली तुळस गोड हसून माझं स्वागत करते. हे आपलं अंगण मला ये गं म्हणतं. आपलं घर म्हणतं,'आली माझी बयो ती. बस आता निवांत.'

 तुझी आई तर किती लाड करते माझे. पुरणपोळी,ताकाची कढी,सुरळीची वडी,घावणघाटले..सगळे माझ्या आवडीचे जिन्नस करुन घालते हो. तरी माहेरी राहून चार दिवस झाले की बाई सासरची सय येतेच. सासूबाई आठवतात. त्यांचा मायेचा धाक आठवतो. मामंजींचा आपलेपणा आठवतो. आणि हे..इश्य..जाऊदे." आणि मग आत्याला एकेदिवशी आलेल्या त्या भयाण कळा. आत्या रडतविव्हळत होती. आजीने तिला मायफळाची मात्रा उगाळून दिली. 

आई तिच्या हाताला धरून तिला फिरायला लावत होती. आत्या कंबरेवर हात धरून फिरायची. वहिनी मी नाही गं वाचत यातून म्हणायची आणि..आणि नंतर आजीने छोट्यांना बाहेर पिटाळलं होतं. सुली व तिच्या सया ओटीवर बसल्या होत्य तरी बाळंतिणीच्या खोलीकडे कान होते सगळ्यांचे. तिचं ते प्रत्येक कळेसोबत ओरडणं ऐकून जीव तुटत होता आमचा.  

एकदाचा लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आजीने बाहेर येऊन सगळ्यांना मुलगी झाली म्हणून सांगितलं. आत्याची लेकही आत्यासारखीच गोरीपान,घाऱ्या डोळ्यांची,कुरळ्या केसांची..सुलीने आत्याला म्हंटलं,"आत्या, ही पण तुझ्यामाझ्यासारखी गौराई ना गं." आत्या म्हणाली,"हो गं,आपण सगळ्या गौराई..वयात काय तो फरक बाकी सगळ्याजणी एकच हो."

 खूप खूप आवडायचं सुलीला आत्याचं जवळ असणं पण बाळंतपणानंतर आत्या तिच्या घरी गेली मग मात्र अगदी पाहुण्यासारखी यायची फक्त दोन दिवसांसाठी.

 गौरीगणपतीला आवर्जुन यायची. सुलीची आई व आत्या दोघी मिळून गौराईला सजवायच्या. आत्या येताना गौराईसाठी एखादा दागिना,साडी,गजरे,चाफी घेऊन यायची शिवाय स्पेशल अत्तर घेऊन यायची तिच्यासाठी. काय सुगंध असायचा त्याचा! गौरीसाठी पुरणपोळ्या,विविध भाज्या,कुरडया,पापड..सगळं निगुतीने करायच्या. आत्या पोट भरुन जेवायची. आई आत्याची खणानारळाने ओटी भरायची. 

प्रत्येक मुलगी ही आईच्या पावलावर पाऊल ठेवून चालते. सुलीलाही तिच्या नणंदेच कौतुक करायचं होतं. तिला स्वतःच्या हाताने जेवू घालायचं होतं.गणपती येऊन दोन दिवस झाले. चौथ्या दिवशी गौराई यायची होती. तिची सारी तयारी करायची होती म्हणून गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी सुली आईकडून जाऊन आली. येताना गाडीत ती व सुयोग दोघेच होते. 

आज तिने सुयोगला गाडी एका आडगावाकडे वळवायला सांगितली. सुयोगला वाटलं..असावी हिची एखादी मैत्रीण..तिला भेटावसं वाटलं असेल.. पण गाडी बौद्धवाड्याकडे जाऊ लागली तसा सुयोग चपापला. 

का बरं.. सुली घेऊन आली इथे असा विचार आलाच त्याच्या मनात. एका मोठ्या घराजवळ गाडी थांबवली. सुयोगने प्रश्नार्थक नजरेने सुलीकडे पाहिलं. सुलीने त्याला नजरेनेच आत येण्यास खुणावलं. 

दारात दादावहिनीला बघून सुयोगची ताई मंजू फार आनंदून गेली. तिच्या सासूसासऱ्यांनी त्या दोघांच स्वागत केलं. मंजूने पाणी आणून दिलं. सुली ते प्याली पण सुयोग..सुयोग ते पिताना   घाबरत होता..दचकत होता. सुलीने लक्षच दिलं नाही. मंजूने फराळाचं ताट आणलं त्यातला बेसनाचा लाडू खाण्यात ती मग्न होती. 

सुयोगने बहिणीच्या डोळ्यांत पाहिलं आणि पाण्याचा घोट घेतला. गटागटा ते पाणी प्यायला. तो पाणी पीत होता तसतशा मंजूच्या डोळ्यातून आनंदाच्या अश्रुधारा ओसंडून वहात होत्या. सुयोगने ताईला मिठी मारली. तोही अगदी लहान मुलासारखा रडू लागला. तब्बल सहा वर्षांनी त्याच्या ताईचा प्रेमळ हात त्याच्या केसांतून फिरत होता.

 मंजूचा नवरा मनिष नुकताच घरात येत होता. तोही हे सारं पाहून चकित झाला. सुलेखा व सुयोगने मंजूच्या सासुसासऱ्यांना नमस्कार केला व मंजूला चार दिवस माहेरी घेऊन जातो म्हणून विनवणी केली. इतक्यात मातीने भरलेला डंपर घेऊन तिचा यश तिथे आला. " मम्मा,हे कोण आहेत" म्हणू लागला. सुलीने त्याला उचलून घेतलं. त्याचे मुके घेतले.

 सुली,यश व मनिषला घेऊन सुयोग,सुलेखा घरी आले. सुलीची सासू मंजूला पाहून हर्षभरित झाली पण नवऱ्यापुढे तिचा पाय उचलेना. अभिजीत इनामदार पोसवलेल्या केळीला पाणी घालत होते. 

आपली लेक इतक्या दिवसांनी घरी आलेली पाहून त्यांनाही गदगदून आलं. ते आपणहून पुढे आले व मंजुच्या आईस म्हणाले,"अहो,लेक पहिल्यांदाच माहेरपणाला आलेय. भाकरतुकडा ओवाळा. तिच्या पायावर पाणी घाला." मंजुच्या आईने पदराने डोळे पुसले. लगबगीने स्वैंपाकघरातून पाण्याने भरलेला गढू व भाकरतुकडा घेऊन आली. भाकरतुकडा मंजू,मनिषवरून ओवाळून टाकला. त्यांच्या पायावर पाणी घातलं. पापण्यांना पाणी लावलं.

 यशने विचारलच,"आई,हे कोणाचं घर?" आजोबांनी त्याला उचलून घेतलं व म्हणाले अरे हे तुझं आजोळ आणि मग त्याची ओळख घरातल्या प्रत्येक जागेशी करुन देऊ लागले. 

मंजू आईला बिलगली. रात्री साधं जेवण केलं. पहाटे उठून आन्हिकं आवरून मंजू व सुलीने गौरींना नटवलं,साडीचोळी नेसवली,फुलांची वेणी घातली. तिघींनी मिळून पुरणावरणाचा स्वैंपाक केला. गौरीगणपतीला नैवेद्य अर्पण केला. गौराईसमोर पंगत बसली. 

अभिजीतराव व सुयोगच्यामधे मनिषला बसवलं. यशला आजी भरवत होती. सुली सगळ्यांना वाढत होती. मंजूला तर आग्रहाने दोन घास जास्तच खाऊ घालत होती.

 सुलीची गौराई आज भरुन पावली होती. 

******

आजही अशा बऱ्याच गौराई आहेत ज्यांना दुसऱ्या धर्मात,दुसऱ्या जातीत लग्न केल्याने माहेर कायमचे परके झाले आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना तालासुरात गाणारी आपण किती प्रमाणात ती अवलंबतो हा प्रश्नच आहे. जातीभेद हा कागदोपत्री नष्ट झाला असला तरी अजुनही बऱ्याच सुशिक्षित कुटुंबात तो चालू आहे. प्रेम करताना ते जात बघून करावं की साथीदाराचं वर्तन,शिक्षण बघून करावं हाही एक प्रश्नच. सुना मात्र यात बदल घडवू शकतात. आपल्या दुरावलेल्या नणंदेला तिचं माहेर पुन्हा मिळवून देवू शकतात.

------सौ.गीता गजानन गरुड.