Login

सुखकर्ता दुःखहर्ता गणराया

About Lord Ganesh

कथेचे नाव   -  सुखकर्ता, दुःखहर्ता गणराया

विषय ---- गोष्ट माझ्या गणरायाची 



" नयना, मला तापाची कणकण वाटते आहे आणि डोकेही दुखते आहे गं."
विशाल आपल्या पत्नीला नयनाला म्हणाला.


"कोरोना टेस्ट करून घ्या. लक्षणे वाटतात आहे बरं तशी. मेडीकलमध्ये औषधे घेण्यासाठी कधी पेशंट येतात तर कधी त्यांचे नातेवाईक. त्यामुळे कोणाच्या तरी संपर्कात आल्याने त्रास होत असेल तुम्हांला.
आता आपला व्यवसाय मेडीकलचा..वर्क फ्रॉम होम करता येणे शक्यचं नाही. मेडीकल सेवा 24*7 असते आणि आता या कोरोना काळात तर आपली जबाबदारी अजून वाढली आहे. आपण सर्व प्रकारची काळजी घेतच आहोत. पण मनात काही शंकाकुशंका नको म्हणून तुम्ही करून घ्या टेस्ट."
नयना विशालला म्हणाली.

"मला वाटते व्हायरल इन्फेक्शन असेल.पण तू म्हणते तर करून घेतो टेस्ट, पण अगोदर डॉक्टरांना ही विचारतो. "
विशाल नयनाला म्हणाला.


विशाल फार्मासिस्ट होता आणि त्याचे मेडीकल ज्या हॉस्पिटलमध्ये होते, ते कोरोना सेंटर होते. मेडीकल सेवा ही कोरोना पेशंटसाठी महत्त्वाची होती.
त्यामुळे विशाल आपली जबाबदारी व्यवस्थित सांभाळत होता आणि त्याबरोबर कोरोना पेशंटसाठी मदतही करत होता. बेड मिळवून देणे,ऑक्सिजन सिलेंडर, इंजेक्शन्स उपलब्ध करून देणे. आपल्या कडून होईल तेवढी मदत करत होता. हॉस्पिटलमधून पेंशट कोरोनातून बरा होऊन घरी जात होता,तेव्हा विशाललाही बरे वाटायचे.

विशाल हॉस्पिटलमध्ये आला. डॉक्टरांनीही त्याला कोरोना टेस्ट करण्यास सांगितले. अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली. आर.टी.पी.सी. आर. चा रिपोर्ट उशीराने येणार होता.डॉक्टरांनी विशालला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.

नयना व मुलगा आरव यांना काही त्रास नव्हता; पण तरीही काळजी म्हणून त्यांचीही कोरोना टेस्ट केली. दोघांचीही अँटीजन निगेटिव्ह आली. त्यामुळे थोडेसे हायसे वाटले. पण विशालची काळजी वाटत होती.
दुसऱ्या दिवशी त्याचा आर.टी.पी.सी.आर. चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. विशालला कोरोनाची लागण झाली होती.
डॉक्टर म्हणाले , "नॉर्मल आहे,पण त्रास नको वाढायला यासाठी हॉस्पिटलमध्येच रहा. "
म्हणून विशाल हॉस्पिटलमध्येच राहिला.

घाबरण्यासारखे नसले तरी नयनाला विशालच्या तब्येतीची काळजी वाटत होती. रोज काहीतरी नवीनच ऐकायला यायचे, बातम्या ऐकून, पाहून अजूनच जीव घाबरायचा.
आणि दोन दिवसांनी गणेश चतुर्थी होती. सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार होते.
\"विशालशिवाय कसा होणार गणेशोत्सव?\" असे नयना विचार करू लागली.
नयना आणि आरव जरी कोरोना निगेटिव्ह होते तरी नियमानुसार त्यांना 14 दिवस घरातच क्वारंटाईन राहवे लागणार होते. कोणीही त्यांच्याकडे येऊ शकत नव्हते आणि तेही घराबाहेर कुठेही जाऊ शकत नव्हते.

त्यामुळे \"आपल्या घरी आता गणेशाची स्थापना कशी करावी? \" हा प्रश्न नयना समोर उभा होता.

कोरोनामुळे लोक खूप भयभीत झाले होते. कोणाच्या घरी कोरोना पेशंट आढळला तर घरातील इतर व्यक्ती तर घाबरत तर होतेच पण शेजारी, आजूबाजूचे व बिल्डिंगमधील लोकही घाबरत होते. एवढी कोरोनाची दहशत लोकांमध्ये पसरलेली होती.

नयनाच्या बिल्डिंगमध्ये, ज्यांच्याकडे दरवर्षी गणपती बसायचे;
त्यांच्या कडे यावर्षीही गणपती बसणार होते.
सोसायटीतही सार्वजनिक गणपती बसणार होता.

गणेशोत्सव म्हटला म्हणजे लहानथोर, गरीब-श्रीमंत सर्वांच्याच आनंदाला उधाण येते.
गणेशचतुर्थीच्या आठ-पंधरा दिवस अगोदरच तयारीला सुरुवात करतात. घरातील साफसफाई ,घर सजवणे,गणपतीसाठी छान आरास करणे. दाराला तोरण,दारासमोर रांगोळी.गणपतीसाठी रोज वेगवेगळा नैवेद्य. आरतीला, दर्शनाला एकमेकांच्या घरी जाणे. सत्यनारायणाची पूजा ठेवणे. सार्वजनिक मंडळाचे मोठमोठे गणपती. गणेशोत्सवा निमित्त घेतल्या जाणाऱ्या अनेक स्पर्धा, राबविले जाणारे अनेक उपक्रम हे सर्व खूप छान असते.दरवर्षी किती आनंद असतो गणेशोत्सवाला !
नयनाला हे सर्व आठवत होते.

पण ..या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून अनेक गोष्टींवर बंदी होती. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी काहीही नव्हते.सर्वजण सर्व नियमांचे पालन करून घरातल्या घरात का होईना गणेशोत्सव साजरा करणार होते.
बाकी काही कार्यक्रम नसले तरी गणपतीची स्थापना, पूजा केली तर खूप ..असे सर्व गणेशभक्तांना वाटत होते.
विशाल व नयनालाही गणेश आगमनाची उत्सुकता होती. त्यांच्या कडेही दरवर्षी गणपती बाप्पा यायचे.
यावर्षीही ते गणेशोत्सवाची तयारी करणारच होते आणि त्याअगोदरच विशालला कोरोना झाला.

विशालच्या कोरोनाचे कळल्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी, बिल्डिंगमधील या सर्वांचे विशाल, नयना यांना फोन येऊ लागले.
प्रत्यक्ष भेटणे शक्य होत नसले तरी त्या सर्वांचे बोलणे खूप धीर देत होते.
काही गरजेचे सामान बाहेरून आणायचे असेल तर शेजारी आणून देत होते .

नयनाला बिल्डिंगमधील तिच्या मैत्रीणीने गणपती स्थापनेसाठी लागणारी पूजेची सामग्री आणि गणपती बाप्पाची मूर्तीही आणून दिली.
कोरोना काळात लोकांनी एकमेकांना मदत करून माणुसकीचे दर्शन घडवून दिले.

विशाल हॉस्पिटलमध्ये असल्याने, नयनाचे तर कशातच लक्ष लागत नव्हते तरीही तिने आरवच्या मदतीने गणपतीसाठी छान आरास केली आणि गणपतीची स्थापना केली.


विशालला हॉस्पिटलमध्ये नाश्ता, जेवण सर्व मिळत होते.तिथे जाऊन त्याला भेटणे शक्य नव्हते.त्यामुळे फोनवरच व्हिडिओ कॉल करून बोलणे होत होते.

"तब्येत चांगली आहे,काही त्रास नाही,2-3 दिवसात घरी सोडतील." असे विशाल सांगायचा.
नयना व आरवला विशालशी बोलून , त्याला व्यवस्थित पाहून बरे वाटायचे आणि विशाललाही आपल्या कुटुंबाला भेटून बरे वाटायचे.

"आपल्या घरी विघ्ननिवारक, सर्व दुःखांना दूर करणारा दुःखहर्ता ,सर्वांना सुख देणारा सुखकर्ता विराजमान आहे. तो आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही. आपलेही संकट दूर करेल ." असे नयना विशालला म्हणायची.

रोज नित्यनेमाने आरती,गणपतीस्तोत्र,
गणपती अथर्वशीर्ष ,भजन नयनाचे सुरू होते. रोज वेगवेगळा छान नैवद्य करायची.नयनाला बागकामाची आवड होती. त्यामुळे तिच्या घरच्या बागेत तिने फुलझाडे लावलेली होती.त्या झाडांची फुले देवाला वाहयची. गणपतीचे आवडते जास्वंद तर रोजच असायचे.
विशालही व्हिडिओ कॉल वरून आरतीला हजर असायचा,बाप्पांचे दर्शन घ्यायचा.


उद्या विशाल घरी येणार म्हणून नयना व आरव आनंदी होते. विशालला बरे वाटत होते म्हणून घरी सोडणार होते. नयना गणरायाचे खूप खूप आभार मानत होती. उद्या विशालचे स्वागत कसे करायचे ? काय काय करायचे ? असे सर्व प्लँनिंग करता करता तिला झोप लागली. आणि खडकन जाग आली ती फोनच्या आवाजाने. तिने फोन घेतला , फोन हॉस्पिटलमधून आलेला होता.विशालची अचानक तब्येत बिघडल्याने त्याला आय.सी.यू. त नेले होते.
नयनाला तर मोठा धक्काच बसला होता.
तिने अशा अनेक घटना ऐकलेल्या होत्या; पेशंटला घरी सोडणारच होते,तो बरा झालेला होता आणि तो घरी न जाताच हॉस्पिटलमध्येच त्याचे जीवन संपते.त्यामुळे अशा अनेक विचारांनी तिचे मन दुःखी होत होते.रडणेही सुरू होते.
तिला वाटत होते,\"आता हॉस्पिटलमध्ये जावे आणि विशालला भेटावे.\"
पण शक्य नव्हते.
विशालशी तर फोनवर बोलणे होऊ शकत नव्हते . तिने डॉक्टरांना फोन केला.

"काही घाबरू नका , त्यांना थोडा श्वास घ्यायला त्रास होतो आहे, म्हणून आय.सी.यु.त ठेवले आहे. "
डॉक्टरांनी तिला सांगितले .
पण विशाल जोपर्यंत घरी सुखरुप येत नाही तोपर्यंत तिच्या जीवाला चैन पडणार नव्हते.
ती रात्रभर गणरायासमोर बसून होती. एकसारखी रडत होती. गणरायाला विनवणी करत होती.
"हे गणराया, विघ्नहर्ता,
तू सर्वांचे दुःख दूर करतोस.सर्वांना सुखात ठेवतो. भक्तांवर कृपा करतो.
माझा विशाल तुझी मनोभावे सेवा करतो. तो खूप चांगला आहे. त्याने कधीही कोणाचे वाईट केले नाही. सर्वांशी चांगलेच वागतो. आता कोरोनातही किती लोकांची सेवा करतो आहे. देवा,श्रीगणेशा, त्याच्या पुण्यकर्माचे काहीतरी चांगले फळ दे

हे गजानना, हे विघ्नहर्ता गणराया,
भक्तांची तुझ्यावर रे अगाध माया
असू दे आमच्यावर कृपेची छाया
पडते मी मनापासून तुझ्या पाया \"


दुसऱ्या दिवशी सकाळी तिने डॉक्टरांना फोन करून विशालच्या तब्येतीविषयी विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले,
"आता सर्व व्यवस्थित आहे, काहीही त्रास नाही. आजच्या दिवस आय.सी.यू.त ठेवू.उद्या किंवा परवा डिस्चार्ज देवू."

डॉक्टरांनी सांगितलेले ऐकून नयनाला खूपच आनंद झाला.
\"गणरायाने माझी प्रार्थना ऐकली व आमच्यावरील एक मोठे विघ्न दूर केले . आता विशाल सुखरूप घरी आला की माझ्या जीवात जीव येईल तोपर्यंत मनात धाकधूक सुरूच राहिल. \"
असे नयना स्वतः शीच बोलत होती.

दोन दिवसांनी विशाल घरी आला . त्याच्या जवळच्या मित्राने त्याला हॉस्पिटलमधून घरी आणले. विशालने,नयनाने त्याचे खूप आभार मानले. नयनाने विशालला ओवाळले. टाळ्या वाजवून त्याचे छान स्वागत केले. विशाललाही घरी आल्यानंतर,नयना व आरवला पाहून खूप आनंद झाला.
विशालने आंघोळ करून बाप्पाचे दर्शन घेतले.
विशाल आणि नयना दोघेही रडत होते. खूप मोठ्या संकटातून देवाने,गजाननाने आपल्याला वाचवले या भावनेने दोघांच्याही डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू होते.
त्यांची आपल्या गणरायावरील श्रद्धा, भक्ती, निष्ठा अजून दृढ झाली.

विशाल नयनाला म्हणाला," जीवनात संकटे येतच असतात गं,शरीर आहे तर आजार होणार. जन्म आहे तर मृत्यू आहेच. सुख सर्वांना हवं असतं. दुःख कोणाला नको असले तरी ते न मागता येतच असतं. आपल्यावर जेव्हा संकटे येतात,दुःख येतात ; तेव्हा आपण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो . देवाची आराधना करतो. प्रयत्न करणाऱ्या भक्तांना देव निश्चितच मदत करतो. दुःख सहन करण्याची शक्ती देतो.काही वेळा देवही आपल्या भक्तांची परीक्षा पाहत असतो. आपल्याला आपल्या चांगल्या वाईट कर्मांची फळेही भोगावीच लागतात.
मी कोरोनातून बरा होऊन सुखरूप घरी आलो. आपल्या सर्वांसाठी खरचं आनंदाची गोष्ट आहे. ही सर्व आपल्या गणरायाची कृपा."

नयना म्हणाली," तू आज घरी आला आणि उद्या बाप्पांचे विसर्जन ..यावेळी तर गणपतीत काहीच करता आले नाही. तुझ्या तब्येतीची काळजी आणि कोरोनामुळे निर्बंध ..घरीच होतो आम्ही. आणि आमच्या सोबतीला होते आपले लाडके बाप्पा. त्यांच्या आशिर्वादानेच तर सर्व शक्य झाले. तू नसताना गणपतीची स्थापना केली आम्ही. सर्व भगवंताची इच्छा. "


दुसऱ्या दिवशी,
नयनाने गणपतीबाप्पांना छान पंचपक्वानांचा ,मोदकाचा नैवेद्य केला. सर्वांनी आरती केली. आणि \"गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या...\"
म्हणत गणपती बाप्पांचे घरीच विसर्जन केले. विघ्नहर्त्या गणपतीला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला.
आणि नयनाने गणपतीला मनोभावे नमस्कार करून प्रार्थना केली ,

\" वक्रतुंड, एकदंत तू गजानन
गणेश,गणपती तू गजकर्ण
वरदविनायक, लंबोदर तू पार्वतीनंदन
सुखकर्ता, दुःखहर्ता तू सर्वात्मन
सर्व देवाधिकांमध्ये तू महान
अग्रपूजेचा तुला मिळतो मान
मोहक,मनोहर असे तुझे रूप छान
चौदा विद्या,चौसष्ट कलांचे तुला ज्ञान
तुझी भक्ती करतात सर्व भक्तगण
सर्वांना सुखी ठेव हे एकचं रे मागणं\"