Jan 19, 2022
सामाजिक

सुखीच्या लग्नाचं चर्हाट

Read Later
सुखीच्या लग्नाचं चर्हाट

#सुखीच्या_लग्नाचं_चर्हाट

सुखदाला चोवीसावं लागलं आणि तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी सुयोग्य वर शोधावयास प्रारंभ केला.

सुखदाच्या आईला आपसातले जीजी म्हणत. जीजीने तिच्या माहेरच्या गोतावळ्यात यंदा  सुखीचं कर्तव्य आहे म्हणून सांगितरलं. नानांनीही(सुखदाचे वडील) त्यांच्या मित्रांना व भावकीत सुखदासाठी सुयोग्य वर शोधत आहोत म्हणून जाहीर केलं.

सुखदा बीकॉम झाली होती व परळला एका कंपनीत अकाऊंटंट म्हणून कामाला होती. पगार तसा बेतास बात होता पण लेकीला घरी बसून रहाण्यापेक्षा निदान अनुभव गाठीस येईल व जगाची ओळख होईल म्हणून नानांनी तिला नोकरी करण्यास मंजुरी दिली होती. नानांचा धाकटा लेक सुजय आर्किटेक्चर शिकत होता. 

नानांनी आयुष्यभर इमानेइतबारे नोकरी केली होती. आता ते सेवानिवृत्त झाले होते. लवकरात लवकर सुखदाचं लग्न करुन द्यावं असं त्यांना वाटत होतं. त्याला कारण म्हणजे, प्रभातफेरीला गेले की कोणाचीतरी लेक कोणाबरोबर पळून गेली,त्यांचे प्रेम किस्सै,लफडी हे सर्व ऐकून नानांच्या छातीचे ठोके वाढू लागत. सुखदा तशी त्यांच्या ऐकण्यातली होती पण तिचा स्वभाव जन्मतःच फटकळ होता,जणू जन्माला येतानाच जीभेला धार लावून आली होती. प्रत्येक गोष्टीत खोट काढायच्या तिच्या स्वभावाने नाना व जीजींस जेरीला आणलं होतं.

शेजाऱ्यापाजाऱ्यांतही सुखदाचं जास्त जमत नसे. तिच्या गप्पांत एकतरी टोमणा हमखास असायचा. सुखदा खरं तर लग्नाला तयारच होत नव्हती पण तिच्या सोबतच्या तिच्या मैत्रिणींची लग्न झाली आणि रस्त्यावरचे ओळखीचे चेहरेही काय मग लाडू कधी असं थांबवून विचारु लागले तसं सुखीने ती लग्नाला तयार असल्याचं सांगितलं. ती नानांना म्हणाली," नाना,मी लग्न करायला तयार आहे पण माझ्या काही अपेक्षा आहेत?"

"सांग ग तायडे,तुझ्या सगळ्या अपेक्षांवर उतरणारा नवरा शोधून तुझ्यासमोर उभा करतो बघच तू." नाना म्हणाले.

नेने गुरुजींनी आणलेली चारही स्थळं सुखीने एकामागून एक नाकारली. दोघांनी तिला नाकारलं. खरंतर तिला बघायला आलेला पहिला तरुण राजस देठे हा  पैशाने वकील होता. प्रेक्टीस चांगली चालत होती त्याची. वडीलही वकील.होते. दोन बेडरुमचा ब्लॉक,दोन चार चाकी गाड्या,नणंदेचं लग्न झालेलं पण सुखीला नानांनी राजसशी एकांतात बोलू दिलं नि सुखीनं माती खाल्ली. तिने राजसला सरळ सांगितलं की लग्नानंतर आपण वेगळं राहू. मला तुझ्या आईवडिलांची सेवा वगैरे करत बसायला जमणार नाही. आय व्हॉन्ट टू एन्जॉय माय लाइफ. जॉइंट फेमिलीत राहून ते नाही जमणार. झालं राजस चिडला तिच्यावर,नानांवर नि नेने गुरुजींवरही. सखीने ते स्थळ हातचं घालवलं.

जीजी सखीवर चिडली,"अगो अशाने उजवायचीस कशी?"

"मी उजळच आहे. विको टरमरीक लावते. विको टरमरीक नहीं कॉसमेटिक विको टरमरिक आयुर्वेदिक क्रिम," म्हणत सखीने गिरकी घेतली व आरशात स्वतःचं रुप निरखू लागली.

"आई,तुला कसं कळत नाही गं. लग्न फक्त एकदाच करतात ना मग कशाला कॉम्प्रमाईज करायचं! माझ्या पसंतीचा नवरा मिळेपर्यंत मी नाही लग्न करणार."

"तो मिळायचा कधी..काही खरं नाही ह्या पोरीचं, रामेश्वरा."

सुखी तिच्या आवडीचा टीव्ही शो बघायला गेलीसुद्धा.

परत पंधरा दिवसांनी नेनेगुरुजी एक स्थळ घेऊन येतोय म्हणाले. नेनेंनी अगदी आईवडिलांसोबत न रहाणारा तरुण शोधला होता सुखीसाठी. हा देवेन. देवेन बँकेत मेनेजर होता. त्याचं कुटुंब पुण्यात रहायचं. तो मात्र सध्या दिल्रीला रहात होता. ठराविक वर्षांनी त्याची बदली होणार होती. देवेनने सुखीच्या वडिलांना तशी कल्पना दिली.तो म्हणाला," मला तुमची सुखी पसंत आहे. लग्नानंतर एकतर तिने माझ्यासोबत रहावं नि ठराविक वर्षांनी बिर्हाड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची तयारी ठेवावी नाहीतर मग माझ्या आईवडिलांसोबत आमच्या पुण्याच्या बंगल्यात रहावं. आधीच क्लिअर केलेलं बरं असतं. नंतर वाद नको."

नाना म्हणाले,"एवढंच नं त्यात काय मोठंसं आणि सुखीचं तुमच्यासोबत लग्न झालं की आम्हालाही देशभर फिरता येईल. आग्र्याचा ताजमहाल पहाता येईल, नाशिकात आलात की त्र्यंबकेश्वराला जाता येईल, ..एकुणच काय सुखीच्या धर्माने आमचीही चंगळ होईल. 

नेने गुरुजी म्हणाले,"तरी तुम्ही सुखदास विचारुन घ्या नि दोनेक दिवसांत मला निरोप कळवा मग मी देवेनच्या आईवडिलांना बोलावून घेतो पुढील बैठकीसाठी."

नेने गुरुजी व देवेन निघून गेटच्या बाहेर जाताच सुखीने  साडी सोडून ठेवली.

"आई गं,किती गरम झालं ह्या साडीत." सुजय घरी होता. तो म्हणाला,"मग काय ताई,यंदा कर्तव्य आहे."

"ए तू गप्प बसं हं पेंद्या. तुला काय कळतंय त्यातलं."

"अगं तायडे,बँकेत मेनेजर आहेत देवेन भाओजी. तुलाही चिकटवतील एखाद्या जागेवर."

"मला नाही करायचं त्याच्याशी लग्न."

"आता काय झालं?"जीजी म्हणाल्या.

"अगं आई तो असा सदा फिरतीवर रहाणारा. त्याच्यासोबत संसार करायचा म्हणजे ठराविक वर्षांनी भटक्या जमातींसारखं संसार गुंडाळून दुसऱ्या ठिकाणी जावं लागणार..परत तिथे एडजस्ट होणं..मुलांची शाळा बदलणं..किती ती जुळवाजुळवी."

"मग तू रहा की पुण्यात सासूसासऱ्यांसोबत. पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात नं. तुझ्या मुलांचं शिक्षण सुरळीत होईल तिथे." सुजय म्हणाला

"आ हा हा..म्हणे रहा सासूसासऱ्यांसोबत. मला नाहीच रहायचंय सासूसासऱ्यांसोबत. मला एकाच ठिकाणी शांततेत संसार करायचाय आणि तो काय या देवेनसोबत सुरळीत होईलसं वाटत नाही. ओ नाना,माझा नकार कळवा हं."

नानांनी कपाळावर आलेला घाम रुमालाने टिपला.

एकदा जीजीच्या सख्ख्या बहिणीने तिच्या दिराच्या मुलाचं स्थळ आणलं. मुलाने तिला एकटीलाच भेटायला बोलावलं होतं. सुखीही खूश झाली..नेहमीसारखी साडी नेसावी लागणार नाही म्हणून. ठरवल्याप्रमाणे एका हॉटेलात सुखी पोहोचली. तिने मस्टर्ड कलरचा टॉप व ब्राऊन कलरचा नी लेंथचा स्कर्ट घातला होता. केस एका साईडने पिनअप करून पुढे घेतले होते. ड्रेसला साजेसा मेकअप केला हाता व पायात हाय हिल्स घातल्या होत्या. खांद्याला ब्राऊन कलरची लेदरची पर्स होती व डोळ्यावर आकर्षक गॉगल. जयसिंगरावाने तिचा फोटू पाहिला होताच. त्याने तिला ओळखलं व बुक केलेल्या टेबलवर घेऊन गेला. 

जयसिंगरावाने खुर्ची मागे ओढून आधी तिला बसू दिलं,मग तिच्याकडे बघून स्मितहास्य करत आपण समोरच्या खुर्चीवर बसला. दुपारची वेळ होती म्हणून त्यांनी जेवणच मागवलं. मटरपनीर,रोटी,लस्सी,पुलाव..साधसं जेवण. जयसिंगने तिला स्वतःची ओळख करुन दिली.
"नमस्कार, मी जयसिंगराव पाटील. सध्या पुण्यात कामाला हाये. आमचा लई मोठा वाडा हाय कोल्हापुरात. अंबाबाईचं देऊळ जवळचं हाय बघा आमच्या वाड्यापासनं ढ्यांगभर अंतरावर. तिथं आमची आई,बापू,थोरला भाव नि वयनी र्हात्यात. भावाला दोन पोरं हायती थोरला पिट्या,प्रतिक  नि धाकटी आमची गौराई. लय गुनी बाळं हायती. मी पुन्यात रहातो. डिप्लोमा इंजिनिअर हाय आपुन. पाच वर्स झाली नोकरीला लागून. फलाटबी घितलाय पुन्यात."

सुखीनेही तिची ओळख सांगितली तोवर जेवण आलं. भाजी नी रोटी खाऊन होताच जयसिंगरावाने पुलाव हाणायला सुरुवात केली,तेही पाची बोटांनी. त्याला ते जेवण सपक लागलं य्हणून त्याने व्हेज कोल्हापुरी मागवलं व भातावर ओतून घेतलं. अजुन पुलाव मागवला. हवं तसं तिखट लागताच घपाघपा घास मारु लागला. सुखीची रोटी संपताच त्याने तिच्या पुलावावरही दोन मोठ्ठे चमचे व्हेज कोल्हापुरी घातलं. दोनेक चमचे पुलाव खाताच तिच्या नाकातोंडातून पाणी निघायला लागलं."

जयसिंगराव म्हणाला,"ह्याला म्हणत्यात जेवान नाययतर कसलं सपक दिलं हुतं अदुगर. लगीन झाल्यावर तुम्हास्नी लाल,तांबडा रस्सा खाऊ घालतो. आपल्याला समदं जेवण बनिवता येतं बघा."

जयसिंगरावाचा निरोप घेऊन सुखी घरी आली. 

"आई,त्या मावशीला सांग ग. कसला नवरा बघितला तिनं माझ्यासाठी.. सोंग नुसतं. ह्या एवढ्या मिश्या..लस्सी प्याला की मिश्यांना भरवली तोच जाणे. गबाळं ध्यान नुसतं. नुसते कपडे टकाटक घालून होत नाही. बोलणं हवं  
प्रमाणभाषेत. हा फक्त शिकायचा म्हणून शिकला बाकी खेडूतच राहिला. काट्याचमच्याची पद्धतच नाही नि किती तिखट खातो. मलाही खायला लावलन्. नको बाई असला अजागळ नवरा मला."

आता मात्र मावशीही सुखीला फोनवर खूप बडबडली पण सुखीने जयसिंगरावावर काट मारली ती मारलीच.

 चौथा पोरगा तिच्या मामाने आणला सोबत. यावेळी जीजींसोबत नानांनीही तिला बजावून सांगितलं होतं की आता ही तिची नसती थेरं चालणार नाहीत. पंजाबी ड्रेसवर सुखी चहा व कांदेपोहे घेऊन गेली. मामासोबत आलेला रवी सावंत हा मालवणचा होता. रवी म्हणाला,"मी सध्या भाड्याच्या घरात रव्हतय पन आपुन दोगा  मिळून घर घेवया नि लोनचो हफ्तो फेडुया. माझे आऊसबापूस गावी  रव्हतत. वरसातसून येकदोनदा आपनाक नि आपले पोराटोरांका बगूक येतीत तवा तुया स्वैन रवाक व्हया. माज्या आयेवांगडा भांडलला मिया खपून घेवचय नाय. बाकी माका तू पसंत आसस." 

झालं, मामा रवीला स्टेशनवर सोडून आला. सुखी सलमान खानचा पिक्चर बघत बसलेली. मामा म्हणाला,"मग सुखदे,आवडलाना रवी. अरे आवडणारच शेवटी चॉइस कोणाचीय. पाच आकडी पगार कमवतोय. हुशार आहे पोरगा."

"मामा,हुशार असो नाहीतर मठ्ठ. मला नको असला नवरा."

"का गं बाई,काय वाईट आहे रवीत? सरकारी नोकरी आहे. उंचापुरा,तगडा आहे. बरं तुला राजाराणीसारखं नांदायचंय तेही मान्य केलं त्याने मग तुझं घोडं अडलं कुठं?"

"अरे भाऊ,ही पोरच अवदसा. नुसती नावं ठेवते प्रत्येक पोराला. स्वत:ला ऐश्वर्या राय समजते." जीजी म्हणाली.

"मी सांगितलं ना मला नाही आवडला तो रवी का फवी. किती काळा आहे तो नि दात किती फुढे त्याचे. केसपण पिकलेत. काका शोभतो तो माझा काका."

"असं असेल तर तू लव मेरिजच कर बाई. आम्हाला अक्षता टाकायला बोलव. आम्ही येऊ," असं म्हणून मामा निघून गेला. होता होता सुखी एकोणतीस वर्षाची झाली. लग्न काही जुळत नव्हतं नि तिच्या आडमुठ्या स्वभावामुळे कुणी तिच्या प्रेमातही पडत नव्हत़.

सुखदाच्या मावशीच्या मुलीचं जयसिंगरावाशी लग्न झालं.   सुखदा सुट्टी नसल्यामुळे तिच्या लग्नाला गेली नाही पण एका वर्षात मावशीच्या नलुला जुळं झालं तेव्हा मात्र बारश्याला ती आईसोबत जयसिंगरावाच्या कोल्हापूरच्या वाड्यावर गेली. 

जयसिंगरावांच्या आईने त्यांना शेत दाखवून आणलं. भुईमुगाचा मळा,लांबवर पसरलेला उसाचा मळा,भातशेती,ज्वारीची,मक्याची वाऱ्यावर डोलणारी कणसं,पालेभाज्या हे सारं पाहून जीजीला सुखदाचा जास्तच राग आला. हाती आलेली लक्ष्मी तिने तिच्या क्षुल्लक अपेक्षांपायी धुडकावली होती. नलुचे लवकुश तर इतके गोजिरे होते की बस रे बस. जेवणही झक्कास होतं. भरपूर पुरण घातलेल्या मऊसूत पुरणपोळ्या,कटाची आमटी ..सगळी पाहुणीमाणसं यथेच्छ जेवत होती. दुसऱ्या दिवशी पाहुण्यासाठी सुखं मटण,भाकऱ्या,तांबडापांढरा रस्सा होता. जयसिंगराव मनात कोणताही किंतू न ठेवता सुखी व तिच्या आईशी तोंड भरुन बोलत होता. सुखीलाही जाणवत होतं की तिने बाह्यरुपावरुन त्याला दिलेला नकार हा चुकीचा होता.

जयसिंगरावाने सुखीला व जीजीला गाडीत बसवून दिलं. भेट म्हणून त्यांच्या गुर्हाळातला गुळ,भुईमुगाच्या शेंगा,खव्याचे पेढे असं बरंच काही दिलं. गाडीत दोघीही गप्प गप्प होत्या. घरी आल्यावर सुखीने मामाला फोन लावला.
"मामा,त्या रवी सावंतचं लग्न झालं का रे?"

"कोण रवी सावंत?"

"अरे तो नाही का तू माझ्यासाठी घेऊन आला होतास."

"हं. त्याचं काय आता?"

"अरे तो सिंगल असेल तर मी तयार आहे त्याच्याशी लग्न करायला."

"आगं पण काळा आहे ना तो."

"असूदे चालतय मला. रंगाचं काय देवाचा देवबी काळा असतोय."

"आगं पन तो काका वाटतो ना गं तुझा."

"माssमा"

"बरं बरं. सुबह का भुला शाम को वापस आये तो उसे भुला नहीं कहते. तुझ्या मामाला चालंल पण रवीसाहेबास्नी विचारलं पाहिजे."

"आता लगेच साहेब का."

"आगं मंग. ती कसली परीक्षा दिली त्यांनी नि आता डिपुटी कलेक्टर झालेत ते."

मामाने सुखी व रवीची भेट घडवून आणली.

रवीने तिला सांगितलं,"मी आता मोठं घर घितलंय नि माझे आऊसबापूसव माज्यासोबत रव्हतत. तुका(तुला) त्यांची अडचण होतली असात तर अगुदरच सांग."

" मुळीच नाही होणार अडचण. मला आवडेल त्यांची सोबत."

तुळशीचं लग्न झाल्यावर रवी व सुखदाचं धुमधडाक्यात लग्न झालं.

दोन वर्षांनी रवी व सुखदाच्या संसारवेलीवर एक टपोरी कळी फुलली. सुरभी नाव ठेवलं तिचं.

बारश्याला सगळे नातेवाईक हजर होते. सुखीचा मामा जावईबापूंसाठी सफारीचं कापड,सुखीसाठी रेशमी साडी व बाळंतविडा घेऊन आला होतो. मामीने सुखीची ओटी भरताच मामाने सुखीला विचारले,"काका खय(कुठे) गेलो गो तुझो??"

सुखी क्रुतककोपाने मामाकडे पाहू लागली.

--------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now