सुखी रहायचा हक्क तुला ही आहे भाग 4 अंतिम
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
ते दोघ घरी आले. निधीने खिचडी केली होती. अदितीने जेवायची तयारी केली. नितीन गप्प होता. काहीतरी विचार करत असल्या सारखा बसुन होता . कस बोलू आई बाबांशी. आज नको. नंतर बोलतो.
दुसर्या दिवशी जेवणा आधी तो आई, बाबा, निधी जवळ हॉल मधे बसलेला होता. अदिती इकडे ये. मला थोड बोलायच आहे सगळ्यांशी . सगळे त्याच्या कडे बघत होते.
अदिती काळजीत होती. घरचे ऐकतील की नाही.
"आई बाबा तुम्हाला वाटत ना तुमच्या दोघी मुलांनी सुखी असाव."
"हो वाटत."
"शांत पणे ऐका मी काय म्हणतो ते. माझे साहेब आहेत ना ऑफिस मधले त्यांचा लहान भाऊ लग्नाचा आहे. त्यांची पत्नी एका वर्षा पुर्वी वारली. मूल बाळ नाही. शिकलेले लोक आहेत. त्यांना निधी बद्दल माहिती होत. माझ्या लग्नात त्यांनी निधीला बघितल होत. त्यांच्या कडून विचारता आहे ते निधी साठी. "
" म्हणजे?" बाबा आईंकडे बघत होते. निधी गोंधळली होती.
" बाबा निधीच लग्न करायला हव. "
" अरे आपल्यात होत नाही पुनर्विवाह . दुसर लग्न शक्य नाही. " बाबा बोलले.
" ते जून झाल. तुम्ही निधीचा विचार करा. एवढ मोठ आयुष्य आहे तिच्या पुढे. कस जगेल ती. "
" अहो मला नितीन म्हणतो ते पटत. पोरगी सुखात रहायला हवी." आई बोलल्या.
बाबा विचार करत होते. "नातेवाईक काय म्हणतील? लोक बोलतील. "
"जेव्हा आपली पोरगी दुःखात होती तेव्हा कुठे होते ते लोक? ते काही नाही मला निधी खुश झालेली हवी आहे ." आई नितीन कडे बघून बोलल्या.
" तुम्ही माझ्यावर सोडा बाबा. समाजाला काय उत्तर द्यायच ते मी बघतो. निधी साठी आपण हा निर्णय घ्यायला हवा ." नितीन समजावत होता.
"ठीक आहे माझी काही हरकत नाही. " बाबा बोलले.
" निधी तुला काय वाटत? " नितीन विचारत होता.
वहिनी.. ती एवढ बोलली.
अदिती तिच्या जवळ गेली." निधी आता माघार घेवू नकोस."
" मला जमेल ना पण वहिनी? परत लग्न. सासरचे लोक. मला भीती वाटते ग. त्यात लोक म्हणतात मी चांगली नाही. माझ्या पायगुणा मुळे अस झाल. "
" अस काही नसत निधी. तू खूप छान गोड मुलगी आहेस. या घरची लक्ष्मी आहेस. आयुष्य खूप मोठ आहे. नवीन सुरुवात कर. कसलाच विचार करू नकोस. आता चान्स आहे. होकार दे. सुंदर आयुष्य तुझी वाट बघत आहे .हे सांगता आहेत ना शिकलेले नवीन विचाराचे लोक आहेत. काळजी करू नकोस. "
"ठीक आहे वहिनी. मी तयार आहे ." ती खुश होती.
"निधीचा होकार आहे." अदितीने सांगितल. सगळे खुश होते.
रविवारी मुलाकडचे लोक बघायला येणार होते. अदिती निधीला तयार करत होती." छान दिसते आहेस निधी. "
" वहिनी मला सुचत नाही काही. तिकडे एडजेस्ट होईल ना मी?"
" निधी घाबरू नकोस. एकदम रिलॅक्स रहा. हे होणार नात अगदी मनापासून निभव. घरच्यांचा खूप आदर कर. त्यांच्यावर खूप प्रेम कर. तुझ खूप छान होणार आहे. त्यात तू दिसते किती गोड. मुलाकडचे एकदम खुश होतील."
मुलाकडचे आले. आकाश अतिशय हॅन्डसम होता. मोठ्या कंपनीत वरच्या पोस्ट वर होता. वागायला चांगला वाटत होता. तो सगळ्यांशी बोलत होता. नवीन विचारांचे लोक सगळ्यांना खूप आवडले.
" मला निधी सोबत बोलायच आहे. "आकाश डायरेक्ट बोलला.
" जा बेटा. "
" वहिनी तू चल. "
" नाही निधी. जा मोकळ बोल. "
ती आकाश कडे बघत होती. "चल निधी." त्याने आवाज दिला.
निधी आकाश बाहेर फिरायला गेले. दोघ परत आले. खूप खुश दिसत होते. दोघांनी होकार दिला.
जवळचा मुहूर्त बघून लग्न झालं. निधी सासरी गेली. दोघ फिरून आले. ती आज माहेरी आली होती . आल्या आल्या ती अदितीच्या गळ्यात पडली. "वहिनी थँक्स. मला माहिती आहे हे तूच केल."
"मग खुश ना?"
"हो खूप आकाश चांगला आहे. "
"तू माझी आवडती नणंद आहेस. तू नेहमी खुश रहायला हवी. आता फिरून वगैरे झाल असेल तर अभ्यासच बघा मॅडम. परीक्षा जवळ येते आहे." दोघी हसत होत्या.
अदिती खुश होती. निधीला तिचा संसार तिच्या वाट्याच प्रेम मिळाल होत.