सुखी कुटुंब

Katha Sansarachi

"अनु, आईला बरं नाही. तू चार दिवस सुट्टी काढ." योगेश चिडून आपल्या बायकोला म्हणाला.

"इतके दिवस मला सुट्टी काढणं शक्य आम्ही रे. ऑफिसमध्ये खूप काम आहे सध्या." अनु आपला डब्बा भरत म्हणाली.
"आणि तसंही सुट्टी काढून काय करू? मी फक्त दहा ते सहा या वेळेत घरी नसते. बाकी घरच्या कामात, कर्तव्यात काही कसूर तर ठेवत नाही ना? तू सकाळी दहाला जातोस ते रात्री आठला उगवतोस. तुझी आई माझ्या एकटीची जबाबदारी नाही आहे ना? तुझीही आहेच की."

'जबाबदारी' हा शब्द ऐकून योगेश आणखीनच चिडला.
"तू काय बोलतेस? याचं तरी भान आहे का तुला? तू या घरची सून आहेस हे लक्षात ठेव अनु."

"तेच लक्षात ठेऊन मी माझी सगळी कर्तव्य पार पाडते आहे. तुझ्या आईने मला कधीच माया लावली नाही की कधी समजून घेतलं नाही. कायम माझा दुस्वास केला. मग आता त्यांच्या विषयी माझ्या मनात अचानक प्रेम कसे निर्माण होईल? पण तुझी आई म्हणून मी त्यांचा आदर करते आणि मला त्यांची काळजीही वाटते." अनु शांतपणे म्हणाली.

"हे सगळं आत्ता बोलायची काही गरज आहे का? अगं, तिला गरज आहे आपली. बघतेस ना, किती खराब झाली आहे तिची तब्येत?" योगेश तणतण करत म्हणाला.

"सॉरी. पण विषय निघाला आणि मनातलं ओठावर आलं इतकंच. पण योगेश, तू दोन दिवस सुट्टी घेऊन बघ. आईंच्या सहवासात राहा. त्यांना खूप बरं वाटेल.
बरं आई, मी येते आणि बाबा, काही लागलं तर फोन करा." असे म्हणत अनु ऑफिसला निघून गेली.

"बघितलं बाबा, कशी वागते ही? तेही आपल्याच माणसांशी?" योगेश अजूनही रागातच होता.

"अनुचं काय चुकलं ते आधी सांग मला." बाबा हातातला पेपर बाजूला ठेवत म्हणाले. "घरचं सगळं करून जाते ती. कामावरून पुन्हा आल्यावर तिच करते सारं. शिवाय तुझ्या आईचं आवरून जाते, तिला दोन घास भरवून जाते. तिची औषध, पथ्य-पाणी सगळं तर सांभाळते! आता आणखी काय करायला हवं तिने?"

"हो. मान्य आहे मला. पण आईसाठी दिवसभर तिने घरात राहायला नको का? त्या वेळेत तिला काय हवं, काय नको ते बघायला हवं की नको?" योगेश आता बऱ्यापैकी शांत झाला होता.

"त्या मधल्या वेळेत मी आहे ना? त्याची काळजी तू का करतोस? आपल्या बायकोकडून अपेक्षा करण्याआधी आपण घरात किती लक्ष देतो हे महत्वाचे नाही का?
योगेश, आईच्या औषधांपैकी तुला एका औषधाचे नाव तरी लक्षात आहे? किंवा तिला चेकअपला किती दिवसांतून न्यायला लागते हे तरी माहित आहे? नाही ना? मग तिचे पथ्य -पाणी तरी ठाऊक आहे?" बाबांचा आवाज चढला होता.
हे पाहून योगेशची मान आपसूकच खाली गेली. "आज साडेपाचला डॉक्टरांकडे आईची अपॉइंटमेंट आहे. बघ तुला यायला जमतं का?" बाबा पुढे म्हणाले,

"इतरांकडून अपेक्षा करण्याआधी आपण घरची कुठली कामं जबाबदारी घेऊन करतो, हे आधी पाहायला हवं. घरची जबाबदारी केवळ स्त्रियांचीच असते की काय? तिला भक्कम आधार, तिची साथ देऊन त्या जबाबदारीचं ओझं पुरुषांनीही पेलायचं असतं." बाबा चिडून म्हणाले.

यापुढे योगेश काही बोलू शकला नाही. कारण लग्न झाल्यापासून घरची जबाबदारी अनुवर टाकून तो निर्धास्त झाला होता आणि अपेक्षेप्रमाणे अनु सगळे सहन करत, कोणतीही तक्रार न करता त्याला एक 'पत्नी ' म्हणून साथ देत होती. हे तिचं साथ देणं अनुला गृहीत धरण्यासाठी खूप होतं. त्यातच सासुबाईंनी दिलेल्या वागणुकीमुळे अनुच्या
मनात असुरक्षिततेची भावना तयार झाली होती.
यातून बाहेर पडण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी सासऱ्यांनी तिला खूप मदत केली होती.

"तू अनुला बोलायचा प्रश्नच येत नाही योगेश. ती सून म्हणून घरची सगळी जबाबदारी पार पाडते आणि तू मुलगा असून देखील..जाऊ दे. मी शांत राहणं पसंत करतो कारण मला घरात वाद, तंटा नको आहे."

"पण बाबा, पुरुषाला कुठे संसाराचा अनुभव असतो?" योगेश आपली बाजू सावरून घेत म्हणाला.

"तसा अनुभव स्त्रीलाही नसतो. तो वयानुसार, जबाबदारीनुसार येत जातो." बाबा म्हणाले.

आता पुढे वाद न घालता योगेश ऑफिसला निघून गेला खरा. पण कामात त्याचे लक्ष लागत नव्हते. दोन -तीन चुकाही झाल्या म्हणून मॅनेजरने त्याला चांगलेचं धारेवर धरले.
"ऑफिसमध्ये टीमवर्क असतं. असं आपल्याच नादात राहून काम करण्याची ही कुठली पद्धत?" मॅनेजर चांगलेच भडकले होते.

योगेशने त्यांची माफी मागितली. पण यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनाही बोलणी खावी लागली. यावर थोडा विचार केल्यावर योगेशच्या लक्षात आले, सर्वांनी मिळून -मिसळून काम केलं तर एक छान टीम तयार होते आणि त्यातूनच तयार होतं एक सुदृढ नातं!

त्याने लगेचच अनुला फोन लावला. "आज आईची अपॉइंटमेंट आहे, तर मी दवाखान्यात जातो. तू तुझे काम आटोपून ये."

'हा बदल अचानक झाला तरी कसा?' योगेशचे बोलणे ऐकून अनुला खूप आश्चर्य वाटले.

बरोबर पाच वाजता योगेश घरी हजर झाला. "बाबा, मी आईला घेऊन जाऊन येतो. तुम्ही घरीच थांबा. उगीच तुम्हालाही दगदग होईल." असे म्हणत योगेशने आईला आधार देत गाडीत बसवले.

"बरं झालं तू आलास. नाहीतर हल्ली अनुची खूप ओढाताण होते रे." आई कशीबशी म्हणाली. "मला तिची माफी मागायची आहे. पण धीरच होत नाही."

"आई, तुला वाटतं ना तू चुकीचं वागलीस? मग सॉरी म्हणून टाक तुझ्या सुनेला."
योगेश सहज बोलून गेला. आपल्या लेकाचा आणि बायकोचा हा संवाद ऐकणारे यशवंतराव मनातून खूप सुखावले. कारण त्यांच्या मनातल्या सुखी कुटुंबाचे चित्र पूर्ण होणार होते..तेही अनेक वर्षांनी!

समाप्त.
©️®️✍️सायली जोशी.