सुखाच्या भिंती- भाग अंतिम

Eka Gharachi Gosht
शनिवार उजाडला. आज अभय भलताच एक्साईटेड होता. वंदनाताई आणि सुशीलाबाई दोघी आपापसात कुजबूज करत आणि अभय आल्यावर शांत बसत. त्याला कळेना, या दोघींचे नक्की काय चालले आहे? अभयने एक दोनदा विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्याला कोणी काही सांगितले नाही. 
आता मुलीकडील मंडळी कधीही येतील म्हणून वंदनाताईंनी आधीच सगळी तयारी करून ठेवली होती. 

इतक्यात बेल वाजली. तसा अभय कोचवर एका कोपऱ्यात जाऊन बसला. मुलीचे आई -वडील, काका, मामा आणि प्रत्यक्ष मुलगी अशी मंडळी आत आली. तसे वंदनाताईंना काय करू आणि काय नको असे झाले. 

"इथे यायला फारसे कष्ट नाही ना पडले?" वंदनाताई हसून म्हणाल्या.

"नाही तर..अहो खच्चून तासाभराचा प्रवास. तुम्हाला तर माहिती आहेच." मुलीचे वडील म्हणाले.

वसंतरावांनी अभयची सर्वांना ओळख करून दिली. अभयला मुग्धा आवडली होती. मात्र आता तिच्याकडे नजर वर करून बघण्याचे त्याचे धाडस होईना. गोरा रंग, सडपातळ बांधा, घारे डोळे, चाफेकळी नाक, लांबसडक केस..अभयने कशीबशी आपली नजर वर केली आणि मुग्धाला पाहून घेतले.


हसत खेळत चहा -पोह्यांचा कार्यक्रम पार पडला. अभय आणि मुग्धा बाहेर जाऊन एकमेकांशी बोलून आले.

"वसंतराव आम्हाला मुलगा पसंत आहे. 
आता केवळ तुमच्याकडून पसंती येणे बाकी आहे म्हणायचे. अहो, आपले सूर जुळले तर सोन्याहून पिवळं! असा योग कोणाच्याही भाग्यात नसेल. कसे?" मुलीचे वडील म्हणाले.

"मुलगी शोभते हो तुला." सुशिलाबाईंनी आपल्या नातवाला हळूच खूण केली.

"बाबा, मला मुग्धा पसंत आहे." अभय कसाबसा म्हणाला.
हे ऐकून साऱ्यांना खूप आनंद झाला. वसंतरावांनी आनंदाने मुलीच्या वडिलांना अक्षरशः मिठीच मारली. वंदनाताई आणि सुशीलाबाईंच्या चेहऱ्यावर तर आनंद मावत नव्हता.

"तुमची सगळी माहिती आम्हाला आधीच कळली होती आणि आपला शेजार खूपच उत्तम आहे बरं. अजूनही तिथले लोक वंदना वहिनी, सुशीलाबाई यांना नावाजतात. 
पण मुलगा आणि माणसे प्रत्यक्ष पाहण्याआधीच पसंती कशी कळवायची? म्हणून आम्ही गप्प राहिलो. तुम्ही घर सोडलं आणि महिन्याभराने आम्ही तिथे आलो. नंतर आम्हाला शेजाऱ्यांकडून कळालं, सुरेशरावांनी तुम्हा लोकांना फसवून घर विकलं आहे. हे आधीच माहिती असतं, तर आम्ही तुमचं घर विकत घेतलंच नसतं." मुग्धाच्या आई वंदनाताईंना म्हणाल्या.
"पण योग बघा कसा? मुग्धा आमची एकुलती एक मुलगी. आता जे तिचं तेच तिच्या नवऱ्याचं!"

अभयला कळेना, ही मंडळी नक्की काय बोलत आहेत? आणि आपल्या घरची लोकं इतकी का खुश होत आहेत?
"मला कळेल? नक्की कशाबद्दल बोलत आहात तुम्ही सगळे?" अभय न राहवून म्हणाला.

"वंदना, आता तुझं गुपित फोडावं लागेल बरं." सुशीलाबाई अभयच्या जवळ येत म्हणाल्या,
"आपलं पहिलं घर यांनीच तर विकत घेतलं आहे. आपण तिथून बाहेर पडलो आणि सुरेश एका आठवड्याने तिथून बाहेर पडला. नंतर ही मंडळी तिथे राहायला आली. रागाच्या भरात आपण घर कोणाला विकलं, याची विचारपूस देखील केली नाही." 

"हो आणि ज्या विवाह संस्थेत तुझे नाव नोंदवले त्याच संस्थेत मुग्धाचे नाव नोंदवलेले होते. तिचा फोटो पाहताच मला ती आवडली होती. बाकी माहिती बघता आपल्या जुन्या घराचा पत्ता होता! मग मी लागलीच मुग्धाच्या आई -वडिलांशी फोनवर बोलले. त्यांनी तिकडे आपली सगळी माहिती काढली आणि आम्ही इकडे.
सुदैवाने या स्थळाबाबत तू आम्हाला फार काही विचारले नाहीस. मग आम्हीही ठरवलं, तुला सरप्राईज द्यायचं. आता काय एकमेकांची पसंती झाली! हा असा योग जुळून आला म्हणायचा." वंदनाताईंचे डोळे आनंदाने भरून आले.

"त्यावेळी कोणीतरी म्हंटले होते. चांगल्या माणसांसोबत नेहमी चांगलेच घडते. जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच." वसंतराव खुश होऊन म्हणाले. 

हे ऐकून अभयला खूप आनंद झाला. या बैठकीत लग्नाचा मुहूर्त ठरला आणि महिन्याभरात अभय आणि मुग्धाचे लग्न पार पडले.

एक रीत म्हणून वसंतरावांनी आपल्या भावाला अभयच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. पण या लग्नाने सुरेशराव आणि छायाकाकू पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाच्या जवळ आले. 
"दादा, आपल्या कुटुंबापासून दूर गेल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांची किंमत आम्हा दोघांना कळली.  अनेकदा माफी मागितली तरी, आम्ही केलेली चूक सुधारता येणार नाही." सुरेशरावांना पश्चातापाचे अश्रू अनावर झाले.

"सुरेश, नाती कर्माने जोडली जातात. पण त्या नात्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आदर असला तर ती आयुष्यभर सोबत करतात. तुझ्या या चुकीसाठी मी तुला माफ करू शकत नाही. पण मोठा भाऊ म्हणून तुला समजून घेण्याचा अजूनही प्रयत्न करतो आहे." वसंतरावांनी आपल्या धाकट्या भावाला गच्च मिठीत घेतले. वंदनाताई आणि छायाकाकू हा सुखाचा सोहळा भरल्या डोळ्यांनी पाहत राहिल्या आणि त्याही एकमेकींच्या मिठीत सामावल्या..कधी ते कळलेच नाही.
सुरेशरावांनी आपल्या भावाला शब्द दिला." दादा मी तुझ्या शब्दाबाहेर इथून पुढे कधी जाणार नाही."
----------------------------------

इकडे मुग्धा आणि अभयचा संसार सुरू झाला. दोघेही संसारात अगदी छान रमले.
------------------------------

मुग्धाच्या आई -वडिलांनी दिलेले आमंत्रण स्वीकारून, एक दिवस वसंतराव आणि सुरेशराव संपूर्ण कुटुंबासह आपल्या जुन्या घरी आले. आपले घर पाहून सुशीलाबाईंना खूप आनंद झाला. त्यांनी आपल्या कुटुंबाकडे एक नजर टाकली. 
'आज तुमची कमी खूप जाणवते आहे. हे भरलं घर सोडून तुम्ही गेलात. त्यानंतर अनेक अडचणी आल्या. आपली मुले चुकली. पण सुदैवाने आज सगळे एकत्र आहेत आणि कायम एकत्रच राहतील.' सुशीलाबाईंनी आपल्या यजमानांच्या आठवणीत आपले डोळे पुसले. 
सारं घर त्यांनी पुन्हा एकदा फिरून पाहिलं. घरात बरेच बदल झाले होते. मात्र या घराच्या 'सुखाच्या भिंती 'अजूनही दिमाखात तशाच उभ्या होत्या. जणू सर्वांना सांगत होत्या, 'घराच्या चार भिंतीत नात्यांचं सुख समावलेलं असतं आणि हेच सुख घराला घरपण देतं.


समाप्त.

©️®️सायली जोशी.







🎭 Series Post

View all