डॉक्टरांनी वसंतरावांना तपासले. "मनावर अति ताण येऊ देऊ नका. फक्त एवढी काळजी घ्या." डॉक्टर म्हणाले आणि त्यांनी काही औषधे लिहून दिली. वसंतरावांची अवस्था समजताच अभय तडका फडकी सुट्टी घेऊन घरी आला. तो येईपर्यंत वसंतराव बऱ्यापैकी सावरले होते.
अभयने सुरेशरावांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. "काका, घर विकण्याचा निर्णय मागे घ्या. हवं तर ते दहा लाख मी फेडायचा प्रयत्न करतो." पण सुरेशरावांनी त्याचेही ऐकले नाही.
अखेर खटपट करून अभयने ओळखीने आपल्या ऑफिसच्या जवळ एक लहानसा फ्लॅट मिळवला. तसेच त्याने ओळखीने आपल्या पगारावर लोन देखील काढले आणि वसंतरावांनी काळजावर दगड ठेवून सामानाची बांधाबांध सुरू केली.
सुशीलाबाई आणि वंदनाताई एकसारख्या रडत होत्या. एकमेकींना समजावत होत्या.
अभय आणि वसंतरावांची अवस्था काही वेगळी नव्हती. वसंतरावांचा खूप जीव होता या घरावर. कितीही झालं तरी हे घर वडिलोपार्जित होतं. गेली पंचेचाळीस वर्षे ते इथे राहत होते. याच घरात लहानाचे मोठे झाले, इथेच चांगली नोकरी मिळाली, लग्न झाले आणि गेली सव्वीस वर्षे त्यांनी याच घरात सुखाचा संसार केला.
सामानाची बांधाबांध झाली. पण वसंतरावांचा घरातून पाय निघेना. भलं परसदार, घरापुढचं मोठं अंगण, घराच्या उजव्या बाजूला असणारी नारळाची एकसारखी झाडं, मुख्य दरवाजापाशी असणारा, बहरलेला जाईचा वेल.. वसंतरावांनी मागे वळून पुन्हा एकदा डोळे भरून सगळं पाहून घेतलं.
पाठोपाठ आलेल्या सुशीलाबाई तुळशी कट्ट्यापुढे वाकल्या. 'काही चुकलं असेल तर क्षमा कर.' थरथरत्या हातांनी त्यांनी तुळशी माईला नमस्कार केला.
वंदनाताईंच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. 'या घरात माप ओलांडून आले अन् सासुबाईंनी सून नव्हे तर मुलगीच मानले मला. हळूहळू या घरात रुळले. तसा घराचा कोपरान् कोपरा ओळखीचा झाला. या घराने खूप माया दिली..खूपच.'
हे सारं पाहून छायाकाकू जवळ जवळ ओरडल्या, "बस् झाली नाटकं. आता सामान बांधता की देऊ.."
"आमच्याबद्दल तुझ्या मनात इतका द्वेष का आहे तुलाच ठाऊक. आम्हाला फसवून तुम्ही दोघांनी हे घर विकलं. देव पाहतो आहे सगळं. तोच न्याय करेल." वंदनाताई छायाकाकूंना म्हणाल्या.
निघताना वसंतराव लहान मुलासारखे ओक्साबोक्षी रडू लागले. सुरेशरावांच्या स्वभावामुळे घर हातचे गेलेच. पण आपल्या माणसांनी फसवल्याचे दुःख जणू त्यांच्या डोळ्यातून वाहत होते.
"सुरेश, आजपासून तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला." वसंतरावांचा आवाज कापरा झाला
सुरेशरावांची दोन्ही मुलं, नेहा आणि रवी आपल्या काकांच्या जवळ आली. "काका, मान्य आहे, आई -बाबांची मोठी चूक झाली. त्यांच्या स्वभावापुढे इलाज नाही. पण त्यासाठी इतकी मोठी शिक्षा नका देऊ. तुम्ही आमच्यासाठी काय केलं, याची जाणीव आहे आम्हाला. निदान आम्हाला तरी दूर लोटू नका." हे ऐकून वसंतराव काहीच न बोलता वंदनाताईंचा हात धरून पुढे आले.
शेजार -पाजारची गोळा झालेली माणसे त्यांना धीर देऊ लागली. वंदनाताईंना गळ्याशी धरून शेजारच्या बायका रडू लागल्या. कुणाच्या डोळ्यांत पाणी तर कुणाच्या मनात आठवणी फेर धरून नाचत होत्या.
"ताई, धीर सोडू नका. आल्या परिस्थितीला सामोरे जा. आत्ता वेळ वाईट आहे. पण चांगल्या माणसांसोबत नेहमी चांगलेच घडते. विश्वास ठेवा. थोडा धीर धरा." कुणीतरी म्हणाले.
इकडे काका काही बोलत नाहीत, हे पाहून रवी अभय जवळ आला. "दादा, मी माफी मागतो. झाला प्रकार मलाही आवडला नाही. बाबांना मी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते कोणाचे ऐकत नाहीत आणि त्यांना आईची साथ आहे म्हंटल्यावर आपण आणखी बोलायचा प्रश्नच येत नाही."
"रवी, आपल्याच माणसांकडून होणारा वार जिव्हारी लागतो." न राहवून अभयच्या डोळ्यात पाणी आले. मागे वळून त्याने आपले घर डोळ्यात साठवून घेतले.
इतक्यात टेम्पो आला आणि अभय सामान भरण्यासाठी निघून गेला.
"बरं झालं, नसती ब्याद गेली. इतकी वर्षे यांच्या गुलामीत राहिलो. कमावणारे हे आणि घरात राबणारे आम्ही! आता इथून पुढे एकत्र राहण्याचा प्रश्नच येत नाही." छायाकाकू डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं करत म्हणाल्या.
"किती दुस्वास करशील गं आपल्याच माणसांचा? तुझ्या कर्माची तुला फळं भोगावी लागतील. हे चांगलच लक्षात ठेव. पण तेव्हा वेळ गेलेली असेल." सुशीलाबाई आपल्या सुनेला म्हणाल्या.
इतक्यात सुरेशरावांना काय वाटले कुणास ठाऊक? ते आपल्या भावाजवळ आले आणि म्हणाले, "दादा, तुझे पैसे जमा झाल्यावर लगेच पाठवून देतो. काळजी करू नको." यावर वसंतरावांनी काही प्रतिक्रिया दिली नाही.
सामान भरून झाले आणि वसंतराव आपल्या कुटुंबासह शहरात निघून गेले.
क्रमशः
शहरात आल्यावर वसंतराव, वंदनाताई रुळतील?
सुरेशराव आणि छायाकाकू पुढे कसे वागतील? यासाठी पुढचा भाग वाचायला विसरू नका.