"दादा, तुला या कागदांवर सही करावीच लागेल." आपल्या हातातले कागद सर्वांसमोर नाचवत सुरेशराव अधिकारवाणीेने बोलत होते.
"सुरेश, तू असे कसे करू शकतोस? माझा विश्वास बसत नाही रे. पुन्हा एकदा विचार कर. तुझा निर्णय मागे घे." बोलता बोलता वसंतरावांच्या डोळ्यात पाणी आले.
"हे बघ दादा, म्हणजे तुला चांगली नोकरी आहे. तुझी बायको, म्हणजेच माझी लाडकी वहिनी उत्तम कमावते. तुझा मुलगा एका मोठ्या कंपनीत, बड्या पॅकेजच्या नावाखाली कामाला लागला आहे. मग आणि काय हवं तुला?
जरा माझ्याकडे बघ. मी वयाच्या पंचवीस वर्षापासून नुसत्या खस्ता खाल्ल्या. आज ही नोकरी, तर उद्या ती नोकरी. त्यातच लग्न झालं. दोन मुलं झाली. इतकी वर्षे मी कसा संसार रेटला, माझे मलाच माहीत."
"भाऊजी, म्हणून तुम्ही हे राहतं घर विकायला काढलंत? आपलं एकत्र कुटुंब! आजवर आमच्या सोबत तुम्हाला काही कमी पडू नये म्हणून आम्ही कष्ट करत आलो. भाऊजी, सगळ्या नोकऱ्या तुम्ही केवळ तुमच्या विचित्र स्वभावामुळे गमावल्या. हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यात आमची काहीच चूक नाही." वंदना वहिनी पुढे होत म्हणाल्या. "अहो, ऐका माझे. या कागदावर सह्या करू नका. सर्वात मोठा हिस्सा या..या सुरेश भाऊजींच्या नावे होईल आणि आपण कमी हिस्सा घेऊन जाणार तरी कुठे?"
यावर वसंतराव काहीच बोलले नाहीत.
"तर, म्हणे जाणार कुठे? यांनी खोऱ्याने पैसा कमावला तो साठवलाही असेल! तोच पैसा वापरा म्हणावं आता घर घ्यायला. आमचा हिस्सा आम्हाला द्या आणि तुम्ही कुठे जायचे तिथे जा. मला आता एकत्र राहायचे नाही पुन्हा." छायाकाकू नाक मुरडत म्हणाल्या.
"छाया, आम्ही कमावलेला पैसा या घरासाठी, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरला. आता आमच्याजवळ शिल्लक फार कमी आहे." वसंतराव मध्येच म्हणाले.
सुशीलाबाई आत खोलीत बसून आपली मुले काय बोलत आहेत हे निमूटपणे ऐकत होत्या. त्याविना त्यांच्यासमोर पर्याय देखील नव्हता. कारण सुरेशरावांनी आपल्याच आईला धमकी दिली होती, \"घराच्या बाबतीत जर मध्ये पडलीस, तर तुझे हाल होतील.\" हे आठवून सुशीलाबाई रडू लागल्या.
\"मोठा मुलगा जितका जबाबदारीने वागणारा, तितकाच धाकटा बेजबाबदार. अगदी धाकटी सूनही तशीच. धाकटेपणाचा फायदा घेऊन यांनी वसंताला अक्षरशः लुबाडलं अन् त्याला ते जाणवत असून, काही न बोलता त्याने मोठ्या भावाचे कर्तव्य बजावले. त्यात वंदनाही अगदी साधी -भोळी निघावी?\"
"आई, या हो बाहेर. यांना समजवा." वंदनाताई काकुळतीने म्हणाल्या.
तशा सुशीलाबाई बाहेर आल्या. न राहवून म्हणाल्या, "अरे, काय चालवलं आहे हे? मी गेल्यानंतर या घराचं काय करायचे ते करा. पण आत्ता सुखानं जगू द्या रे मला. आज तुमचे वडील ह्यात असते तर ही वेळच आली नसती आणि एक लक्षात ठेवा, हे नुसतं घर नाही तर सुखाच्या भिंती आहेत या. हे कळायला तुम्हाला हा जन्म देखील पुरायचा नाही." सुशीला बाई दुःखाने आणि रागाने थरथरत होत्या.
"आई, यातलं तुम्हाला काय कळतं? तुम्ही गप्प बसा. आम्हाला आमचा वाटा हवा आहे बस्. इतकी वर्षे आम्ही सहन केलं. पण आता नाही." छायाकाकू फणकाऱ्याने बोलल्या.
"दादा, या घराचे साधारण चाळीस लाख येतील. त्यातल्या पंचवीस लाखांचा हिस्सा माझा. यापैकी दहा लाख ऍडवान्स मी आधीच घेतला आहे आणि एक फ्लॅटही बुक केला आहे त्यामुळे तुला या कागदावर सही करावीच लागेल. माझी रक्कम मोठी आहे. कारण माझं कुटुंब मोठं आहे. शिवाय हे घर विकल्यानंतर आई माझ्याकडे राहील. तो जादाचा खर्च आहेच." सुरेशराव बेफिकिरीने म्हणाले.
आता वसंतरावांपुढे काहीच पर्याय शिल्लक नव्हता. आपला पाठचा भाऊ असे काही वागेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते त्यांना.
"वसंत भाऊजी, आणखी एक आठवण करून देते. ती पार्टी आता आम्हाला दिलेले दहा लाख रुपये परत घेणार नाही हं..त्यामुळे तुम्ही निमूटपणे सही करा." छायाकाकू ठसक्यात म्हणाल्या.
वसंतरावांनी शांतपणे सुरेशरावांकडील कागदपत्रं हातात घेतली. त्यातलं एकही अक्षर न वाचता त्यांनी तितक्याच शांतपणे त्यावर सही केली.
"सुरेश, माझ्या दोन अटी आहेत. एक म्हणजे, माझ्या जीवात जीव असेपर्यंत आई माझ्याकडे राहील आणि हा जो तुझा जादाचा हिस्सा तुला दिलेला आहे, तो नेहमीसारखा उधळून पुन्हा माझ्या दारात अजिबात यायचं नाही..कधीच नाही."
वसंतरावांनी आत येऊन आपल्या मुलाला, अभयला फोन लावला. "अभय, घर रे गेलं आपलं. तू लवकर निघून ये." ते इतकंच म्हणाले आणि खाली कोसळले. तशा वंदनाकाकू आणि सुशीलाबाई वसंतरावांना सावरायला पुढे आल्या.
क्रमशः
पुढे काय होईल? खरंच घर विकले जाईल की अभय घर विकण्यापासून सुरेशरावांना रोखू शकेल? यासाठी पुढचा भाग नक्की वाचा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा