वाई - सुखाची परिभाषा

सुखाची परिभाषा.... माझ्या नजरेतून
विषय : सुखाची परिभाषा

कृष्णेच्या काठावर,
कातरवेळी गजबजलेल्या घाटावर,
हळुवार उठणाऱ्या तरंगावर,
प्रसन्न गंधित झुळूकेवर,
आहे सुखाची परिभाषा…

नतमस्तक झालेल्या चरणावर,
अगणित प्रश्नांच्या नवसावर,
जास्वंदीच्या पिवळसर कुक्षीवर,
दुर्वांच्या लवलवणाऱ्या पात्यांवर,
आहे सुखाची परिभाषा…

लहानग्यांशी नाते सांगणाऱ्या वेदांतावर,
भक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या लंबोदरावर,
अश्रूंची किनार पुसणाऱ्या एकदंतावर,
चेहऱ्यावर गोड हसू देणाऱ्या वक्रतुंडावर,
आहे सुखाची परिभाषा…

सात घाटांच्या प्रत्येक पाषाणावर,
कृष्णामाईच्या सदोदित कृपेवर,
विश्वेश्वराच्या अखंड अभिषेकावर,
पाठीशी स्थिरावलेल्या स्वामींच्या वरदहस्तरावर,
आहे सुखाची परिभाषा…

खामकरांच्या केसरी पेढ्यावर,
मांढऱ्यांच्या चमचमीत फरसाणावर,
प्यासाच्या आंबा मस्तानीवर,
कृष्णामाई उत्सवाच्या गोड आमटीवर,
आहे सुखाची परिभाषा…

साताऱ्याच्या हृदयावर,
अजिंक्यतारा किल्ल्यावर,
मानाच्या सुवर्ण तुऱ्यांवर,
वाईकरांच्या स्वाभिमानावर,
आहे सुखाची परिभाषा…

सुखं म्हणजे नक्की काय असते,
समाधानाचंच दुसरं नावं असते…
माझ्यासाठी वाई , तर ...
तुमच्यासाठी तुमचं गावं असते…!

सुखाची परिभाषा,
खरंच सोपी असते…
म्हणलं तर मोदकाएवढी ,
म्हणलं तर कृष्णेएवढी असते…