सुखाची परिभाषा...

त्याची सुखाची परिभाषा...


शीर्षक - सुखाची परिभाषा...
कवितेचा विषय - सुखाची परिभाषा
फेरी - राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा


नकारानंतरही देवाकडे तुझं सुख मागणं
यातही माझं प्रेमच होतं दाटलं..
दरवेळी माझं काळजी दाखवणं
कुणास ठाऊक पण तुला खोटंच वाटलं..

तुला झळ लागू नये म्हणून
धरली तुझ्यावर सावली होती..
जीवघेण्या स्पर्धेत धावताना
तुझ्यासमोर केवळ बक्षिसाची बाहुली होती..

तसं.. कळत होतं सारं;
पण नजरेसमोर प्रेमाचं धुकं होतं..
डोळस होतं खरं पण;
माझं प्रेम तितकंच मुकं होतं..

माझ्या प्रेमाचं तसं म्हणजे
गणितच जरा आगळं होतं..
आपल्या नात्याचं मापच वेगळं होतं
आपल्या नात्यात अगदी सगळं होतं..

तुला सुखात पाहण्यासाठी
सोडून दिल्या साऱ्या इच्छा, साऱ्या आशा
तुझ्या सुखातच माझं सुख
हीच माझी सुखाची परिभाषा..

© कामिनी खाने
जिल्हा - रायगड रत्नागिरी