Login

सुखाची बरसात

बघ तो पाऊस, तुझा प्रिय सखा. जरा तुझ्या डोळ्यात अश्रु आले की हजर होतो.

रमा आणि रोहन यांचे लग्न ऐन पावसाळ्यात झाले होते. दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने परिस्थिती बेताची होती त्यामुळे रोज बाईकवरून दोघांना आपल्या नोकरीच्या गावी प्रवास करावा लागत होता. रमाला पाऊस अत्यंत प्रिय होता. 'रोजच ही का भिजतेय पावसात?' हा मनात विचार करत न राहवून रोहन रमाला म्हणाला, "अगं ते रेनकोट कशासाठी घेतलं मी ? घाल बरं पटकन. तू ते रेनकोट घातल्याशिवाय आज मी गाडी स्टार्ट करणार नाही. बघुया आज तू कशी नाही ऐकत ते." असं म्हणून रोहन बाजूच्या हॉटेलमध्ये जिथून ते दोघे नेहमीप्रमाणे गरमागरम भजी आणि चहा पिऊन बाहेर आले होते त्याच हॉटेलात जायला निघाला. त्याने मागे वळून पाहिले त्याला वाटले रमा त्याच्यामागे रेनकोट घालून आली असेल. पण पाहतो तर काय? रमा हॉटेल समोरच्या गार्डनमधील बाकावर शांतपणे बसली होती. तिला त्या धो-धो पडणाऱ्या पावसाचा मुळीच त्रास होत नव्हता. पाऊस म्हणजे जणू तिचा सखा, सोबती तसेच मित्र बनून तो तिच्या मनातलं हितगुज ऐकतोय असाच विचार रोहनच्या मनात आला. तो ही मग आपल्या बायकोच्या शेजारी जाऊन बसला.डोळे मिटून बसलेली रमा त्या चिंब भिजलेल्या सरींनी रोहनाला भुरळ पाडत होती. तिचे ते निरागस रूप काहीतरी सांगू पाहत होते. पण काय? रोहन आपल्या बायकोच्या आज नव्याने प्रेमात पडला होता. हळूहळू पाऊस कमी होऊ लागला हलक्या हाताने रोहनने रमाच्या गालावरील बट बाजूला केली. रमा भानावर आली.   


"हे काय रमा, झालं तुझं भिजून?" रोहन टेन्शन फ्री होऊन म्हणाला.  


"ह्म्म" स्मितहास्य करत रमा पुढे म्हणाली, " तुला मी वेडी वाटत असेल ना? पण तुला नाही कळायचं माझं आणि या पावसाचं नातं?"  


"का नाही कळणार ? नवरा आहे मी तुझा. तुलाच जाणून घ्यायचेय मला आता आयुष्यभर. आणि तेच जाणून घेण्यासाठी आज कधी नव्हे ते एवढा भिजलोय मी." रोहन म्हणाला.  


"अरे सॉरी, पण उगीच कशाला भिजला तू ? आले असते ना मी. या पावसासोबत खूप आठवणी जोडलेल्या आहेत माझ्या. ज्या त्याने पाहिल्या आहेत म्हणून अगदी हक्काने त्याच्यापाशी आसवे ढाळून मी मुक्त होते. आणि मोठ्या विश्वासाने मी ढाळलेली आसवे आजवर त्याने कोणालाच कळू दिली नाहीत." रमा ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा नकळत पुसत म्हणाली.


"आता मला खरंच वेडी वाटतेय तू. अगं असं कसलं दुःख होतं जे तुला इतरांना सांगता आलं नाही?" रोहन रमाचा हात हातात घेत म्हणाला.


"नको तो विषय. आजवर मी कधीही कोणापुढे तो विषयच काढलेला नाही. कारण जो विषय काढल्यावर फक्त त्रासच होतो आपल्याला आणि इतरांनाही तो विषय टाळायलाच हवा ना." रमा खिन्न होऊन म्हणाली.


"म्हणजे माझ्या बायकोच्या आयुष्यात असं काय घडलंय? ज्याचा तिला इतका त्रास होतोय. हे जाणून घेण्याचा मला काहीच अधिकार नाही का ? पण तुझा माझ्यावर विश्वास असेल तर मी तुला एवढी खात्री नक्की देतो की तुझं दुःख दूर नाही करू शकलो तरी मला बोलून ते हलकं होईल." अगदी समजूतदारपणे आपल्या बायकोचे मन जिंकत रोहन म्हणाला.


"नाही रोहन हे मी कसं सांगू शकेल तुला ? मी वचन दिले आहे माझ्या घरच्यांना. मी तो प्रसंग आयुष्यतून कायमचा पुसून टाकेन म्हणून." रमा खूपच खिन्न झाली होती. रोहनच्या ही मनात विचारांचं काहूर माजलं होतं. 'काय असेल हिला असं दुःख ? जे ती मला नाही सांगू शकत.'


"बरं तुला नसेल सांगायचं तर राहू दे.चल आपण घरी जाऊया." म्हणून रोहन उभा राहिला. 


रमा मात्र पुन्हा द्विधा मनस्थितीत सापडली. 'काय वाटेल रोहनला? नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं. मी रोहन वर विश्वास नाही दाखवला असं वाटेल का त्याला? सांगू सगळं खरं काय ते ? का आजी म्हणाली तसं माझ्या भूतकाळाचा माझ्या वर्तमानावर काही परिणाम होईल?' 


रमा विचारचक्रात गुंतली होती. दोघेही घरी पोहोचले पण आज दोघांचाही मूड ऑफ दिसत होता. 


'काय झालेय या दोघांना? कदाचित ऑफिसमधला ताण आणि हा पाऊस त्यामुळे दमले असतील. ' हा मनात विचार करून रोहनच्या आईने सगळ्यांसाठी गरमागरम चहा बनवला. चहा घेऊन गेलेली आई सतत आपल्या लेकाचा आणि सुनेचा चेहरा न्याहाळत होती. इतक्या वर्षाचा अनुभव असलेली आई रमा आणि रोहन या नवरा बायकोचे काहीतरी बिनसले आहे हे समजून गेली. कारण रात्रीच्या जेवणातही दोघांचं लक्ष नव्हतं.


सकाळ झाली. आईचे काही कामात लक्ष लागत नव्हते. 'कधी एकदा रमा खाली येते आणि मी तिला कारण विचारते असे एक मन म्हणत होते. तर दुसरे मन नवराबायकोच्या भांडणात कशाला पडायचे? असेही म्हणत होते.'


पण नुकताच सुरू झालेला आपल्या एकुलता एका लेकाचा संसार फुलण्याआधी मुरगळू नये असे तिला वाटत होते. रमा खाली आली. तसा रोहनच्या आईनी रमाच्या हातात चहाचा कप दिला. त्या रमाला म्हणाल्या," रमा मला तुझी आई समज. वाईट वाटून घेऊ नकोस. पण माझा रोहन अगदी हळव्या मनाचा आहे. तो कधी कोणाचं मन दुखावेल असं तो बोलत नाही. त्याचे बाबा गेल्यापासून सगळ्या घराची जबाबदारी त्याने एकट्याने पेरली आहे. पण तीही हसत हसत. इतके उदास या आधी मी त्याला कधीच पाहिले नाही.  तुम्हा दोघांचे काय बिनसले हे मला विचारायचंही नाही. पण लक्षात ठेव रमा, जे काही असेल ते आपापसात सोडवावं अन्यथा छोट्याशा गोष्टी मोठ्या बनतात आणि मग सगळंच बिनसतं." 


लग्न झाल्यापासून रमा सासूबाईंच्या आणि रोहनच्या दोघांच्याही स्वभावाला ओळखून होती. त्यामुळेच तिला सासूबाईंचे म्हणणे पटले. रोहन आणि त्याची आईही अतिशय प्रेमळ आणि मायाळू होते हे रमाला ठाऊक होतं. अखेर रमाने काय तो निर्णय घेतला. बाहेर पाऊस पडत होता. आज रोहन स्वतःचा रेनकोट घालून खाली आला. त्याने रमाचा रेनकोट आणलाही नाही आणि तिला रेनकोट घालायची सक्तीही केली नाही. रोहन गाडीवर जाऊन बसला रमाही डबा भरून चक्क रेनकोट घालून खाली आली. रोहन तिला आरशातून पाहत होता. त्याची कळी खुलली होती. पण त्याला कालचा प्रसंग आठवला आणि त्याने काही न कळल्यासारखे दाखवत गाडी स्टार्ट केली.रमाला कालच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. 'रोहन मला समजून घेऊ पाहत होता आणि मी त्याच्यावर अविश्वास दाखवला' ही खंतही रमाला सतावत होती.  


रमा हळूच रोहनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली," एक बोलायचं होतं."


"ह्म्म." वेगात चाललेल्या बाईकचा खाचकन ब्रेक दाबत रोहन म्हणाला.


"सॉरी ना ." रमा म्हणाली.


" बस एवढंच बोलायचं होतं का ?" म्हणून रोहनने अजूनच गाडीचा वेग वाढवला. 


"अरे नाही आज मी सगळं खरं सांगायचं ठरवलंय जे आत्तापर्यंत मी कोणालाही सांगितलं नाही. माझ्या आजीचं असं म्हणणं होतं की, मी ते सत्य सासरी कळू दिले तर सासरचे मला स्वीकारणार नाहीत." रमा आज खरोखर कोणासमोर तरी रडत होती.


"काय आहे रमा ते सत्य सांगशील मला ?" गाडी बाजूला थांबवत रोहन म्हणाला.


"अरे माझ्या आईने दुसरे लग्न केले आणि ती मला एकटीला सोडून निघून गेली." रमा म्हणाली.


"काय ?" रोहनला धक्का बसला.


"आणि मग आता आहे ती कोण?" रोहन स्वतःला सावरत म्हणाला.


"ती माझ्या वडिलांची दुसरी बायको आहे." रमा म्हणाली.


"अगं पण का केलं तुझ्या आईने असं ?" रोहन म्हणाला.


"काय माहीत ? मी तिला कधीही भेटले नाही. एकदा ती मला शाळेत असताना भेटायला आली होती ते ही शेवटचं. जोराचा पाऊस सुरू होता पण ती तेवढ्या पावसात मला भेटण्यासाठी चार तास भिजत होती. हे मला नंतर समजलं.


पण बाबांनी तिला पाहिल्यावर ते तिच्याजवळ गेले आणि त्यांनी तिच्या गालात चापट मारली. मी दुरून पाहिले. मी तिच्याजवळ पोहोचण्याआधीच ती दूर निघून गेली होती. घरी गेल्यावर मी जेव्हा बाबा आणि आजीचे "आई मला तिच्यासोबत घ्यायला आली होती हे ऐकले." तेव्हा खूप रडले. माझ्या आजीने मला आईला कधी भेटायचे नाही, तिची आठवण काढायची नाही आणि यापुढे मी डोळ्यातून कधीच पाणी काढायचे नाही म्हणून चटके दिले होते. ते मी अजूनही विसरले नाही. खूप लहान होते. पुढे काय झालं ? ती मला का भेटायला आली नाही? हे मला काही माहीत नाही." रमा आता धायमोकलून रडू लागली.


"मी तुझ्या भावना समजू शकतो. पण मी तुझ्याकडून जे ऐकतोय त्यावरून असे वाटतेय की, तुझ्या आईची चुकीची बाजू तुझ्यासमोर मांडली गेलेली असू शकते." रोहन म्हणाला.


"काय?" रमा म्हणाली.


"होय रमा मी तुला आत्ता काहीच सांगू शकत नाही. पण लवकरच तुला कळेल खरं काय ते." रोहनच्या या वाक्यावर रमाने त्याला मिठी मारली. 


काय आश्चर्य! पाऊसानेही या सुखद क्षणाला हजेरी लावली.


"बघ तो पाऊस, तुझा प्रिय सखा. जरा तुझ्या डोळ्यात अश्रु आले की हजर होतो." स्मितहास्य करत रोहन म्हणाला.


"इतके दिवस तो फक्त दुःखद अश्रूंमध्ये सोबत असायचा. आज तो माझ्या आनंदाश्रूतही सहभागी झालाय बघ. तुला माहितीय माझा आणि आईचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. 8 जुलैला. जो आजवर मला मी स्वतःच्या पायावर उभी असूनही कधीच करता आला नाही. पण यावर्षी मला तो वृद्धाश्रमात साजरा करायचा आहे. प्लीज तू परवानगी देशील ना." रमा म्हणाली.


"अगं परवानगी मागायची काय गरज आहे. आईबाबांच स्थान मुलांसाठी किती महत्त्वाचं असतं हे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला कळणार? अगं फक्त दोनच दिवस उरलेत आपण उद्याच शहरात जाऊन वृद्धाश्रमातील अधिकाऱ्यांची भेट घेऊया." रोहन म्हणाला.


"जे तू माझ्यासाठी करतोय त्यासाठी "थँक्स" हा शब्द खूप छोटा आहे. मी खूप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखा नवरा मिळाला. ज्याला न बोलताच बायकोच्या मनातल्या दुःखाची सल ओळखता आली." रमा म्हणाली.


"अगं तू माझी अर्धांगिनी आहेस म्हटल्यावर तुझं दुःख आता माझंही झालं ना." रोहन म्हणाला.


उद्याचा दिवस निश्चित करून रोहन आणि रमा वृद्धाश्रमात पोहोचले. त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण काहीच उपयोग झाला नाही.


रमाच्या इच्छेप्रमाणे तिला आठ तारखेला आश्रमात काहीच वाटप करता येणार नाही. कारण त्या दिवशी  उपजिल्हाधिकारी मॅडम त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात आणि हे सर्व त्या पाच वर्षापासून सलग करत आहेत असे समजल्यावर रमाच्या डोळ्यात पाणी तरळलं. ते पाहून रोहनचाही चेहरा पडला. रमाला तिथल्या बाकावर बसवून रोहन परत त्या अधिकाऱ्याजवळ गेला आणि हात जोडून विनंती करत म्हणाला, " सर माझ्या बायकोची खूप वर्षांपासूनची इच्छा आहे ही. जी आठ तारखेला पूर्ण होणार होती. आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. अगदी थोडाच वेळ आमच्यासाठी द्या.प्लीज सर."


"ओके." मी उपजिल्हाधिकारी मॅडमशी एकदा बोलून बघतो म्हणून अधिकाऱ्याने उपजिल्हाधिकारी मॅडमला फोन लावला. त्याने सांगितले, "आश्रमात पहिल्यांदाच असं जोडपं आले की, त्याच्या बायकोची तिच्या आईसाठी खूप वर्षापासून वृद्धाश्रमात काहीतरी दान देण्याची इच्छा आहे जी तिला आठ तारखेलाच पूर्ण करायची आहे त्यासाठी त्यांना थोडा वेळ हवा होता." 


उपजिल्हाधिकारी मॅडमनी  क्षणाचाही विलंब न करता "त्यांना परवानगी द्या." असे सांगून फोन ठेवला. उपजिल्हाधिकारी मॅडमचे मनापासून आभार मानत रोहन रमाजवळ अगदी आनंदाने, प्रसन्न चेहऱ्याने जाऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून रमा म्हणाली, "मघाशी तर तू खूप नाराज दिसत होतास. आता आनंदी आहेस. मॅडमनी परवानगी दिली का?"


"हो." म्हणताना रोहनच्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडून वाहत होता. 


दोघेही शहरात खरेदीसाठी गेले. आश्रमात जे जे काही द्यायचे होते ते सर्व त्यांनी खरेदी केले. दुकानदारांकडे बिलाची रक्कम देऊन ते सर्व सामान घेऊन जायला उद्या येतो म्हणून दोघेही निघाले. रमाच्या चेहऱ्यावर रोहन बद्दलची कृतज्ञता आणि रोहनच्या  चेहऱ्यावर बायकोची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान स्पष्ट दिसत होते. 


'रात्र संपून सकाळ कधी होणार?' हाच विचार रमाच्या मनात घोळत होता. तेव्हा लहान असल्यामुळे खूप वेळ पावसात भिजत असलेल्या आपल्या आईसाठी रमा काहीही करू शकली नव्हती. पण आज इतक्या वर्षांनी ती तिच्या आईसाठी काहीतरी करणार होती याचा तिला आनंद वाटत होता.


रोहनच्या आईलाही आधीच रमा आणि रोहनने कालच्या नाराजीचे कारण सांगितले होते. सगळी आईचीच चूक नसणार हे त्यांनीही मान्य करून त्यांनीही आपल्या सुनेला आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठीची परवानगीही मोठ्या मनाने दिली होती. त्यामुळे तिघेही भाड्याची गाडी घेऊन वृद्धाश्रमात जायला निघाले. खरेदी केलेले सामान गाडीत घेऊन ते वृद्धाश्रमात पोहोचले. उपजिल्हाधिकारी मॅडम येणार म्हणून आश्रम छान सजले होते.  फुलांच्या माळा, फुगे लावलेले पाहिल्यावर मॅडमची मुलगी खरंच नशीबवान आहे असेच पाहणाऱ्याला वाटत होते. वृद्धाश्रमातील एका आजीला साहित्य वाटप करत असताना रोहनच्या आई म्हणाल्या, "लहान आहे का हो उपजिल्हाधिकारी मॅडमची मुलगी?" त्यावर त्या आजी म्हणाल्या, " मुलगी आम्ही पाहिली नाही हो. त्या कधी मुलीला घेऊन आल्या नाहीत. पण मुलीचं नाव रमा आहे एवढं नक्की. गेल्या वेळी त्यांनी हे स्वेटर देताना हे बघा याच्यावर रमा असं लिहून सगळ्यांना दिलं. तेंव्हा आम्हाला समजलं त्यांच्या मुलीचे नाव रमा आहे ते."


रमाच्या अंगावर शहरा आला. 


'किती हा योगायोग आज मी माझ्या आईच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देतेय तर अशी एक आई जिच्या मुलीचं नाव आणि माझं नाव सारखंच आहे तिही तिच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देतेय.' रमा मनात  विचार करत होती.


"खूप छान चादर आहे पोरी. शिकलेल्या पोरींना वृद्धाश्रमात यायला वेळ नसतो पण तू आवर्जून आईचा वाढदिवस इथे साजरा करतेय. खूप आशिर्वाद आहेत माझे तुला." आजी म्हणाल्या.


"आजी, माझी आईही जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे. हा आशिर्वाद द्या मला." रमा म्हणाली.


तेवढ्यात उपजिल्हाधिकारी मॅडमची गाडी आलीय तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड लोंढा गेटसमोर उभा राहिला. अचानक पाऊस सुरू झाला. मॅडम गाडीतून खाली उतरल्या  सर्वजण छत्री घेऊन मॅडमच्याजवळ उभे राहिले. पण मॅडमनी "नो थँक्स." म्हणत मॅडम पावसात भिजत आश्रमाकडे गेल्या. हे दृश्य मैदानातील सर्व लोक पाहत होते. गर्दीतून रमाची नजरही उपजिल्हाधिकारी मॅडमला शोधत होती. पावसात एकट्याच भिजत येणाऱ्या मॅडम रमाला स्पष्टपणे दिसल्या. रमाच्या हातातील चादरी खाली पडल्या.


 रमा धावत जाऊन उपजिल्हाधिकारी मॅडमच्या गळ्यात पडली. दोघीही धायमुकलून रडू लागल्या. सर्वांच्या नजरा या दोघींवरच खिळल्या होत्या.


'रमा अशी धावत का गेली?' म्हणून रोहन आणि त्याच्या आई रमाच्या मागोमाग मैदानावर पोहोचल्या. 


"रमा हे काय करते तू ?" या रोहनच्या प्रश्नावर रमा म्हणाली," रोहन जिच्या मिठीसाठी मी वर्षानुवर्ष स्वतःला दोष देते, जी माझ्यासाठी खूप वेळ पावसात उभी होती पण मला तिला भेटता आलं नाही. ती ही माझी आई आहे. "काय!" रोहन आश्चर्याने म्हणाला.


"हो. मीच रमाची आई सौ.रजनी सरदेसाई. इतके दिवस मी ही जिचा वाढदिवस मोठ्या थाटात करायचे पण माझं मन मात्र तिच्या मिठीसाठी व्याकुळ असायचं ती ही माझी लेक. काल मला इथल्या अधिकाऱ्यांचा फोन आला की, एक मुलगी तिच्या आईसाठी आश्रमात काहीतरी दान करायचं म्हणतेय तेव्हा माझी रमा माझ्या डोळ्यासमोर आली आणि  मी माझे आश्रमातील कार्यक्रम रद्द केले. आज मला त्या गोष्टीचा खूप आनंद होतोय त्या मुलीच्या आशीर्वादामुळेच आज मला माझी रमा भेटली." रमाच्या आई म्हणाल्या.


"मॅडम, ती आईचा वाढदिवस आश्रमात साजरा करणारी मुलगी ही तुमची रमाच आहे. काल याच आल्या होत्या त्यांच्या आईचा वाढदिवस साजरा करायचा आहे म्हणून."


हे ऐकून मॅडमनी आपल्या लेकीला जवळ घेतलं. 


"रमा म्हणजे तुला कळलं ना? माझी काहीही चूक नव्हती बाळा तुला सोडून जाण्यामागे." रमाच्या आई म्हणाल्या.


"आई आता तो विषय नको. आपण घरी जाऊन बोलूया का?" रमा म्हणाली.


"हो बाळा." मॅडम म्हणाल्या.


मॅडमनी रमाचे औक्षण केले. इतक्या दिवसांनी लेकीला भेटल्यामुळे मॅडमना स्वर्गसुख मिळाले होते. त्या सतत रमाच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.  सतत तिला जवळ घेत होत्या. रमाही आईच्या प्रेमळ स्पर्शाला वर्षानुवर्षे दुरावली होती. तिलाही तो स्पर्श हवाहवासा वाटत होता. मुलं कितीही मोठी झाली तरी ती आपल्या आईसाठी लहानच असतात हेच खरं. आश्रमातील जो तो रिया आणि उपजिल्हाधिकारी उर्फ रियाच्या आईला भरभरून आशीर्वाद देत होता. आज रियाच्या हस्ते मॅडमनी भला मोठा केक कापला. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. कार्यक्रम अगदी आनंदात साजरा झाला. मॅडम रियाला आणि तिच्या कुटुंबीयांना आपल्या शहरातल्या प्रशस्त बंगल्यात घेऊन गेल्या. गेटवर उभे असलेले सिक्युरिटी घरात असलेले नोकर हे सगळं पाहून अचंबित झालेले रमा आणि रमाच्या घरच्यांना मॅडम म्हणाल्या," रमा हे सगळं मी स्वकष्टाने मिळवले आहे. तुला माझ्याविषयी काय सांगितले ? ते मला माहीत नाही. पण मी आज तुला जे सांगेन ते अगदी खरं असेल."


"हो आई. मलाही ऐकायचे आहे खरे काय ते." रमा म्हणाली.



"तुझे बाबा आणि मी आम्ही एकाच वर्गात शिकत होतो. आमची चांगली मैत्री होती. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तुझ्या बाबांच्या मी प्रेमात पडले आणि माझे आयुष्य वेगळ्याच वळणावर आले. त्याने घाईत माझ्याशी लग्न केले. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती म्हणून माझ्या आई-बाबांचा या लग्नाला खूप विरोध होता. पण तो विरोध पत्करून मी त्याच्या प्रेमाखातर लग्नाला तयार झाले. मी माझ्या आई बाबांना खूप दुखावलं. म्हणून त्यांनी आपली सगळी इस्टेट रागाच्या भरात माझ्या नावावर न करता माझ्या होणाऱ्या अपत्याच्या नावावर केली. म्हणून आधीच डोक्यात सगळे प्लॅन रेडी असणारा तुझा बाबा आता मूल होण्याची स्वप्ने पाहू लागला. तुझा जन्म झाला लगेच प्रॉपर्टी मिळेल असे त्याला वाटले. पण माझ्या बाबांनी तुझं लग्न झाल्यावर ती प्रॉपर्टी तू हवी त्यांना देऊ शकते असं नमूद केलं होतं. बहुतेक त्यांना तुझी आजी आणि बाबा यांच्याविषयी सगळं खरं समजलं होतं. प्रॉपर्टीही नाही की हुंडाही नाही म्हणून तुझ्या आजीने मला छळायला सुरुवात केली. त्यात तुझे बाबाही सामील होते.  मी तुला घेऊन घर सोडायला निघाले तर प्रॉपर्टीमुळे त्यांनी तुला त्यांच्याजवळ ठेवून घेतलं. मी तुला भेटले तर तुझ्या जीवाला धोका असेल अशी धमकी त्यांनी मला दिली. म्हणून मी परत तुला कधीही भेटले नाही. पण मी हार मानली नाही मी पुन्हा कॉलेजला ऍडमिशन घेऊन परीक्षा देत राहिले आणि ही बघ तुझ्यासमोर ही तुझी आई उपजिल्हाधिकारी म्हणून उभी आहे. दुःख फक्त इतकंच वाटतं की,माझ्या चुकीमुळे तुला खूप समस्यांना सामोरे जावे लागले. मला माफ कर." रियाच्या आई बोलत होत्या. 


"नाही आई, आजवर मी तुला कधीही चुकीचे समजले नाही कारण माझं मन मला सांगत होतं की माझी आई चुकीची नव्हती. पण तू म्हणतेस ते खरे आहे लग्नाच्या दिवशी बाबांनी माझ्याकडून कोणत्यातरी कागदावर सह्या घेतल्या. कदाचित तेच असतील प्रॉपर्टीचे पेपर पण मला गरज नाही मला माझी आई मिळाली हीच प्रॉपर्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे." रमा म्हणाली.


"हो बाळा. मला ही माझी लेक मिळाली.सगळं मिळालं." मॅडम म्हणाल्या.


दोघींनी एकमेकांना मिठी मारली. रोहन आणि रोहनची आई यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.


अशा ह्या पावसाच्या सरीने आई मुलीच्या नात्यात सुखाची बरसात केली.


सौ.प्राजक्ता पाटील