Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

सुखाची बाग

Read Later
सुखाची बाग


कथेचे नाव - सुखाची बाग
कॅटेगरी - राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा
सबकॅटेगरी- आणि ती हसली


      " व्यक्ती आयुष्यभर सुख शोधत असते,
        सुविधा व सुखात मात्र गल्लत करते . .!
       नात्यांच्या ओलाव्यात सुख वसते,
         हे मात्र त्याला ठाऊकच नसते….!!"

        नात्यातील ओलावा, जिव्हाळा, प्रेम यानी जीवनातील सुखाची बाग फुलते . सुख मिळविण्यासाठी माणूस सतत धडपडत असते .
सुख शोधतांना ते कुठं मिळते , माहित नसले की
जीवनात सुखाची बाग फुलणे कठिण असते .

          माणूस म्हणजे विविध भावनांचं मिश्रण 

असते . प्रत्येक सजीवाला फुलतांना प्रेमाची व आपुलकीची गरज असते .

      नात्यांतील गोडवा जीवनात आनंद पेरते . नाते कोणतेही असो त्याच्या सुगंधाने जीवनात आनंद दरवळते .

       असंच नातं आद्या आणि तिच्या आजीचं आहे. आजीच्या सहवासात .प्रेमाच्या वर्षावात आद्याच्या चेहर्‍यावर हसू फुलते .

            आद्याचे आई-बाबा दोघेही नोकरी निमीत्तानं सकाळीच घराबाहेर पडतात .  रात्री उशीरा घरी येतात. आद्याचा जास्तीत जास्त वेळ आजीच्या सहवासात जातो . शनिवार, रविवार आद्याचे आईबाबां घरी असतात म्हणून आद्याची आजी म्हणजे तिच्या आईची आई . एका तासावर शहर असल्यामुळे दोन दिवस तिच्या घरी जाते . हे आजीचं नेहमीच ठरलेलं. त्यामुळे आद्याची मानसिकता पक्की झालेली की आजी दोन दिवसानी परत येणार . दोन दिवस तिचे आईबाबा तिला पूर्ण वेळ देतात . बाकी दिवस कमी वेळ देत असले तरी ते आद्याला क्वालीटी टाईम देतात.

       आजी, आई-बाबा यांच्या प्रेमाच्या सावलीत आदयाचं पालनपोषण अगदीच आदर्शवत होत आहे . आदया तशी जन्मतःच समजदार मुलगी असं म्हटलं तर अतिशोयोक्ती होणार नाही .

       आजूबाजूचे नेहमी म्हणतात , "आदयासारखं शहाणं बाळ आम्ही बघीतलच नाही . अगदी तान्ही असल्यापासून कधी तिचा रडण्याचा आवाज ऐकला नाही. कधी कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केलेला बघीतला नाही . आई ,बाबा व आजी जे म्हणतील ते आदया पटकन ऐकते . असं समजदार लेकरू बघीतलेच नाही . नाहीतर लहानमूलं किती हट्ट

करतात . किती त्रास देतात . आदया खेळून झालं की खेळणी नीट जिथली तिथं ठेवते . कधी घरभर पसारा करत नाही . जशी सर्वकाही पोटातून शिकून आली की काय असे वाटते ."


       आदया तीन वर्षाची झाली .कधी तिच्या आईला व आजीला तिचं पालनपोषण करतांना त्रास झाला नाही  . आद्याच्या सहवासात सर्वांना आनंदच

मिळतो . आजी व आईबाबांनी आदयावर संस्काराचं शिंपण असं केलं की, ती तिच्या समवस्क सवंगड्यांशी प्रेमानी वागते .कधी कुणाशी भांडण नाही . नाहीतर लहान मुलं एकत्र आली की मिनिटामिनीटाला भांडणे सोडवावी लागतात . आदया या गोष्टीला अपवादच .


         आज, आदयाच्या मामीला कन्यारत्न
झालं . अगदी आनंदाचा दिवस . आजी आई बाबा व आदया मामाच्या गावी मामाच्या मुलीला बघायला

गेले . आदया छोट्याशा परीला बघून फार खुश

झाली . आदयाचे आई बाबा व आजी यांच्या चेहर्‍यावरील आनंदाची जागा चिंतेनी घेतली .

       आदयाची मामी नोकरी करणारी . त्यामुळे आता आजीला आद्याला सांभाळायाला आदयाकडे राहणं शक्य नव्हतं . आदया आजीशिवाय कशी राहणार ? प्रश्नाने आजी व आदयाच्या आईबाबांना ग्रासलं

होतं .आदयाला आजीचा इतका लळा होता की ती दोन दिवस गावी जायची त्यावेळी तिसऱ्या दिवशी आद्याचे डोळे सकाळपासून आजीच्या वाटेकडे
असायचे . आजीला यायला वेळ झाला तर आदया अस्वस्थ व्हायची . दिवाळीला आजी पाच दिवस गावी जायची त्यावेळी आदयापण आजीसोबत जायची . आजीचाही आदयात अती जीव व आदयाचा 

आजीत .असं आजीनात्यांचं नातं .


        बाळाला बघून आदया व तिचे आईबाबा घरी परत आले .दोन दिवसानी आजी परत येणार असं तिच्या आईबाबांनी खोटं आश्वासन आदयाला दिलं . त्यामुळे आजी दोन दिवसानी येणार या आशेवर आदया आनंदी होती .

       आदयाची आई अदिती, आदयाचा सांभाळ करायला कुणीतरी मिळेपर्यंत पंधरा दिवस सुटीवर होती . चार दिवस उलटून गेल्यावर आजी आली नाही म्हणून आदया," आजी कधी येणार ? "आईबाबांना प्रश्न करू लागली .लहान मुलीला दोन आणि चार दिवस काय कळतात म्हणून तिची आई आदयाला सांगत होती," उदया येते आजी बाळा ." असे करता करता आठदिवस उलटून गेले . आदयाच्या चेहर्‍यावरचे हसू हरवले .

    आदयाचा एकच प्रश्न, " आजी कधी येते ?"


            एक दिवस बाजुच्या काकू आदयाकडे आल्या बोलता बोलता आदितीला विचारू
लागल्या ," मिळालं का गं कुणी आदयाला सांभाळायला . आदयाला आजीचा फारच
लळा . किती मायेनी सांभाळायच्या आजी
तिला . आजी गेल्यामुळं आद्याच्या चेहर्‍यावरचं हसूच हरवलं गं."

        आद्या सर्व ऐकत होती . काकूच्या बोलण्याचा अर्थ तिला कळत होता . तशी आदया बुद्धीनं तल्लख . तीन वर्षाच्या मानानी जास्तच समज असलेली .

    काकू म्हणाल्या,
"आजी म्हणजे मायेचा ओलावा ….
जी नातवांच्या मनावर करते
संस्काराचा गिलावा…
आजी म्हणजे आनंदानी पोतडी…
आजी म्हणजे एक समर्पण व त्यागाची भावना जपलेल्या नात्यांच्या घट धाग्यांनी विणलेलं मुलायम वस्त्र, उबदार गोधडी, अनुभवाची शिदोरी . दुधाच्या सायेला जपणारी, प्रेमाचा वर्षाव करणारी, मायेची

मूर्ती . सुखाची बाग.तिची सर महिन्यानी ठेवलेल्या बाईला येणे नाही गं बाई".

        आदिती काकूंना इशार्यानी सांगत होती , काकू थांबा या विषयावर बोलू नका . काकूंना मात्र

आदितीचा इशारा कळला नाही .

      काकू मनाला वाटले ते जीवनाचं वास्तव बोलून निघून गेल्या . आदयाला कांकूच्या बोलण्यातून कळालं की, आजी आता येणार नाही . आजी येणार नाही या गोष्टीचा आदयाला धक्का बसला .

       आदयानी मौन धारण केलं . पाणी प्यायला तसेच जेवायलाही आद्या तोंड उघडत नव्हती . दिवसभरात आदयानी पाणी तसेच अन्नग्रहण केले नाही . चेहर्यावर कुठलाच भाव नाही .आद्याचा निर्वीकार उदास चेहरा पाहून आद्याच्या आईवडिलांची चिंता वाढली . त्यामुळे त्यांनी त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरकडे जाण्याचं ठरवलं .

      डॉक्टरांकडे गेल्यावर आदयाची आई आदयाला घेवून बाहेर बसली . आदयाच्या वडिलांनी डॉक्टरांना घडलेली हकिकत सांगीतली . त्यानंतर आदिती आदयाला घेवून डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये आली . डॉक्टरांनी आदयाशी बोलण्याचा प्रयत्न केला . तिला चॉकलेट दिले . आदयानी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. डॉक्टरांनी आदितीला घेवून बाहेर जायला सांगीतले व नंतर आदयाच्या बाबांना उपाय

सांगीतला .

     "आदया ही वयाच्या मानानी खूप समजदार मुलगी आहे . त्यामुळे तुम्ही आजी आपल्याकडे राहू शकणार नाही हे तिला समजावून सांगायला हवे होते . तिला चार दिवस आजीच्या विरहाचा त्रास झाला असता पण असा मानसिक धक्का बसला नसता . जी गोष्ट लपवण्यासारखी नाही चार दिवसानी सत्य बाहेर येणारच त्याला लपवून वाईटच परिणाम होणार .
तुम्ही आदयाला खोटी आशा दाखवली त्याचा हा परिणाम आहे .
आता तिला थेट आजीच्या भेटीला घेवून जा . तीची मानसिकता पूर्ववत झाल्यावर तिला सत्य परिस्थिती समजावून सांगा . काहीदिवस दोघेही आलटून पालटून सुटी काढून ति थोडी सावरेपर्यंत ,तिला बाईची सवय होईपर्यंत तिच्या सोबत रहा . सर्वकाही ठीक होईल".

        डॉक्टरांचा सल्ल्यानुसार आदयाला घेवून तिचे आईबाबा आजीकडे गेले . आजीला बघताच आदया आजीकडे धावत सुटली .
आजीने आदयाला कडेवर घेतले .तशी आदया आजीला बिलगली . आजीच्या कुशीत दडून हुमसून हुमसून रडली . आजीने प्रेमानी आदयाचे आसवं पुसली . तिचे पटापट पापे घेतले . आद्यानी आजीकडे बघीतले अन् आदया गोड हसली .

आदिती उद्‌गारली, "आजी म्हणजे सुखाची बाग ."

त्यावर आजी म्हणाली, " जीवनातील सुखाची बाग म्हणजे नाती केवळ आजी नव्हे . नात्यांतील प्रेम, जीव्हाळा व ओलाव्यानी जीवनात सुखाची बाग

फुलते . म्हणून नाती जपावी त्यातील ओलावा कमी होवून ते रुक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी ."

        आजी तसेच आदयाच्या आईबाबांनी दोन दिवसानंतर आदयाला समजावून सांगीतले, बघ आदया मामीचं बाळ किती गोड आहे. बाळ खूप छोटसं आहे . त्याची आई नोकरीला
गेल्यावर ,त्याला सांभाळायला आजी हवी ना इथे ? जसं तू छोटी असतांना आजीनी तुला सांभाळलं, तसं बाळालाही सांभाळावं लागेल .
बाळ तुझी छोटी बहीण आहे की नाही मग तिची काळजी नको का घ्यायला .
आता तू मोठी झाली, तू स्वतःला सांभाळू

शकतेस ना ?".

   " हो मी स्वतःला सांभाळू शकते " , आद्या

"बाळासाठी तुझ्या छोट्या बहिणीसाठी आजीला काहीदिवस बाळ मोठं होईपर्यंत इथेच राहू दयायचं

 का ?", आदिती .

         आद्यानी दोन मिनीट शांत राहून आजीकडे बघीतलं अन् आजीच्या मांडीवर जावून बसली .
आजीला म्हणाली," आजी तू काही दिवस बाळ मोठं होईपर्यंत इथेच राहा . बाळ मोठं झाल्यावर मात्र येशील ."

     आजी म्हणाली," हो गं बाई .माझी शहाणी परी .
मी शनिवारी तुझ्या भेटीला येत जाईल . दोन दिवस तुझ्याजवळ राहून पुन्हा बाळासाठी परत येत जाईल ."


" प्रॉमिस", आदया


"हो प्रॉमिस", असं आजीनी म्हणताच आद्याचा चेहरा खुलला आणि ती हसली….


©®✍️ ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टिम- अमरावती .
५/८/२२

धन्यवाद !

कथा कशी वाटली कमेंन्ट करून कळवा आवडल्यास लाईक करायला विसरू नका .
न आवडल्यास माफ करा .
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Adv Nita Kachave

Advocate

सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून एकविस वर्षे नोकरी करून स्वेच्छा सेवानिवृत्तीनंतर वकिली व्यवसाय करते . मी लेखीका नाही परंतु शालेय जीवनापासून भावलेलं, रुजलेलं, अनुभवलेलं शब्दांत उतरवायचा एक छंद . वाचनाचा व्यासंग . शब्दांच्या दुनियेत रमायला आवडणारी मी एक शब्दवेडी .

//