सुखाचे कोडे

एक सुंदर सुख
निरभ्र आकाशात एकटक पाहत असताना,एखादया ताऱ्याने खळकन निखळावे...अन त्याच क्षणी आपली दृष्टी त्याकडे सहजच वळावी...काही मागण्यासाठी डोळे क्षणभर का होईना बंद करावे...अन...अन त्या ताऱ्या ने स्वतःस भूमीवर लुप्त करून घ्यावे...स्वप्नं की सत्य ह्या संभ्रमात मग आपण स्वतःला च कोड्यात टाकावे.
कोडे सुटेल न सुटेल पण मग पुन्हा आपण तीच प्रक्रिया पुन्हा घडते का बघत पुन्हा आकाशाकडे टक लावून चातका प्रमाणे पाहू लागतो.
एक तो तुटणारा तारा पण आपल्याला जीवनात आशावादी राहण्याची उमेद देऊन जातो. पुन्हा तसेच काहीतरी घडावे म्हणून आपणही पुन्हा पुन्हां निरभ्र आकाश पाहण्याची खटपट करत राहतो.
अशावेळी तो तारा तर नाही पण एक सुखावणारी सर आपल्या अंगावर कोसळत राहते.....अन जणू काही संभ्रमात असलेल्या आपल्या मनाला शीतलता प्रदान करते. आहा... काय तो क्षण...तन मन मोहरून टाकणारा. त्या क्षणाची किमया च न्यारी....बरसणाऱ्या सरींनी आपणास गुणगुणण्यास भाग पाडावे.अन सहजच आपण त्या ताऱ्यास विसरून जावे.
असेच असते ना आपले जीवन....एकामागोमाग येणाऱ्या सुखाची आस लावणारे. जणू काही सुखाभोवती आपण पिंगा घालतो की आपल्या भोवती सुख पिंगा घालत....हेच कळत नाही. असे हे जीवनातील अनमोल क्षण वेचत राहणं म्हणजेच खर सुख.
@प्राजक्ता हेदे(बोवलेकर)