सुख वेचताना

Sukhacha Kavdsa Chinta Vadhvnara Hota

सुख वेचताना

कथेचे नाव  :  सुख वेचताना

विषय  :  आणि ती हसली

फेरी   :   राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

-©®शुभांगी मस्के...

टिम : भंडारा


आई कसं दिसतं गं हे, सगळे विचारतात, काय आहे म्हणून? शरिराच्या कुठल्याही भागावर चाललं असतं, पण असं चेह-यावर, आरशात बघावं वाटत नाही..


ताई मोठ्या हौशीने, मेकअप किट देवून गेली, म्हणाली थोडा मेकअप कर, छान दिसशील!.. कोणत्या अँगलने, छान दिसणार मी?

अनुच्या शाळेत दहावीच्या मुलामुलींचा निरोपसमारंभ होता. मुलांना कुर्ता पायजमा, मुलींना साडी, शाळेने ड्रेस कोड सेट केला होता.

लहानपणापासुन अनु, मुलांसारखे जीन्स टिशर्टच घालायची. केस छोटे असल्याकारणाने, हेअरस्टाईलचा प्रश्नचं नव्हता. त्यामुळे तिला ह्या सगळ्याची सवयचं नव्हती.

आज, साडी नेसायची म्हणून ती खूप एक्साईटेड होती. आरशासमोर ती ऊभी राहीली. ताईने सांगितल्याप्रमाणे, चेह-यावर पहिले फॉन्डेशन लावून घेतलं, कॉम्पँक्ट पावडर लावणार तोच आतापर्यत एकवटून ठेवलेला धीर सुटला.

उघडलेल्या कॉम्पँक्ट पावडरच्या किटचं झाकण तिने जोरात बंद केलं..

"काय लपवतेय मी" ह्या कॉम्पँक्ट पावडरच्या थरात,माझ्या चेह-यावरची कुरुपत.

डाव्या भूवईपासुन गालापर्यत पसरलेलं, हिरवट निळ्याकाळ्या रंगाचं, जन्मजात लायसं लपवणं काही केल्या शक्य नव्हतं.. (लायसं- काळ्या निळ्या रंगाचा जाडसर चेह-याच्या स्किनपेक्षा जरासा उंचवटा असलेला डाग)

मला नाही जायचं कार्यक्रमाला. स्वत:वरच्या रागातच, तिने सगळं सामान अस्तव्यस्त फेकलं.

विणाताई, स्वयंपाकघरातून धावत, रुममध्ये आल्या, सगळ्या वस्तू इतरत्र पसरल्या होत्या.. ओंजळीत चेहरा लपवून, अनु मोठ्यामोठ्याने रडत होती.

"उगी राह बाळा" उगी.. कुरुपवेड्या बदकाचे गाणे आई गाऊ लागली, तशी अनु आईच्या कुशीत शिरली.

एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे, पिल्लू तयात एक

कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वाहूनी निराळे, ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हसुन लोक
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक

एके दिनी परंतू, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वा-यासवे पळाले
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक
आणि गाताना त्यांचाही ऊर दाटून आला, कवितेतल्या, राजहंसाचं नाव ऐकताच, अनुच्या गालावर हलकसं स्माईल आलं.

बाळा, आपण जसे आहोत तसेच आपण आपल्याला स्विकारायला हवे. काय नाही ह्याचा विचार करत रडत कुढत बसण्यापेक्षा, आहे त्यात समाधान मिळवून, आनंद मिळवायचा.

सुंदर जग बघण्यासाठी, डोळे... हातपाय धडधाकट त्यामुळे तू कुणावरही अवलंबून नाही. दुस-यांच ऐकता, मनातलं बोलता येतं..

सरस्वती मातेचा वरदहस्त आहे तुझ्या डोक्यावर. हुशार आहेस... बाळा परिपूर्ण आहेस तू.. आई समजावत होती...

सौदर्य.. "मी सुंदर कुठे आहे आई!", अनुने विचारलं..

"बाळा, बाह्यसौदर्य क्षणिक असतं, मनाचं सौदर्य महत्वाचं, दुस-यांच्या नजरेने बघण्यापेक्षा, तू स्वत:ला तुझ्याच नजरेने बघ."

"ह्या नाजूक बोटांनी साकारलेल्या, सुंदर चित्रांनी घराच्या भिंती, किती सुंदर सजवल्यायस बघ तू.. कसा जिवंतपणा आलाय ह्या भिंतींना." आई

आज सगळ्याच छान तयार होवून येतील.. सुंदर दिसण्याची चढाओढ लागेल.. सुंदरता बघणा-याच्या नजरेत असते. तू म्हणतेस पण मला, माझ्याविषयी इतरांच्या नजरेत दया आणि किवच दिसते ती नाही बघायची आज मला.

जबरदस्तीने कुणी, थोडं कौतुक केलं तरी, दिखावा असल्यागत वाटतं, काय करु मी?अनुच्या डोळ्यांच्या कडा पुन्हा पाणावल्या.

तारुण्याच्या उंबरठ्यावर, जीथे सौदर्याची व्याख्याच, "मीच माझ्या रुपाची राणी गं!" म्हणत सुरु होते, तिथे लेकीला पडणा-या प्रश्नांनी वीणाताई अनुत्तरीत झाल्या..

बाळा, कर्तृत्वाच्या बळावर मोठी हो.. तुझा स्वभाव, तुझी गुणकौशल्ये हीच तुझी ओळख असेल. अनु लक्ष देवून ऐकत होती..

शाळेच्या पहिल्या दिवसापासुन सोबत, मोजक्या जीवलग मैत्रीणींनी अनुचं बालपण समृद्ध केलं होतं.. जीवाभावाच्या ह्या सख्यांना रोज भेटता येणार नाही, विचारानेच तिला गहिवरुन आलं..
अखेर, अनुने कार्यक्रमाला जायचं ठरवलं.

आईने अनुला, छान साडी नेसवून दिली. साधं टाल्कम पावडर, ओठांवर हलकसं चॉकलेटी मरुनिश रंगाचं लिपस्टिक, डोळ्यांच्या शेवटपर्यत काजळाची लांब रेघ ओढली आणि ती तयार झाली.

सगळ्याच एकसे बढकर एक, सुंदर साड्या नेसून, नटूनथटून आल्या होत्या. आठवण म्हणून, सगळ्यांनी छान फोटो काढून घेतले.. अनुच सर्वाचे फोटो क्लिक करत होती. ..

" वाह अनु फारच सुंदर".. कँनव्हासवर, रंगकांड्याचं नाही तर कँमेराही तुझ्या इशा-यावर नाचतो. फोटो सुंदर निघाल्याची पोचपावती मिळाली..निरोपाच्या वेळी सर्वांनाच गहिवरुन आलं होतं.

ओढूनताणून करिअर करण्यापेक्षा, पुढचं शिक्षण, आवड असलेल्या क्षेत्रातून घ्यायचं तिने ठरवलं.. बारावीनंतर बँचलर ऑफ फाईन आर्ट्समधून, ग्रॅज्युएशन करायचं ठरलं.

कॉलेजमध्ये वर्गात, अनु हुशार, तल्लख बुद्धिची, कलासक्त विचारांची, तिच्यातल्या जिज्ञासु शोधक वृत्तीमुळे, वस्तूस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन, गुरुजनांकडून वाखाणल्या जात होता.

चांडाळचौकडीत व्यस्त असलेल्या, श्रद्धाने मैत्रीचा हात पुढे केला. हँलो मी रितेश, मी स्वरुप, मी साजिरी..
हँलो.. मी अनु..
"अनुश्री"..
चार जणांच्या उनाड ग्रुपमध्ये आता अनुही सामिल झाली होती.

तारुण्य म्हणजे सळसळणारा उत्साह, तारुण्य म्हणजे थ्रील, स्वच्छंदी होवून बागडण्याचे दिवस. शांत, संयमी असलेली अनु आता बिनधास्त होवून जगण्यातल्या नव्या रंगात सामिल झाली होती.

मज्जा मस्ती एकिकडे तर दुसरीकडे, तिचे ध्येय निश्चित होते. उनाड मित्रमैत्रिणी मागे राहू नये म्हणून, प्रसंगी त्यांचे प्रँक्टिकल रेकॉर्डस ही ती रात्ररात्र जागून पूर्ण करायची.

एकदा, श्रद्धाच्या घरी अनु गेली असताना, भारदार शरिरयष्टी असलेला श्रद्धाचा दादा, सुजीत.. अधुनमधुन तिच्याकडे बघत असल्याचं तिला जाणवलं.

एखाद्या हँन्डसम मुलाने आपल्याकडे बघावं, बोलण्याचा प्रयत्न करावा, विरुद्ध लिंगी आकर्षणातली, ओढ तिला त्यावेळी सुखावून गेली होती.

सुजितने मात्र.. ह्याचा वेगळाच अर्थ काढला.

मी श्रद्धाचा दादा बोलतोय, श्रद्धाच्या आजारपणाचं कारण पुढे करुन, एके दिवशी सुजितने,अनुला घरी बोलावलं.

तुझ्यासारख्या मुलीला, बॉयफ्रेंड वगैरे तर अशक्यच.

घरी कुणीच नाही.. चांगला चान्स आहे.. माझ्याच काय तुझ्याही शरिरीक गरजा आहेच की!!.. आता सगळेच प्रश्न मिटतील.. म्हणत त्याने शर्टाचं बटन काढलं.

काही कळायच्या आत, त्याने तिला स्वत:कडे खेचलं.

अनुने, जोरात त्याच्या कानशिलात लगावली, शीSS काय बोलतोयस तू... श्रद्धाचा दादा म्हणून सोडतेय. ह्यापुढे असं वागलास तर खबरदार.. तुझ्या विरुद्ध पोलीसात कम्पलेंट करेन.. अनुने चांगलच बजावलं.

श्रद्धाचा ह्यात काय दोष.. आपणचं जागरुक असायला हवं होतं, स्वत:लाच दोष देवून.. मैत्रीखातर ती गप्प राहीली.

सुजितने मात्र, अनुविरुद्ध काहीबाही सांगून,श्रद्धाचे कान भरले..

"स्वत:चा चेहरा आरशात बघितलायस का तू? तुझी लायकी काय गं? माझ्या दादावर लाईन मारतेयस?" खरंखोटं न करता, श्रद्धाने अनुला खूप सुनावलं..

न केलेल्या चूकीची शिक्षा, अनु भोगत होती.. सहज कुणावर विश्वास ठेवायचा नाही, ह्या प्रसंगाने तिला शिकवलं होतं..

अनुची खोड काढायची ठरवून,अनुचे कम्प्लिट झालेले, रेकॉर्डस श्रद्धाने लपवले, ह्या कटात तिचे बाकी मित्रमैत्रिणीही सामिल झाले. अनुला ऐनवेळी मनस्ताप सहन करावा लागला.. अनुचा मैत्रीवरचाही विश्वास उडाला होता.

को-या कँनव्हासशी आता तिची मैत्री अधिकाधिक घट्ट होत होती. भटकंती, दरम्यान डोळ्यांनी वेचलेले निसर्गाचे विलोभनीय रुप, ती कँमे-यात कैद करु लागली..

आकाशाची निळाई.. सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी पसरलेल्या नानाविध रंगांच्या छटा.. आणि सर्वदूर पसरलेली हिरवाई तिला भुरळ घालतं होती..

फेसबुक इंस्टागँमवर तिच्या चित्रांना लाईक्स करणारे, हजारोच्या संख्येत फॉलोवर होते.

आर्किटेक्चर झालेला अमेय,अनुच्या पेंटिंग्जमध्ये जगण्याचा खोल-सखोल मतितार्थ शोधु लागला. तिच्या पेंटिंग्जच्या तो कधी प्रेमात पडला त्याचं त्यालाच कळलं नाही.

मँसेंजरवर हँलो - हाय पासुन सुरु झालेल्या प्रवासाने, मैत्रीचं सुंदर रुप घेतलं.. आता चँटींग करताना, वेळ कसा भर्रकन उडायचा दोघांनाही कळायचं नाही.

अनुच्या मनातही प्रेमाची ठिणगी पेटली.. मनाच्या आरशात ती स्वत:ला न्याहाळू लागली.. रंगांशी जवळचं नातं होतंच आता अनुचं, लिप्स्टिक आणि नेलपेंटच्या रंगांशी नातं घट्ट होतं होतं..

आईने अनुमधला बदल लगेच टिपला. तिच्या आयुष्यातला हा सुखाचा कवडसा, आईची चिंता वाढवणारा होता.

अव्यक्त प्रेमाच्या लहरींमध्ये, दोघेही वाहावत जात होते.

ऑनलाईन प्लँटफॉर्मवर तुझा एकही फोटो नाही. एकमेकांना ओळखणार कसं? अमेयने भेटीची इच्छा बोलून दाखवली.

आणि आता अनु, अमेयशी बोलायचं टाळू लागली. काय झालं असेल? ह्या काळजीपोटी, अमेयचे मँसेजवर मँसेज, मँसेंजरवर येवून धडकले.

"आपल्यात कुठलं नातं तयार व्हावं, एवढी मी लायक नाही".. फॉलोवर म्हणून ठिक पण मैत्री करावी एवढा माझा तुझ्यावर विश्वास नाही...

असा एक छोटासा मँसेज टाकून तिने त्याला ब्लॉक केलं.
त्या दिवशी ती हमसुन हमसुन रडली होती.

"पहिल्या प्रेमाच्या, अमर्याद गोड आठवणींची ठिणगी, तिला तशीच, मनाच्या गाभा-यात तेवत ठेवायची होती"..

तिने स्वत:ला पूर्णपणे कामात गुंतवून घेतलं, तिच्या साकारलेल्या चित्रांची, आता मोठी गँलरी तयार झाली होती..

नागपूरमध्ये "अनुश्री", पेंटिंग्जचं मोठ... एक्झिबिशन भरणार असल्याचं, अमेयच्या वाचनात आलं..

\"अनुश्री\"... \"अनु\"... तर्क लावून, तो एक्झिबिशनला गेला.

सुंदर सुंदर चित्रांनी, पेंटींग्जने, दालन भरलं होतं.

चित्रांची माहीती देतेय... अनुच असावी, मनोमन विचार करुन, तो तिच्याजवळ गेला.
अनु??
सॉरी.. तुम्ही अनुच ना!! मी अमेय..
सॉरी... पण मी अनु नाही...
मी अनुची मोठी बहिण - सोनू....

मी अमेय..
मला अनुला भेटायचयं. कुठे भेटेल ती?? अमेयने विचारलं.

तीचं लग्न झालयं.. सोनुकडून कळताच, त्याचा तिच्या शब्दांवर विश्वासच बसला नाही... विश्वास ठेवण्यापलिकडे तो काही करुही शकत नव्हता. तो घरी परतला.

"मनस्वीनी". ह्या सदराखाली, एक आर्टिकल अमेयच्या वाचनात आलं.

" अनु", "अनुश्री" थरकाप उडावा असा प्रवास, त्यावर तिने केलेली मात.. वाचून अमेयचा धीरच सुटला.

खूप प्रयत्नांनंतर, अखेर अमेयने अनुश्रीचा नंबर मिळवलाच.

अखेर भेटीचा दिवस ठरला. हायवेपासुन दूर, माळराणावर पिवळ्यागर्द बहाव्याच्या मधोमध फुललेल्या, एकुलत्या एक लालगर्द, गुलमोहराखाली ती एकटीच उभी होती.

गप्पात रंगलेलेे, आठवणींनी मोहरलेले, क्षण तिच्या डोळ्यासमोरुन भराभरा सरकत होते.

बांधणीच्या ओठणीत, चेहरा बांधलेल्या तिला त्याने दुरुनच बघितलं, भेटीच्या औत्युक्यात त्याच्या गाडीने वेगही वाढला. गाडी तिच्याजवळ पोहचताच, त्याने गाडीचा करकचून ब्रेक मारला.

आज उनसे पहले मुलाकात होगी
फिर आमने सामने बात होगी
फिर होगा क्या.. क्या पता क्या खबर.. कारमध्ये गाणं चालू होतं.

कारच्या खिडकीचा काच खाली करत त्याने विचारलं.. अनु!!

डोळ्यावंरचा गॉगल, काढत ती उत्तरली, हो मीच अनु.

राजबिंडा... बघता क्षणी प्रेमात पडावा असा.. सहा साडे सहा फुट उंचीचा, गो-या कांतीचा.. अमेय...

मला नाही फरक पडत, तु कशी आहेस कशी दिसतेस... तुझ्या चित्रांवर, तुझ्या कलेवर प्रेम केलय मी.. एवढी सुंदर चित्र जिच्या कुंचल्यातून साकार होतात.. ती मूर्ती मनाने किती सुंदर असणार.

"जरा तसबीर सें तु निकल के सामने आ, मेरी मेहबुबा".. तो गुणगुणला. ..

चेह-यावरची बांधलेली ओठणी तिने काढली... तिचा चेहरा बघून, तो दोन पावलं मागेच सरकला.

तत्क्षणी, गाडीत बसून त्याने.. गेअर टाकला, विरुद्ध दिशेने आता त्याची गाडी पळत होती.

आयुष्य असतचं रंगीबेरंगी आव्हानांनी भरलेलं.
सुख - दु:ख, संकट -अडीअडचणींना ही रंग असतातच. दिसण्या, वागण्या, बोलण्याचे.. स्वभावाचे ही रंग असतात. आपण त्यांना किती सहज पेलतो
तसतसे ते रंग फिके तर कधी गडद होत जातात,
आईचे शब्द अनुला आठवले.

काहीच रियँक्ट न होता, तिने तिच्या गाडीच्या आरशात स्वत:ला बघितलं. आणि ती स्वत:शीच पुटपुटली.. हम तो है च बहूत स्मार्ट.

मागून तिच कार, तिला आरशातून तिच्या दिशेने येताना दिसली... त्याने तिच्याजवळ कार थांबवली.

लग्न करशील माझ्याशी.. विल यू मँरी मी, त्याने गुडघ्यांवर बसुन हातात गुलमोहराचं गर्द लाल फुल देवून.. लग्नासाठी मागणी घातली.. बहरलेला बहावा आणि गुलमोहर ही आत्ता त्यांच्या ह्या क्षणाचा साक्षिदार होवून, त्यांच्यावर प्रेमाची बरसात करत होता.

पण, एक सांग यार!! लग्न नाही ना झालं तुझं.. त्याने विचारलं
आणि ती गोड हसली.
-©®शुभांगी मस्के...