सुख शोधताना भाग -8

Katha Eka Samanya Strichi
कविताचे बोलणे ऐकून सारिका काही खरमरीत बोलणार होती. पण इतक्यात तिला सासुबाईंचे बोलणे आठवले म्हणून ती गप्प बसली.

इतक्यात अक्षय आणि अनिरुद्ध शाळेतून घरी आले. या दोघा भावंडांकडे कौतुकाने पाहत सारिका पुढे म्हणाली. "पण काहीही म्हणा वहिनी, मला तुमच्यासारखे वागायला मुळीच जमत नाही. हो दोघेही तुमचेच शिकली आहेत. उलट उत्तर म्हणून देत नाहीत. अगदी शहाण्यासारखी वागतात. एकमेकांना जराही सोडून राहत नाहीत. कधी कधी वाटते अक्षय माझा मुलगा नाहीच, तुमचाच आहे तो!" दोघी जावांच्या अशा सुख- दुःखाच्या गप्पा बराच वेळ चालल्या. वागतात. एकमेकांना जराही सोडून राहत नाहीत. कधी कधी वाटते अक्षय माझा मुलगा नाहीच, तुमचाच आहे तो!" दोघी जावांच्या अशा सुख- दुःखाच्या गप्पा बराच वेळ चालल्या.

___________________________

काही वर्षांनी राधाचे शिक्षण पूर्ण झाले. तिला चांगली नोकरीही मिळाली. आपल्या जिवलग मित्र, पार्थसोबत तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय दादांना फारसा पटला नाही. तेव्हा राधा आपल्या आजोबांना म्हणाली, "आबा, माझ्या लग्नाला तुमची कोणाची परवानगी नसेल तर मी हे लग्न करणार नाही. आम्ही दोघांनी तसेच ठरवले आहे. घरच्यांची परवानगी नसेल तर लग्न करायचे नाही म्हणून." 
'कवितासारखीच आपली नातही समंजस आहे,' हे पाहून दादांना बरं वाटलं. त्यांनी हा निर्णय सचिन आणि सागरवर सोपवला. 
"बाबा, पार्थची स्वप्ने मोठी आहेत. परदेशी नोकरी करून तिथेच स्थाईक व्हायचं आहे त्याला. त्याचा उमदा, इतरांना मदत करणारा, समजून घेणारा स्वभाव, त्याची कष्ट करण्याची तयारी.. यांनी मला प्रभावित केलं आणि म्हणूनच मला आयुष्याचा जोडीदार म्हणून तो योग्य वाटला. मीही त्याला आवडते. पण त्याच्या घरच्यांनी आणि आपल्या घरच्यांची परवानगी असेल तरच आम्ही लग्न करणार आहोत." राधाने सारे काही स्पष्टपणे सांगितले.
काही दिवसांनी घरचे सारे पार्थला भेटले. त्यांना पार्थ आवडला. पार्थच्या घरीही राधा आवडली आणि दोघांची सोयरिक पक्की झाली आणि फारसा गाजावाजा न करता, हे लग्न रजिस्टर पद्धतीने करायचे ठरले. 

महिन्याभरात राधाचे लग्न झाले. ठरल्याप्रमाणे पार्थ आणि राधा दोघेही परदेशी जाणार होते. 
आपली लेक आता इतक्या दूर जाणार म्हणून कविता अस्वस्थ झाली. पण 'मुलं मोठी झाली की त्यांना पंख यायचेच' म्हणून सचिनने तिची समजूत घातली. अनिरुद्धही मोठा होत होता. 
"एक दिवस तोही असाच दूर निघून जाईल. मग कदाचित अक्षयही जाईल. फार सवय झाली हो मुलांची. अजिबात करमायचे नाही मला त्यांच्याविना." कविता सचिनला म्हणाली.

"अगं, असं करून कसं चालेल? मुलं आपली वाट शोधणारच. त्यांना असे अडकवून ठेवले तर कसे व्हायचे? त्यांचा विकास, वाढ कशी व्हायची मग? हेच वय आहे त्यांचं.. जग पहायचं, अनुभवायचं, टक्के-टोणपे खायचं. यातून शिकत पुढे जातील ती. नको इतकी काळजी करू."सचिन कविताचा हात हातात घेत म्हणाला.
"आज मागे वळून पाहताना असं वाटतं..आयुष्याचे किती टप्पे ओलांडून पुढे आलो आपण! एक मुलगी, सून, मग आई आणि आता सासू म्हणून या अखेरच्या टप्प्यावर आले मी. आता वाटते आपण नको त्या गोष्टींना प्राधान्य, महत्व देत आलो. अनेक गोष्टी सहन केल्या, तशाच सोडूनही दिल्या. सासुबाई आज हव्या होत्या ना? आपल्या राधाला पाहून त्यांनाही अभिमान वाटला असता तिचा." कविताच्या डोळ्यात अश्रू जमा झाले.

"हो,तर. आज आईच्या मागे याही वयात दादा आपल्या पाठीशी उभे आहेत. त्यांचा किती आधार वाटतो आपल्याला! तसेच आपण आपल्या मुलांच्या मागे उभे राहायला हवे. आज ना उद्या आपली दोन्ही मुले शिक्षण संपल्यावर नोकरीला लागतील. लवकरच दोघांची लग्नं होतील. 
खूप दिवस झाले एक विचार मनात घोळतो आहे.. पुढच्या वर्षी मी निवृत्त होईन, तेव्हा हे घर विकून आणखी मोठं घर घ्यावं म्हणतो मी. अर्थात याला दादा आणि सागरची परवानगी हवी. पण म्हंटल आधी तुझ्या कानावर घालावं." सचिन कविताला म्हणाला.

नवं घर या कल्पनेने कविता सुखावली. नाही म्हंटल तरी उद्या मुलांची लग्नं झाल्यावर जागा अपुरी पडणार होती. 'आपण चालवून घेतलं इतकी वर्षे. पण आता येणाऱ्या सुना कशा असतील कोणाला ठाऊक? म्हणतात, आजकाल मुलांना सगळं स्वातंत्र्य हवं असतं..आपल्याच आई -वडिलांची अडचण होते त्यांना. देव न करो आणि आपली मुले तशी न वागो.' कविता
 स्वतःशी विचार करत राहिली.

लवकरच सचिनने आपली कल्पना घरात सर्वांच्या समोर मांडली. सारिकाला नव्या घराची कल्पना खूपच आवडली. पण दादा थोडे नाखूश दिसले. कोमलचाही विचार घेण्यात आला, तिच्या मतानुसार नवे घर घ्यायला काहीच हरकत नव्हती.
सरते शेवटी राहत्या घराची डागडुजी करून त्यावर नवीन घर बांधावे असे ठरले. म्हणजे मुले जवळही राहतील आणि त्यांना त्यांचे स्वातंत्र्यही मिळेल.

 घरच्यांच्या या ठरावाला मात्र अनिरुद्ध आणि अक्षयने विरोध केला. 'वर स्वतंत्र घर बांधण्या ऐवजी मागच्या मोकळ्या जागेत दोन खोल्या बांधू, कारण आम्ही एकत्रच राहणार आहोत.' हे ऐकून सर्वांना आनंद झाला आणि राहत्या घराची डागडुजी करून दोन खोल्या बांधायचे निश्चित करण्यात आले. 

दादा काही दिवस बदल म्हणून कोमलकडे राहायला जात. तिची मुले तशी लहानच होती. हट्टी आणि खोडकर होती. पण दादांच्या शिस्तीत ती लवकरच सरळ झाली. त्यामुळे कोमल निश्चिंत झाली. 


अक्षय आणि अनिरुद्धचे शिक्षणही झाले तसे काही महिन्याच्या अंतराने दोघांनाही नोकरी मिळाली.
मग सारिकाने आता आपली नोकरी सोडून विश्रांती घेण्याचे ठरवले. दादाही वयानुसार थकले होते. त्यांची तब्येत वारंवार बिघडत होती. त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे होते. त्यामुळे कवितानेही आपले काम खूपसे कमी केले होते. 

दादांनी आता आग्रह धरला होता," माझ्या डोळ्यासमोर एखाद्या तरी नातवाचे लग्न करा म्हणून. त्यानुसार अक्षयला स्थळ पाहायला सुरुवात केली. मुलींच्या वाढत्या अपेक्षा पाहून अक्षयने स्वतः लग्न जमवले असते तर फार बरे झाले असते, असे वाटू लागले सारिकाला. 
एकत्र कुटुंब नको. घरात फारसे काम नको. शिवाय घर स्वतंत्र असेल तर उत्तमच..अशा अटी पाहून अनिरुद्धला कशी मुलगी मिळेल? याची कविताला काळजी लागून राहिली होती.

अचानक एक दिवस सारिकाचा भाऊ, विशाल दादा घरी आला आणि आपल्या मुलीसाठी, देविकासाठी त्याने अनिरुध्दचा हात मागितला. देविका छानच होती. नाकी, डोळी उत्तम होती. नुकतेच शिक्षण पूर्ण झाल्याने नोकरीच्या शोधात होती. नकार द्यावा, अशी काहीच कमी नव्हती तिच्यात. 'हे अक्षयसाठी आपल्याला आधीच का सुचले नाही?' म्हणून सारिकाला कमालच वाटू लागली.
पण अनिरुध्दचे मत विचारात घेणे गरजेचे होते. त्यामुळे आता सारे अनिरुध्द काय म्हणतो? याची वाट पाहू लागले.

अनिरुद्धला हे ऐकून आश्चर्यच वाटले. त्याने देविकाला एकदा भेटून मगच काय तो निर्णय घ्यायचे ठरवले. 

"देविका, काहीही झाले तरी मी एकत्र कुटुंबातच राहणार. राधाताईसारखी माझी स्वप्ने मोठी नाहीत. मात्र परदेशी जाण्याची कधी संधी मिळाली तर जाईनही. पण वरचेवर इकडे येत राहणार. ती तयारी हवी तुझी. बाकी तू घर सांभाळ किंवा नोकरी कर. माझी काही हरकत नाही." 

देविकाला अनिरुद्धचे म्हणणे पटले. तिने संमती दर्शवली आणि अनिरुद्धनेही आपला होकार कळवला. तशी देविका नकार देण्यासारखी नव्हतीच. अनिरुध्दचा होकार आला, तशी लग्नाची तयारी सुरू झाली. सारिका थोडी नाराज होती. पण लवकरच तीही आपली नाराजी विसरून तयारीला लागली. 
अनिरुद्धला रजिस्टर पद्धतीने लग्न करायचे होते. मात्र देविका एकुलती एक मुलगी होती. शिवाय घरातल्या मुलाचे पहिलेच कार्य म्हणून कविता आणि सारिकाचीही लग्न धूमधडाक्यात पार पडावे अशी इच्छा असल्याने दोन्ही घरी लग्नाची लगबग सुरू झाली.

लवकरच राहत्या घराची डागडुजी करून दोन खोल्या वाढवण्यात आल्या. कोमल आपल्या कुटुंबासह घरी आली. राधा आणि पार्थही आले. अनिरुद्ध आणि देविकाचा साखरपुडा थोडक्या पद्धतीने पार पडला. 
लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला. दोन्ही घरी देवक बसले. मुहूर्तमेढ रोवली गेली. देविकाच्या हाती मेहंदी रंगली. हिरवा चुडा भरला. 
लग्नाचा दिवस उजाडला. नवरा नवरीला हळद लागली आणि ठरल्या मुहूर्तावर देविका आणि अनिरुद्धने एकमेकांच्या गळ्यात हार घातले.
विशालदादा आणि वहिनीने भरल्या डोळ्यांनी आपल्या लेकीला निरोप दिला.

माप ओलांडून देविका 'सून 'म्हणून घरी आली आणि कविता सुखावली. या आधी ती पार्थची सासू होतीच. मात्र सुनेची सासू झाल्यावर एक वेगळीच भावना तिला सुखावू लागली होती. राहून राहून आपल्या सासुबाईंची आठवण येऊ लागली तिला. 'पण काहीही झालं तरी आपण आपल्या सुनेशी छानच वागायचे. आपला मूळचा स्वभाव अजिबात बदलायचा नाही.' असे मनोमन तिने ठरवून टाकले. 
शिवाय देविकाचा स्वभाव तिला आधीपासूनच ठाऊक होता. पण कितीही नाही म्हंटले तरी सून म्हणून थोडे दडपण येतेच, म्हणून ती सारे काही देविकाच्या कलाकलाने घेण्याचा प्रयत्न करू लागली. 
एक दिवस कविताने देविकाला आपल्या खोलीत बोलावले. आपल्या सासुबाईंनी दिलेले आपल्या वाटणीचे दागिने तिने देविकाला देऊन टाकले. 
"देविका, आपले सासू -सुनेचे नाते फुलायला थोडा वेळ आपण एकमेकींना द्यायला हवा. आपण दोघी एकमेकींचा मान ठेऊ, एकमेकींवर विश्वास ठेऊ म्हणजे साऱ्या गोष्टी सोप्या होतील. तुला कोणतेही दडपण घेण्याची गरज नाही. आहे तशीच छान रहा आणि माझ्या अनिरुद्धला आयुष्यभर अशीच साथ दे." 
आपल्या सासुबाईंचे बोलणे ऐकून देविकाचे दडपण कमी झाले आणि ती आशिर्वादासाठी कविताला नमस्कार करणार, इतक्यात कविताने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिला भरभरून आशीर्वाद दिला.

क्रमशः
©️®️सायली

🎭 Series Post

View all