सुख शोधताना भाग -7

Katha Eka Samanya Strichi
कविताने नोकरीची गोष्ट सचिनच्या कानावर घातली. "अगदी पूर्णवेळ नाहीतरी, कमी तासांची नोकरीही चालेल मला."

"तुला काहीतरी करावे वाटते, हेच खूप आहे. शिवाय मुले आता मोठी होत आहेत. राधाही जबाबदारीने आपला अभ्यास पूर्ण करते. शिवाय आई -दादांसोबत मुलांना पाहते. तिचे दोन्ही भावांवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे मुलांची काळजी करण्यासारखे काही नाही. आता घरात कामाला मावशी आहेत. तू तुला हवं ते कर." सचिन आनंदाने म्हणाला. तशी कविता परवानगी विचारायला सुलभाताईंकडे गेली.

इकडे सचिन विचार करू लागला. 'कविता घराबाहेर पडली तर बरेच होईल. केवळ घरकाम, चुल-मुल या विचारातून बाहेर पडेल ती. शिवाय स्वतःचे चार पैसे हाती आले, तर आपणही काहीतरी करू शकतो, असा आत्मविश्वासही येईल तिला.'

"सासुबाई, मीही नोकरी पाहिली तर चालेल का? म्हणजे घरी बसून पहिल्यासारखे काही काम नसते आणि असलेले काम लवकर संपते. सारा दिवस अंगावर आल्यासारखा वाटतो मग." कविता जरा भीत भीतच म्हणाली.

"माझी काही हरकत असणार नाही. तू एकदा हवं तर तुझ्या सासऱ्यांना विचार." सुलभाताई थोडा विचार करून म्हणाल्या.

"पण मी काय म्हणते..वहिनी, आता नोकरी जमणार आहे का तुम्हाला? तुमचे शिक्षण म्हणजे साधी पदवी. माझ्यासारखे उच्च शिक्षण नाही तुमच्याकडे. शिवाय नोकरीसाठी एक प्रकारचा स्मार्टनेस लागतो. तोही नाही तुमच्याकडे. मग कसे व्हायचे?" आपले मोठाले डोळे मिचकावत सारिका म्हणाली.

"तिला मनातून काही करावे वाटते हेच खूप आहे आणि धाडस केल्याशिवाय एखादी गोष्ट अंगवळणी पडत नाही. हळूहळू तिला आत्मविश्वास येईल. कविता, तू बिनधास्त हो पुढे. आम्ही आहोत तुझ्यासोबत. कोणी काही म्हंटले तर अजिबात मनावर घेऊ नको." दादा म्हणाले तसे कविताला खूप बरे वाटले.

कोमलही आता नोकरी करत होती. शिक्षण संपल्यावर सुलभाताईंनी तिला "आता पुढे काय?" म्हणून अडून अडून विचारले देखील होते. पण तिच्या सासुबाई म्हणाल्या, "तिच्या कलाने होऊ दे सारे. नातवंडांची आम्हाला गडबड नाही." तेव्हा सुलभाताई गप्प बसल्या. मग कविताने नोकरीची तयारी दाखवली, तसा त्यांना मनातून आनंदच झाला आणि त्यांनी मोकळ्या मनाने परवानगी देऊन टाकली.

सचिनने शाळेजवळच्या आपल्या दोन खोल्या आपल्या गरजू विद्यार्थ्यांना कमी पैशात राहण्यास देऊन टाकल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली.

तीन महिन्यांच्या प्रयत्नानंतर कविताला घराजवळच नोकरी मिळाली. पगार फारसा नव्हता. पण नोकरीची वेळ कमी होती. पण ही नोकरी बरी वाटल्याने कविताने ती स्वीकारली. घरची इतर कामे, मुलांचे आवरून कविता सकाळी दहा वाजता बाहेर पडत असे आणि चार वाजता परत येत असे. 
हळूहळू कविता आपल्या कामाला सरावली. मन लावून काम केल्याने एका वर्षातच तिला पुढचे पद मिळाले. "आपणही काहीतरी करू शकतो!" असा आत्मविश्वास तिच्या मनाला आनंद देऊ लागला.

अक्षय आणि अनिरुद्धचे एकमेकांशिवाय पान हलत नसे. ते आता शाळेत जाऊ लागले होते. शाळेतल्या त्यांच्या गमती -जमती ऐकून घरच्यांची छान करमणूक होत होती. शिवाय त्यांच्या अभ्यास दादा करवून घेत असत. त्यामुळे दादांच्या शिस्तीत त्यांना नीट वळण लागत होते.

इकडे सारिका मात्र स्वतःच्या कामावर खट्टू झाली. 'आपण इतकी वर्षे हेच काम केले. पण पगारही फारसा वाढला नाही. मात्र वहिनींचे शिक्षण आपल्यापेक्षा कमी असूनही त्या पुढे गेल्या. काय म्हणावे याला? खरचं माझे काही चुकले का?' तिला समजेना.

"ही इतकी समज आली तेवढी पुरे आहे. तुझे चुकले काही नाही. पण कोणी आपल्या पुढे गेलेले तुला आवडत नाही आणि कदाचित तुझी कष्ट करण्याची तयारी कमी पडत असावी." सागर सारिकाला म्हणाला.

"पुरेसा अनुभव येईपर्यंत नोकरी करावी. मग स्वतः हिशोबाची कामे घरी घ्यावीत. मीही हेच काम केले इतकी वर्षे. मला जमेल तशी मदत करेन मी तुला." कविताचे काम पाहून दादांनी तिला सल्ला दिला. कविताला हे पटले आणि आणखी उत्साहाने ती आपले काम करू लागली.

"दादा, एक विचारू का? म्हणजे इतकी वर्षे मी हेच काम करत आले. मग मला तुम्ही कधी घरी काम घे, मी मदत करतो.. असे म्हणाला नाहीत बरं?" सारिका दादांना म्हणाली.

"ते कसं आहे सुनबाई, तुमच्या आणि मोठ्या सुनबाईंच्या स्वभावात बराच फरक आहे. तुम्हाला आमचे म्हणणे कधीच पटले नसते. कारण तुम्ही स्वतंत्र वृत्तीच्या आहात. आम्ही कोणी तुमच्या निर्णयांच्यामध्ये आलेले तुम्हाला सहसा आवडत नाही? आपले निर्णय घेऊन तुम्ही मोकळ्या होता. खरं ना?" दादा जरा स्पष्टपणेच म्हणाले.
हे ऐकून सारिका काहीच बोलली नाही. ती आत निघून गेली. मात्र तिला दादांचे हे म्हणणे कुठेतरी पटल्यासारखे वाटले.

हे सारे ऐकणारी सारिकाची आई पुढे म्हणाली, "दादासाहेब म्हणाले ते सारे अगदी खरे आहे. सारिका कोणाचे ऐकेल तर शपथ! तुम्हाला आठवते ना, सुलभाताई? अक्षय अगदी लहान होता, तेव्हा सारिका त्याला आमच्याकडे ठेऊन जात होती. तेव्हा अनिरुद्धही लहान होता. दोन्ही मुले तुमच्याच घरी एकत्र वाढतील, म्हणून मी पहिल्यांदा नाहीच म्हणाले होते. पण ही ऐकते कुठे? हट्टाने आमच्या घरी ठेऊ लागली त्याला.
मग काही दिवसांनी तिची वहिनी म्हणाली, ताई अक्षयला तुमच्याच घरी राहू दे. इथे आम्हाला नाही म्हंटल तरी त्याची अडचण होते. तेव्हा कुठे बाईसाहेबांचे डोळे उघडले. नंतर विशालला मुलगी झाली ही गोष्ट निराळी."
हे ऐकून सुलभाताईंनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला. 
"ताई, आपले नशीब चांगले. हे ऐकायला सारिका इथे नाही. नाही तर काही खरं नव्हतं माझं." सारिकाची आई इकडे-तिकडे पाहत म्हणाली. तसे सारेच हसू लागले. 

"हल्ली घरचं वातावरण हसतं- खेळतं झालं आहे नाही का? ते कायम असचं राहू दे." दादा सागर आणि सचिनकडे पाहून म्हणाले.
_________________________

यथावकाश राधा दहावी झाली आणि पुढच्या शिक्षणासाठी मोठ्या शहरात गेली. तिथे कोमल आपला नवरा आणि दोन मुलांसह नुकतीच राहायला गेली होती. त्यांच्या सोबतीने राधा तिथे राहणार होती. राधाने महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि लवकरच तिथल्या वातावरणात ती रमून गेली.

अक्षय आणि अनिरुद्धचा एकमेकांवर फार जीव होता. एकमेकांना सोडून ते कुठल्याच गोष्टी करत नसत. शाळेत एकत्र जात.अभ्यासही एकत्र करत. त्यांची मित्र मंडळही खूप होती. त्यांचा अभ्यास जसा वाढू लागला, तशी सारिकाने त्यांना खाजगी शिकवणी लावली.

वर्षभरापूर्वीच कविताने नोकरी सोडली होती आणि ती घरून काम करत होती. दादा आता वयानुसार थकले होते. कविताला ते जशी जमेल तशी मदत करत होते. हे पाहून सारिकाला आपली नोकरी सोडण्याची इच्छा झाली. मात्र कामाच्या बाबतीत तिचे कविताशी फारसे पटणार नाही, हे जाणून सुलभाताईंनी तिला नोकरी न सोडण्याचा सल्ला दिला आणि तो सारिकाने ऐकला देखील.

सारे काही छान चालू होते. अचानक सुलभाताई आजारी पडल्या. दोन्ही सुनांनी मिळून त्यांची खूप सेवा केली. एक दिवस त्यांनी कविताला आपल्या खोलीत बोलावले. "कविता, जमलं तर मला माफ कर गं. आक्कांनी माझा कान पिळला नसता, तर माझे डोळे उघडले नसते. उगीचच तुझा राग राग केला मी. माझ्या माघारी तू हे घर, या घरातील माणसांची मनं अगदी व्यवस्थित सांभाळशील याची मला खात्री आहे. 
सारिकाचा अल्लडपणा म्हणावा तसा अजून कमी झाला नाही. आपणहून ती जबाबदारी घेते हेच खूप आहे. मात्र तिला कधी अंतर देऊ नकोस. आजपर्यंत जशी समजून घेत आलीस, तशीच यापुढेही समजून घे. पाठच्या बहिणीप्रमाणे वाग तिच्याशी आणि तुझ्या सासऱ्यांची नीट काळजी घे. त्यांचेही वय झाले आता. सारे मिळून जपा त्यांना." इतके बोलून सुलभाताई थांबल्या. बाजूच्या खोलीत बसून त्यांचे बोलणे ऐकणारी सारिका एकसारखी रडत होती. न राहवून ती सुलभाताईंच्या खोलीत आली.

"सारिका, कोणाला दुखावू नको आणि जिभेला थोडा आवर घाल." सुलभाताई सारिकाला पाहून म्हणाल्या.

"कोमलचा हक्क मी कोमलला तिच्या लग्नात दिला. हे सारं तुमचंच आहे." ताईंनी आपले दागिने दोन्ही सुनांना सामान वाटून दिले. 
नातवंडांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. आपल्या मुलांना जवळ घेतले आणि दादांचा हात हातात घेऊन मूकपणे सुलभाताई कायमच्या प्रवासाला निघून गेल्या.
सुलभाताई गेल्याने सारं घर उदास झालं. दादा कोलमडून गेले तर सासू नसल्याची जाणीव कविता आणि सारिकाला पावलो पावली होऊ लागली. पण सुलभाताई गेल्याने जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून निघणारी नव्हती. याची जाणीव दोघींनाही झाली. 
हळूहळू घर सावरलं. सारिकाही अधिक जबाबदारीने वागू लागली. 

"वहिनी, एक विचारू? पूर्वी सासुबाईंनी तुम्हाला चांगली वागणूक दिली नाही. मग कोणीतरी बोलले म्हणून त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्च्याताप झाला. पण तुम्ही मनात त्यांच्याबद्दल राग कधी ठेवला नाहीत? की तुम्हाला त्यांच्या वागण्याचा त्रास कधी झाला नाही?" सारिका कविताला म्हणाली.

"सारिका, आपल्या भूतकाळावर वर्तमान रचला जात असतो, त्यामुळे झाले गेले विसरून जाणे केव्हाही चांगले. सासुबाईंचे वागणे मला त्रास देत होते. पण हे, भाऊजी, दादा यांनी मला खूप जीव लावला. त्यांच्या प्रेमामुळे मला सर्व काही
सहन करण्याची ताकद मिळाली. शेवटी गोष्टी फार मनाला लावून घेतल्या नाहीत की त्रास कमी होतो." 
"तेही खरेच. पण वहिनी, मीही फटकळ आहे. न पटणाऱ्या गोष्टी लगेच बोलून दाखवण्याचा माझा स्वभाव आहे. कोणी मुळुमुळू वागलेले मला आवडतच नाही मुळी. सारे व्यवहार कसे रोख ठोक असावेत, असं वाटतं." सारिका म्हणाली.

"हो. पण माणसाने इतकी रोखठोक असू नये. जेणेकरून समोरच्याचे मन दुखावले जाईल." कविता शांतपणे म्हणाली.

क्रमशः
©️®️सायली



🎭 Series Post

View all