सुख शोधताना भाग -6

Katha Eka Samanya Strichi
सारिकाचे बाळ मोठे खट्याळ होते. रडून रात्रभर साऱ्यांना जागवत होते. कविताला स्त्रीसुलभ भावनेने वाटे, 'आपणही कुशीत घेऊन त्याचे लाड करावे.' पण सारिका कविताला बाळाकडे फिरकू देत नव्हती. ती जवळ आल्यावर काही ना काही कारण काढून त्याला स्वतः घेत होती. 
एक दिवस सारिका नुकतीच आत गेली होती. अचानक बाळ रडू लागले. जवळ कोणी नसल्याने कविताने हळुवारपणे बाळाला जवळ घेतले. तसे ते शांत झाले आणि तिच्याकडे पाहून हसू लागले. हे पाहून कविता सुखावली. इतक्यात सारिका तिथे आली.

"वहिनी, कशाला घेतले माझ्या बाळाला? मी आहे ना इथे." असे म्हणत सारिकाने बाळाला आपल्याकडे ओढून घेतले.
"अगं, फार रडत होता तो. इथे आसपास कोणीच नव्हते, म्हणून घेतले मी त्याला." कविता सहजपणे म्हणाली.
"घरी आलात इथवर ठीक आहे. पण माझ्या बाळावर हक्क दाखवणाऱ्या तुम्ही कोण?" सारिका चिडून म्हणाली.
"असं काय करतेस? मी या बाळाची कोण लागत नाही का? आणि मोठी जाऊ या नात्याने इथून पुढे माझ्याशी नीट बोलायचं." कविता शांत स्वरात,पण स्पष्टपणे म्हणाली.
"हो, तर.. मोठी जाऊ म्हणे! इतके दिवस मी नीटच वागत होते. बाकी या घरात तुम्हाला विचारते तरी कोण?" सारिका नाटकीपणाने म्हणाली.

"सारिका, बस् झालं. आता एकही वेडावाकडा शब्द तुझ्या तोंडून येता कामा नये." सुलभाताई स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाल्या. 
"ती तुझी मोठी जाऊ आहे. निदान त्या नात्याचा तरी मान ठेव. मन मानेल तसं वागतेस, मनाला येईल ते बोलतेस. आपल्या मुलावर देखील हेच संस्कार करणार आहेस का?" सुलभाताईंचा राग पाहून सारिका गप्प बसली.

"मला नका सांगू, कसे वागायचे ते. तुम्ही इतके दिवस वहिनींना कसे वागवले, हे पाहिले आहे मी आणि आज अचानक तुम्हाला मोठ्या सुनेचा पुळका कसा काय आला?" सारिका तणतण करत आत गेली.
इतक्या वर्षात आज पहिल्यांदाच सासुबाईंनी आपली बाजू घेतली, म्हणून कविताला आश्चर्य वाटले. आनंद, खेद, आश्चर्य असे अनेक भाव तिच्या चेहऱ्यावर पसरले. ती भरल्या डोळ्यांनी सुलभाताईंकडे पाहू लागली. 

"असा त्रास करून घेऊ नको. आताच्या परिस्थितीत हे बरे नव्हे. चल, जेवण करून घे. मी कोमलला सांगते, तुझे ताट तयार करायला." सुलभाताई कविताकडे न पाहताच म्हणाल्या आणि आत निघून गेल्या.
कविताला जेवण जाईना. 'सासुबाई इतके चांगले कशा काय वागू लागल्या? आणि सारिकाचे नक्की काय बिनसले? हे तिला कळेना. मी इथे नसण्याची तिला सवय झाली की आणखी काही?' असे विचार तिच्या मनात नाचू लागले.

"वहिनी, जेव ना." कोमलच्या आवाजाने कविता भानावर आली. कसेबसे चार घास पोटात ढकलून ती ताटावरून उठली आणि आपल्या खोलीत निघून गेली.

रात्री सचिन घरी आल्यावर कविता त्याला म्हणाली, "अहो, मी माहेरी जाईन म्हणते. आता कसेबसे दोन -तीन महिने राहिलेत. बाळंतपण झाले की मग येईन दोन एक महिन्यांनी. राधा इथेच राहील. तिची काळजी नाही मला. पण.." बोलता बोलता कविता थांबली.

"पण काय?" सचिन.

"काही नाही. कधी कधी वाटते. आपल्याला सारिकासारखे वागायला जमले असते, तर फार बरे झाले असते." कविता पुढे म्हणाली.

"ठीक आहे. मी ट्रेनने सोडायला येईन तुला. तिथे जाऊन तुझी मनस्थिती चांगली होणार असेल तर ते बरे राहील. मी बोलतो आईशी." सचिन थोडा विचार करून म्हणाला.

दुसऱ्या दिवशी सचिनने आईजवळ विषय काढला. तशा सुलभाताई जा म्हणाल्या. इथे सारिकाच्या तोंडी लागण्यापेक्षा, माहेरी जाऊन निवांत राहिलेले बरे.. असे त्यांना वाटले. 

कालचा झाला प्रकार सागरच्या कानावर पडला. आई आणि दादांना तो म्हणू लागला, "वहिनी इथेच राहू दे. मी आणि सारिका थोडे दिवस दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहीन."
पण सारिकाने या गोष्टीला नकार दिला. कारण आपण घरातून गेल्यावर इथला आपला हक्क डावलला जाईल, अशी तिला मनातून भीती वाटत होती. 
दोन दिवसांनी कविता सचिनसह आपल्या माहेरी गेली. कविताला सोडून सचिन दोन दिवसांनी परत आला. 

दिवस वेगाने जात होते. नऊ महिने भरल्यानंतर कविताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दादा आणि सुलभाताईंना खूप खूप आनंद झाला. सचिन राधाला घेऊन पुन्हा काही दिवस कविताच्या माहेरी राहून आला. 

कविता सासरी आल्यावर बाळाचे बारसे थाटामाटा पार पडले. बाळाचे नाव 'अनिरुद्ध' ठेवले. बाळ खोडकर होते. मात्र कवितासारखे शांतही होते. त्यामुळे त्याचे अधिकच लाड होऊ लागले. दादांना तर त्याविना चैनच पडेना.
हे पाहून सारिका मनातून नाराज झाली. कारण तिला पहिला मुलगा झाला. या नात्याने तिचा आणि अक्षयचा मान पहिला, अशी तिची समजूत झाली होती. त्याचे लाड, कोडकौतुक आधी व्हावे मगच कविताच्या बाळाचे लाड व्हावेत, असे तिला वाटू लागले.
_______________________

सारिका आता लवकरच आपल्या कामावर रुजू होणार होती. पण कामाचे तास तिने कमी करून घेतले होते. त्यामुळे आता बाळाला कुठे ठेवायचे? हा मोठा प्रश्न तिच्या समोर उभा होता. तिने दिवसभर अक्षयला आपल्या माहेरी ठेवण्याचा हट्ट धरला. ती सुलभाताईंना म्हणाली, "हल्ली तुम्हाला वहिनी आणि त्यांची मुले फार प्रिय वाटू लागली आहेत. मग माझ्या बाळाची इथे आबाळ नको व्हायला. तेव्हा मी त्याला माझ्या आईजवळच ठेवीन. तिथे त्याचे भरपूर लाड होतील आणि शिस्तही लागेल."

तिच्या या निर्णयाला सुलभाताईंनी मात्र विरोध केला. "दोन्ही मुले एकत्र वाढतील, खेळतील. पण अक्षयला माहेरी ठेवू नको. आमची सवय लागणार नाही त्याला." सुलभाताईंनी असे बजावूनही सारिकाने त्यांचे ऐकले नाही. कामावर जाताना ती अक्षयला आपल्या आईजवळ ठेवत असे आणि संध्याकाळी घरी येताना पुन्हा घेऊन येत असे. आता आपसूकच सुलभाताईंचा ओढा अनिरुद्धकडे वळू लागला. दादा आणि सुलभाताईंच्या शिस्तीत अनिरुद्ध वाढू लागला.

मध्यंतरी कोमलच्या परीक्षेचा निकाल लागला आणि ती चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली. आता तिच्या लग्नाचे वय उलटून जायला नको, म्हणून दादा तिच्यासाठी स्थळ पाहण्याची गडबड करू लागले. कोमलचे लग्न झाले की आपली जबाबदारी संपेल आणि जीवाला थोडा निवांतपणा मिळेल म्हणून दादा घाई करू लागले. त्यानुसार विवाहसंस्थेत तिची नाव नोंदणीही केली.

एक दिवस सागर आपल्या मित्राला घेऊन घरी आला. त्याच्या मित्राने, योगेशने कोमलला 'मागणी' घातली होती. हे जर दादा आणि सुलभाताईंना मान्य असेल तर तो आपल्या आई - वडिलांना बोलणी करण्यासाठी पुन्हा इथे घेऊन येणार होता.
त्यानुसार दादा आणि सुलभाताईंनी योगेशचे सारे म्हणणे ऐकून घेतले आणि दोन दिवसांनी निर्णय कळवतो म्हणून सांगितले. 

कोमलला योगेश पसंत होता, तर सचिनने पुन्हा एकदा बाहेरून योगेशची सारी चौकशी केली. मुलाला 'नाही म्हणायला' कुठेच जागा नव्हती. त्यानुसार दादांनी योगेश आणि त्याच्या आई- वडिलांना बोलावणे धाडले. 

कोमलच्या लग्नाची बोलणी पार पडली आणि जवळचा मुहूर्त काढून लग्न पक्के झाले. आता लग्नाची गडबड सुरू झाली. पाहुणे मंडळी ये- जा करू लागली. खरेदीला सुरुवात झाली. दादांनी आपल्या बहिणीला, आक्कांना आग्रहाचे निमंत्रण पाठवले. 
"हे या घरचे शेवटचे लग्नकार्य आहे. त्यामुळे कोणीही या लग्नात विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नये. रुसवे -फुगवे असतील तर ते आपल्या माहेरी जाऊन करावेत." दादांनी साऱ्या घराला, खास करून सारिकाला सक्त ताकीद दिली. या आनंदाच्या प्रसंगी आक्काही सारे काही विसरून आपल्या सुनेला घेऊन पुन्हा घरी आल्या. कोमलच्या लग्नाच्या निमित्ताने आपसातले भांडण विसरून सारे घर एकत्र आले. 

कोमलचे लग्न पार पडले आणि घर सूने झाले. लाडाकोडात वाढलेली, थोडीशी हट्टी असणारी आपली मुलगी सासरी गेली म्हणून दादांचे मन हळवे झाले. आक्का साऱ्यांना चार समजुतीच्या गोष्टी सांगून आपल्या घरी निघून गेल्या.

दादा आणि सुलभाताईंना एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखे वाटू लागले. 

हळूहळू कोमल आपल्या सासरी रूळू लागली. काही दिवसांनी तिच्या सासऱ्यांनी तिला पुढे शिकायचे असेल, तर शिकू शकतेस म्हणून परवानगी दिली आणि कोमलने उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. 
सारे काही सुरळीत होऊ लागले. सारिकाही कवितावरचा राग काही दिवस विसरल्यासारखी वागू लागली. पण तिचा फटकळपणा म्हणावा तसा कमी झाला नव्हता.
अचानक तिने आपल्या बाळाला माहेरी ठेवणे बंद केले. त्यामुळे अक्षय आता इथेच राहू लागला. घरचा व्याप वाढल्याने सुलभाताईंनी घर कामाला मावशी ठेवल्या. सागरने अधिक पगार मिळाल्याने पुन्हा एकदा नोकरी बदलली तर सचिनलाही बढती मिळाली.

मुले हळूहळू मोठी होऊ लागली. काही दिवसांनी सारिकाच्या बाळाचा पहिला वाढदिवस साजरा झाला. पाठोपाठ अनिरुद्धचाही पहिला वाढदिवस थाटामाटात पार पडला. मुलांच्या खेळण्या -बागडण्याने, बोबड्या बोलांनी घर कसे आनंदाने भरून गेले होते. 

मुलांना जशी समज येऊ लागली. ती दोघे फारशी घरी नसतं. शेजारी -पाजारी त्यांचे भरपूर लाड होत. त्यामुळे सारिका आणि कविता थोड्या निवांत झाल्या होत्या. सकाळी सगळे आपापल्या कामावर गेल्याने आणि घरी फारसे काम नसल्याने संध्याकाळपर्यंतचा वेळ कसा घालवावा? हे कविताला कळेना. 

दोन वर्ष अशीच गेली. मुले मोठी होत होती. सारिकाही आता पूर्ण वेळ कामाला जात होती. 
त्यामुळे 'आता घरी बसून काय करावे? आपणही एखादी नोकरी करावी काय? जमेल का हे आपल्याला? सासुबाई परवानगी देतील?' असे विचार कविताच्या मनात येऊ लागले.

क्रमशः
©️®️सायली

🎭 Series Post

View all