सुख शोधताना भाग-4

Katha Eka Samanya Strichi

आक्का आपले सामान बांधायला खोलीत निघून गेल्या.

"सारिका, खरं सांग. या असल्या गोष्टी तुझ्या मनात कोणी भरवल्या? कविताने तर नाही?" सुलभाताई कविताकडे रागाने पाहत म्हणाल्या.

"वहिनी असेल कशाला काही भरवेल आई? सारिकाचेच विचार आहेत हे. पण तिला बोलायचे सोडून तू वहिनीला का बोलतेस?" सागर.

"मग काय करू? सारिका असा विचार करणे शक्यच नाही." सुलभाताई.

इतका वेळ आपल्या खोलीत बसून सारे ऐकणारा सचिन बाहेर आला.
"आई, तू काय बोलतेस हे तुला तरी समजते आहे काय? असेल दळभद्री विचार कविताच्या मनात येणे कधीच शक्य नाही. तू कविताशी नीट वागत नाहीस की धड बोलत नाहीस. इतके दिवस मी काही बोललो नाही, शांत राहिलो. कारण कधी ना कधी सून म्हणून तू तिला स्वीकारशील म्हणून. तुझे पाहून सारिकाही बोलायला कमी करत नाही तिला. तुम्हाला कामाला मात्र कविता हवी. वर प्रत्येक गोष्टीचा दोष तुम्ही तिला देता आणि तीही सहन करते. पण आता नाही. आजवर सांगायचं धाडस केलं नाही. पण शाळेजवळ मी दोन खोल्या घेतल्या आहेत. तिथे राहायला जातो आहोत आम्ही." हे ऐकून साऱ्यांना धक्का बसला.

"अहो, हे काय खुळ घेतलं आहे डोक्यात?" कविता सचिन जवळ येत म्हणाली.
"हे या आधीच करायला हवं होतं. मग गोष्टी या थराला गेल्याच नसत्या." सचिन रागाने थरथरत म्हणाला.

"भैय्या, असे नको रे बोलू. मी आईला समजावतो आणि सारिकालाही. पण घर सोडून जाऊ नकोस. अरे, दादांना काय वाटेल याचा तरी विचार कर." सागर सचिनला मिठी मारत म्हणाला.

"तूच शिकवलेस ना मला? चुकीला चूक आणि जे
बरोबर आहे त्याला बरोबर म्हंटले पाहिजे म्हणून? मग मी तेच केले आत्ता. सागर माझे तुझ्यावर जितके प्रेम आहे तितकेच आई, दादा आणि कवितावर आहे.
आजवर कविताने कुठलीच तक्रार केली नाही माझ्याकडे. पण याचा अर्थ असा नाही की तिने सगळेच सहन करावे. या सारिकाला असा विचित्र सल्ला ती देईल असे तुला तरी वाटते का रे? आपल्याच माणसांच्या जळजळीत नजरा सहन करण्यापेक्षा, दूर राहून चांगले संबंध राहत असतील तर काय हरकत आहे? म्हणून हा निर्णय योग्य वाटतो मला. वाटलचं तर आम्ही अधून मधून येत जाऊ घरी. पण इथे राहणं आता शक्य नाही." सचिन दुःखावेगाने म्हणाला.

"आई, तुम्ही तरी बोला. यांना समजवा." कविता सुलभाताईंना म्हणाली. पण त्यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. त्या मूकपणे तशाच बसून राहिल्या.
"आई आता काहीच बोलणार नाही. तू सामान बांधायला घे आपले." सचिन कविताला म्हणाला.

तशी कविता सासुबाईंकडे आशेने पाहत राहिली. त्या काहीच बोलत नाहीत, हे पाहून अखेर तिने आपले सामान बांधायला सुरुवात केली.

"आई, अगं थांबव त्यांना. बोल काहीतरी. सारिका, सगळी चूक तुझी आहे. आधी जाऊन वहिनी आणि भैय्याची माफी माग, म्हणजे ते घर सोडून जाणार नाहीत." सागर काकुळतीला येऊन म्हणाला.
बाहेर बैठकीच्या खोलीत दादा मूकपणे अश्रू ढाळत उभे होते. आक्का तर कधीच निघून गेली होती. आता मुलगा, सून आणि नात घर सोडून चालले होते.

अचानक पायाला झालेल्या स्पर्शाने दादा भानावर आले. "दादा, आम्ही येतो." कविता इतकेच म्हणाली.
"पोरांनो, या म्हाताऱ्याला सोडून कुठे चाललात?असे जाऊ नका. तुम्हा तिघांशिवाय घराला घरपण नाही. सुनबाई, माझे काही चुकले असेल तर माफी मागतो मी. पण इतकी मोठी शिक्षा देऊ नका मला." दादा रडू लागलेले पाहताच सचिनने त्यांना गच्च मिठी मारली.
"दादा, माफी मागू नका. तुम्ही सारे जाणता. आता इथे राहण्याचा हट्ट धरू नका. आपलीच माणसे अशी वागायला लागली तर मुलांनी काय करायचे? येतो आम्ही. काळजी घ्या स्वतःची." सचिन डोळे पुसत घरातून बाहेर पडला. पाठोपाठ कविता आणि राधाही निघाल्या.
राधाला कळत नव्हते, \"आजी- आजोबा, काका - काकू आपल्यासोबत येत का नाहीत?\" म्हणून ती साऱ्यांना सोबत नेण्याचा हट्ट करू लागली.

इतक्यात सागर धावत आला. "भैय्या, वहिनी हवं तर मी आई आणि सारिकाच्या वतीने माफी मागतो. पण जाऊ नका."

"आता नको अडवू सागर. तू घरी जा. सारिकाला तुझी जास्त गरज आहे." सचिन तुटकपणे म्हणाला.

"ठीक आहे. तुम्ही असे ऐकणार नाही. मी..शपथ घेतो भैय्या. जोपर्यंत तुम्ही घरी येत नाही, तोवर मी आईशी एक शब्दही बोलणार नाही." असे म्हणत सागर आत निघून गेला.
दादा बैठकीच्या खोलीत शांतपणे बसून होते. सारिका तिच्या खोलीत बसून रडत होती. तिला कविता आणि सचिनची माफी मागायची होती, पण आता ते होते कुठे घरात?
"अहो, चुकले मी. दादा, वहिनी खरंच गेले का? माफी मागायची आहे मला त्यांची."
सागर आत आलेला पाहून सारिका म्हणाली.

" जा..आता माग माफी. वेळ गेल्यावर सगळं कसं सुचतं तुला? तुझ्यामुळे हट्टी, मतलबी स्वभावामुळे झालं सगळं. आक्काही निघून गेल्या आणि आता दादा, वहिनी घर सोडून निघून गेले. ते परत येतीलच याची काय शाश्वती?" सागर रागाने म्हणाला.

__________________________

"आई, कुठे चाललो आहोत आपण? आणि आजी- आबा का नाही आले आपल्यासोबत?" राधा कविताला एकसारखे प्रश्न विचारत होती.
थोडयाच वेळात रिक्षा एका घराजवळ थांबली. कविता हातातले सामान घेऊन खाली उतरली आणि सचिन रिक्षाचे पैसे देऊन राधाला घेऊन पुढे गेला. त्याच्या मागोमाग जात कविता आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती. इथली घरे, बंगले थोडे उच्चभ्रू वर्गातले दिसत होते.
सचिनने एका घरापाशी थांबून कुलूप काढले. कविताने आत येण्याआधी दारातूनच डोकावून पाहिले. दोनच खोल्या होत्या, मात्र मोठ्या प्रशस्त दिसत होत्या. कविता उंबऱ्याशी डोकं टेकवून आत आली.
"अहो, हे घर कधी घेतले तुम्ही? कधी काही बोलला नाही ते?" कविता सारं घर फिरून आली. स्वयंपाक घर मोठं होतं आणि मागल्या दारी बरीच मोकळी जागा होती.
"घर छान आहे. पण आपल्या घराची सर नाही याला. आपली माणसं नाहीत इथे. येऊन जाऊन आपणच तिघे. दादा नाहीत की वहिनी, वहिनी म्हणून मागे पुढे करायला सागर भाऊजी नाहीत. खूप एकटं वाटेल मला इथे." आता मात्र कविताचा बांध फुटला.

सचिन जवळ घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला, "आपण आहोत ना एकमेकांसाठी! अगं, जिथं आपली किंमत नाही तिथे माणसाने कष्ट करू नयेत. माझी आई चुकली..सारिकाही चुकली. चुकीला चूक म्हणायची हिंमत दाखवावी माणसाने. उद्या त्यांना या चुकांचा पश्चाताप झाला तर चांगलीच गोष्ट आहे. मग पुन्हा एकत्र राहू आपण आणि तुझ्यावर जो आरोप झाला तो मला नाही सहन झाला." सचिन कविताला समजावत म्हणाला.
राधाला कळत नव्हतं, \"आई का रडते आहे ते?\" ती आई आणि बाबांकडे नुसतीच पाहत होती.

"कविता, मागच्या वेळी मला बढती मिळाली, तेव्हा मी या दोन खोल्या घेतल्या. म्हंटल, पुरती कागदपत्र हातात आली की मग सर्वांना या घराबद्दल सांगायचं. इथे राहायला येण्याचा माझा विचार नव्हता. वाटलं होत, हे घर भाड्याने देऊन ते पैसे राधाच्या नावे ठेवावेत. पण झालं काही वेगळच. इथे लाईट, पाणी अशा जरुरी पुरत्या सोयी आहेत. बाकी एकएक करून घेऊ.
आपण आणलेले सामान लावून घेऊ. गॅस, सिलेंडर मिळेपर्यंत जेवायला बाहेर जाऊ हवं तर." सचिन कविताला म्हणाला.

रात्री झोपल्यावर कविताच्या मनात विचारांनी गर्दी केली. \"दादा बरे असतील का? सागर भाऊजी कसे असतील? आणि सारिकाच्या मनात काय चालू असेल? विचार बदलला का असेल तिचा?\" पहाटे कधीतरी कविताचा डोळा लागला.
_________________________

सकाळ झाली तरी अजून कोणीच उठले नव्हते. \"एरवी कविता लवकर उठून सगळी कामे पटापट आवरायची. चहा हातात आणून द्यायची. सर्वांचे डबे करून नाश्ता बनवायची. आता सगळेच गणित बिघडले.\" दादा विचार करता करता व्हरांड्यात फेऱ्या मारत होते.
इतक्यात सागर आवरून आला. त्याने दोघांचा चहा केला, वर पोहे बनवले. \"दादा आवरून मी चाललो. आज मुलाखत आहे एका बड्या कंपनीत.\" काम झाले तर खूप बरं होईल. त्याने दादांना नमस्कार केला आणि खाऊन तो बाहेर पडला.

___________________

सकाळी आठ वाजता दार वाजले. तशी कविताला जाग आली. \"आता या वेळी कोण असेल?\" कविताने दार उघडले.
"अगं काल तुम्ही इथे आलात, तेव्हाच पाहिलं मी. म्हटलं ओळख करून घ्यावी म्हणून आले. मी इथे अगदी तुमच्या शेजारीच राहते. काही लागलं तर अवश्य सांग. हे घे, आत्ता चहा करून आणला आहे तुम्हाला." चहाची किटली समोर धरत शेजारच्या आजी म्हणाल्या.

कविताला काही समजेना म्हणताना आजी आत आल्या आणि त्यांनी किटली स्वयंपाक घरात नेऊन ठेवली.
"एवढा कसला विचार करतेस? तुझ्या वयाची नात आहे मला. बघ, एकटीच राहते मी घरी. काही लागलं तर हक्काने ये." असे म्हणत आजी निघून गेल्या.

आजीच्या चहाने सकाळची सुरुवात अगदी गोड झाली. नंतर कविताने अंघोळीसाठी आजीचा बंब मागून घेतला. पलीकडच्या गल्लीत जेवणाचा डबा मिळत होता, तोही सांगितला.
राधा आणि सचिन शाळेत गेल्यावर ती खरेदीला बाहेर पडली. वाणसामान आणून तिने पलीकडल्या आजींनी दिलेल्या डब्यात भरून ठेवले. संध्याकाळी येताना सचिन आपल्या मित्राची गॅस शेगडी आणि सिलेंडर घेऊन आला. कविता आणि सचिनचा नवा संसार हळूहळू उभा राहू लागला.

क्रमशः
©️®️सायली

🎭 Series Post

View all