सुख शोधताना भाग- 3

Katha eka samanya strichi

सकाळी दादा सचिनला म्हणाले, "तुझ्या शाळेतले ते म्हात्रे मास्तर आहेत ना, त्यांना आपल्या गावी, आक्काकडे निरोप द्यायला सांग, की मी आणि सुलभा दोन दिवसांनी तिकडे येतो आहोत म्हणून."

"असे अचानक का निघालात दादा? काही काम?" सचिन.

"नाही रे. खूप दिवसांत आक्का भेटली नाही. शिवाय पिंट्याचे लग्न झाले, तेव्हा आपल्यापैकी कोणी गेलेही नव्हते. त्यामुळे नाराज आहे ती. मग म्हंटल जाऊन भेटून यावं." दादा

"मग ठीक आहे. मी सांगतो मास्तरांना आजच निरोप द्यायला." असे म्हणत सचिन शाळेत निघून गेला.
तोपर्यंत सुलभाताईंनी दोन्ही सुनांना बोलावून सांगितले, "आम्ही दोघे जरा गावी आक्कांकडे जाऊन येणार आहोत. आठ दिवसांनी परत येऊ. तेव्हा घर नीट सांभाळा."
आई आणि दादा आक्कांकडे जाणार म्हणताच, कविताने आक्कांच्या आवडीचे बेसनाचे लाडू वळले. शिवाय आक्कांना, नव्या सुनेला साडी, पिंट्याला कापड असा आहेर बांधून दिला.

सुलभाताई सारिकाकडे अपेक्षेने पाहू लागल्या, ती काही आहेर बांधून देते का म्हणून? पण सारिकाने एक नवा पैसाही बाहेर काढला नाही.
"आई, हा आहेर आपल्या सर्वांकडून आक्कांना द्या." कविता जणू त्यांच्या मनातले भाव ओळखत म्हणाली.

गावी आक्कांना निरोप मिळाला. तशा त्या खुश झाल्या. आपला पाठचा भाऊ आणि वहिनी येणार म्हणून त्या तयारीला लागल्या.

इकडे सगळी तयारी झाल्यानंतर दोन दिवसांनी दादा आणि सुलभाताई गावी जायला निघाले.
नडीला लागतात म्हणून दादांनी कविताच्या हातावर थोडे पैसे काढून दिले.
"आई ,दादा सांभाळून जा आणि पोहोचल्याचा निरोप पाठवा." कविता काळजीने म्हणाली.

आई आणि दादा गावी गेले, तसे घर सूने झाले. परीक्षा तोंडावर आल्याने कोमल आपल्या मैत्रिणीकडे अभ्यास करण्यासाठी म्हणून राहायला गेली. तर सारिका आपल्या माहेरी येऊन - जाऊन करत होती. साखरपुड्याची तयारी, ऑफीसचे काम यात सारिकाची धावपळ होऊ लागली. तिचे आई -बाबा येऊन रीतसर आमंत्रण देऊन गेले. पण आई आणि दादा नसल्याने कविताने त्यांचा आहेर देऊन योग्य तो पाहुणचार केला.

खूप वर्षांनी आलेल्या आपल्या भावाला पाहून आक्कांना खूप आनंद झाला. गोविंदराव आणि सुलभाताईंसाठी काय करू आणि काय नको असे झाले होते त्यांना. त्यांची नवी सून, देवकी
स्वभावाने खूप छान होती. घरचं सारं तिचं पाहत होती. तिला पाहून सुलभाताईंना क्षणभर कविताची आठवण झाली.

"वहिनी, कसला एवढा विचार करता? आक्का सुलभाताईंना म्हणाल्या.

"काही नाही हो वन्स. ते आपलं असंच काहीतरी. बाकी तुमची सून वागायला, बोलायला छानच आहे हं. किती कामं करते! तुम्हाला आराम आहे म्हणायचा." सुलभाताई.

"हो तर. मी सध्या घरचं काही बघत नाही. सगळं सुनच करते. मी पडतील ती कामे करते. तेवढीच तिला मदत होते आणि आपले हात -पायही हलतात. देवकी मला काहीच करू देत नाही. म्हणते, तुम्ही इतकी वर्षे केले सगळे, आता मी करते. मग मीही बसते बाजूला. तिला काही अडले तर मदत करते. पण हे असेच का? ते तसेच का? असे म्हणून तिला दुखवत नाही.
शेवटी आपल्याकडे जो वयानुसार अनुभव आलेला असतो तो या आत्ताच्या मुलींना कुठे असतो? म्हणून त्यांच्या कलाने घेते इतकेच." आक्का कौतुकाने म्हणाल्या.

हे ऐकून सुलभाताईंना कसेसेच झाले. आपण कितीही बोललो तरी निगुतीने घर सांभाळणारी कविता आठवली त्यांना.
पण त्या आपल्या विचाराकडे दुर्लक्ष करत म्हणाल्या "आक्का, देवकीची निवड तुम्ही केली होती?"
"नाही. पिंट्यालाच ती पसंत पडली आणि आम्ही लग्न लावून दिले. शेवटी संसार त्या दोघांचा आहे. आम्ही किती दिवस पुरणार त्यांना? मग आहे ते दिवस मजेत घालवायचे." आक्का.

इतक्यात देवकी आली. पुरता स्वयंपाक झाला होता आणि पानं वाढून तयार होती. सुलभाताई पानावर बसल्या खऱ्या, पण त्यांच्या मनात राहून राहून कविताचाच विचार येत होता. 'आक्का किती छान वागतात आपल्या सुनेशी! मला वागायला जमेल तसे?'

जेवणं झाली. आक्का आणि सुलभाताई गप्पा मारत बसल्या. अचानक ताईंना कसली आठवण झाली. कविताने दिलेला आहेर द्यायचा राहून गेला होता. देवकी आणि पिंट्याला हाक मारून त्यांनी आहेर देऊन टाकला आणि आक्कांच्या हातात लाडवाचा डबा आणि साडी दिली.
"वहिनी, कशाला काय आणले? सारिकेने पाठवले ना हे? शेवटी मिळवती आहे ना ती! छानच आहे हं सगळे." आक्का आपली साडी निरखत म्हणाल्या.
सुलभाताई काहीच बोलत नाहीत हे पाहून दादा म्हणाले,"अगं धाकट्या सुनबाईंना तितकी पोच नाही अजून. मोठ्या सुनबाईंनी आठवणीने पाठवले हे. घरचं सारं त्याच पाहतात हल्ली. त्यामुळे आम्ही निवांत आहोत."

हे ऐकून आक्का समाधानाने हसल्या.

दोन दिवस फार मजेत गेले. वहिनी आणि भावाची बऱ्याच वर्षांनी भेट झाल्याने आक्का खुश होत्या.

पाच- सहा दिवस झाले तशा सुलभाताई जाण्याची गडबड करू लागल्या. पण आक्का काही सोडेनात. "सारिकेच्या भावाचा साखरपुडा आहे. जायलाच हवे आम्हाला. हवं तर तुम्ही सोबत चला." सुलभाताई आक्कांना आग्रह करू लागल्या.
हो, नाही करत आक्काही तयार झाल्या.

कवितेने आक्कांचे छान स्वागत केले. बऱ्याच वर्षांनी त्या भेटत होत्या साऱ्यांना. सारिकेची आणि त्यांची फारशी ओळख नव्हती. त्यांची थोडीफार चौकशी करून भावाचा साखरपुडा जवळ आल्याने सारिका माहेरी निघून गेली. त्यामुळे दादा चिडले. पण कविता सारे सांभाळून घेत आक्कांना काय हवं, नको ते बघू लागली.

पुढच्याच आठवड्यात विशालचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. तिथला थाटमाट, मानपान पाहून सुलभाताई अगदी हरखून गेल्या. पण आक्कांना मात्र काहीतरी चुकल्यासारखे वाटू लागले. कविता इतकं सारं करते पण घरात तिला काहीच स्थान नाही, वहिनी तिच्याशी नीट वागत, बोलत नाहीत हे त्या पाहत होत्या. त्यांनी दादांना अडूनअडून विचारले देखील. पण दादांनी घरच्या गोष्टी बाहेर कशाला बोला? म्हणून काहीबाही सांगून वेळ मारून नेली.

मैत्रिणीकडे गेलेली कोमल कधीची घरी आली होती. हे कॉलेजचे शेवटचे वर्ष असल्याने दादांनी तिला सक्तीचा अभ्यास सांगितला होता.

"आक्का, एखादे चांगले स्थळ आहे का बघा. कोमलचा निकाल लागला की, तिचेही लग्न उरकून टाकू. म्हणजे आम्ही जबाबदारीतून मोकळे होऊ. पुढे शिकायचे असल्यास ती सासरी जाऊन शिकली तरी चालेल." दादा आपल्या बहिणीला म्हणाले.

काही दिवसांतच कोमलची परीक्षा संपली आणि  दोन महिन्यानंतर होणारे विशालचे लग्न घाई गडबडीत पार पडले. लग्नानंतर सारिका आठ दिवस आपल्या माहेरीच होती.

उलट्या, ताप, मळमळ याने हैराण झालेली सारिका अचानक बरं वाटत नाही म्हणून घरी आली. सुलभाताई आणि आक्कांचा संशय खरा ठरला. सारिकाला दिवस गेले होते! आता सुलभाताईंना तिला कुठे ठेवू आणि कुठे नको, असे झाले होते. ही बातमी ऐकून सागरलाही खूप आनंद झाला.
पण सारिका नाराज होती. मात्र साऱ्यांचा आनंद पाहून तिने ही नाराजी चेहऱ्यावर दिसू दिली नाही. तिला इतक्यात मूल नको होते. त्याचा परिणाम नोकरीवर होणार होता. त्यामुळे मिळणारे स्वातंत्र्य नाहीसे होणार होते. शिवाय हाती येणारा पगारही थांबणार होता.
"अहो, मला इतक्यात बाळ नको. आधी माझे काम, मिळणारा पैसा महत्वाचा वाटतो मला. अजून एखादे वर्ष जाऊ दे. मग मुलाचा विचार करू आपण." न राहवून ती सागरला म्हणाली.

"अगं, काय बोलतेस हे? किती आनंदाचे क्षण आहे हे. घरात सारे जण किती आनंदात आहेत हे पाहतेस ना? त्यांचा आनंद हिरावून घेणार आहेस का तू? नंतर अडचण येण्यापेक्षा योग्य वेळी मूल झालेलं बरं आणि राधाचे लाड करतेस ना? तसेच आपल्या बाळाचे कर." सागर सारिकाला समजावत म्हणाला.

हे ऐकून त्यांच्या खोलीमध्ये येणारी कविता आत जावे की नको, असा विचार करत बाहेरच थांबली.
बोलता बोलता सागरचे लक्ष कविताकडे गेले आणि त्याने तिला थांबवले.

"वहिनी, सारिका काय म्हणते बघ. तिला हे बाळ नको झाले आहे." सागर चिडून म्हणाला.

"असे अचानक काय झाले सारिका? काही अडचण आहे का? अगं पहिल्यांदा असे वाटणे स्वाभाविक आहे. पण नंतर तुलाच छान वाटेल बघ तू." कविता सारिकाला समजावत म्हणाली.

"हा आम्हा दोघांचा प्रश्न आहे वहिनी. तुम्ही कशाला नसत्या गोष्टीत लक्ष घालता? आणि तुम्हाला तरी काय नडले हो? सगळ्याच गोष्टी वहिनींना सांगायलाच हव्यात का?" सरिकाचा वाढलेला आवाज बाहेर पर्यंत गेला.

हे ऐकून कविताच्या डोळ्यात पाणी आलं. ती आपल्या पदराने डोळे पुसत तिथेच बसून राहिली.

आवाज ऐकून काय झालं? हे पाहायला आक्का आत आल्या. "काय झालं इतकं? का ओरडतेस कवितेवर?"
"आक्का अहो, सारिका म्हणते तिला हे बाळ नको आहे." सागर पुढे होत म्हणाला.
"का? काही अडचण आहे काय?" आक्का सारिका जवळ बसत म्हणाल्या.
"नाही. पण मी ही जबाबदारी घ्यायला आत्ता तयार नाही. मला माझं काम, पैसाही तितकाच महत्त्वाचा वाटतो." आपल्याच ठेक्यात सारिका म्हणाली.
इतक्यात शेजारी गेलेल्या सुलभाताईही परत आल्या.

"इतकंच ना? डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कामाला जाऊ शकतेस तू. ते काही फारसं अवघड नाही आणि पाहिले तीन महिने त्रास होतोच थोडा. त्यात काही फारसं काळजी करण्यासारखं नाहीच मुळी. देवानं दिलेलं सुख गोड मानून घ्यायला शिका जरा.
गेले बरेच दिवस पाहते मी. सगळ्याच गोष्टींचा दोष तुम्ही कविताला देता. तिच्यासोबत नीट वागत बोलत नाही. माणूस म्हणून थोडी तरी जाण आहे की नाही तुम्हाला?" आक्का.

"वाटलंच होतं मला. इथे मला समजून घेणारं कोणी नाही आणि आक्का तुम्हीही मलाच बोला. तसा तुमचा नि या घराचा काय संबंध म्हणा? आलाच आहात तर चार दिवस नीट रहा आणि जा आपल्या घरी." सारिका रागारागाने म्हणाली.

हे ऐकून सुलभाताई पुढे आल्या. "अगं तुझ्या जिभेला काही हाड? मोठ्यांशी कसं वागायचं, बोलायचं हे शिकवल नाही का तुझ्या माहेरी?"

"आक्का, तुम्ही मनावर नका घेऊ सारिकाचे बोलणे. तुम्ही चला बाहेर. त्या दोघांना काय करायचे ते करू दे." सुलभाताई.

"वा.. इतक्या वर्षात मी माझ्या माहेरी किती वेळा आले वहिनी? अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत ना? ना इथे कधी कुठल्या गोष्टीत लुडबुड केली, ना कधी कसले सल्ले दिले. दोन गोष्टी समजुतीच्या सांगितल्या, तर या घराचा नि माझा संबंध संपला लगेच? किती पाठीशी घालाल या आपल्या उध्दट सुनेला? ती नोकरी करते म्हणजे फार काही जगावेगळं नाही करत. असो, मी आता इथे परत यायची नाही. माझा आणि या घरचा संबंध कायमचा संपला." आक्का चिडून म्हणाल्या.

क्रमशः
©️®️सायली

🎭 Series Post

View all