सुख शोधताना भाग -5

Katha Eka Samanya Strichi

कविताला आपल्या घराची आठवण सतत येत होती. राधा आणि सचिन शाळेत निघून गेल्यावर आख्खा दिवस तिला खायला उठे. आता रोज काय करायचे? म्हणून ती शेजारी आजींकडे जाऊन बसू लागली. त्यांची चार कामे करू लागली. जशी ओळख वाढत गेली, तसा आजींच्या प्रेमळ स्वभावाचा तिला आधार वाटू लागला. त्यांच्या जवळ आपलं मन मोकळं करू लागली.
गल्लीतल्या इतर कुटुंबांच्या ओळखी झाल्या, तसे कविताचे त्यांच्याकडे येणे-जाणे सुरू झाले. नव्या घरात हळूहळू कविता रुळली.

सागरला नवी नोकरी मिळाली. तसे त्याचे फिरतीचे काम बंद झाले. सारिकाने आपला विचार बदलला आणि विश्रांतीसाठी ती माहेरी गेली. सुलभाताई अगदीच एकट्या पडल्या होत्या. सागर त्यांच्याशी बोलत नव्हता, तर दादा केवळ कामापुरते बोलत होते.

सागर सचिनला कधीतरी शाळेत भेटायला जाई. "घरी परत ये म्हणे." पण अजून सचिन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
________________________

एक दिवस दुपारच्या वेळी आजी घरी आल्या. कविता जेवत होती. आपल्यासोबत तिने आजींचे ही ताट वाढले.
"एक विचारू का गं?" आजी जेवता जेवता म्हणाल्या.
"हो." कविता.
"तू नेहमी तुझ्या सासरच्या मंडळींचा उल्लेख करतेस, ती इथे कधी येत नाहीत की विचारपूस करत नाहीत! असे कसे?"आजी

थोडे आढे वेढे घेत कविताने सारे काही सांगितले त्यांना.

तशा आजी म्हणाल्या, "अगं, तू कधी तुझ्या सासुला खडसावून विचारलेस का, माझ्याशी असे का वागता म्हणून? कधी हक्क दाखवलास का त्यांच्यावर? त्या जे वागतील ते सहन करत गेलीस? हो, ना?
कविता, एकत्र कुटुंब सगळ्यांच्याच नशिबात नसतं गं. तू त्या दिवशी तुझ्या जावेला जाब विचारून खरे -खोटे करून पाहायला हवे होतेस. तुझेही चुकलेच. नवरा म्हंटला म्हणून लगेच घराबाहेर पडलीस? ते घर तुझेही आहेच. आता त्या घरी गेली नाहीस ना, तर आपल्या माणसांना कायमची गमावून बसशील. या वयात आपल्या सासू- सासऱ्यांना आधार हवा असतो. तुझी धाकटी जाऊ याचा विचार करत नसेल, तर तू हे तिला कृतीतून दाखवून दे.
जा तिथे आणि थोडा हक्क दाखव..घरावर नाही तर आपल्या माणसांवर."

"हे ही खरचं.."कविताला आजींचे म्हणणे पटले आणि तिला खूप बरं ही वाटलं. "कोणीतरी आपल्याला समजावणार, समजून घेणारं आहे म्हणून." तिला आता साऱ्यांची तीव्रतेने आठवण येऊ लागली. पण त्या घरी जायचे कसे? हे तिला उमजेना.

"खरं सांगू का कविता, मला सून आहे, मुलगा आहे. साधारण तुझ्या वयाची नात आहे. पण ते माझ्या जवळ राहत नाहीत. कारण त्यांना माझी अडचण होते आता. ही म्हातारी जड झाली आहे त्यांना. मुलगी आहे मला. पण ती परदेशात असते. लग्न झाल्यानंतर तिकडे गेली ती आलीच नाही. अगदी तिकडची झाली बघ." आजींनी डोळ्याला पदर लावला.
"म्हणून म्हणते, सासू चुकली तर ती चूक दाखवून द्या. सौम्य भाषेचा वापर करून बोला तिच्याशी. संवाद साधा. असं एकटं पाडू नका तिला." कविता आजींच्या जवळ बसून त्यांना थोपटत राहिली. बऱ्याच वेळाने त्या निघून गेल्या.

रात्री तिने आजींचे म्हणणे सचिनच्या कानावर घातले. त्यालाही कुठेतरी हे पटत होते. पण आता घरी जायचे तरी कसे? हे त्यालाही समजेना.

दुसऱ्या दिवशी कविताची सकाळ झाली ती पोटदुखीने. कशीबशी घरची कामे आवरून तिने आजींचे घर गाठले. तिला काय होत असावे हे त्यांनी अनुभवी नजरेने ताडले. पण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा म्हणून त्या तिला दवाखान्यात घेऊन गेल्या. आजींना आलेली शंका खरी होती, कविताला पुन्हा दिवस गेले होते. डॉक्टरांनी औषधे दिली आणि आराम करायला सांगितला. तशी कविताची आई राहायला आली.

मध्यंतरी सुलभाताईंनी आक्कांना माफीचे पत्र पाठवले. मात्र आक्कांनी त्यांना उलट पत्र पाठवून खूप काही सुनावले. त्यामुळे सुलभाताईंच्या स्वभावात थोडा बदल जाणवू लागला होता.

सारिकाला सासरी येऊन बरेच दिवस झाले. सुलभाताईंनी तिच्यावर तिला पेलेल अशी जबाबदारी टाकायला सुरुवात केली. सातवा महिना लागला तसा सुलभाताईंनी तिचे डोहाळ जेवण करायचे ठरवले. रीत म्हणून त्यांनी सागरकडून कविताला आमंत्रण धाडले. पण दुसरा महिना असल्याने कविता येऊ शकत नव्हती.
ही बातमी ऐकून दादांना फार आनंद झाला तर सुलभाताई काही न बोलता मनातून सुखावल्या. सारिकाचे डोहाळ जेवण आनंदात पार पडले. पण कविता इथे नसल्याची जाणीव सुलभाताईंना झाल्याविना राहिली नाही. डोहाळ जेवणानंतर सारिका पुन्हा माहेरी निघून गेली. सुलभाताईंना आता मनोमन वाटू लागले, "सचिन आणि कविताने पुन्हा घरी यायला हवे." शेवटी काहीही झालं तरी त्यांचा मोठा मुलगा होता तो.

एक दिवस दादा सचिनच्या घरी आले. असं अनपेक्षितपणे दादांना आलेलं पाहून कविता सुखावली. "आता घरी परत चला.." म्हणून दादा हट्ट करू लागले. कवितालाही साऱ्यांची आठवण येत होतीच. पण सचिन आणि राधा शाळेत गेले होते. त्यामुळे तिला नीट निर्णय घेता येईना. सरते शेवटी दादा निघून गेले.

अचानक एक दिवस सुलभाताई आल्या. त्यांना पाहून कविताला खूप खूप आनंद झाला.
सुलभाताईंना काय आणि कसे बोलावे? हे समजतच नव्हते. त्यांनी सारं घर नजरे खालून घातले. काही न बोलता त्या बराच वेळ नुसत्याच बसून राहिल्या.

"आई, काय घेणार?चहा की सरबत?" कविता.

"नको गं काही. तुम्हाला तिघांना न्यायला आले मी आपल्या घरी." सुलभाताई कशाबशा म्हणाल्या.
हे ऐकून कविताला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
" तुम्ही निघून गेला आणि घराचं घरपण हरवलं. स्वयंपाक घरात सतत तुझा राबता असायचा. आम्हाला काही लागलं तर तू आसपास असायचीस. काय हवं नको विचारायचीस.. सारिकाला थोडी कामाची सवय केली मी. पण ती आहे अशा अवघडलेल्या अवस्थेत! आठवा लागला तसा गेली माहेरी.
मग तुझी बातमी ऐकून का कोण जाणे, मला वाटू लागलं तुला सोबतीची गरज आहे. तुलाही आरामाची गरज आहे आता. एकटी काय काय करशील? झालं गेलं गंगेला मिळालं. आता घरी चला." सुलभाताई एक एक शब्द जुळवून बोलत होत्या.

"ताई, मीही तिला हेच सांगत होते. मोठी कशीही वागत असली तरी मोठ्यांचा राग लहानांनी मनावर घेऊ नये. सोडून द्यावा तिथल्या तिथे." कविताची आई म्हणाली. तशा सुलभाताई काहीच म्हणाल्या नाहीत.

थोड्या वेळाने सचिन आणि राधा आले. आईला पाहून सचिनला आनंद झाला. पण त्याच्या मनातला रागही उफाळून वर आला. काही न बोलता तो आत निघून गेला. तर राधा आपल्या आजीला बिलगली.

"मी काय म्हणते, जावईबापू..राग सोडा आणि आपल्या घरी जा. अहो, इतका राग बरा नव्हे. शेवटी आईचं मन आहे ते. काळजी करणारच." कविताची आई न राहवून बोलली.

"आईचं मन होतं, तर या आधी का काळजी केली नाही? इतके महिने गेले तेव्हा आम्ही लक्षात तरी होतो का यांच्या?" सचिन चिडून म्हणाला.

"मी चुकले रे. असं वागायला नको होतं मी. आता लोकही नको नको ते बोलू लागले आहेत." सुलभाताई नाराजीने म्हणाल्या.

"आई, माझेही चुकलेच." कविता आपल्या सासुबाईंना म्हणाली. यापेक्षा अधिक ती काही बोलू शकली नाही. कारण तिचा तो स्वभावच नव्हता मुळी.
"अहो, जाऊया ना घरी. हे आपलं जरी घर असलं तरी इथे करमत नाही आणि आपल्या घराची सर नाही या घराला. आपली माणसं नाहीत इथे कोणी." कविता हट्टाने म्हणाली.

"जावईबापू, आता या अवस्थेत कविताला गरज आहे कोणाची तरी. मग तिला इतक्या दूरवर आमच्या घरी नेणे शक्य नाही. आपल्या माणसात राहिली म्हणजे आम्हालाही काळजी नाही." कविताची आई म्हणाली.
सचिन कसाबसा तयार झाला. इथली आवराआवर करून उद्या येतो म्हणाला. तशा सुलभाताई निघून गेल्या.
दुसऱ्या दिवशी घरची सारी आवराआवर करुन कविताने शेजारच्या आजींचा निरोप घेतला. आता "सारं काही ठीक होईल" असा आशीर्वाद दिला आजींनी तिला. तोवर सचिन आपल्या सासुबाईंना स्टँडवर पोहचवून आला आणि भरल्या मनाने कविता तेथून निघाली.

सचिन, कविता आणि राधाला घरी आलेले पाहून दादांना कोण आनंद झाला! "पोरांनो, आपण झालं गेलं विसरून जाऊ आणि नव्याने सुरुवात करू." दादा आनंदाने म्हणाले. सागरही खुश झाला.

दिवस सरत होते. सुलभाताई कविताशी फारशा बोलत नव्हत्या. मात्र तिची काळजी घेत होत्या. काय हवं नको पाहत होत्या. तीही सुलभाताईंशी हक्काने वागत, बोलत होती. आपल्या मनातले स्पष्टपणे सांगू लागली होती. हळूहळू सासू -
सुनेमधला दुरावा नाहीसा होऊ पाहत होता. आता \"हे नातं कधी घट्ट होतं, खुलतं?" याची सारं घर जणू वाट पाहत होतं.

कोमलला पाहून कविताला आश्चर्य वाटत होते. ती घरची सारी कामे करत होती. साऱ्यांशी अदबीने बोलत होती. कोमल आताशा खूप बदलली होती. परीक्षा संपून निकालाची वाट पाहत होती तर निकाल लागताच दादा तिला स्थळ पाहायला सुरुवात करणार होते.

सारिकाचे बाळंतपण जवळ आले. तशा सुलभाताईंच्या सारिकाच्या माहेरी फेऱ्या वाढल्या. तिचे बाळंतपण माहेरीच होणार होते. दिवस भरले आणि आणि सारिकाने एका गोड मुलाला जन्म दिला. तसे सारे घर आनंदाने न्हाऊन निघाले. बाळ- बाळंतिणीची तब्येत सुधारली. बारसे झाले. बाळाचे नाव "अक्षय "ठेवले.
सारिका पुन्हा सासरी आली आणि घर कसं उत्साहाने भरून गेलं. आता कविताच्या गोड बातमीची सारेजण वाट पाहू लागले.

क्रमशः
©️®️सायली

🎭 Series Post

View all