सुख म्हणजे नक्की काय असतं. भाग - ४
"नाही... मी दुसऱ्यांसाठी माझा जीव कशाला संपवू. असंही मी मेल्यावर कोणाला काही फरक पडणार नाही. माझा जीव इतकाही स्वस्त नाहीये की तो लोकांच्या त्रासामुळे मी संपवू. बसं झालं आता... आजपर्यंत इतरांसाठी जगले, इतरांसाठी भरपूर कष्ट घेतले पण आता इथून पुढे स्वतःसाठी कष्ट करायचे आणि स्वतःसाठी जगायचं. स्वतःचं सुख स्वतः शोधायचं." आरती स्वतःशीच बोलली आणि तिथून मागे झाली. तिने सरळ जिकडे वाट दिसेल तिकडचा रस्ता धरला आणि सुखाच्या शोधात निघाली.
आरती चालत होती... पाय थकलेले, पण मनात एक नवा ध्यास होता. "सुख मिळत नाही, ते निर्माण करावं लागतं." हे तिला आज उमजलं होतं. चालता चालता ती एका ठिकाणी थांबली. आता तिचे पायच उचलत नव्हते. आजूबाजूला घरं दिसत होती. कोणीच ओळखीचे वाटत नव्हते. त्यामुळे ती दुसऱ्या गावात पोहोचली हे तिच्या लक्षात आले होते. तहानेने आणि भुकेने व्याकूळ झाली होती ती. चालता चालता समोर एक घर दिसले ते ही उघडेच होते आणि तिथे काहीतरी कार्यक्रम वाटत होता. कारण जेवणाच्या पंगती बसल्या होत्या. आरती हळूच एका कोपऱ्यात गेली आणि त्या पंक्तीला शेवटच्या जागेवर बसली. पाहुणे जास्त असल्यामुळे तिच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही.
आरती आज बऱ्याच दिवसांनी पोटभर जेवली. त्यामुळे तिचं मन आणि शरीर दोन्हीही उत्साही झाले. जेवल्यानंतर ती तिथून उठली आणि बाहेर यायचं सोडून नेमकं आतल्या बाजूला गेली. तेव्हा तिथल्या एका बाईने तिला पाहिलं आणि आवाज दिला.
"ए...इकडे जरा तू, मी भांडी घासायला बोलावले होते तिच आहे का तू? तिच असशील म्हणा, नाहीतर इथे कशाला आली असती! चल हे भांडे घासून घे. सगळे भांडे चांगले घासले की मी तुला दोनशे रुपये देईल." ती बाई म्हणाली आणि आरतीला मनातून खूप आनंद झाला. तशी ती बाई दोनशे रुपये म्हणाली होती पण भांडेही काही कमी नव्हते. पण आरतीला सवय होती त्यामुळे तिने पटपट ती सगळी भांडी घासून पुसून स्वच्छ करून ठेवली. त्या बाईने पाहिले तर ती आरतीचं काम बघून खूश झाली आणि तिला दोनशे रुपये दिले वरतून तिला थोडं फार खायला होतं ते ही बांधून दिले.
आरती खूश होऊन तिथून बाहेर पडली. आज पहिल्यांदाच तिच्या हातात दोनशे रुपये आले होते त्यामुळे तिला त्याचा खुप आनंद झाला होता. त्या आनंदातच ती पुढे चालू लागली. पुढे चालता चालता अंधार पडला मग तिला समोर एक मंदिर दिसले. ती त्या मंदिरात गेली आणि तिथेच बसून परत जवळ असलेलं थोडंसं खाल्लं आणि पाणी पिऊन मंदिराच्या मागच्या बाजूला गेली. जिथे आपल्याला कोणी बघणार नाही अशा ठिकाणी जाऊन ती झोपली.
इकडे वनिताला आरती घरी आली नाही म्हणून काहीच फरक पडला नाही. तिने तिची वाट पाहिली... आणि थोड्या वेळाने स्वयंपाक करून खाऊन पिऊन झोपूनच घेतलं.
दुसऱ्या दिवशी आरतीला सकाळी जाग आली तेव्हा आता पुढे कुठे जायचं हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. मग तिने तिथूनच परत रस्ता दिसेल तिकडे चालायला सुरुवात केली. काल चांगलं खायलाही भेटलं होतं आणि रात्री झोपही चांगली झाली होती त्यामुळे ती पुन्हा नव्या उमेदीने चालत होती. चालता चालता ती एका छोट्या शहरात पोहचली. आता तिला भुकेची जाणीव होऊ लागली. तिच्याकडे पैसे होते त्यामुळे ती आता ते खर्च करून काहीतरी खाऊ शकत होती. तिने जवळपास कुठे हाॅटेल दिसतंय का बघितले आणि एक हाॅटेल दिसताच तिथे मिसळ पाव खाल्ली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा