Login

सुख म्हणजे नक्की काय असतं. भाग - २

सुख म्हणजे नक्की काय असतं
सुख म्हणजे नक्की काय असतं. भाग - २

कोपऱ्यात बसलेली आरती भिंतीकडे पाहत होती. रडून रडून तिचे डोळे कोरडे पडले होते, पण मनाचं रडणं थांबलेलं नव्हतं. एक क्षण असंही वाटून गेलं, की सुहास ऐवजी आपण का नाही गेलो? एवढं सगळं बघायला तरी लागलं नसतं.

"देवा, का रे असं दुःख दिलं तू मला. माझ्या आयुष्यात सुखच नाही का? जन्म झाला आणि आई गेली, सगळ्या आयुष्याची वाताहत झाली. वाटलं होतं की लग्नानंतर तरी चांगले दिवस येतील पण नाही... ते पण सुख माझ्या नशिबात नव्हतं." आरती मनातल्या मनातच बोलत होती. स्वतःला आणि देवालाही दोष देत होती. रडता रडता आणि स्वतःला दोष देता देता ती तिथेच बसल्या जागी झोपून गेली.

सुहासला जाऊन आता एक महिना झाला होता पण आरतीचा सासुरवास काही कमी नव्हता. उलट तो जास्तच वाढत चालला होता. सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं करायची. मन आणि शरीर दोन्हीही थकलेलं होतं पण तिला मायेने विचारणारं कोणी नव्हतं.

घरातली कामं झाल्यावर आरती परत त्याच कोपऱ्यात जाऊन बसली. तिला घरात दुसरीकडे बसायचा सुद्धा अधिकार नव्हता. ती नुकतीच बसली नाही तर लगेच वनिता तिथे आली आणि मोठ्या आवाजात बोलू लागली.

"आता किती दिवस अशी घरात बसून राहणार आहे, आणि आम्ही तरी तुला अजून किती दिवस असं फुकट पोसणार आहोत, आता आमचं सुद्धा वय झालं आहे. ते काही नाही, आजपासून तू शेतात कामाला जायचं. तुला इथे कोणी आयतं बसून गिळायला घालणार नाही." वनिता ओरडून बोलली. त्याचवेळी आरती काही न बोलता तिथून उठली आणि एक डबा घेऊन त्यात दुपारी खायला म्हणून भाकर घेऊ लागली पण वनिताने तिच्या हातातून तो डबा ओढून घेतला.

"आता खाल्लंय ना माझ्या मुलाला मग त्याने पोट नाही भरलं का तुझं? अजून कशाला भाकर हवी आहे तुला. जा निघ जरा कामं सांगितली का टाईमपास करत बसते." वनिता रागाने म्हणाली. तसं आरती उठली आणि निराश मनाने खुरपे घेऊन शेतावर गेली. दुपारपर्यंत तिने खुरपणी केली पण दुपारच्या वेळी मात्र तिच्या पोटाला खुप भुक लागली. पाणी पिऊन पिऊन पण पोटात डचमळायला लागलं. भुक तर खुपच लागली होती पण खायला काहीच नव्हतं. आता काय करायचं आणि पोटाची भुक शांत कशी करायची याचाच विचार ती करू लागली. तोच तिला शेतातल्या पेरूच्या झाडाची आठवण झाली. मग ती तिकडे गेली आणि पेरू खाल्ले. त्यानंतर तुरीच्या शेंगा खाल्ल्या आणि हरबऱ्याच्या शेतात जाऊन हरबरा पण खाल्ला आणि पोटाची भुक भागवली. आणि परत कामाला लागली.

क्रमशः

🎭 Series Post

View all