Login

सुख म्हणजे नक्की काय असतं _ आईचं मन भाग ३ (अंतिम)

लहान गोष्टीतच सुख सामावलेले असतं
सुख म्हणजे नक्की काय असतं_
आईचं मन भाग ३

बाळाची चाहूल लागताच विभाचे जास्त लाड होऊ लागले. ते पाहून श्रीकांत मजेत म्हणाला,

"आई तुला ती म्हण माहित आहे ना 'कानामागून आली आणि तिखट झाली."

"हो माहित आहे पण असं का म्हणतो आहेस."

"बघ ना हल्ली तुला मी दिसतच नाहीस. एकट्या विभाचेच लाड होतात."

"चल चहाटळ कुठला. आता तिला जपायला हवं. तू दृष्ट नको लावूस."

पण हे सर्व अगदी छान नजर लागण्यासारखं चाललेलं नियतीला कसं बघवेल. एका अशुभ क्षणाला विभा पाय घसरून पडली आणि तिचा गर्भपात झाला. घरातले सगळेच हताश झाले. पण मालती ताईंनी वेळीच स्वतःला सावरलं आणि विभाला धीर दिला. त्या प्रसंगात त्यांनी तिची खूप काळजी घेतली. घरातल्यांच्या प्रेमाने विभाने स्वतःला सावरलं. पुन्हा सर्व रोजचं जीवन सुरू झालं. श्रीकांत विभाला म्हणाला,

"आपल्या बाळाला माझीच दृष्ट लागली."

"नाही हो जे घडायचं असतं ते घडतंच आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. पुढच्या वेळी आपण जास्त काळजी घेऊ."

एक दिवस सकाळी विभा ऑफिससाठी तयार होताना मालती ताई तिच्या हातात मोत्याच्या बांगड्या देत म्हणाल्या,

"विभा अगं ह्या माझ्या आईची आठवण असलेल्या मोत्याच्या बांगड्या आहेत. ह्यातले मोती खूप जुने आणि झिजले आहेत. तू आपल्या सोनाराकडून मोती बदलून आणशील का?"

"अहो आई आणेन न विचारता काय. एक दोन दिवसात जाईन सोनाराकडे."

ऑफिसला जाताना विभाच्या लक्षात आलं अरे आईंचा वाढदिवस पंधरा दिवसांवर आला आहे. म्हणजे आजच आपल्याला सोनाराकडे जायला हवं. संध्याकाळी घरी येताना ती न विसरता सोनाराकडे गेली. आल्यावर आईना ती म्हणाली,

"आई मी जाऊन आले सोनाराकडे. दहा पंधरा दिवसात बांगड्या मिळतील."

"बरं झालं बाई. माझ्या आईची एकुलती एक आठवण. खरं तर मला त्या जशा आहेत तशाच ठेवायच्या होत्या. बरं ते जुने मोती आपल्याला परत मिळतील ना" हळव्या स्वरात आईनी विचारलं.

"ते बांगड्या घ्यायला जाईन तेव्हा कळेल."

विभाला जाणवलं आईच्या आठवणीने मालती ताईंना भरून आलं आहे. आईंच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच विभा बांगड्या घेऊन आली होती. तिने रजा घ्यायच ठरवलं होतं आणि श्रीकांतला पण तसं सांगितलं होतं कारण आईंचा हा साठवा वाढदिवस होता. त्यावेळी हॉल वगैरे घेऊन असे खास वाढदिवस साजरे केले जात नसले तरी घरातल्या घरात वाढदिवस साजरा होई. सकाळी आईंची पूजा आटोपली तरी विभाची ऑफिसची लगबग दिसत नव्हती. त्यांनी तिला त्याबद्दल विचारताच ती सरळ त्यांना बाहेर हॉलमध्ये घेऊन आली. हॉलमध्ये आधीच शलाका आणि तिचे पती विराजमान झाले होते. तिथे पाट मांडून त्याभोवती सुंदर रांगोळी काढली होती. विभाने त्यांना पाटावर बसवले आणि श्रीकांत आणि आप्पांना सुद्धा बाहेर बोलावले. मालती ताईंना कळेचना हे सर्व काय चाललं आहे.

श्रीकांत आणि आप्पा आल्यावर विभा म्हणाली,

"आई आज तुमचा साठावा वाढदिवस आहे."

"तुला कसं कळलं? ह्यांनी सांगितलं की काय!"

विभाने आणि शलाकाने मिळून त्यांचं औक्षण केलं त्यांना मस्त सुवासिक गजरा माळला आणि त्यांना अनेक वर्ष हवी असलेली पदरावर जरतारी मोर असलेली पैठणी दिलीं. मालती ताईंचे डोळे पाणावले. सर्वात शेवटी विभाने हळूच त्यांच्या हातात जुनीच मोत्याच्या बांगड्यांची डबी ठेवली. त्यांनी ती उघडून बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ह्या जुन्या बांगड्या जशाच्या तशाच आहेत. त्या थोड्या हिरमुसून म्हणाल्या,

"अगं तू हे मोती बदलून आणणार होतीस ना."

विभाने हळूच त्यांच्या हातात एक नवी कोरी डबी दिली आणि त्यांना उघडून बघायला सांगितली तर त्यात मोत्याच्या आधुनिक नक्षी असलेल्या नवीन बांगड्या होत्या. डोळे विस्फारून त्या बांगड्याकडे पाहत असतानाच विभा म्हणाली,

"आई तुमची ईच्छा होती ना तुमच्या आईंच्या ह्या बांगड्या जशाच्या तशाच राहाव्यात म्हणून त्या तशाच ठेवून ह्या नवीन बांगड्या तुमच्यासाठी आणल्या."

हे ऐकताच मालती ताई आणि जवळच उभ्या
असलेल्या माधवरावांच्या डोळ्यात अश्रू तरळले. दोघांनी एकाच वेळी एकमेकांकडे पाहिले. शलाकाला पण गहिवरून आलं. ती म्हणाली,

"विभा खरंच मला पण हे सुचलं नसतं. मी आईने सांगितल्याप्रमाणे फक्त मोती बदलून आणले असते. माझ्यापेक्षा तूच आईची लेक जास्त आहेस."

हे सर्व पाहणाऱ्या भावविवश श्रीकांतचा ऊर अभिमानाने भरून येत होता. आईला पण आता पटलं असेल विभा किती गुणी आहे ते. तो आईकडे बघत असतानाच त्या म्हणाल्या,

"विभा तू नक्कीच एक चांगली आई होशील. माझ्या आईची आठवण माझ्यासाठी किती अनमोल आहे हे तू जाणलेस. एका आईचं मन एक आईच जाणू शकते. गाडी, बंगला, नोकर चाकर ही सुखाची परिभाषा नसून एकमेकांची मनं ओळखणाऱ्या माणसांची साथ असणं हेच खरं सुख."

" आई आप्पा ह्याच तुमच्या संस्कारात मी आणि शलाका लहानाचे मोठे झालो. आता अशाच एका संस्कारी आणि दुसऱ्याचं मन जपणाऱ्या विभाची आपल्या कुटुंबात भर पडली."