सुख म्हणजे नक्की काय असतं _
आईचं मन भाग १
आईचं मन भाग १
"अगं ऐकलंस का, ह्या महिन्यात माझ्या एका जवळच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे. मी ठरवलं होतं तुझ्या वाढदिवसाला तुला साडी घ्यायची. त्या दिवशी दादरला तू त्या दुकानातील शोकेस मधली साडी किती निरखून पाहत होतीस. पण आता ह्या महिन्यात शक्य होणार नाही. नंतर कधी घेऊ. चालेल ना तुला?" माधवराव खेदाने म्हणले. त्यांचं मन समजून मालतीताई लगेच बोलल्या,
"अहो आपला एव्हढा सुंदर संसार आहे. मला साडी आणि इतर गोष्टी गौण आहेत. साड्या म्हणाल तर बाहेर नेसायला आहेत की सात आठ साड्या. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका."
अशा तऱ्हेने समजूतदार मालती ताईंच्या साथीने माधव राजेंचा संसार काटकसरीने पण आनंदाने सुरळीत चालू होता. त्यांना श्रीकांत आणि शलाका दोन मुलं होती. माधवरावांच्या एकट्याच्या पगारात घर चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. मुलं मोठी होत होती तसा त्यांचा खर्च वाढत होता. मालतीताईंचे एक महिला मंडळ होतं. सर्व बायका काहीतरी उपक्रम हाती घेऊन घर संसाराला हातभार लावत होत्या. कधी त्या तिळगुळाच्या लाडवांची ऑर्डर घेत तर कधी दिवाळीच्या पदार्थांची. इतकंच काय तर त्यांच्या शेजारी एक फिल्म स्टुडिओ होता. तिथे कधी ह्या सर्व बायकांना एखाद्या सीन साठी पाचारण करण्यात यायचं. त्याचं त्यांना मानधन मिळायचं.
मुंबईत परळला चाळीतल्या दोन खोल्यांत संसार थाटलेला. एकंदरीतच त्या काळी सर्वांची परिस्थिती यथातथाच असायची. तरीही सर्व कुटुंब आनंदाने राहत असत. सिनेमा, हॉटेल अशी चंगळ नसायची. सिनेमा पाहणं म्हणजे गणेशोत्सव किंवा दुसऱ्या एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात एखाद्या मैदानात अथवा रस्त्यावर कापडी पडद्यावरचा दाटीवाटीने भारतीय बैठक घालून सिनेमा पहायचा. त्यात सुद्धा आगळी गंमत असायची. कोजागिरी पौर्णिमेला सर्वांनी वर्गणी काढून भेळ आणि मसाला दुधाचा आस्वाद घ्यायचा.
माधवरावांची दोन्ही मुलं हुशार होती. धाकटी शलाका कॉलेजला असताना गणित आणि विज्ञान विषयांची शिकवणी घ्यायची. गणितात तिचा हातखंडा होता. तिच्या ढ विद्यार्थ्यांना सुद्धा गणितात चांगले गुण मिळायचे. त्याचा तिला अभिमान होता. घरात तिचं वर्चस्व होतं. कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन्ही मुलांनी आपल्या हुशारीच्या बळावर छान नोकरी मिळवली. श्रीकांतला एका खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. शलाकाने सरकारी नोकरी निवडली. तिचं नात्यातल्या राजन नावाच्या एका मुलावर प्रेम होतं. राजनला लहानपणापासून माधवराव आणि मालतीताई ओळखत असल्यामुळे त्यांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. तिचं सासर जवळच असल्यामुळे ती वरचेवर माहेरी यायची.
एक दोन वर्षातच माधवराव निवृत्त झाले. आता श्रीकांत कमावता झाल्यामुळे त्यांचं बरं चाललं होतं. आता त्याच्यासाठी पण मुली बघायला सुरुवात झाली होती. खरं तर बऱ्याच वधुपित्यानी त्याची चौकशी केली होती. श्रीकांतची नोकरी आणि त्याचं रुबाबदार व्यक्तिमत्व सर्वांना भुरळ घालत होतं. मुलीकडचे घरी यायचे तेव्हा हा घरी थांबत नव्हता आणि स्वतःहून मुलगी बघायला जात नव्हता. तेव्हा मालती ताईंच्या मनात संशय आला की याचं नक्कीच काहीतरी बाहेर प्रेम प्रकरण असणार. एकदा त्यांनी थेट श्रीकांतला विचारलं तेव्हा त्याने सगळं सांगून टाकलं. ती मुलगी म्हणजे विभा ह्यांच्या जातीतली नव्हती. मालतीताई समजूतदार असल्या तरी त्यांना सून त्यांच्या पसंतीची हवी होती. लेकाच्या आयुष्याचा विचार करून त्यांनी विभाला घरी यायला सांगितलं. विभा चारचौघीत उठून दिसणारी होती. निमगोरा वर्ण, मध्यम उंची, लांब केस, बोलके डोळे अशी विभा मालती ताईंना आवडली पण त्यांच्या मनात धाकधुक होती की ही आपल्या चालीरितींशी जुळवून घेईल की नाही. तसं त्या माधवरावांजवळ बोलताच ते म्हणाले,
"तू उगाच शंका घेतेस. मला तर ती मुलगी आपल्या श्रीकांतसाठी योग्य वाटते. आल्याबरोबर आपल्या पाया पडली. स्वयंपाकघरात पण तुझ्या मदतीला आली."
"सुरुवातीला छाप पडायला अशाच वागतात मुली. नंतर रंग दाखवतात."
"तुझं आपलं काहीतरीच असतं. आता आपण तिच्या घरच्यांना भेटू तेव्हा तू तिच्याशी बोलशीलाच तेव्हा कळेल."
(श्रीकांतचे विभाशी लग्न झाल्यानंतर काय घडेल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा