#सुख म्हणजे नक्की काय असतं...

सुरेख सासरची गोड कथा

# सुख म्हणजे नक्की काय असतं...

©® आर्या पाटील

सहा महिन्यांपूर्वी मेघा लग्न करून पाटलांच्या घरात आली.. रीतसर कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाला. आनंदलाही ती पाहता क्षणीच आवडली. एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी करणारी मेघा मनमिळाऊ होती. सासरच्या मंडळींना तिने प्रेमाने जिंकून घेतले.

माहेरच्या अंगणात प्राजक्तापरी बहरणाऱ्या लेकी जेव्हा लग्न करून परक्या घरी जातात तेव्हा पुन्हा नव्याने मूळ धरावं लागतं तिथल्या अनोळखी मातीत. पण जोडीदाराची ओळखीची शाश्वत सोबत तिला त्या मातीत रुजायला निर्णायक ठरते त्याचबरोबर सासू सासरे सासरच्या मातीतले पोषक द्रव्ये ठरतात. निरोगी वाढीसाठी त्यांची साथ, त्यांचे सल्ले दिशा दाखवतात.

मानवी जीवनवरही न्यूटनच्या 'क्रिया तशी प्रतिक्रिया' या तिसऱ्या नियमाचा पगडा दिसून येतो..

नव्या रोपाला मायेनं आपल्या मातीत रुजवून घेतलं तर तेच रोप पुढे जाऊन मायेचं वटवृक्ष बनतं.. त्याच्या गर्द छायेखाली सरती जीवनसंध्या सुकर होते. आयुष्य प्रेम आणि ममतारुपी फळाफुलांनी बहरते..

आणि याउलट या नव्या रोपाला जोम घेतांना परकेपणाचं खतपाणी घातलं तर त्याच्याकडून आपलेपणाची अपेक्षा कशी करणार..?

कदाचित सासू सुनेच्या नात्यात येणारे चढउतार याच धर्तीवर आधारित असतील..

पण मेघाला मात्र आईने कळकळीने सांगितले होते.

" मेघा, सासरची मंडळी कशी का असेना तु मात्र अरेला कारे करायचं नाही. सुरवातीला बघतात काही जण परीक्षा नव्या सुनेची. पण कितीही झाले तरी तुझी माणसे तुलाच होतीच. जे येत नाही ते शिकून घ्यायचं त्यांच्याकडून. चुक झालीच तर क्षमा मागून मोकळं व्हायचं.." आई समजवायची.

" का का..? माझीच का परीक्षा..? पसंद आले म्हणूनच लग्नाला तयार झालेत ना.. मग लग्नानंतरही परीक्षा." मेघा आढेवेढे घेत म्हणायची.

" तशी सांगायची पद्धत गं.. पण तु जर सासूशी मुलीसारखी वागलीस तर त्या ही तुझी आई बनतील.." मेघाला जवळ घेत आई म्हणायची.

" असं कोणी परकं एवढ्या सहज आईची माया देईल का..?" भावनिक होत ती आईच्या कुशीत शिरायची.

" असतात गं अशीही लोकं सुनेला लेकीची माया देणारी. आपल्याला फक्त त्यांची लेक होता आलं पाहिजे.." मेघाला उराशी कवटाळित आई म्हणायची..

लहान असतांनाच बाबाला पोरकी झालेली मेघा निरोपाच्या क्षणी आईला बिलगून खूप रडली.

" मेघाच्या आई सून नाही लेक घेवून जात आहोत निश्चिंत रहा.." तिच्या सासऱ्यांनी दिलेले वचन त्यांनी आजपर्यंत पाळले.

नवी नवरी दडपणाखाली येऊ नये म्हणून तिच्या सासूनेही काळजी घेतली.

" आई, मी स्वयंपाकात सुगरण नाही त्यामुळे माझ्या हातचं तुम्हांला आवडेल की नाही याची भीती वाटते." पहिल्यांदाच स्वयंपाकघरात आलेली मेघा हळू आवाजात म्हणाली.

" तु नको घाबरू. भात थोडा कच्चा राहिला, वरण थोडं पातळ झालं आणि भाजी अळणी झाली म्हणजे तुला स्वयंपाक जमत नाही असे मुळीच नाही. तुम्ही आताच्या मुली शिक्षणासाठी बाहेर राहता. त्यानंतर नोकरी मिळाली की ती कसरत करता मग कसा वेळ मिळेल स्वयंपाक शिकायला. म्हणून तुझ्या आईला नाही दोष देणार मी. आपल्या नात्याची सुरवात आपण शिकून करुयात. तु मला नविन तंत्रज्ञान शिकव आणि मी तुला संसाराच्या गोष्टी. मग बघ कसं सगळं सुकर होईल.. आणि तु आमची लेक बनायला आम्हांलाही तुझे आईवडिल होता आलं पाहिजे.." सासूबाई असं म्हणताच तिला आईच्या शब्दांची आठवण झाली.

" सासू सासरे आई वडिल बनतील फक्त आपल्याला लेक होता आले पाहिजे.."

आपण किती नशिबवान आहोत याची जाणिव होताच तिने सासूबाईंना आलिंगन दिले.

सासरच्या घरात मेघाच्या नव्या आयुष्याची यापेक्षा गोड नांदी दुसरी कोणती असेल..

प्रत्येक मुलीला लग्नानंतर संसाराच्या अग्निदिव्यातून जावं लागतं आणि त्यात जर मुलगी नोकरी करणारी असेल तर तारेवरची कसरतच. ही कसरत मेघालाही चुकली नाही मात्र सुसह्य तेवढी झाली. कारण या कसरतीमध्ये तिच्या सासूबाई आई बनून सोबती झाल्या.

जुन्या नव्या विचारांची घडी व्यवस्थित बसली की पिढीतील अंतर संपून जातं आणि जवळीक नात्याला आणखी घट्ट बनविते.

मेघाच्या सासूबाईंनी पुढे येऊन हेच अंतर संपवलं.

संसाराच्या प्रवासात त्या तिच्या मार्गदर्शक बनल्या तर तिच्याकडून नव्या गोष्टी, नवे विचार शिकतांना तिच्या शिष्याही झाल्या.

मेघाला सकाळी शाळेत लवकर जावे लागे. माहेरी असतांना आई आयता डब्बा करून द्यायची त्यामुळे सकाळी लवकर उठून किचनमध्ये जाण्याची याआधी कधी वेळच आली नाही.

आता मात्र सकाळ जरी किचनमध्ये होत असली तरी ती ही सुसह्य होती. मेघासोबत तर कधी तिच्या आधी उठून सासूबाई किचनमध्ये हजर व्हायच्या.

" मी करेन आई. तुम्ही झोपा.." तिने बऱ्याचदा सांगून पाहिले. 

" असू दे गं. तेवढीच मलाही कामाची सवय. सकाळी लवकर जाग येते मग उगाचच लोळत पडण्यापेक्षा तुझी मदत केलेली चांगली. तुला तरी कुठे सवय असेल या सगळ्याची. आपण करू दोघी मिळून.." म्हणत तिला कणिक मळून द्यायच्या तर कधी भाजी चिरायला मदत करायच्या..

धावपळीत असलेल्या मेघाला सकाळी हट्टाने चहा चपाती खायला लावायच्या. किंबहुना तिचा डब्बा, पाण्याची बाटलीही भरून द्यायच्या.

आपण सासरी आहोत याचं दडपण मेघाला कधीच आलं नाही. दुपारी शाळेतून आल्यावर गरमा गरम जेवण बनवून तयार असायचं. कधी उशीर झालाच तर त्या जेवायलाही थांबायच्या. संध्याकाळी चहानंतर मेघाकडून आर्वजून काहीतरी नवीन शिकायच्या. दिवेलागणीनंतर स्वयंपाकघर दोघींच्या गप्पांनी आणि एकत्र बनविलेल्या पदार्थांनी दरवळून निघायचं.

उकडीच्या भाकरी, पुरणपोळी, मोदक, नवनवीन भाज्या किती किती पदार्थ शिकविले त्यांनी तिला. आणि ते ही आईच्या मायेने.

" मेघा, तु माझ्यापेक्षा आईलाच जास्त वेळ देतेस. कधीतरी नवऱ्याकडे पण लक्ष दे.." एक आनंदी नवरा आपल्या बायकोकडे गोड तक्रार करायचा.

दुधात साखर विरघळावी तशी एकरूप झाली होती मेघा सासरच्या घरात. आणि यात सर्वात मोठा वाटा होता तिच्या सासूचा. आताश्या माहेरी गेल्यावर सासरच्या ओढीने अगतिक व्हायची ती. तिला सासरी रुळलेली पाहून आईला समाधान वाटायचं..

सासरेही देवमाणूस. मितभाषी असलेल्या त्यांच्याशी तसं कमीच बोलणं व्हायचं.. पण ते ही मुलीप्रमाणे माया करायचे तिच्यावर. सांगायला एक नणंद होती.नणंद कसली मोठी बहिणच म्हणावी लागेल. ती माहेरी आली की घरात सण साजरा व्हायचा. जीवाभावाच्या मैत्रिणींप्रमाणे एकामेकींचा सहवास अनुभवायच्या त्या दोघी.

एक दिवस नणंदेची तब्येत अचानक बिघडली.. मुलाची शाळा असल्याने माहेरी येणं शक्य नव्हतं मग मेघाच्या सासूलाच तिने तिकडे बोलावून घेतलं.

" मेघा मी लवकरच येईन. घर सांभाळता सांभाळता स्वतः कडे दुर्लक्ष करू नकोस. आनंदची मदत घे हक्काने.." त्या सांगून गेल्या.

तिने होकार देत त्यांना स्वतः ची काळजी घेण्याचे आश्वासन दिले खरे पण खरी कसरत आता सुरु होणार होती. संसार म्हणजे काय हे आता खऱ्या अर्थाने कळणार होतं..

दुसऱ्या दिवशी सगळं कसं होईल या विचारात झोपच लागली नाही बिचारीला. सकाळी लवकरच उठली पण सासूबाई नसल्याने सगळीच तारांबळ उडाली. पण तरीही त्यांनी शिकविलेली प्रत्येक गोष्ट अंगिकारत तिने एकहाती किचनचं शिवधनुष्य उचललं.. डब्ब्यासाठी चपात्या, भाजी केली. दुपारी उशीर होईल म्हणून डाळही कुकरला लावली आणि वेगळी भाजी बनवली.. सासऱ्यांसाठी चहाही करून ठेवला. स्वत: चा , आनंदचा डब्बा भरला. या गडबडीत पाण्याची बाटली भरायची राहून गेली. तोच लक्ष घड्याळाकडे गेले. उशीर होत असल्याचे पाहून लागलीच तयार होण्यासाठी रूममध्ये गेली. आज नोकरी करणाऱ्या स्त्रीची व्यथा ती खऱ्या अर्थाने जवळून अनुभवत होती.. जेमतेम तयार होऊन बाहेर आली.. 

समोर टेबलावर नेहमीप्रमाणे चहा आणि चपातीचा रोल दिसला. क्षणभर सासूबाई परत आल्याचा भास झाला तिला. चेहऱ्यावर स्मितहास्याची लकेर उमटली. तोच सासरे तिची पाण्याची बाटली भरून किचनमधून बाहेर आले.

" मेघा, आधी नाश्ता कर पाहू. मगच बाहेर पड. तुझी सासू जातांना चांगलाच दम भरून गेलीये बघ. माझ्या लेकीकडे लक्ष द्या असं बजावून गेली आहे.." म्हणत त्यांनी ती बाटली तिच्या बॅगेजवळ ठेवली आणि त्याच हक्काने तिला नाश्ता करायला लावला.

आज प्रत्येक घासागणिक डोळ्यांतून आनंदाश्रू बाहेर पडत होते. आई तर मिळाली होतीच पण आज सासरच्या अंगणात सासऱ्यांच्या रुपात बाबाची मायाही मिळाली. त्याक्षणी सुख म्हणजे नक्की काय असतं याचीच अनुभूती तिला आली. अस्स सुरेख सासर मिळायला नशिब लागतं आणि ज्यांना ते मिळतं त्यांची ओंजळ 'नशिबवान' या अमूल्य रत्नाने ओतप्रोत भरलेली असते..

©® आर्या पाटील.

मैत्रिणींनो, अस्स सासर प्रत्यक्षातही असतं बरं..

कथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.