सुख म्हणजे नक्की काय असतं

Marathi katha

दिवाळी जवळ आली होती म्हणून प्रियाने घराची साफसफाई करायला सुरुवात केली.. घर झाडून काढताना न लागणाऱ्या म्हणजेच जुन्या साड्या, कपडे, जुनी भांडी वगैरे बाजूला काढून ठेवले आणि कपाटात नवीन साड्या, स्वयंपाक घरामध्ये नवीन भांडी वगैरे सगळं सामान लावून तिने घर स्वच्छ केले.. जुने सामान एका पोत्यांमध्ये भरून ते बाहेर ठेवले आणि आता ती निवांत बसली.. आता घर स्वच्छ आणि छान दिसत होते.. अडगळीचे सामान एक तर फेकून द्यायचे आणि मोडीला घालण्यासारखे असलेले सामान मोडीला घालायचे म्हणून ती शांत बसली होती..

थोड्यावेळाने तिची कामवाली सुमन आली.. ती आत येताना त्या अडगळीचे सामानाकडे पाहत आली आणि आत येऊन "ताई ते सामान का बाहेर ठेवले??"

तेव्हा प्रिया म्हणाली, "घर झाडून काढल्यानंतर टाकायचे सामान आहे ते.. त्यातील टाकून द्यायचे ते टाकणार आणि मोडीला द्यायचे ते मोडीला देणार आहे.."

तेव्हा सुमन म्हणाली, "ताई त्याच्यात वरती ती लाल रंगाची साडी दिसत आहे.. ती मी घेऊ का हो??"

"घे ना आणि एक काम कर ते सगळे समान तू घेऊन जा.. तुला त्यातील जे हवे असेल ते काढून घे आणि उरलेले टाकून दे.." प्रिया

सुमनला खूप आनंद झाला.. जणू काही तिच्या घरी दिवाळीच आली असे तिला वाटले.. तिने सगळी कामे केली आणि सगळे सामान घेऊन घरी गेल्यावर पहिल्यांदा तिने स्वतःचे सामान बाहेर काढले आणि प्रियाकडून नेलेले सामानातील चांगले चांगले सामान काढून घेतले..

अर्थातच तिच्या सगळ्या सामानापेक्षा ते सामान चांगले होते.. म्हणून तिने ते सगळेच सामान वापरायला घेतले आणि तिचे स्वतःचे काही जुन्या साड्या, मळलेले कपडे, चिरलेली भांडी बाजूला काढून ठेवले आणि तिथे प्रियाकडून आणलेले कपडे आणि भांडी व्यवस्थित लावले.. आता तिचेही घर छान दिसू लागले आणि तिच्या घरातून काढलेले ते सामान फेकून द्यायचे आणि थोडे मोडीला घालायचे म्हणून तिने बाजूला काढून ठेवले होते..

सुमन सगळे आवरून बसली असता एक बाई काखेत एका लहान मुलाला घेऊन आली..

"ताई, प्यायला थोडे पाणी देता का हो.. आणि मुलाला काहीतरी खायला देता का??" म्हणाली सुमनने बाजूला काढलेल्या भांड्यापैकी एक भांडे घेतले आणि त्यातून त्या बाईला पाणी दिले.. पाणी पिऊन झाल्यानंतर ती बाई ते भांडे परत देत होती.. तेव्हा सुमन "ते तुला घेऊन जा आणि यातील तुला लागेल ते सामान तू घे.." असे म्हणाली.. त्या बाईला खूप आनंद झाला.. त्या समानातून साड्या आणि काही भांडी घेऊन ती गेली.. तिलाही दिवाळीत असल्याचे वाटू लागले.. सगळेच खूप खूश झाले होते..

यामध्ये कोणी कोणाला विकतचे घेऊन काही दिले नाही.. आपल्याला नको असलेले सामान दुसऱ्याला देऊ केले.. आणि सगळेजण आनंदित झाले..

तर यातून बोध घ्यायचा तर प्रत्येकाने आपल्यापेक्षा लहान असलेल्या म्हणजेच गरीबांकडे बघून आनंदी रहायला शिकले पाहिजे आणि आपल्यापेक्षा मोठ्यांकडे बघून प्रगती करायला शिकले पाहिजे.. उगीचच दुसऱ्याच्या श्रीमंतीकडे बघून आहे तो दिवसही रडतकुढत काढण्यापेक्षा आनंदाने जगले पाहिजे.. तरच माणूस सुखी राहू शकतो..

सुख म्हणजे नक्की काय असते? तर मिळालेल्या गोष्टीत समाधान मानणे म्हणजे सुख असते.. उगीच नाही त्या गोष्टीचा हेवा करत बसले की कायम दुःखाच मिळते.. म्हणूनच खूश रहा आणि लहान लहान गोष्टीत आनंदी रहायला शिका..

एकाने टाकून द्यायची गोष्ट, वस्तू जर दुसऱ्या व्यक्तीच्या उपयोगाची असेल तर ती वस्तू ती व्यक्ती घेते.. तसेच एखाद्या गोष्टीचे एखाद्या व्यक्तीला दुःख वाटत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला त्याच गोष्टीने आनंद होऊ शकतो.. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला शिका..
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..