सुख कळले..

"आत्मचरित्र" काही शब्द मुळात पोटात भीतीचा, भावनांचा गोळा दाटून येण्यासाठीच जन्माला आलेले असता?

"सुख कळले "

"आत्मचरित्र" काही शब्द मुळात पोटात भीतीचा, भावनांचा गोळा दाटून येण्यासाठीच जन्माला आलेले असतात. लाख पळपुटेपणा केला तरी ज्यापासून दूर पळता येत नाही अशी कुठली गोष्ट असेल तर ते आत्मचिंतन असावे, असं मला वाटतं आणि ह्याच आत्मचिंतनाच्या वाटेवर तुमचंच चरित्र तुमच्यासमोर उलगडत जातं आणि अर्थात ते जेव्हा आपल्या खेरीज इतर कुणी वाचायला घेतलं की साहजिक त्याची व्याख्या बदलते. आत्मचिंतनातून कागदावर उतरलेली आपली गोष्ट मग वाचकांसाठी आपलं आत्मचरित्र ठरतं.

वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी आत्मचरित्र वगैरे कागदावर उतरवावं इतकी अनुभवांची, शब्दांची आणि माणसांची शिदोरी अजूनतरी माझ्याजवळ जमलेली नाही. हे मान्य करण्याचं कारण इतकंच की आत्मचरित्र हे गोष्टी हातच्या राखून ठेवून कागदावर उतरवता येत नाही. आयुष्यात घडलेल्या तमाम चांगल्या वाईट अनुभवांसमोर क्षणिक का होईना तुम्हाला शरणागती पत्करावी लागतेच आणि ऋणी ही व्हावं लागतं.

कुणी सहानभूती देईल, कुणी नावं ठेवतील, कुणी स्तुती करेल तर कुणी ह्यात काय वेगळं? असं ही म्हणून जाईल.  अशा असंख्य वैचारिक भिन्नतेचे कंगोरे अनुभवावे लागतील या भीतीने गेले कित्येक दिवस हातात लेखणी येऊनही ती कागदावर उतरू पाहत नव्हती. पण विचार केला की, दुःखाचे कंगोरे वाचकासमोर ठेवले तर सहानभूती मिळेल, कुणी बिचारी म्हणेल म्हणून ते लिहायचं नाही, मग अर्थ काय? कारण आपल्या आयुष्यातल्या आनंदाच्या गोष्टीमुळे जसा समोरच्याला आनंद मिळू शकतो तसंच आपल्या दुःखासमोर कुणाला त्याचं दुःख ठेंगनही वाटूच शकतं आणि तेच खरं ही आहे म्हणूनच तर आपण म्हणतो न, समोरच्याचं दुःख वाचण्याचा, त्याची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपल्या आयुष्यातल्या कमी असलेल्या गोष्टींचा बाऊ करत बसण्याची सवय आपोआप तुटते आणि मग ठरवलं करायचाच एक इमानदारीचा प्रयत्न.. आत्मचिंतनाचा, ज्यातून कदाचित उलगडेल आत्मचरित्र.

माझा जन्म चंद्रपूरचा. आई वडिलांना मी आणि माझा लहान भाऊ, अशी आम्ही दोन लेकरं. घरात आई बाबा आम्ही दोघं आणि आजी अशी आम्ही पाचच माणसं.
आजी शिक्षिका  आणि आजोबा हेड मास्टर होते. आजोबा १९९६साली वारले आणि त्यानंतर आजी स्ट्रॉंग पिलर झाली. नुसतीच स्ट्रॉंग नाही तर अगदी खाष्ट सासू, मराठीतल्या जुन्या टिपिकल चित्रपटामध्ये दाखवायचे अगदी तशी आणि अर्थात त्यामुळं आईला होणारा त्रास, तिची सहनशक्ती हे सगळं मी बालपणा पासून बघत आले, पण आईबाबांनी त्यांना पोहचणारी झळ आमच्यापरेंत कधीच पोहचू दिली नाही, आम्हाला सगळं पुरवत राहिले, म्हणून कदाचित आम्ही त्यातही एकमेकांच्या सुखासाठी फार कमी वयात समाधानी होणं शिकून गेलो.

समोरच्या मुलाला त्याच्या बाबाच्या स्कूटरवर बघून कधीच ईर्षा झाली नाही कारण अगदी लहान असताना बाबाच्या सायकलच्या बास्केटमध्ये आणि मग मागच्या सीटवर बसून जे जग बघायला मिळायचं ते खूप न्यारं होतं. त्यांनी स्वतः सायकल चालवली पण मला पॉलीटेकनिकलाच नवीन गाडी घेऊन दिली. नंतरच्या काळात ते बस ने ये जा करायचे पण मला वर्धेत सेकंड हॅन्ड गाडी घेऊन दिली. माझ्या कॉलेजच्या प्रोग्रामसाठी मला नवीन ड्रेस मिळायचा, वाटल्यास मागच्या कित्येक दिवाळीच्या सणांना आई बाबांनी कपडे घेतलेले नसायचे. मग या सगळ्या जाणीवेतून हळू हळू कळायला लागलं, आपण आई वडिलांना किती गृहीत धरतो आणि बरेचदा आपण खूप चुकीचे असतो हे समजलं. बालपण ते आजवर सारं रेखाटताना आता कळतंय की, असं म्हणतात 'लहान मुलांना काही कळत नाही' असं आपल्याला वाटत असतं, पण खरे संस्कार आणि आजूबाजूच्या वातावरणातल्या गोष्टींचे परिणाम हे त्या कोवळ्या मनावर जे तेव्हा कोरल्या जातात, ते मग काही मनांवर आजन्म राहतात आणि ते अगदी खरं असतं.

आईचं शिक्षण जरी ग्रेड्युएशन पूर्ण नसलं तरी ती खूप हुशार आणि नविन शिकायला सतत तयार, कायम अशीच होती, अगदी अजून ही आहे. मुळात आपल्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करतानाची तिची  जिद्द मी कायम बघत आले आणि आजीचं तिचं खच्चीकरण करणं, बरं हे तिनं फक्त सुनेबद्दल केलं नाही तर मुलासोबत ही तेच केलं, बाबांमध्ये ताकत असतानाही कायम आजीनं पाय खेचले, ते इतक्यासाठीच की ती एकटी पडू नये, सासू म्हणून तिचं वर्चस्व कमी होऊ नये अर्थात त्या तिच्या स्वभावाला तिला मिळालेली परिस्थिती ही कारणीभूत होती. पण त्यामुळं फार मोठं नुकसान झालं ते माझ्या आईबाबांचं. कष्टाळू वडील आणि सोशिक माऊली असे आई वडील लाभल्यामुळं अर्थात बालपनापासूनच सोशिकता, सहनशीलता हे वेगळं कुणी समजवण्याची गरज भासली नाही, ते आपसूकच मानसिकतेत, वागण्यात, बोलण्यात येत गेले.

आजीचं एक होतं, तिनं आईला कितीही त्रास दिला तरी नातवंडावर तिचं भारी प्रेम, जे म्हणेल ते लाड पूर्ण व्हायचे. पण पैश्याचे लाड किंवा तशी सवय तिनं पूर्ण केली नाही, त्याबाबतीत ती खूप कडक होती. म्हणून आई कायम म्हणते की  काटकसरीच्या चांगल्या ज्या काही सवयी लागल्या त्या आजीमुळेच. कधी कधी वायफळ गोष्टी टाळण्यासाठी चादर पाहून पाय पसरण्याची सवय हवीच, हे आजीनं शिकवलं. माझ्या आई आणि आजीच्या नात्याबदल बोलायचं तर एक वेगळा एपिसोड होईल, पण इतकंच सांगेल की त्यांचा प्रवास खाष्ट सासू आणि सोशिक सून इथून सुरु होऊन आता ९६वर्षाचं सुनेचं लाडकं बाळ इथंवर पोहचला आहे.

माझे आजी आजोबा खूप चांगले शिक्षक होते, असं गावाकडून भेटायला येणारे सगळे सांगतात. कितीतरी जणांच्या शाळेच्या फीस आजोबा परस्पर भरून टाकायचे म्हणून आम्ही घडलो, हे ही ऋण व्यक्त करतात.
अशा प्रकारे कष्ट, त्रास, काटकसर, त्याग, सोशिकपणा, दानी स्वभाव सगळ्या वागण्याच्या, भावनांच्या गर्दीतुन पार होत आम्ही घडत राहिलो. 

सुरवातीला मी अभ्यासात हुशार होते, पहिल्या चारमध्ये असायचेच आणि त्याचं श्रेय आईचंच असायचं. पण तिला खंत असायची की माझी मुलं इंग्रजी मीडियममध्ये मी शिकायला पाठवू शकत नाही, कारण बाबाच्या तुटपुंज्या पगारावर आजीचा वचक असायचा आणि आईनी शाळा बदलवायची म्हटलं की आजी म्हणायची, "काही गरज नाही इंग्रजी शाळेत घालण्याची, कोणती आपली पोरं अमेरिकेत शिक्षणाला पाठवायची आहेत." असं करता करता एक एक वर्ष समोर जात राहिलं.  माझ्या मागोमाग माझा लहान भाऊ त्या त्या शाळेत माझ्या मागे असायचा. बरं इतरवेळी शांत असलेली मी लहान भावाला कुणी हात लावायची हिम्मत जरी केली तरी डॉन होऊन जायची, तेव्हा अगदी सगळे घाबरून राहायचे. त्याच्यावर दादागिरी करायला मला कधीच आवडलं नाही, पण त्याला प्रोटेक्ट करणं मला माझी लाडकी जवाबदारी वाटायची. आता मात्र  तो मला प्रोटेक्ट करतो, मोठमोठाल्या गोष्टी सांगून समजावतो.  दिवस किती पटापट बदलतात, याचं कधीकधी फार अप्रूप वाटतं.

चौथी नंतर माझी शाळा बदलली आणि नेमकी त्याच वर्षी माझ्या आईची आई वारली. मी आजीसोबत घालवलेला तो पहिला आणि शेवटचा उन्हाळा होता, कारण सुट्ट्यांमध्ये आईनं मला आजोळी पाठवलं होतं. एकीकडे आजी गेलीये हे कळत होतं आणि अचानक गेल्यामुळे सगळेच दुःखात होते. आई,मावशी यांना सतत आबा आणि मामाची काळजी असायची, त्यामुळं आई अर्थात मानसिक खचलेली आणि दुसरीकडे माझा आलेला पहिला नंबर ही मला साजरा करता आला नव्हता याचं वाईट वाटत होतं. नविन शाळा, नविन मैत्रिणी आणि सगळे एकापेक्षा एक हुशार सगळं छान सुरु होतं. माझं हस्ताक्षर चांगलं असल्यामुळे शुद्धलेखन, निबंध लेखन स्पर्धा, वाचन स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला मिळत होता. आयुष्यात हरणं आणि जिकणं, असे दोन्ही फेज सुरु झाले होते. सगळं छान छान सुरु असताना, एक दिवस आईला बरं नाही म्हणून आई बाबा दोघंच नागपूरला तब्येत दाखवायला म्हणून निघाले. पहाटेच्या साखर झोपेतच मी त्यांना टाटा बाय बाय केलं आणि दुसऱ्या दिवशी बाबांचा फोन आला की आईचं ऑपेरेशन करायचं आहे. त्यानंतर आरामाला म्हणून आई मावशीकडे जाईल. आभाळ कोसळल्यागत हे माझ्यासाठी कठीण होतं. माझं जग आई, बाबा, भाऊ आणि आजी इतकंच होतं, त्यात आई बाबा म्हणजे तर श्वास. ते सगळं तेव्हा इतकं कठीण होतं की आज ही आठवायला नको वाटतं. काही प्रसंगाचे चटके हे फक्त आपण सोसलेले असतात आणि दुःख इतकंच असतं की जे आपण सहन केलंय किंवा करतोय त्याची तितकीच झळ, तितकेच चटके समोरच्याला लागणारे नसतात. ते दिवस आयुष्यातले खूप वाईट दिवस होते. बरं तेव्हा आमच्याकडे फोन ही नव्हता. आई मावशीकडून शेजाऱ्यांकडे कॉल करायची आणि मग आमचं बोलणं व्हायचं. अक्कल येणं हे काय होतं मला वयाच्या सातव्या आठव्या वर्षी कळून चुकलं होतं, कारण इकडे लहान भाऊ, फार कमी बोलणारे, व्यक्त न होणारे माझे बाबा आणि ऑपेरेशनमुळे महिनाभर लेकरं डोळ्यापुढे नसताना मावशीकडे राहत असलेली आई. आईचा कॉल म्हणजे ठरवावं लागायचं की रडायचं नाही कारण आईला त्रास नको, पण तेही दिवस सरले.

आई महिन्याभऱ्या नंतर घरी आली. सगळं नव्यानं सुरु झाल्यासारखं वाटतं होतं. बरं शाळेतलं हेच वर्ष माझ्यासाठी खूप महत्वाचं ठरलं. आमच्या शाळेत मराठी शिकवायला मोहरील मॅडम होत्या, खरं तर त्यांच्यामुळेच मी इतर स्पर्धेमध्ये समोर जात राहिले. आई घरी नसल्यामुळे मी जरा नाराज राहायचे, त्याचा अभ्यासावर परिणाम व्हायचा, हे सगळं आमच्या मॅडमच्या लक्षात आलं. त्यांनी मला आपल्याजवळ बोलावून माझी विचारपूस केली आणि अगदी मला शिरा खाऊ घालण्यापासून माझे लाड पुरवले. मला वाचन, निबंध, गायन, वकृत्व सगळ्या स्पर्धेचे मार्ग मोकळे करण्यात मदत केली. आई, मामा इतकीच माझ्या लिखाणाच्या घडवणुकीत मला मॅडमची खूप खूप मदत झाली. त्यांच्या नावाप्रमाणे त्यांनी मला कायम माया लावली.

माझं नशीब खूप छान की मी हायस्कूलला गेल्यावर मोहरील मॅडमही हायस्कूलच्या वर्गांना  शिकवायला लागल्या. तिथे मी अजूनच खुश की त्यांची ही सोबत आता अजून लांबवर पुरणार. आवडते शिक्षक, तुमच्या कलागुणांना मिळणारा वाव यामुळेच विध्यार्थी शाळेला आपलं घर समजू लागतो, त्या वयात शाळेचं दार म्हणजे जेल अशी भावना मग उरत नाही, याबाबतीत माझी शाळा माझी खूप आवडती होती, आहे आणि कायम असेन. तिनं मला ओळख दिली, तिनं मला माणूस म्हणून घडवलं. जिवाभावाची मैत्री दिली. जे जे उत्तम असं घडलं आयुष्यात असं वाटावं, त्यात शाळा कायम अग्रस्थानी असेल. हेच लिहिताना लक्षात आलं आपण फक्त माणसांच्याच ऋणात नसतो तर अशा वास्तूच्या ही ऋणात असतो आणि काही ऋण फेडणं केवळ अशक्य असतं.

मला आवडणाऱ्या आणि एक विध्यार्थी म्हणून पोषकतेने परिपूर्ण लाभलेल्या वातावरणात माझी दहावी पूर्ण झाली, तो ही भला मोठा किस्सा आहे. नेमकं त्याच वर्षी बाबांना कावीळ झाला तोही सिरीयस. बाबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट वगैरे करावं लागलं. दुसऱ्या सत्रात आजी सिरीयस झाली म्हणजे अगदी आता जाईल की काय, असे वातावरण निर्माण झाले होते. माझे पेपर सुरु झाले आणि सगळे एक एक दिवस मोजू लागले.  भूमितीच्या पेपरच्या दिवशी तर घरी सगळी तयारी अशीच होती की झालं आता आजी जाणार, पण त्याही टेंशनमध्ये दहावी पार पडली. ८१% मिळाले.  माझ्याबदल मत मांडणारे मला कायमच लाभत राहिले. तेव्हाही काहींनी ठरवून टाकलं, आता काय ५०%मिळवले पोरीनी तरी खूप, वर्ष वाया नको जायला वगैरे वगैरे. पण याही वेळी मी माझ्या एका खूप चांगल्या मित्राची आणि त्याच्या आईची,ऋणी आहे. घरी आजीची तब्येत खूप खराब, अभ्यास होत नव्हता म्हणून मी रोज माझ्या एका मित्राकडे अभ्यासाला जायचे. काही तास आम्ही २-३ जण रोज एकत्र अभ्यास करायचो आणि मग कधी आई कधी बाबा रात्री मला घ्यायला यायचे. त्या वर्षात मला काकूंची आणि त्या मित्राची लाभलेली साथ लाखमोलाची आहे. आज विचार केल्यावर लक्षात येतं, आयुष्यात जितकी तुम्हांला तुमच्यावर जळणारी, वाईट चिंतणारी माणसं भेटतात, तितकीच तुम्हाला जीव लावणारी, तुम्हाला घडवणारी माणसंही ह्या प्रवासात देव तुमच्यासाठी पाठवत असतो, फक्त ते कळायला उशीर व्हायला नको.

दहावी झाली पण आजीच्या परिस्थितीमध्ये काही सुधार नव्हता. आता माझ्यासमोर प्रश्न होता पुढे करायचं काय? गणितात मी शून्य, त्यामुळे पी ई टी आणि पी एम टी काही माझ्या निघणार नव्हत्या आणि मला शिक्षण तर चांगलंच घ्यायचं होतं. बरं तेव्हा चांगलं मार्गदर्शन करेल असं ही कुणी नव्हत. उलट सगळे बाबांना सुचवायचे, कशाला इतक्या बेताच्या परिस्थितीमध्ये पोरीला शिकवतो? पोरीवर खर्च नको करू, ती शेवटी दुसऱ्याच्याच घरी पाठवायची आहे. पण आईबाबा मुलीला शिकवण्याच्या निर्णयावर ठाम होते. मग पॉलीटेकनिक करण्याचा निर्णय झाला. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला, पण बाहेरगावी. दहावी नंतर लगेच बाहेर पाठवायचं नाही, असं ठरलं.  मग आता काय शोधा गावातले कॉलेज आणि शेवटी ऍडमिशन झाली.

पहिलं वर्ष सरलं. परत नविन मित्रमैत्रिणी भेटले. नव्या शिक्षकांची सोबत लाभत गेली, मार्गदर्शन मिळत गेलं आणि ३वर्ष कधी पूर्ण झाली कळलंही नाही. या तीन वर्षात माझा लिखाणाच्या कुठल्याही स्पर्धेशी संबंध आला नाही. हो पण माझं कविता करणं सुरूच होतं. कधीही कुठल्याही ओळी डोक्यात आल्या की त्या पुस्तकावर लगेच उतरवायच्या, ही सवय जडून गेली होती. माझ्या काही मित्रमैत्रिणींना कितीही बोर झालं तरी मी त्यांना कविता एकवत सुटायचे आणि काही आग्रह करून आवडीने ऐकायचे. लक्षात राहील असा एक किस्सा म्हणजे माझ्या ह्या छंदासाठी जाणीवपूर्वक माझ्या पूजा नावाच्या एका मैत्रिणीणं मला एक डायरी गिफ्ट दिली होती. त्या नंतर माझ्या कविता एकाच ठिकाणी म्हणजे त्या डायरीमध्ये नांदू लागल्या. पूजाने दिलेली ती पहिली डायरी त्यानंतर आता चार डायऱ्या कधी कवितांनी भरून गेल्या, कळलं सुद्धा नाही. पण त्या पहिल्या डायरीसाठी मी ऋणीच असेन. नाहीतर हायस्कूलमध्ये असताना लिहिलेले कित्येक शब्द जसे हरवत राहिले तसंच इतर शब्दांचही झालं असतं. माझी आई माझ्या कवितांचे सगळे कागद जपून ठेवायची, तिनं त्यासाठी अगदी एक फाईल केली होती. पण एकदा माझं बहिणीसोबत कडाक्याचं भांडण झालं आणि मी ते सगळे कागद फेकून दिले होते. जितके कागद वाचवता आले आईने वाचवले. त्यावेळी मला माझं नुकसान झाल्याची खंत जितकी नव्हती त्यापेक्षा जास्त वाईट मला आईसाठी वाटलं होतं, त्यात तिची मेहनत होती, एक एक कागद तिनं जपून ठेवला होता. आईला दुखावल्यामुळे मला तेव्हा इतकी अक्कल जरूर आली की परिणाम काय होतील याचा विचार केल्या खेरीज कृती करायची नाही आणि ज्या कृतीतून तुमची माणसं दुखावल्या जाणार असतील अशा  वागणूकी साठी लाख वेळा विचार करायचा.

डिप्लोमा नंतर डिग्रीसाठी ऍडमिशन घ्यायची होती. डिप्लोमा फर्स्ट क्लास डिस्टिंक्शननं पास झाले होते त्यामुळं चांगलं कॉलेज मिळणार, अशी आशा होती. पण नेमका फॉर्म भरण्याच्या दिवशी आईला पाण्याच्या बोरिंगचा शॉक लागला, घरात गणपती बाप्पा बसलेले, साक्षात विघ्नहर्ता घरी असताना विघ्न आलं. मी, माझा भाऊ, आम्ही सकाळी झोपेतच होतो आणि हा प्रकार घडला. वार्डातल्या सगळ्यांची गर्दी जमा झाली. आजूबाजूच्या गल्लीतलेही येऊन विचारू लागले. बहुतांश गर्दी आई गेली या विचारानेच जमलेली होती. बाबांनी मिटरचा काच फोडून ते बंद केलं होतं, पण आईला चेक करण्याची त्यांची हिम्मत नव्हती. क्षणापुरती सगळं चित्र जणू पालटलं होतं. मी भावाला घेऊन कवटाळून पायरीवर बसले, बाबा भलतीकडे रडवेले झाले होते. तितक्यात कुणीतरी ओरडलं, आई ठीक असल्याचं सांगत आलं. आम्ही तसेच धावत गेलो, आईला दवाखान्यात नेलं. शॉक खूप जबरदस्त होता त्यामुळं त्याचा प्रवाभ शरीरावर अर्थात पडणार होता, पण आई सुखरूप होती. विघ्नहर्त्याने त्याच्याच अस्तित्वाची लाज राखली होती अन् आईला वाचवलं होतं. एकीकडे हे सगळं आणि दुसरीकडे माझा ऍडमिशन फॉर्म, कॉलेजची लिस्ट टाकायची होती, सांगणार कुणी नव्हतं. आम्ही असेच खूप गोंधळात होतो त्यात एका मैत्रिणीणं फॉर्म भरला आणि त्यात लिस्ट बरोबर न टाकल्यामुळे मार्क्स चांगले असूनही, अजून चांगल कॉलेज सहज मिळणं शक्य असतानाही मला जेमतेम कॉलेज मिळालं, ते वर्ध्यातलं एक इंजिनीरिंग कॉलेज होतं.

आई आता रोजच्या दैनंदिन कामाला लागली होती पण तिला विकनेस होता, आजी बेडवर होतीच आणि मी पहिल्यांदा घरापासून दूर राहणार होते. शक्य झाल्यास ट्रेनने ३च तास लागायचे म्हणून मी शनिवार रविवार वर्धा चंद्रपूर करत राहिले कारण आईची खूप काळजी वाटायची. बाबांना सगळं जमेल की नाही असं वाटायचं. या सगळ्यात एक वर्ष खूप वाईट गेलं, पण मग सवय झाली. मी आणि घरचे दोघेही स्ट्रॉंग होत गेलो. पहिल्या वर्षी या सगळ्या एकूणच परिस्थितीचा माझ्या मानसिकतेवर, अभ्यासावर खूप परिणाम झाला. माझे काही विषय बॅक लागले.

आयुष्यात अपयशाला मी पहिल्यांदा समोर जात होती, तो माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. कारण तुटपुंज्या पगारात मुलीच्या जातीला चांगलं शिक्षण देण्यासाठी आईवडील काय आणि किती इच्छा मारत जगतात हे मी बघत आले होते. त्यांची काटकसर बघत आले होते.  म्हणूनच निकाल बघून आईबाबा मला एका शब्दानं काहीच कसं बोलत नाहीये, याचं जास्त वाईट वाटत होतं. त्या काळात माझ्या वयाच्या बऱ्याच मुलामुलींच्या आत्महत्तेच्या घटना घडत होत्या. ते ऐकून, वाचून मी माझ्या एका मित्राला विचारलं,'खरंच इतकं सोपं असतं का रे मरणं?'  त्यावर त्यानं उत्तर दिलं ते मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही. त्यानं तेव्हा दिलेलं उत्तर होतं 'मरून सहज मोकळं होता येतं पण मागे उरलेल्यांनी मग करायचं काय? पळपुटेपणापेक्षा उरली सुरली सगळी ताकत, लोकांना सरळ उत्तर देण्यात घालवायची. प्रश्नासमोर कधीही पळवाट शोधायची नाही.' खरं तर माझा तसा काहीही विचार कधीच नव्हता आणि नसेलही कारण आईनं तितकं कमजोर कधी घडवलं नाही, पण त्याला काय वाटलं कुणास ठाऊक तो समजावत सुटला होता. म्हणाला,'तुझ्यासारख्या मुली शेर असतात आणि वाघ जेव्हा आराम करतो तो यासाठी नाही की तो थकलाय पण त्या आरामानंतर त्याला दुप्पट ताकतीने उडी मारायची असते म्हणून,और तू तो मेरी शेर हैं.' त्या हिमतीनं मी सगळ्या चांगल्या वाईट अनुभवातून जात राहिले आणि ती चार वर्ष ही सरली. सेमिस्टर आणि प्रोजेक्ट ह्यातून कधी बाहेर पडले कळलंही नाही. परत एकदा फर्स्ट क्लास मिळवून कॉलेजला रामराम ठोकला. चांगले वाईट खूप प्रसंग मी या काळात अनुभवले. लोकं तुमचा वापर कसा करतात, हे असंख्य वेळा अनुभवलं, पण त्या अनुभवामुळं मी खमकी झाले. आपल्या भोवती आपणच सुरक्षेच कवच कसं बांधायचं हे कळलं. पण  हे कळेपर्यंत असंख्यवेळा रडावंही लागलं. तेव्हा सुद्धा वाट शोधण्यासाठी कुणाची न कुणाची सोबत लाभलीच. त्या काळात अजून एक समजलं, शाळेतील मैत्री ही कायम तुम्हाला जिवंत ठेवते.

कॅम्पस प्लेसमेंट झालं असल्यामुळे मी खूष होते. तीन महिन्याचं ट्रेनिंग झालं आणि मुंबईला एका कंपनीत जॉब मिळाला, म्हणून मी मुंबईला गेले. तिथं गेल्यावर कळलं की हे सगळं थर्ड पार्टी आहे आणि खर्च जास्त मिळकत खूप कमी म्हणून परत आले. नुसतं रिकामं बसायचं नव्हतं आणि बाबांना त्रास होऊ द्यायचा नव्हता, म्हणून नागपूरला बँकेचे क्लास लावले. दोन्ही परीक्षा अगदी कमी मार्कने हुकल्या. तरीही नुसतं रिकामं राहायचं नव्हतं. पण पुण्यामुंबईला जाऊन पुन्हा कुठले कोर्स करायचे म्हंटल तर खर्च खूप होता म्हणून मग नागपुरातच होम ट्युटर म्हणजे घरी जाऊन शिकवणं सुरु केलं. त्यातून माझा माझा खर्च निघायचा अशी एकंदरीत गाडी धावत असतानाच घरच्यांनी मुलं बघायला सुरवात केली.

मला इतक्यात लग्न करायचं नव्हतं कारण मी २५चीच होते. स्वतःच्या पायावर उभं राहायला मला एक दोन वर्ष हवी होती, पण दुसरीकडे हे ही दिसत होतं की माझं लग्न झालं तर बाबाच्या मागची जवाबदारी जरा कमी होईल आणि इतरांना लग्नासाठी होणारा उशीर मी बघत होतेच. त्यातून घरच्यांना आणि त्या मुलीला येणारं नैराश्य ही दिसत राहायचं. म्हणून मग मी लग्नासाठी तयार झाले, पण तरीही मी सावळी असल्यामुळे वाटलं होतं की वर्षभर तरी आपल्याला वेळ मिळेलच, आपण काय लगेच कुणाला पसंत पडणार नाही. पण कसलं काय महिन्याभरात सगळ्या घडामोडी घडल्या आणि लग्न ठरलं.

३१डिसेंबर पहिली भेट,१९फेब्रुवारी साक्षगंध आणि २२मे लग्न.२०१७ने माझी ओळख बदलवली, लग्नानंतर नावं बदलवलं नाही इतकंच समाधान.

लग्नानंतर मुंबईला ३वर्ष आणि आता नागपूर २वर्ष, कोविडचं एक वर्ष चंद्रपूरला गेलं अशी ६वर्ष पूर्ण झाली. चांगल्या वाईट अनुभवातून अजूनही शिकते आहे, आरोप प्रत्यारोप चुकले नाही कुणाला म्हणून ते ही चक्र आजमावते आहे. "यावर्षी लग्नाला सहा वर्ष झाली आणि अर्थात अजून पाळणा हलला नाही वगैरे" ह्या गोष्टींचा मग येणाऱ्या प्रश्नांना बरेचदा समोर ही जाते. पण आता मला प्रश्न विचारणारी २१व्या युगातली लोकं फार बुजऱ्या मानसिकतेची वाटतात म्हणून मला माझ्यासाठी दया येत नाहीच.पण, इतरांच्या विचारांची, मानसिकतेची कीव जरूर येत राहते.आधी त्रास व्हायचा, आता दया येते कारण काळजीपूर्वक केलेली विचारपूस आणि हीन भावनेने विचारला जाणारा प्रश्न, आपल्याला ह्या दोघांचेही ओघ कळतात आणि म्हणूनच आम्ही दुर्लक्ष करतो. आयुष्यात काय नाही यापेक्षा काय आहे याकडे बघायचं आता मी शिकले आहे. देव अनेकांना असंख्य गोष्टी देतो तरीही समाधान देत नाही, ईर्षा मात्र जरूर देतो. माझ्या आयुष्यातली अनमोल गोष्ट अजून यायची आहे म्हणून मी कमी समाधानी असेलही, पण देवानं ईर्षा करण्याची भावना दिलेली नाही, हे ही खूप मोलाचं आहे, असं मला वाटतं. बरं काही लोकांचे यातही अगदी कानावर पडतील असे विचार ऐकू येतात की असं असूनही ही दोघं कसे काय आनंदी राहू शकतात? तेव्हा मला हसायला येतं, प्रश्न पडतो बघ्यांना त्रास कसला आहे, आम्ही दोघंच आहो याचा की आम्ही दोघंच आनंदी आहोत याचा? मग दुर्लक्ष करायचं इतकंच मी शिकले. दोघेही नवरा बायको प्रगतीच्या नव्या वाटा शोधत आहोत.  आत्मचरित्र लिहिताना मुळात मुद्दाच हा होता डोक्यात की आपल्या आयुष्यातल्या या गोष्टीबद्दल नमूद करायचं की नाही? पण इतरांपर्यंत हेच पोहचवण्याची मला हीच एक संधी वाटली की आयुष्य कुणाचंच परिपूर्ण नसतं आणि तरीही समोरच्याचा प्रवास त्याचा त्याचा समाधानाचा सुरु असेल तर उगाच आपले बुजरे विचार आपण समोरच्याच्या आयुष्याला घेऊन मांडू नये, त्यावर चर्चा करू नये आणि गरजच असेल तर काळजी दर्शवावी पण सहानभूती आणि तुम्ही कसे बिचारे आहात, ही जाणीव करून देऊ नये.

बरं हे सगळं असच सुरु असणार आहे कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती भेटत राहणार, पण ह्यात माझ्या लिखाणाला पूर्ण विराम कधीच मिळाला नाही. कधी डायरी, कधी फेसबुक, कधी कुठलं मोबाईलवरचं अप्लिकेशन यावर मी आणि माझी लेखणी कायम मोकळे होतं राहिलो आणि अजूनही या सगळ्या ओळींची माझी पहिली वाचक माझी आई असते आणि खडतर प्रतिक्रिया देणारा माझा भाऊ असतो.  नवऱ्याकडे अधून मधून वेळ असला की तो वाट वाकडी करतो तेवढंच माझं हि समाधान होतं.

लिखाणाला घेऊन मला खूप मोठे अनुभव आले नाही कारण माझ्या खरंच तितक्या ओळखी नाही आणि अजून तितकी लिखानातली प्रतिभा मी मिळवू शकले नाही हे ही असावं. एकदा फक्त ट्रेन मध्ये प्रवासात डॉक्टर रंजन दरव्हेकर यांची भेट झाली होती आणि सारखा कोच असल्यामुळे गप्पा ही रंगल्या होत्या. त्यांनी मला त्यांचं एक पुस्तकं भेट दिलं होतं. त्यावेळी आम्ही एकमेकांना भरपूर किस्से सांगितले होते. आता या गोष्टीला ४वर्ष झाली, पण तेव्हा ते नेमके कोण हे मला ठाऊक नव्हतं नंतर लक्षात आल्यावर स्वतःसाठीच वाईट वाटलं.

माझा नशिबावर आणि योग या गोष्टींवर फार विश्वास आहे. अर्थात सगळ्याच गोष्टी योगायोगाने घडत नाही, पण काहींसाठी योगायोगच कारण ठरतात आणि शेवटी तुमचं नशीब, त्याच्याशिवाय जास्त आणि कमी स्वामी कधीच कुणाला देत नाही.

ईरा सोबत जुळणं हाही योगायोगच आहे आणि इतक्या सगळ्या मैत्रिणींची सोबत लाभणं हे नशिबात होतं म्हणून हा योग जुळून आला. सहज इंस्टाग्राम वर ईराच्या स्पर्धे विषयी कळलं आणि ह्या ग्रुपचा मी भाग झाले. माणसं मिळाली, लेखणीला, विचारांना, नविन दिशा मिळाली, जे माझ्यात होतं पण न्यूनगंड म्हणा किंवा संधी न मिळणं म्हणा म्हणून मागे पडलं होतं, त्या कलागुणांना वाव मिळाला. मी शिकलेली आणि तरीही स्वतःच्या पायावर उभी नाही म्हणून मला फार त्रास व्हायचा. आई वडिलांसाठी काही करता आलं नाही कारण मी स्वतः कमावती नाही याचं वाईट वाटायचं. संसाराची गाडी नवरा एकटी खेचतोय ह्यामुळे त्रास व्हायचा. अर्थात या स्पर्धेमुळे मला पैसे मिळाले नाही की माझे विचार बंद झाले नाही, पण वेगळा विचार करण्याची बुद्धी उमगली आणि पैश्यापेक्षा कधीकधी समाधानी मन लाख मोलाचं असतं, असं मला वाटतं.

ईराने या स्पर्धेसाठी आत्मचरित्र ही फेरी ठेवली. आत्मचरित्र म्हणजे खरं तर प्रयत्नांची पराकष्टा, अनुभवांची भली मोठी शिदोरी, जडणघडणीतले चांगले वाईट अनुभव यांचा संचय असतो. असा संचय,असे विचार ज्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळणार असते. एखाद्याचं आत्मचरित्र हे पुढे जाऊन कित्येकांसाठी एक अभ्यासाचं पुस्तक ठरणार असतं, म्हणून मुद्दा होता की किती खरी मतं मांडावी आणि किती लपवावी? आणि जर लपवूनच ठेवायचं तर मग मन मोकळं होणार कसं? आणि कणभर का होईना कुणीतरी काहीतरी शिकणार कसं?
म्हणून स्वभावप्रमाणे फार विचार न करता आणि अगदी सरळ सरळ जे जे आठवेल त्या त्या विचारांना वाट मोकळी करण्याचा प्रयत्न केला. नको असलेली दया,क्षमा आणि कौतुक, सगळ्यांचेच या विचारांना वाट असेल. कारण यांचं स्वागत केलं नाही तर लेखक म्हणून घडण्यासाठी मला वाव मिळणार नाही. ईरानं ही संधी दिली त्यासाठी ईराचे खूप आभार.

©®भाग्यश्री हर्षवर्धन.