अलिकडे थंडी पडायला सुरुवात झालेली आहे.त्यामुळे सुकामेव्याचा वापर आहारात करणे फायदेशीर असते. सुका मेव्याचे आरोग्यदायी फायदे म्हणजे यामध्ये प्रथिने व तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. तसेच उष्मांक व स्निग्ध पदार्थांचे प्रमाणही भरपूर असते. म्हणून महागडी औषधी खाण्यापेक्षा सुकामेव्याचा आपल्या आहारात समावेश करा.
साहित्य
मेथीदाणे एक वाटी, डिंक 100 ग्रॅम, खारीक एक पाव, गोडंबी अर्धा पाव, खोबरा कीस 100 ग्रॅम, बदाम अर्धा पाव, काजू अर्धा पाव, खसखस अर्धी वाटी, कणिक एक वाटी, एक जायफळ व तीन-चार वेलची. पिठीसाखर अर्धी वाटी.
कृती
प्रथम मेथीदाणे स्वच्छ धुऊन वाळवून घ्या.व मिक्सर मधून त्याची बारीक पूड करून घ्या. ती पूड दुधामध्ये भिजत टाका. आठ दहा तास चांगली भिजू द्या. नंतर कढईत तूप टाकून ही मेथी पूड तूप सुटेपर्यंत भाजून घ्या. त्यामुळे मेथीचा कडवटपणा लागणार नाही. डिंक तुपामध्ये तळून घ्या. खसखस सुद्धा थोडी तुपामध्ये परतून घ्या. एक वाटी कणिक तुपामध्ये भाजून घ्या. खोबरा किसही थोडा परतून घ्या .आता वर सांगितलेल्या तळलेला डिंक, खारीक, गोडंबी, बदाम, खोबरा कीस, काजू, खसखस या सर्व वस्तूंची मिक्सरमधून पूड तयार करून घ्या. खोबरा कीस व या सर्व पूड केलेल्या वस्तू, कढईतील भाजलेल्या मेथी दाण्याच्या पूड मध्ये घाला. भाजलेली कणीकही त्यात घाला. जायफळ पूड आणि वेलची पूड टाकून सर्व मिश्रण एकदा परतून घ्या. कढई खाली उतरवून या मिश्रणात पिठीसाखर घाला आणि थोडे थंड झाल्यावर त्याचे लाडू वळा.
टीप-लाडू जर जास्त करायचे असतील तर हे प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊ शकता.
२) तीळ -बदाम वडी
साहित्य
एक वाटी तीळ, अर्धी वाटी खसखस, एक वाटी बदाम, एक वाटी साखर, एक टेबल स्पून तूप, वेलची, जायफळ.
कृती
बदाम, खसखस व तीळ रात्री वेगवेगळे पाण्यात भिजत घाला. सकाळी बदामाची सालं काढून घ्या. खसखस व तीळ यातील पाणी निथळून घ्या. आता या तिन्ही वस्तू मिक्सरमधून बारीक करून घ्या. हा वाटलेला गोळा कढईत तूप टाकून परतून घ्या. साखरेत अर्धी वाटी पाणी घालून दोन तारी पाक करा. तयार केलेला गोळा त्या पाकात घट्टसर शिजवा. नंतर कढई खाली उतरवून त्यात वेलची जायफळ पूड घाला. एका खोल ताटात हा गोळा हलक्या हाताने थापून घ्या व लगेच वड्या पाडा. तीळ, बदाम गरम व आरोग्यदायी तसेच स्निग्ध पदार्थ युक्त असल्यामुळे हिवाळ्यामध्ये या वड्या अतिशय फायदेशीर ठरतात.
चला तर मग वाट कसली बघतायं.
करा की रेसिपी ला सुरुवात.
मस्त खा.
स्वस्थ रहा.
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा