सुगरण बायको... अंतिम भाग

कथा दोन मित्रांची आणि त्यांच्या बायकांची


सुगरण बायको.. भाग ३



" हाय.. आलास का तू? मस्तपैकी फ्रेश होऊन ये. मी दोन मिनिटात आलेच.." सोनाने संजयला सांगितले. त्याला पाच मिनिटे डोळे बंद करून पडायचे होते.. पण..
" हे बघ.. मी काय केले आहे? या आहेत मस्त टोमॅटोच्या पुर्‍या.. आणि या सोबत गरमागरम चहा.." सोना ते घेऊन हॉलमध्ये आली..
" टोमॅटोच्या पुर्‍या?" संजयच्या पोटात ढवळायला लागले.. " पण तो टोमॅटो मी असाच खाल्ला तर नाही का चालणार? "
" वेडा आहेस का? मी एवढ्या मेहनतीने बनवल्या.. तुला माहित आहे का?........................................"
संजय भयभीत नजरेने त्या पुर्‍यांकडे बघत होता.. "मी ना हे असे पदार्थ नेहमीच करते.. आज भाजी कसली करणार आहे माहित आहे? कलिंगडाची.. म्हणजे त्याचे काय आहे, आधी कलिंगड कापायचे.. त्याचा आतला लाल गर आणि हिरवे साल बाजूला काढायचे.. आणि मग तो जो पांढरा भाग असतो ना..."
" सोना, मी खातो या पुर्‍या.. पण थोडा वेळ देशील का मला.. माझे ना डोके दुखते आहे.." संजयने शेवटी बोलायचा प्रयत्न केला..
"हो का? तू चहा पी.. मी तुझे डोकं चेपून देते.. तुला माहित आहे का?.........." सोनाची एक्स्प्रेस सुसाट सुटली होती.. त्याच वेगाने संजयचे डोके पण उठले होते..

"मोना.. ओ माय डार्लिंग.." रजतने गाणे गातच घरात एन्ट्री केली..
" मोना.. मोना कुठे आहेस?"
" दोनच मिनिटे. तोंड धुवून आले थांब."
" काय ग.. काय झाले? "
" काही नाही रे.. ती पार्लरवाली ताई आताच गेली.. मास्क सुकला. आता तोंड धुते आहे.."
" हो का.. मग खायला काय करून ठेवले आहेस स्पेशल?"
" काहिही हां.. एवढा वेळ तिचे फेशियल चालू होते.. आपण हनिमूनला गेलो तर सगळी स्कीन टॅन झाली.. ते सगळेच करायला वेळ लागला.."
" मग चहा तरी?" रजतने उदास स्वरात विचारले..
" देते ना.. तू हातपाय धुवून घे.. मी मस्त चहाबिस्किट देते.." रजत उदास होऊन बाथरूम मध्ये गेला..
" घे जिंजर, ग्रीन टी विथ स्पेशल कारडॅमन ॲन्ड बेक्ड कुकीज.." मोनाने एवढ्या पटापट आणि एवढ्या छान ॲक्सेंट मध्ये सांगितले कि रजतच्या चेहर्‍यावर हसू आले.. त्याने चहा घेतला..
"अग हा तर आल्याचा चहा आहे.."
" मी कुठे नाही म्हटले.. तेच तर मी तुला सांगितले.." नुकताच फेशियल केलेला फ्रेश चेहरा आणि पोटात गेलेली चहा बिस्किट रजतच्या चेहर्‍यावर परत हसू आले..
" मी काय म्हणतो.. रात्री जेवायला काही स्पेशल करायचे?"
" हो करते कि.. आजच दुपारी रेसिपी शोधून काढली फक्त तुझ्यासाठी.."
"हो.. काय आहे ती?"
" स्पेशल बासमती राईस ॲन्ड इन्डियन लेन्टिल्स विथ बटर गार्लिक तडका.. ॲन्ड स्पेशली प्रीपेअर्ड स्पायसी चिलीज , लास्ट बट नॉट द लिस्ट स्पायसी कर्ड विथ मसाला.."
" ऐकूनच तोंडाला पाणी सुटले.. तुला काही मदत हवी आहे का?"
" नको..पण मला ना शांतपणे काम करायला आवडते.."
" ओके.. तू कर.. मी तोपर्यंत खालून मस्त आईस्क्रीम घेऊन येतो.."
रजत उत्साहाने खाली जाऊन आईस्क्रीम घेऊन आला.. मोनाला डिस्टर्ब नको म्हणून खालीच थोडा टाईमपास केला.. तो घरी आला तेव्हा तिने जेवणाची सगळी तयारी करून ठेवली होती..
"पटकन वाढ ग.. खूप भूक लागली आहे.."
मोनाने पदार्थांवरचे झाकण काढले.. तिने सर्व पदार्थ वाढले..
"हे काय आहे?" रजतने आश्चर्याने विचारले..
" मी बोलले तेच.. इन्डियन.."
"अग पण हि कढी आणि खिचडी आहे.."
"हो.. मी तुला इंग्लिश मध्ये नाव सांगितले.. ऐकायला कसले भारी वाटले ना?"
काय बोलायचे, काय नाही हे न सुचून रजतने जेवायला सुरुवात केली..
" यात मीठ नाहीये का?"
" अय्या.. विसरले का? त्याचे काय आहे, मी ना हे सगळे कधी केले नाही ना.. माझ्यावर कधी वेळच आली नाही.. मी फक्त तुझ्यासाठी शोधून शोधून केले.." मोनाच्या डोळ्यात पाणी आले. ते बघून रजत विरघळला.
" नको काळजी करूस.. आपण जमवू काहीतरी.."
" संजय रविवारी भेटूया का?"
" हो.. हिला नको सोबत.."
" तेच सांगणार होतो.. एकटाच ये. नेहमीच्या मिसळहाऊस मध्ये.."
" सकाळी दहा वाजता.."
दोघं रविवारी सकाळी दहा वाजता नेहमीच्या ठिकाणी भेटले.. आणि एकमेकांकडे बघतच राहिले.. गोलमटोल रजत बारीक झाला होता आणि सडपातळ संजय जाडा झाला होता..
" कायरे? मला न सांगता जिम जॉइन केलीस?"
"आणि तू हे काय ? एका महिन्यात एवढा जाडा? लग्न मानवलेले दिसतंय."
" आत बसून बोलूयात.." संजय उदास चेहर्‍याने म्हणाला..
" आता बोल.." समोरच्या मिसळकडे अधाशीपणाने बघत रजत म्हणाला..
" हो बोलतो.. पण तुझे हे काय? खूप दिवस खायला न मिळाल्यासारखे?"
" नाहीच मिळत रे.. एवढे कायकाय खाणारा मी.. आता सकाळ संध्याकाळ फक्त बिस्किटे खातो आहे. आणि रात्री कधी खिचडी, कधी पुलाव. त्यात कधी तिखट कमी तर कधी मीठ जास्त.. काय सांगू तुला?"
"काही नको.. मी तर खाऊन खाऊन वैतागलो आहे.. कधी मोदकाची आमटी तर कधी लबाड वांगे.. कधी आंब्याच्या शंकरपाळ्या तर कधी केळ्याची भाजी.. काहिही चालले असते माझ्याकडे.." संजय उदासपणे बोलत होता.. तसतसे रजतचे डोळे चमकत होते.. "अरे फळांच्या कसल्या भाज्या आणि शंकरपाळ्या करायच्या? आणि बडबड तर इतकी.. की तोंड फुटत कसे नाही हा प्रश्न पडतो रे.."
" बाबारे.. आणि हे असे आयुष्यभर चालवायचे?"
रजत आणि संजय एकमेकांकडे बघत राहिले..
"सोना कामाला नाही जाणार? मोनाला मिळाला जॉब.."
"नाहीरे.. तिला पाककलेचे क्लासेस घ्यायचे आहेत.. स्वतःचे चॅनेल सुरू करायचे आहे.." हे ऐकून रजतचा चेहरा फुलला ..
"कल्पनेची आयडिया..."
"आता हि कोण नवीन कल्पना.. नको रे नको आणूस कोणाला आता मध्ये."
" तू पण ना माठ झाला आहेस.. ऐक मोनाला स्वयंपाक आवडत नाही आणि सोनाला खूप आवडतो. "
" नवीन काय त्यात? हे आधी कळले असते तर?" संजय काय उदासीतून बाहेर यायला तयार नव्हता..
" मी तुमच्याकडे टिफीन चालू करतो.. सोनाला म्हणावे जे नवीन पदार्थ करायचा आहे तो कर.. रिचवायला मी तयार आहे.."
" पण ते नेणार आणणार कोण?" संजयने विचारले..
" ते मी करतो मॅनेज.. माझे हाल तरी थांबतील रे.."
"हो ना.. माझीही सुटका होईल रे या पदार्थांच्या भडिमारातून.."

दोघांची हि कल्पना सोनामोनानेही उचलून धरली. आणि ते चौघे गुण्यागोविंदाने सुखासमाधानाने रहायला लागले आता हे काय वेगळे सांगायला पाहिजे?

कथा कशी वाटली नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all