सुगरण बायको? भाग २

कथा दोन मित्रांची आणि त्यांच्या बायकांची

सुगरण बायको भाग २..



" अशी किती वेळ बघणार? बोल ना काहीतरी.." रजत मोनाला म्हणाला.

"अंहं.. मला बोलायला नाही फक्त तुझे ऐकायला आवडते.. किती माहिती आहे तुला.. बापरे.. असे वाटते तू बोलत रहावे आणि मी फक्त ऐकत रहावे.." मोना उत्तरली.


" मी तुला बोर तर नाही ना करत?" सोनाने संजयला विचारले.. तो तिच्या चेहर्‍याकडे एकटक बघत होता..

"नाही ग.. हे बोलणे मी आयुष्यभर ऐकायला तयार आहे.." संजय उत्तरला..

"किती गोड.. पुढे काय झाले माहिती आहे.................." सोना नॉनस्टॉप बोलत होती.. आणि संजय फक्त बघण्याचे काम करत होता..

" रजत.. थँक यू सो मच.. " घरी परतताना संजय म्हणाला..

"कशासाठी?" रजत हवेत तरंगत होता.

" त्या मेळाव्यासाठी.. जिथे मला माझी स्वप्नातली राणी भेटली.. तूच रे तूच मित्रा.."

     संजय-सोना आणि रजत-मोना यांनी एकमेकांना पसंत केल्यामुळे घरातल्यांना आनंद झाला होता.. लग्नासाठी कोणालाच काहीच प्रॉब्लेम नव्हता.. सगळ्यांनी हसत हसत परवानगी दिली.. मग काय चट मंगनी पट ब्याह.. संजयचे आईबाबा तर गावीच होते.. नव्या जोडप्याला एकांत मिळावा म्हणून रजतचे आईबाबा पण त्यांच्या गावी गेले.. आणि सुरू झाला राजाराणीचा संसार..

  "संजय आज संध्याकाळी तू घरी आलास कि तुला काय खायला आवडेल? " सोनाने प्रेमाने विचारले..

" मला? अग मला आल्यावर चहा बिस्किट खायची सवय आहे.."

" चहा बिस्किट? हे काही खाणे आहे का?"

" अग हो.. लग्नाच्या आधी तर मी हेच खायचो.. पेईंग गेस्ट म्हणून रहात होतो ना.. सकाळी ऑफिसमध्ये नाश्ता, तिथेच जेवण.. संध्याकाळी चहाबिस्किट आणि रात्री खानावळीतले जेवण. संपला दिवस.."

" फार हाल झाले आहेत ना माझ्या राजाचे. आता नाही हो मी असे हाल होऊ देणार.." सोना संजयच्या मिठीत जात म्हणाली..

"मोना.. मग आज काय स्पेशल?" रजतने विचारले..

"स्पेशल म्हणजे.. आज मी पार्लरची अपॉइंटमेंट घेतली आहे. काही दिवसात नोकरीचे इंटरव्ह्यूज द्यायला लागतील ना.." मोना निरागसपणे म्हणाली..

" ते स्पेशल नाही ग.." रजत वैतागून म्हणाला..

"मग काय?"

" अग आत्ता डब्यात आणि संध्याकाळी जेवायला काय करणार आहेस? असे विचारतो आहे.."

" अच्छा ते होय?"

"आता मी तुला आलू पराठा दिला आहे.. आणि संध्याकाळी सरप्राईज.."

मोना खोटे हसत म्हणाली..

" मस्तच.. पण मला ना रोज बटाटा नाही आवडत ग.. एवढ्या भाज्या आहेत, एवढे पदार्थ आहेत.. काय तो नुसता बटाटा. माझे ना एक स्वप्न होते. मी कामावरून दमून घरी आलो कि माझ्या समोर माझ्या बायकोने मस्त गरम चहा आणि काहितरी नवनवीन खायला करावे.. अहाहा.." रजत थांबतच नव्हता..

"ओ मिस्टर.. मी नोकरीला लागल्यावर मी पण दमून येणार.. मग काय?" मोनाने कंबरेवर हात ठेवून विचारले..

" मग एक दिवस मी, एक दिवस तू अशी कामाची विभागणी करू प्रिये.. यावर काय म्हणणे आहे तुझे प्रिये?" रजत मोनाला गुदगुल्या करत म्हणाला..

"चालेल मला.. पण आता या गुदगुल्या करायचे थांबव." मोना हसत म्हणाली. 

रजत कामाला गेल्यावर मात्र तिच्यापुढे संध्याकाळी खायला काय करायचे हा मोठा प्रश्न होता.. सोनाला विचारायचे का? तिने मनात विचार केला.. पण नकोच. तिच्या तोंडात तीळ भिजत नाही.. ती पटकन बोलून जायची संजयला आणि संजय रजतला.. नको आपणच काहीतरी करूया..

  संध्याकाळी दोघेही नवे नवे नवरे दमून भागून आपापल्या घरी पोचले.. संजयला हवा होता फक्त छानसा चहा आणि थोडी शांती तर रजतला हवे होते काहीतरी मस्त चमचमीत खायला..

मिळेल का दोघांना हवे ते , बघू पुढील भागात.  तोपर्यंत हा भाग  कसा वाटला नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all