सुगंध अजुनही दरवळतो आहे.

The smell of honesty is marvelous.

दिनूने नुकताच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.  गावाकडून आलेला दिनू सोबत लाखो स्वप्नं आणि एक चाफ्याचं छोटंसं रोपटं घेऊन पुणे शहरात आला. चाफा म्हणजे त्याचा जीव की प्राण. आत्तापर्यंतच्या आयुष्यात त्याने गावाकडे काढलेले दिवस, शेतातील ती झाडे, सगळं सोडून येणं त्याला जरा जड गेलं पण दुसरीकडे त्याची स्वप्न होती. वडिलोपार्जित संपत्ती, भरपूर पैसा तरीही दिनू निसर्गातील गोष्टींशी जास्त जवळ होता. त्याचा जास्तीत जास्त वेळ तो शेतात घालवायचा.
                  पहाटेच्या गाडीने निघून दिनू दुपारच्या आसपास वसतिगृहाच्या इमारतीबाहेर हजर झाला. आल्यासरशी त्याची नजर त्या चाफ्याच्या रोपट्यासाठी जागा शोधू लागली. एका बाजूला त्याला सपाट पण तशी थोडीशी दुर्लक्षित अशी जागा सापडली. त्याने आपल्या पिण्याच्या पाण्याचा उपयोग करून तिथे ते रोपटं लावलं देखील. वसतिगृहाची जागा तशी स्वच्छ, टापटीप होतीच आणि चारही बाजूंनी मोठी सातफुटी भिंत होती. त्या भिंतीमुळे पलीकडील काही दिसणं केवळ अशक्य. झाड लावून झाल्यावर दिनूच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान आलं. दिनू आता दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस त्या रोपट्याला पाणी घालायचा आणि संध्याकाळचा वेळ रोपट्याजवळील बाकड्यावर बसून घालवायचा. रोपटं ही आता बहरू लागलं होतं.
      एके दिवशी असाच दिनू संध्याकाळी अभ्यास वगैरे आवरून खाली आला तेव्हा त्याला जरा विचित्रच वाटलं. सकाळी रोपट्याला घातलेलं पाणी पण तरीही ओल कायम होती. त्याला वाटलं कोणीतरी घातलं असेल पाणी म्हणून त्याने दुर्लक्ष केलं पण पुन्हा दुसऱ्या दिवशी देखील तोच प्रकार. सलग आठवडाभर असाच अनुभव आल्याने दिनूने एक युक्ती केली. पुढच्या दिवशी महाविद्यालयात न जाता त्याने सुट्टी घेतली व रोपट्यावर लक्ष ठेवलं. त्याने सकाळी पाणी घातलं आणि त्यानंतर तो आपल्या खोलीच्या खिडकीतून अभ्यास करत करत त्या रोपट्याकडे लक्ष देऊ लागला. दुपारी १ ते १:३० च्या आसपास त्याने पाहिलं एक ८ ते ९ वर्षांची मुलगी त्या रोपट्याजवळ काहीतरी करतेय. बराच वेळ गेला तरीही ती तिथेच होती. कुतूहलाखातर दिनू जराही आवाज न करता तिथे गेला तर ती मुलगी चक्क त्या रोपट्याशी गप्पा मारत होती. तिच्याकडे एक पिशवी होती जराशी मळकट.तिचे कपडे देखील बरेच मळलेले, पायात ना चप्पल,केस विस्कटलेले. बरीच गरीब वाटत होती ती. दिनू शेवटी गेलाच तिच्याशी बोलायला. जराशी दचकली ती.. पण तिच्या बोलल्यावरुन कळलं तिच्या त्या पिशवीत काही पेन होते जे ती नजीकच्या रस्त्यावरच्या सिग्नलवर विकायची आणि तिला चाफ्याचा वास आवडला व त्यामुळे ती त्या रोपट्याला पाणी घालण्यासाठी रोज येत होती. आता दिनू शनिवारी आणि रविवारी तिच्याशी गप्पा मारत बसायचा कारण अन्य दिवशी त्याला दुपारी वेळच नसायचा आणि आपल्यासारखं ती ही रोपट्याकडे आकर्षित झाली यामुळे तिच्याबद्दल एक आपुलकीची ओल निर्माण झाली.  ती देखील त्याच्याशी बोलायची त्याला हळूहळू कळू लागलं तिला शिक्षणाची गोडी आहे पण घरची परिस्थिती आणि वातावरण पाहता तिला ते केवळ अशक्य होतं.
          दिनूने त्याच दिवसांत घरून काही पैश्यांची जुळवाजुळव केली तश्या त्याच्या मागण्या काहीच नसायच्या त्यामुळे घरच्यांनी दिले देखील.जवळच्याच एका शाळेत जाऊन तिचा दाखला करायला लावला व त्या शाळेला दरवर्षी दिनूकडून देणगी जाऊ लागली सोबतंच तिच्या शिक्षणाची आणि इतर खर्चाची सोय त्याने केली. त्याच्या काकांच्या मदतीने तिच्या वडिलांना एका नोकरीची शिफारस करून दिली. पुढील शिक्षणासाठी दिनू परदेशात गेला आणि बरीच वर्षे तिकडे राहिला. २० वर्षांनंतर पुन्हा दिनू पुण्यात एका कामासाठी आला आणि आपसूक त्याची पावलं महाविद्यालयाच्या वसतिगृहाकडे वळली त्या रोपट्याचं आता मोठं झाड झालं होतं ते पाहून दिनू मनोमन खुश झाला. त्याला त्या मुलीची आठवण झाली पण आपण तिला नाव विचारलंच नाही ह्यामुळे तो थोडा स्वतःवर हसला देखील आणि थोडा नाराज ही झाला कारण जितकं प्रेम दिनूने चाफ्यावर  केलं होतं तेवढंच तिने ही केलं होतं.
                 आसपासचा परिसर बराच सुधारला होता पण ते झाड मात्र त्याला तिथून जाण्याची परवानगी देत नव्हतं. बराच वेळ झाला आता निघायला हवं ह्या विचारात दिनू तिथून निघाला. दुसऱ्या दिवशी दिनू कामाच्या ठिकाणी गेला आणि क्षणात आनंदला तो... तो चाफ्याचा वास त्याला अगदी बरोबर जागी घेऊन आला. त्याला भेटायला येणारी व्यक्ती म्हणजे एक मुलगी तिशीच्या दरम्यान तिचं वय तिने उठून त्याच स्वागत केलं. त्यानंतर कामाचं बोलणं झालं बाकी औपचारिकता झाल्यावर दिनूने तिला विचारलं ही चाफ्याची फुलं तुम्हाला चाफा आवडतो का. ती म्हणाली ह्या चाफ्याचे मला नवं जीवन दिलंय तो खूप जवळचा आहे माझ्यासाठी.कसं, काय हे सगळं दिनूला ही समजलं आणि चाफा म्हटल्यावर त्याच्या डोळ्यांसमोर येणारी ती चिमुरडी आज एवढी मोठी जबाबदारी घेतेय हे पाहून त्याला भरपूर आनंद झाला.

शेवटी दोघेही म्हणालेच " सुगंध अजूनही दरवळतो आहे".

©श्वेता कुलकर्णी♥️