सुभानरवाच लगीन अंतिम भाग

फोनवर ऐकलेल्या अर्धवट गोष्टींतुन उडालेली गंमत नक्की वाचा


सुभानरावाच लगीन भाग 2

सर्वप्रथम वाचकांची माफी मागतो.कथा पूर्ण करायला खूप वेळ लागला.काही वैयक्तिक अडचणी असल्याने लिहिण्यात बराच खंड पडला.

मागील भागात आपण पाहिले की अनुसया तिच्या बहिणीकडे मदत मागायला गेली.सुभानराव दुसरं लग्न करणार .अनुसया हा विचार करून पुन्हा पुन्हा रडायची.इकडे दुरपदाने सगळी माहिती घेतली आणि अनुसयाजवळ येऊन म्हणाली,"आनशे,दाजी काय ऐकत न्हाईत बया,त्यांना आता नवीच पायजे."हे ऐकल्यावर अनुसयेने आणखी मोठा सूर लावला,"आक्के,आग आपलाच दाम खोटा, पर या आनशी बरोबर गाठ हाये म्हणावं,कोण टवळी हाये तिच्या झिंज्याचं उपटते."दुरपदा हसु दाबत म्हणाली,"पण तू इथं आन दाजी तिकडं पडेगावला".अनुसया विचारात पडली.आता काय करायचं?या अर्थाने तिने दुरपदाकडे पाहिलं.दुरपदा हळूच तिच्या जवळ जात म्हणाली,"आनशे ,तू अशी हिथ बसून रहायली तर त्यांना रान मोकळं सापडलं की".अनुसया या वाक्याने विचारात पडली.तिने मनाशी काहीतरी निश्चय केला आणि दुरपदाकड वळली,"आक्के!आजच आपण पडेगावला जाऊ, तू बी चल माझ्या सोबत ."मी आणि कशाला ग?"दुरपदा विचारात पडत म्हणाली."आग माझ्या माहेरातून तूच मोठी न्हव, भाऊला पण बोलावू नंतर."दूरपदाने सामानाची बांधाबांध केली आणि दोघी बहिणी पडेगावच्या वाटेला लागल्या.

एक तास वाट बघितल्यावर एस.टी.आली.अनुसया वैतागली,"आली एकदाची एस.टी. किती येळ झाला."दोघी गाडीत बसल्या. तासभर प्रवास करून पडेगावला पोहोचल्यावर अनुसयेला जरा हायस वाटलं.दोघी घराची वाट चालू लागल्या.एवढ्यात बायजा माळीण भेटली.बायजेच देवळाबाहेर फुलाचं दुकान होत.दोघींना बघताच बायजाने हाक मारली,"आवो पाटलीन बाई ! कुठून येताय??चार दिस झालं देवळात बी दिसल्या न्हाई?"तेव्हा अनुसया हसत म्हणाली,"मावशे आग जरा आक्का कड गेलते."त्यावर बायजा हसली,"आस व्हय?परवा थोरली आली व्हती देवळात.बरोबर एक पोरगी पण व्हती".हे ऐकून अनुसयाला प्रचंड राग आला.रागात धुमसत त्या दोघी घरी पोहोचल्या.तेवढ्यात सुभानराव गाडीतून जाताना दिसले.सोबत एक मुलगी होती.इतक्यात अनुसया हाक मारेपर्यंत सुभानराव निघून गेले.अनुसया घरात आली.थोरल्या सुनेने पाणी आणलं.अनुसया काही बोलणार एवढ्यात तीच दुरपदाकडे पाहून बोलली,"मावशी शेजारच्या घरी एक बारशाचा कार्यक्रम आहे,तिकडेच निघालोय आम्ही दोघी."एवढं बोलून त्या वेगाने घराबाहेर निघूनसुद्धा गेल्या.अनुसयेने स्वतःच रागाने धुमसत चहा केला.दोघींसाठी जेवण केलं.या सगळ्यात ती एकही शब्द दुरपदा बरोबर सुद्धा बोलेना.धुसफूस वाढतच चालली होती.

जवळपास तीन तासांनी दोन्ही सुना परत आल्या.त्यांना पाहताच अनुसया गरजली,"आल्या गावभर भटकून,सासू आलीय त्याच काय न्हाई,आता रातीचा सैपाक पण मीच करू का काय?"दोघी एकमेकिंकडे पहात आत गेल्या."बघ आक्के माझ्याशी एक शब्द बोलल्या का भवान्या,सासऱ्याशी बर गोड गोड असत सगळं.अनुसया एवढं बोलून रागानं खोलीत निघून गेली.मग दोघी सुना बाहेर आल्या .दुरपदा मावशीच्या पाया पडल्या.दुरपदा दोघींना म्हणाली,"पोरींनो नका ग छळू ,सांगून टाकू का ??"नको ना मावशी फक्त आजचा दिवस",दोघी हसल्या.एवढ्यात सुभानराव आले.चहा झाल्यावर ते खोलीत गेले.अनुसया रागात होतीच.त्यांनी कोट काढला आणि पुढे दिला तशी ती भडकली,"म्या कशाला कुणाची काम करू,म्हातारपणी चाळ सुचल्यात ना! मंग सांगा जाऊन त्याच टवळीला".धाडकन दार आपटून अनुसया बाहेर आली.

रात्री जेवताना कोणीच बोलत नव्हते.दोन्ही पोरसुद्धा काहीच बोलत नव्हती.ते पाहून अनुसया भडकली.पण पोरांना कसे बोलायचे?तिला शब्दच फुटत नव्हते.ती रागारागात झोपायला गेली.सगळे बाहेर हळुहळू चर्चा करत होते.सकाळी उठून अनुसया चहा करायला गेली.थोरली म्हणाली,"मी करते चहा".बस भडका उडाला,"धा माणसाचा सैपाक भिंगरींगत बनवते ही आनशी, मला काय धाड न्हाय भरली."चहा पिऊन बाहेर आली.सुभानराव मस्त तयार झाले होते.ठेवणीतला कोट,अत्तर काय आणि केसांना रंग लावला होता.ते पाहून अनुसया रागावली.जोरात भांड आपटत म्हणाली,"आक्के,कितीबी रंगवला तरी कावळा काय पांढरा व्हतो काय ?"सुभानराव शिट्टी वाजवत बाहेर पडले.अनुसया रागातच दुरपदाला म्हणाली,"आक्के मळ्यात जाऊ आपण,हे सगळं काय म्या बघू शकत न्हाई."दोघी मळ्यात निघून गेल्या.


दिवसभर मळ्यात सगळं विसरून शेतात रमल्यावर घरी यायला निघाल्या.वाटेत जाधवांच्या नंदीने हटकल,"बया अनसा काकू वाडा काय सजीवलाय?कुणाचं लगीन बिगीन काढलं का काय???अनुसया चिडली,"व्हय पाटलाच लगीन हाय ."लांबूनच रोषणाईत झळाळणारा वाडा पाहून अनुसया दुःखी झाली.दारात मांडव आणि सगळी तयारी झाली होती.दोन्ही सुना,पोर सजून धजून तयार होती.अनुसया आत आली.रागातच आत गेली.तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला.सुभानरावानी हाक मारली,"मालकीणबाई!आवो भाईर तरी या,बघा काय हाये ते."अनुसया रागातच बाहेर आली.समोर नवी कोरी गाडी उभी होती .सुनांनी ओवाळणीच ताट तिच्या हातात दिलं. गाडीला पुजून अनुसया वळली एवढ्यात सुभानराव परत हाक मारत म्हणाले,"आवो मालकीन बाई माग बघा."अनुसया मागे वळली.सुभानरावांच्या हातात नवी धा तोळ्याची मोहनमाळ आणि पैठणी होती

हे बघून अनुसयेला काही कळेना.तेव्हा दुरपदा हसली,"आनशे तुला मी किती येळा सांगितलंय जास्त चिडचिड करू नको,आग तू जे नव्या बद्दल ऐकलं ते या गाडी आन माळबद्दल बोलत व्हत दाजी,दाजींचा पासष्टवा वाढदिवस हाये आज."आता आनशीच्या डोक्यात प्रकाश पडला.थोरली सून पुढे येत म्हणाली,"तुम्ही रागावून निघून गेला,दुरपदा मावशीने फोन केला मग म्हंटल थोडी गंमत करू."असे म्हणून सगळे हसत हसत वाढदिवस साजरा करायला वाड्यात आले.कुटुंब परत हसायला,खेळायला लागलं आणि आपलाच वेडेपणा आठवून अनुसया परत परत हसू लागली.

🎭 Series Post

View all