Feb 27, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

संघर्ष स्व चा स्वतःशी

Read Later
संघर्ष स्व चा स्वतःशी


चार मैत्रिणी शीतल, गौरी, प्रिया व मेघा संध्याकाळी अपार्टमेंटच्या आवारात गप्पा मारत बसल्या होत्या.

"अभिनंदन गौरी." शीतल गौरीला म्हणाली, "प्रथम क्रमांक येईल असंच लिहिलं आहे हं तु."

"थँक्यू गं!" गौरी आनंदून म्हणाली.

"कसं काय जमतं गं घरात पसारा ठेऊन लिहीत बसणं. म्हणजे मला तर अजिबात आवडत नाही हं असलं." प्रिया बोलली.

"नाही गं एखाद वेळीच होतं तसं. बाकी मी लिखाणात व्यस्त असली कि अहो आणि सासूबाई आवरतात सगळं." गौरी ओशाळून म्हणाली.

"हा तरीही इतका हुरूप. आपल्याला तर आहे तितकंच खूप आहे." मेघा आंबट चेहऱ्याने प्रियाच्या स्वरात बोलली.

गौरीचा चेहरा पडलाय हे बघून शीतलने गोष्ट बदलन्यासाठी तिला विचारलं,
"गौरी तुझे केस किती सुंदर दिसत आहेत गं? पार्लर वारी झाली वाटतं?"

"नाही गं बाई. घरीच आधी कोमट तेलाने मालिश केली, मग गरम पाण्यात टॉवेल बुडवून पिळून केसांना वाफ दिली, नंतर अर्धा तास दही लावून ठेवलं व शेवटी शाम्पूने धुवून काढले." गौरीने उत्साहाने आपल्या सुळसुळीत, मऊ, रेशमी चमक असलेल्या केसांमधून हात फिरवत तिने काय काय केलं ते सांगितलं.

यावर मेघा म्हणाली, "छान आहे बाई. पण आम्हाला तर वेळच नाही मिळत इतकं करत बसायला."

"हो गं मिळत नाहीच वेळ. तो काढावा लागतो." शीतल म्हणाली.

त्यावर प्रिया बोलली, "बाई कसं काढणार वेळ? तुमची मुलं आहेत शांत सगळं करू देणारी. पण माझी कार्टी तर सैतान आहे. त्यामुळे माझ्यात त्राणच उरत नाही काही करण्याचा?"

गौरीचा उत्साह विरला. ती आपली त्यांच्या गप्पा ऐकत चालू लागली. तिला आठवलं कोव्हीड लॉकडाऊन मधेही असंच झालेलं. गौरीने स्वतः तर विविध ऑनलाईन स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे जिंकलीच. वर मुलं, सासू सासरे यांनाही स्पर्धेचा भाग बनायला प्रोत्साहन दिलं. घरातील वातावरण खेळीमेळीचं ठेवलं. जेव्हा हे व्हाट्सअप ग्रुपवर आलं तेव्हा प्रिया व मेघाचा तोच तोरा,
"आता तर मोलकरीण शिवाय सगळं करावं लागतंय. चोवीस तास सासू सोबत घरात कोंडून राहावं लागतंय. अगदी संघर्षमय वातावरण झालंय घरात. त्यात काय हे ऑनलाईन स्पर्धा?

तुझा नवरा, सासू सासरे समंजस आहेत. नशीबवान तु. पण आमच्याकडे सगळी गुर्रर्र गुर्रर्र करणारी कुत्री."

गौरीला मळमळून आलं हे आठवून. तिच्या मनात आलं, "नशीबवान ! तिला आठवलं कुटुंब मिळून दोन मिनिटांचं नाटक फेसबुकवर टाकायच्या स्पर्धेत संपूर्ण परिवाराने समाविष्ट व्हावं म्हणून किती डोकं लावावं लागलं तिला नवऱ्यासोबत? सासूबाईला वय फक्त आकडा हे समजावतांना किती रुसवे फुगवे झाले आणि सासरे? या वयात असली थेरं नको म्हणतांनाही त्यांना पटवलंच शेवटी.
आपल्या कुटुंबाला तणावमुक्त करण्यासाठी काहीतरी क्रियाशील करायला हवं व त्यासाठी आपण त्यांना तयार करावं हे ठरवतांना माझाच माझ्या स्व शी झालेला संघर्ष यांना कळेल का?

आपल्या स्वतःला एखादं काही चांगलं करण्यासाठी वेळ काढायला लावणं, एखादी नवीन सवय लावतांना (जसं दिवसातून फक्त एकदाच चहा प्यायचा किंवा रोज दहा सूर्य नमस्कार करायचेच) त्यासाठी स्वतःला तयार करणं, पटवणं हाही एक प्रकारे संघर्षच नाही का? फक्त हा संघर्ष आपल्याला इतर कोणाशी नाही तर स्वतःशीच करावा लागतो व तो इतरांना दिसतही नाही.

सकाळी लवकर उठून फक्त फिरायला जाण्यासाठीही किती समजवावं लागतं स्वतःला तेव्हा ते होतं."

"अगं ए गौरी कुठे हरवलीस?" मेघाने गौरीला आवाज दिला. ती भानावर आली पण मनोमन तिच्या स्व चा परत तिच्या स्वतःशीच संघर्ष सुरु झाला,

"वेळ नाही, जमत नाही वगैरे वगैरे कारणं देऊन स्वतः काहीही नवीन न करणाऱ्या, स्वतःवर मेहनत न घेणाऱ्या, माझ्या संघर्षाला नशिबाशी जोडू पाहणाऱ्या या खरंच माझ्या मैत्रिणी आहेत का? माझ्या प्रगतीसाठी मी यांना सोडून द्यायला हवं कि स्वतःच्या विकासाचं महत्व पटवून द्यायला हवं?"
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you

//