Feb 24, 2024
वैचारिक

स्त्री.. विनोदाचा विषय.. कुठपर्यंत ??

Read Later
स्त्री.. विनोदाचा विषय.. कुठपर्यंत ??
"टवाळा आवडे विनोद" असे श्री समर्थ रामदासस्वामींनी सुमारे चारशे वर्षांपूर्वीच म्हणून ठेवलेय.. खरं तर मनुष्याला वेदना विसरायला लावणारं विनोदाइतकं प्रभावी साधन दुसरं नाही.. तरीदेखील समर्थांनी असं का म्हटलं असावं..? प्रत्यय मला आला.. कालच.. !

फेसबुकवर मी एक पोस्ट बघितली.. विनोदी लेखन असावं असं लिहिण्याचा शैलीवरून वाटत होतं.. लिहिणाऱ्यानं लिहिलं होतं..

"लॉक डाऊन मध्ये एक गोष्ट समजली.. घरात बायकोला खूप काम असतं ..काम करून दमून जातात.. त्यामुळे दोन बायका करायला पायजे.. कामाचा ताण कमी होतो.. नाय का ?" अन् पुढे तीन चार खिदळणारे चेहरे.. !!

अस्सा संताप आला म्हणून सांगू ! आधी मनातल्या मनात लिहिणाऱ्याला दोन चार अर्वाच्य शिव्या हासडल्या.. अन् उत्सुकतेने पोस्टखालच्या कॉमेंट्स वाचायला घेतल्या. नव्वद टक्के कॉमेंट्स स्त्रियांच्या होत्या.. पण एकीनेही असल्या निम्न दर्जाच्या विनोदावर नाराजी किंवा निषेध व्यक्त केला नव्हता.. उलट "तू कर दुसरं लग्न.. आम्ही येऊ लग्नाला".. हाच सूर..

एखाद दुसऱ्या पुरुषाची कॉमेंट होती.. पण तीही "आधी एकीला सांभाळून दाखव.. मग दुसरीबद्दल बोल.." अशा स्वरूपाची..

पोस्टही किळसवाणी अन् त्यावरच्या कॉमेंट्सदेखील. सहसा मी समाजमाध्यमांवर कोणाच्या वाटेला जात नाही.. पण का कोण जाणे.. इथे माझी सहनशक्ती संपली.. अन् अतिशय सभ्य शब्दात माझी कॉमेंट टाकली.. "वाईट्ट विनोद !"

तर काही वेळातच महाशयांचं उत्तर आलं.. "हा विनोद वाईट कसा काय ?"

आता ह्या व्यक्तीला काय म्हणावं? ज्या व्यक्तीला कोणी सांगितल्यावर देखील आपण काही चुकीचं लिहिलंय असं वाटत नाही अशी व्यक्ती प्रत्यक्षात स्त्रीचा खरंच किती आदर करत असेल ह्या बाबत शंका वाटते .

बरं, मी माझी कॉमेंट टाकून चोवीस तास उलटून गेलेत.. पण माझ्याव्यतिरिक्त  एकाही स्त्रीला किंवा पुरुषाला‌ ह्या पोस्टला विरोध करावासा वाटला नाही हे आणखी नवल !

जर अशीच एखादी कमेंट महिलेनं टाकली.. तर ..? ती हलकीफुलकी घेण्याची वृत्ती असेल आपल्याकडे ??

आपण नेहमीच अनुभवतो.. बायको ही विनोदाचा विषय.. तिची आई म्हणजे जावयाची सासू ही तर फारच ! आई ही 'आई' असते.. मग ती नवऱ्याची असो किंवा बायकोची ! ती विनोदाचा विषय कशी असू शकेल ? मेव्हणी ही आणखी एक विनोदाचा विषय .. नुसत्या विनोदाचा नव्हे, तर अश्लीलतेकडे झुकणाऱ्या विनोदाचा.. ती देखील एक स्त्री आहे.. अन् तिलाही मानसन्मानाची गरज आहे .. पण हे लक्षात कोण घेतो !

उद्या जर स्त्रियांनी नवऱ्याच्या वडिलांचा अन् भावाचा असल्या बाष्कळ विनोदाकरीता वापर केला तर ?

ऑफिसमध्येदेखील बॉसची सेक्रेटरी ही आणखी एक विनोद विषय.. खरं तर स्त्रियांइतकं मल्टीटास्कींग पुरूष करू शकत नाही म्हणून तिथे स्त्रीची सहसा निवड होते.. पण तद्दन फालतू हिंदी सिनेमे बघून आपली मनोवृत्ती इतकी घाणेरडी झालेली असते की सेक्रेटरी म्हणजे तोकडे कपडे घालणारी अन् बॉसला नेहमीच 'ॲव्हेलेबल' असणारी.. अन् मग तिच्यावरचे विनोद अतिशय खालची पातळी गाठतात.

स्त्री मग ती कोणीही असो.. ती एकतर आई असते अन् बहिणही.. ती कुणाचीतरी मुलगी नक्कीच असते.. विनोदाच्या नावाखाली जर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे तिच्या मानसन्मानाला ठेच लागणार असेल तर त्याला विरोध हा व्हायलाच हवा..

अशा वेळी नुसतं दुर्लक्ष करून उपयोग नाही.. किमान निषेध तरी व्हायलाच हवा.. नाहीतर अशाने ही विकृती वाढीला लागेल.. ही कीड समाज आणखीनच पोखरून काढेल..

"आम्ही स्त्रियांबद्दल काहीही बोलू .. आमचा तो अधिकार .." असं म्हणणाऱ्या पुरुषांना प्रत्येक स्त्री मध्ये स्वतःची आई आणि बहिण दाखवायची जबाबदारी घेणं आवश्यक आहे अन्यथा अनादिकालापासून स्त्रियांना‌ पुरुषांच्या मनोरंजनाचं साधन बनून राहावं लागलंय अन् पुढेही राहावं लागणार..

म्हणून मैत्रिणींनो.. सावध होऊ या..!   उद्या आपण स्वतः किंवा आपल्या मुली ह्या समाजकंटकांच्या घाणेरड्या मनोवृत्तीच्या बळी ठरण्यापूर्वी..

कल्याणी पाठक
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

कल्याणी पाठक

Service

मी एक नवोदित लेखिका आहे

//