Feb 24, 2024
वैचारिक

स्त्री शक्तीचा जागर

Read Later
स्त्री शक्तीचा जागर


अलीकडेच नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर याविषयी खूप भाष्य केले गेले. किंबहुना अनेक गुणवंत महिलांना विविध पारितोषिकेही देण्यात आली पण खरंच स्त्री शक्तीचा जागर म्हणजे नेमके काय?हेच बऱ्याचदा साविस्तर सांगितले जात नाही किंवा त्यावर चर्चा केली जात नाही.चला तर मग बघुया या संदर्भातील सविस्तर माहिती..

सर्वप्रथम स्त्री नावाचं हे रसायन काय असतं?
" तू ध्यास,तू विश्वास,
तू बळ,तू भरारी,
तू जिद्द,तू चिकाटी,
तू धैर्यशील,तू रणरागिणी,
तू पूजनीय,तू मानिनी.."
खरंच, स्त्रीला शब्दात व्यक्त करणे म्हणजे प्राजक्त गंधातील स्तुतीसुमनांची बरसात होय.एका गहिऱ्या धैर्याचा,नव्या सूर्योदयाच्या प्रारंभ होय.

स्त्रीशक्ती म्हणजे काय?
स्त्री म्हणजे शक्ती, शुद्ध ऊर्जा यांचे मूर्त स्वरूप.महिलांच्या प्रयत्नातून संभाव्य किंवा वास्तविक शक्ती.एक गट म्हणून स्त्रियांचा प्रभाव.

जागर म्हणजे काय?
एक विधी म्हणून, जागर हा एक मार्ग आहे ज्यामध्ये देव आणि स्थानिक देवतांना त्यांच्या सुप्त अवस्थेतून जागे केले जाते आणि कृपा किंवा उपाय मागितले जातात.

आज घडीला भारताच्या काही रणरागिणी वरील ओळींचा आपल्या सर्वांना खूप छान प्रत्यय देतात. चला तर मग घेवूया आढावा त्यांच्या कामगिरीचा आणि उत्तुंग गगनभरारीचा!

१.एकता कपूर

एकता कपूर या एक भारतीय टेलिव्हिजन निर्माता, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहेत ज्या हिंदी चित्रपट आणि सोप ऑपेरामध्ये काम करतात.कपूर स्क्रिप्ट रायटिंग, क्रिएटिव्ह कन्व्हर्जन आणि कॉन्सेप्ट बिल्डिंगवरही काम करतात.यासोबतच त्या बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि क्रिएटिव्ह हेड आहेत,ज्याची स्थापना १९९४ मध्ये झाली होती. एकता कपूर या दिग्गज स्टार जितेंद्र यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरची बहीण आहे.

एकताने टीव्ही मालिका आणि चित्रपट निर्मितीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. त्यांना सहज मनोरंजन विश्वातील सर्वात यशस्वी महिला निर्माती म्हणता येईल.त्यांना २००१ चा सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार मिळाला आहे.कपूर यांना टेलिव्हिजन उद्योगातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक मानले जाते आणि भारतातील शीर्ष २५ महिला उद्योजकांमध्ये त्यांचा समावेश होतो. कलाक्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना २०२० मध्ये पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.कपूर यांना बालाजी टेलिफिल्म्सची निर्माती म्हणूनही अनेक पुरस्कार मिळाले आहेत .

२.रितू कुमार

रितू कुमार हे भारतीय फॅशन इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे.त्या एक उत्तम फॅशन डिझायनर म्हणून कार्यरत आहेत.स्विमवेअर, पारंपारिक भारतीय पोशाख, कॅज्युअल पोशाख आणि औपचारिक व अनौपचारिक असे गाउन यासह विविध प्रकारचे वॉर्डरोब डिझाइन करण्यात रितूने आपला एक वेगळाच ठसा निर्माण केला आहे.त्यांना तीन विजेत्या मिस इंडियाचे पोशाख डिझाइन करण्याचा तगडा अनुभव आहे. रितू कुमार यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार तसेच लॉरियल पॅरिस फेमिना पुरस्कार मिळाला आहे.

३.शहनाज हुसेन

शहनाज हुसेन सध्या शहनाज हर्बल्स इंकच्या सीईओ म्हणून कार्यरत आहेत.शहनाज हुसैन हे भारतातील हर्बल कॉस्मेटिक्स उद्योगातील सर्वात मोठे नाव आहे. त्यांनी आजवर अनेक ट्रेंड सेटिंग हर्बल उत्पादने जगासमोर सादर केली आहेत.सध्या, शहनाज हुसेन ग्रुपचे जगभरात ४०० पेक्षा जास्त फ्रँचायझी क्लिनिक आहेत ज्यात १३८ पेक्षा जास्त देश समाविष्ट आहेत. त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हा भारत सरकारकडून त्यांच्या अग्रगण्य कार्याला मान्यता मिळाली. हार्वर्ड बिझनेस स्कूलने व्यावसायिक जाहिरातींशिवाय आंतरराष्ट्रीय ब्रँड स्थापन करण्याच्या त्यांच्या यशोगाथेवर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते आणि यावर हार्वर्ड केस स्टडी देखील बनला आहे ज्याचा अभ्यासक्रमात समावेश आहे. सक्सेस मॅगझिनचा 'वर्ल्ड्स ग्रेटेस्ट वुमन आंत्रप्रेन्योर'पुरस्कार जिंकला.

४.लक्ष्मी अग्रवाल

लक्ष्मी अग्रवाल या एक ऍसिड हल्ला पीडिता आहेत. सध्या त्या ऍसिड हल्ला पीडितांच्या हक्कांसाठी प्रचारक आणि टीव्ही होस्ट म्हणून कार्यरत आहेत .लक्ष्मी अग्रवालवर २००५ मध्ये नवी दिल्ली येथे वयाच्या १५व्या वर्षी नईम खान नामक मुस्लिम लव जिहादीने ऍसिड हल्ला केला होता,ज्यामुळे त्यांचं आयुष्य उध्वस्त व्हायची वेळ आली. त्या हल्ल्यातून त्या बचावल्या आणि पुढे अशा हल्ल्यात जखमी होणाऱ्या मुलींसाठी काम करायला त्यांनी सुरुवात केली.अशाप्रकारचं ॲसिड सहजासहजी उपलब्ध होऊ नये यासाठी त्यांनी याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टानेही त्यांच्या या याचिकेची दखल घेतली आणि केंद्राला आणि राज्यांना ॲसिड विक्रीबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले. म्हणूनच भारतात महिलांवर होणाऱ्या हल्ल्याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणून लक्ष्मी अग्रवाल यांना ओळखले जाते.२०१९ मध्ये, त्यांना महिला आणि बाल विकास मंत्रालय , पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय तसेच युनिसेफ यांच्याकडून ॲसिड विक्री थांबवण्याच्या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.२०१४ मध्ये, त्यांना फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या हस्ते इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज पुरस्कार मिळाला.छपाक हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित असून यात दीपिका पदुकोण त्यांच्या भूमिकेत आहे.

५.सीमा राव

भारताची वंडर वुमन अशी सीमा राव यांची ओळख आहे कारण या भारतातील पहिल्या कमांडो ट्रेनर आहेत.पेशाने डॉक्टर असून आपत्कालीन स्थितीत कशाप्रकारे काम केलं पाहिजे यात त्यांनी एम. बी. ए. केलं आहे.मेजर दिपक राव या आपल्या पतीबरोबर त्यांनी आत्तापर्यंत १५००० कमांडोजना ट्रेनिंग दिलं आहे.
'जीत कुने दो 'या मार्शल आर्टची पद्धत जगातल्या ज्या दहा महिलांनी शिकली आहे त्यातील एक म्हणजे सीमा राव. अत्यंत वेगळं असं क्षेत्र त्यांनी आपलं करिअर म्हणून निवडलं आहे.राव ह्या २०१९ च्या फोर्ब्स इंडिया डब्ल्यू-पॉवर ट्रेलब्लेझर यादीत सहाव्या स्थानावर होत्या.त्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिन २०१९ रोजी तत्कालीन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार मिळाला होता.


६.रितू करिधाल


इस्रोच्या माहितीनुसार चांद्रयान ३ हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर उतरवण्याची जबाबदारी ही वरिष्ठ महिला वैज्ञानिक रितू करिधाल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. रितू करिधाल या चांद्रयान ३ च्या मिशन डायरेक्टर आहेत. याआधी डॉ. रितू या मंगळयानाच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर आणि चांद्र मिशन डायरेक्टर म्हणून कार्यरत होत्या.
लखनऊमधून फिजिक्समध्ये त्यांनी एम. एस्सी. पदवी मिळवली आणि ज्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्समधून पदवी मिळवली तिथंच त्यांनी सहा महिने शिकवलंही. त्यानंतर बंगळुरुच्या इंडियन सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं.बंगळुरुमधील आयआयएससीमध्ये रितू यांनी एरोस्पेस इंजिनियरिंगमध्ये उच्च शिक्षण घेतलं. १९९७ मध्ये त्या इस्रोमध्ये दाखल झाल्या. तेव्हापासूनच आजवर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.


७.मेरी कोम

या एक भारतीय बॉक्सिंगपटू आहेत.मेरी कोमने महिला जागतिक हौशी बॉक्सिंग अजिंक्यपद सहावेळा जिंकले असून २०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेत फ्लायवेट प्रकारामध्ये त्यांनी कांस्यपदक मिळवले आहे. २०१४ इंचॉन आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले आहे. २०१४ साली त्यांच्या जीवनावर आधारित मेरी कोम ह्याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरी कोमची भूमिका केली आहे.भारताला बॉक्सिंगमध्ये मानाचं स्थान देणारी खेळाडू म्हणजे मेरी कोम. ईशान्येकडील एका छोट्या गावातून अत्यंत गरीब घरातून बॉक्सिंगमध्ये जिने नाव कमावलं ती म्हणजे मेरी कोम.बॉक्सिंगसारख्या वेगळ्या क्षेत्राचं दालन भारतातल्या महिलांना खुलं करणारी मेरी कोम आता सगळ्यांनाच माहीत आहे.ऑलिंपिकमध्ये भारताच्या महिला बॉक्सिंग टीमचं प्रतिनिधित्व त्यांनी केले. त्या पाच वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चंपियन झाल्या.सलग सहा सामन्यांमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या त्या एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे.

८.सालुमरद थिम्माक्का

सालुमरद थिम्माक्का या कर्नाटक राज्यातील बेंगळूरूपासून ८० किमी अंतरावर असणाऱ्या हुलिकल या गावातील पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती आहेत.त्यांचे वय १०५ वर्षे असून भारत सरकारने त्यांना २०१९चा पद्मश्री पुुुरस्कार दिला. त्यांचा बीबीसीच्या १०० प्रभावी पर्यावरणवादी महिलांच्या यादीत समावेश आहे. त्यांनी ८००० पेक्षा जास्त झाडे लावून त्यांचे उत्तम संगोपन केले आहे.या कामाबद्दल त्यांना राष्ट्रीय नागरी सन्मान (नॅशनल सिटीझन अवार्ड) देण्यात आला.त्यांच्या कामाची दखल लॉस एंजेलिस, ऑकलंड व कॅलिफोर्निया मधील संस्थांनी देखील घेतली आहे.तसेच त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आलेले आहे. पतीच्या निधनानंतरही त्यांचे हे वृक्ष संवर्धनाचे अव्याहतपणे चालू आहे.
कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला वयाचं बंधन नसतं हे सालुमरद थिम्माक्का यांच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं.त्या मजूर म्हणून काम करायच्या. परंतु त्यांना आणि त्यांच्या नवऱ्याला जेव्हा समजलं की ते आई-वडील होऊ शकणार नाहीत, तेव्हा त्यांनी झाडे लावायला सुरुवात केली.


९. प्रतिभा देवीसिंह पाटील

प्रतिभा देवीसिंह पाटील (डिसेंबर १९, इ.स. १९३४ - हयात) या भारताच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी इ.स. २००७ ते इ.स. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.त्यांनी एम.जे. कॉलेज, जळगाव येथून एम.ए.ची पदवी घेतली व नंतर मुंबईतील लाॅ काॅलेजातून एल.एल.बी.ची परीक्षा देऊन त्या वकील झाल्या.प्रतिभा पाटील यांनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे त्या सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या.त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापून स्त्रियांना चरितार्थाच्या संधी उपलब्ध करून दिल्या तसेच पाळणाघर मदत योजना स्थापन केली. महिला बँकांची स्थापना देखील केली. आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांची स्थापना केली.


१०.निर्मला सीतारामन्

या भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत.निर्मला सीतारामन् यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २०१४ मध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला.३ सप्टेंबर २०१७ पासून ते ३० मे २०१९ त्या भारताच्या संरक्षणमंत्री होत्या. ३० मे २०१९ ते आतापर्यंत भारताच्या अर्थमंत्री म्हणून त्या काम करत आहेत.त्यापूर्वी सीतारामन् यांनी अर्थ राज्यमंत्री व वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केले आहे. त्याआधी त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून देखील काम केले आहे.कर्नाटकातून त्या राज्यसभेच्या सदस्या म्हणून निवडल्या गेल्या.त्या भारताच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर दुसऱ्या महिला अर्थमंत्री बनल्या. सीतारामन यांना फोर्ब्स २०२१ च्या जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत स्थान देण्यात आले आणि त्यांना ३७ व्या स्थानावर ठेवण्यात आले. फॉर्च्युनने निर्मला सीतारामन यांना भारतातील सर्वात शक्तिशाली महिला म्हणून स्थान दिले.

ही आहेत भारतातील काही सक्षम महिलांची उदाहरणे. अशाच अनेक महिला, भारताच्या रणरागिणी आजही खंबीरपणे स्वतःला सिद्ध करत एक वेगळा ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटवत आहेत.या भावी रणरागिणी भारताला येणाऱ्या काळात एका नव्या उंचीवर नेतील यात शंका नाही.

मला वाटतं की ही सारी उदाहरणे जी आपण पाहिली ती स्त्री शक्ती एक अस्त्र आहे हे सिद्ध करतात.आता हे अस्त्र कशाचे तर समानतेचे,नैतिकतेचे.स्त्रीनं तिच्या शक्तीचा जागर स्वतःमध्ये नेहमीच तेवत ठेवावा या मताची मी आहे.’पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्;’असं करत करत, चौऱ्यांशी लक्ष योनीतून प्रवास केल्यावर मनुष्यजन्म प्राप्त होतो म्हणतात.म्हणून हा जन्म एकदाच.त्यामुळे एक स्त्री म्हणून अनेक नवीन बदलांचा वेध किंवा जाणीव आपण इतरांना करून देऊ शकतो.ते कसे ? बघुया खालील मुद्द्यांमध्ये:


१.आता बघा ना अगदी साधं उदाहरण!आजही आपल्या घरामध्ये मुलीला लग्नाआधी सारी कामं शिकवली जातात पण मुलाला लग्नाआधी घरकाम शिकवलं जातं? नाही.म्हणून आपल्या भावी पिढीतील स्त्रियांना घरकामात जरा मदत मिळावी या हेतूने या बदलाचा स्त्री शक्ती म्हणून जागर केला तर नक्कीच फायदा होईल.आता सुरुवातीला तुम्हाला किंवा घरच्यांना हा बदल म्हणजे जरा वात्रटपणा वाटेल किंवा याबद्दल तुम्हाला जरा बोलणी खावी लागतील.म्हणून साऱ्यांना येणाऱ्या काळातील बदलाची जाणीव करून योग्य दिशेने आपण कसे चाललो आहोत हे पटवून देणे योग्य ठरेल.
२.मल्टीटास्किंग चा अट्टाहास आता पुरे.नोकरदार असो किंवा गृहिणी घरातील सारी कामे मी करू शकते किंवा मलाच छान येतात अशी मानसिकता नकोच.स्वतःला आवडतं ते करायची मजा अनुभवता आली पाहिजे,तेवढा वेळ मिळाला पाहिजे .म्हणून नाही म्हणायला शिकले पाहिजे.जरा दुसऱ्यांवर जबाबदारी टाकता आली पाहिजे.
३. स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा.आता हे सारं कुटुंबाला धरून देखील करता येऊ शकतं.फक्त स्वतःला जरा पुश करा मग बघा घरातले तुम्हाला आपोआप सपोर्ट करतील.
४.स्वतःची काळजी घ्यायला शिका.आता बऱ्याच महिलांनी नवरात्रीमध्ये ९ दिवसांचे उपवास धरले होते. बरोबर? अरे पण उपवास म्हणजे शाबुदाना किंवा भगर हेच पदार्थ खाणे हे चुकीचे आहे. उपवास असताना वेगवेगळे उपवासाचे पदार्थ ट्राय करून घरातील इतरांनाही ते खाण्यास द्या.मग बघा एकच चविष्ट पदार्थ खाऊन घरातले खुश होतील अन् मग दुसरा स्वयंपाक करण्याची गरजच पडणार नाही.बघा म्हणजे यातून तुम्ही काहीतरी नवीन शिकलात,उपवास घडला आणि दुसऱ्या स्वयंपाकाचा त्रास देखील वाचला.हो की नाही?अहो महिला वर्ग,आधी स्वतःची काळजी घ्या; दुसऱ्यांची आपोआप घेतली जाईल.
५.अध्यात्म आणि संसार यांचा योग्य समतोल साधला गेला पाहिजे.तरच मनुष्य जन्म समाधानी आणि आनंददायी होऊ शकतो.

तर मग चला सख्यांनो आपण आपल्यातील स्त्री शक्ती ओळखून या बदलांचा जागर करूया आणि या २१व्या शतकात एक नवीन क्रांती घडवून आणूया.मग? या दिवाळीत हा संकल्प करणार ना?

माहिती संकलन: साभार गुगल

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडेईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

सौ प्रियंका कुणाल शिंदे बोरुडे

Freelance Teacher, Content Writer

I am Mrs Priyanka Kunal Shinde Borude,an Engineering Postgraduate Homemaker.I have a teaching experience of 3 years to Engg students.My Cerebral Palsy Child Explored me by all means.He gave me Vision towards life. Thank U my Little munchkin.

//