स्त्री जन्मा तुझी कहाणी...

Stri chya samor ubhe aslele sanghrsh kadhihi n sampanare aahet

स्त्री जन्मा तुझी कहाणी...

रमाने बॅग भरली आणि घरून तशीच रागारागात, तावात बाहेर पडली.

थोड्या दूर चालत आल्यानंतर एका झाडाखाली विसाव्याला बसली. डोळे पाणावलेले, छातीत धडधड , शरीरात कंपन सुरू होते. शेवटी ती ही एक माणूसच आहे, तिलाही वेदना होणारच.

रमा दिसायला देखणी, परिस्थितीमुळे शिक्षणात मागे पडलेली, वयाच्या सतराव्या वर्षी सतीशसोबत तीच लग्न झालं.

नव्या नवलाईचे नऊ दिवस खूप आनंदात गेले. त्यानंतर सुरू झाला स्त्री म्हणून जन्माला येण्याचा संघर्ष.

लग्नानंतर दोन वर्षाने रमाने एका गोड मुलीला जन्म दिला. पण घरी कुणालाच आनंद झाला नाही, कारण घरच्यांना वंशाचा दिवा हवा होता.

ते रमाला त्रास द्यायला लागले.पदोपदी अपमान सुरू झाला. घरातल्या लक्ष्मीची हेळसांड व्ह्यायला लागली.

स्त्री म्हणजे पायाखालची धूळ कधीही मसला आणि उडवून द्या, असच काहीसं रमासोबत घडत होतं.

सासू सासऱ्यांच त्रास सुरू झाला, नवरा दारू पिऊन मारहाण करायला लागला. पदरात एक मुलगी आहे म्हणून रमाने सगळं सहन केलं.

रोजच टोचून बोलणं, अपमान करणं, अपशब्द बोलणं ह्या सगळ्यांचा रमाला खुप त्रास व्ह्यायचा . पण रमाचा नाईलाज होता, कारण ती माहेरी जाऊ शकत नव्हती आणि तिची आर्थिक बाजूही भक्कम नव्हती.

दहा वर्ष मुकाट्याने सगळं सहन केलं. पण कहर त्या दिवशी झाला ज्या दिवशी सतीशने माणुसकी सोडली. दारूच्या नशेत त्याने रमाच्या लहान बहिणीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. रमाच्या लक्षात येताच तिने धाव घेतली आणि बहिणीची अब्रू वाचवली, सतीश शुद्धीतच नव्हता त्याने रमाला मारहाण करायला सुरुवात केली.

पण यावेळी रमाच्या शरीरात चंडिकेचे आगमन झाले होते. रमाने दंडा घेतला आणि सतीश शुद्धीत येईपर्यंत त्याला चांगलाच चोपला.

हा रुद्र अवतार पाहून सासू सासरेही घाबरून पळून गेले .

रमाने हातातला दंडा फेकला आणि बहीण आणि मुलीला घेऊन त्या घरातून बाहेर पडली, कायमची.

तिथे कधीही न परतण्यासाठी .

स्त्रीला फक्त स्त्री समजू नका, ती अनेक नात्यांनी भरलेली असते, परिपूर्ण असते. तिला कधीच अबला समजू नका.

स्त्री म्हणजे नारी...

स्त्री म्हणजे आई,पत्नी, सून अनेक नात्यात गुंफलेली नारी म्हणजे स्त्री.

स्त्रीचं दुसरं भक्कम नातं म्हणजे अर्धांगिनी.

अर्धांगिनी हा शब्द स्त्रीशी अधिक जुळलेला आहे.

अर्धांगिनी म्हणजेच पतीची सेवा करणारी, मुला-बाळांना सांभाळणारी ,घरसंसार चालवणारी, सासू सासऱ्यांची सेवा करणारी हे एवढंच आपल्या डोळ्यासमोर येत पण आजची स्त्री आपल्या कठोर परिश्रमाने शिकून उच्चपदावर पोहोचलेली आहे, पण हे सगळं असतानाही तिला चूल चुकलेली नाही.

आजही स्त्री अनेक समस्यांना तोंड देत आहे. सावित्रीबाई फुलेंसारख्या स्त्रीमुळे आज स्त्रियांना शिक्षण मिळून मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

ती खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभी राहू शकली. आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण करू शकणारी शक्ती तिच्यामध्ये निर्माण झाली आहे.

पुर्वकाळी सुद्धा स्त्रियांना अनेक यातना सोसाव्या लागल्या आहेत. समाजातील लोक ज्याप्रकारे स्त्रीला वागणूक देत होते, ते दृश्‍य डोळ्यासमोर ठेवले तर अजूनही असे वाटते, की त्याकाळी मुलगी म्हणून जन्माला येण म्हणजे तिचे दुर्भाग्य होतं.

स्त्री जन्म घेतला म्हणून समाजातील सारी बंधने जन्मापासूनच तिला स्वीकारावी लागली, स्वातंत्र्य मात्र कधी मिळाले नाही, या बाबतीत पुरुषांना मात्र पूर्ण स्वातंत्र्य मिळालं.

मुलगी थोडी वयात आल्यावर पुरूषांसमोर उभे राहायचे नाही, असे करायचे नाही, असे बोलायचे नाही, घराच्या बाहेर जायचं नाही, किती ते बंधन असायचे, लग्नानंतर घरात वावरतानादेखील डोक्‍यावर पदर घेऊन वावरावे लागत असे.

लग्न म्हणजे काय हे माहीत नसतानासुद्धा केवळ वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी आई-वडिलांचे कर्तव्य म्हणून मुलीचे लग्न करून द्यायचे. नंतर काही वर्षांनी मातृत्व स्वीकारून घरसंसार, मुलांना सांभाळून घरी राहायचे.

तिने फक्त चूल-मुलं, संसार आणि नवरा यांच्यासाठी जगायचे. हेच तीच जीवन होते. दुसऱ्यांसाठी दिवसरात्र राबायचे आणि एक दिवस त्यातच झिजून जायचे.

तिच्या जीवनाला, जगण्याला कोणतीच सीमा, कोणतीच मर्यादा नसते. आज परिस्थिती थोडी बदललेली असली, तरीसुद्धा समाजात स्त्रीने एकटे राहणे धोक्‍याचे झाले आहे.

आई-वडील नसल्यामुळे पोरकी बनलेली मुलगी किंवा पतीचे निधन झाल्यामुळे विधवा बनलेली स्त्री दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. दोघांनाही कोणाचा तरी आधार हवा असतो. आधाराशिवाय समाजात वावरणे म्हणजे एक प्रकारे संघर्षच.

पुरुष कितीही शिक्षित असला तरी चारचौघात वावरताना तो उच्च दर्जाचे शब्द वापरेल, पण हीच स्त्री जेव्हा त्याच्या पुढे जाईल, तेव्हा तो तिचा तिरस्कार करू लागतो.

त्याचा स्वाभिमान जागा होतो. आज समाजातील परिस्थिती बदललेली आहे, परंतु स्त्री भ्रूणहत्या कमी झालेली नाही. आजही सुशिक्षित लोकांना मुलगी म्हणजे डोक्‍यावरचे ओझे वाटते. त्यांना वंशाचा दिवा हवा असतो आणि म्हणून भ्रूणहत्याला वाव मिळतो.

काळ बदललेला असला तरी परिस्थिती तीच आहे. स्त्रीच्या समोर उभे असलेले संघर्ष कधीही न संपणारे आहेत. रमाने जो निर्णय घेतला तसाच निर्णय आणि धाडस अन्याय सहन करणाऱ्या स्त्रियांनी दाखवलं काही प्रमाणात का होईना कुठेतरी या गोष्टीला आडा बसेल. आणि स्त्रियांवरील अत्याचार कमी होतील.

समाप्त:

( कुणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही, हे फक्त माझे विचार आहेत. इतरांचे मत, विचार वेगळे राहू शकतात. मन दुखावलं असल्यास क्षमा असावी.)