Login

स्त्री जीवना तुझी कहाणी

स्त्री जीवना तुझी कहाणी
स्त्री जीवना तुझी कहाणी...

"सुरुची आज आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. आटप लवकर" शुभम ऑफिसमधून येताचं सुरुचि ला म्हणाला.
"हो ,झालीच माझी तयारी. निघूया आपण.
सुरुचि व शुभम हॉस्पिटलमध्ये आले. सुरुचिला नुकताच नववा महिना लागला होता. सारं काही व्यवस्थित असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. बाळंतपणाची तारीख सुद्धा दिली.

ठरलेल्या तारखेनुसार शुभम आणि सुरुचि डॉक्टरांकडे जाण्यासाठी निघाले. शुभमने आईला आवाज दिला. "आई, आम्ही हॉस्पिटलमध्ये निघालो आहोत. तू तयारी करून ठेव. काम पडलं तर मी तुला घ्यायला येईल."
अरे शुभम, थोडावेळ थांब. मी काय म्हणते ते ऐक.
"बोल काय म्हणतेस." शुभम आपल्या आईला म्हणाला.
"अरे शुभम सध्या पितृपक्ष चालू आहे. अजून चार दिवस राहिले आहेत महिना संपायला. तोवर थांबायला काय हरकत आहे. डॉक्टरांना सांग सिझर चार दिवस पुढे ढकला."
"अगं आई हे काय नवीनच?"
अरे शुभम, पितृपक्षात नवीन बाळ? नाही नकोच.
"आई अग तुला कोणी सांगितलं हे. असे कितीतरी हॉस्पिटल्स आहेत. तिथे या महिन्यात जन्माला येणारी कितीतरी बाळं असतील.
पण मंजिरी ताई ऐकायलाच तयार नव्हत्या. सुरुचिला ही काय बोलावं समजेना.
शेवटी त्या दोघांनी जाण्याची तयारी कॅन्सल करून पुढे चार दिवसानंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी सुरुचिला ऍडमिट करून घेतले. काही इंजेक्शन्स वगैरे देऊन डॉक्टरांनी नॉर्मल डिलिव्हरी होण्याची वाट पाहिली. परंतु सरते शेवटी"बाळाला पोटात पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही." म्हणून सिझर करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला. सर्वांची संमती घेण्यात आली. सिझर झाले. मुलगा झाला. सर्वांना खूप आनंद झाला. पण जन्मताचं बाळ रडलेच नाही. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले तेव्हा कुठे काही तासाने बाळ रडायला लागले. डॉक्टरांनी सांगितलं की बाळाच्या रडण्याचे थेट हृदयाशी कनेक्शन असतं.

बाळ जसं जसं मोठा होऊ लागलं तशा बऱ्याच गोष्टी लक्षात येऊ लागल्या. कारण त्याच्या आरोग्याशी संबंधित अनेक तक्रारी निर्माण झाल्या होत्या.

वास्तविक ज्या तारखेला हॉस्पिटल मध्ये जायला पाहिजे होतं तेव्हा न जाता ती तारीख पुढे ढकलल्यामुळे या सर्व प्रसंगाला तोंड द्यावं लागलं होतं.

खरंतर बाळंतपण म्हटलं तर स्त्रीचा दुसरा जन्म असतो. विशेषतः तिला अशावेळी स्वतः कोणताच निर्णय घेता येत नाही. सर्वस्वी ती घरच्यांवर अवलंबून असते. डॉक्टरांवर अवलंबून असते.

सौ. रेखा देशमुख