स्त्री चे परावलंबित्व

Parawlambi Stri


राज्यस्तरीय लघूकथा स्पर्धा
विषय:
स्त्री आणि परावलंबित्व

स्त्री ही कधीच परावलंबी नव्हती. तिला परावलंबी केले गेले. जन्मताच जाणून बुजून....
कसं ते पहा..

आई: थांब लाडो! तुला जमणार नाही. मी करुन देते.

लाडो: "नाही मला जमतं ! मी करते, मी करणारच" !

आई : तुला एकदा सांगितलेल कळत नाही का गं? गप्प बस!

मुलगी मोठी होते. ती शाळेत जाऊ लागते.
बायको:"अहो, हिला जाता जाता. शाळेत सोडता का?"

नवरा: जाते की तिचं ती! आता काय लहान आहे ती. आणि शाळा कुठे लांब आहे. जाऊ दे तिला !
तिला ही एकटी जायची सवय व्हायला पाहिजे.

आजी:ये बाबा तुला जमतंय का? ते सांग नाहीतर, मी सोडते. पोरीची जात आहे. काळजी घ्यायला हवी. दिवसमान बरोबर नाही.

नवरा: बरं ठिक आहे सोडतो मी तिला. दुपारी आणायला तू जा गं आई. तुझे पाय पन मोकळे होतील.

आजी: बरं जाईन!

आजी: गोट्या गेला काय? गं. सुनबाई!

बायको :हो सासूबाई गेला तो .

आजी: तो काय पोरगा हाय, तेच काही नाही.

लाडो: तेचं काही नाही. आणि मग माझंच काय आहे गं, आजी, मलाच इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. हे करु नको ते करु नको.

आजी : अगं लाडो, गोट्या पुरुष आहे. तो दणकट आहे. तो प्रसंगी दोन देऊ शकतो. तुझं तसं नाही. तू नाजुक आहेस. असं म्हणतात, मुलगी काचेचं भांडं असते.

लाडो : अस कोण म्हणतात?

आजी: पुर्वीची लोकं. ते तडकलं की काही कामाचं नसते.

लाडो : का? मग मी काय दणकट‌ नाही?
आम्ही दोघं एकच जेवण खातो ना? मग हा फरक का? मला पण दणकट करा मीही समोर येईल त्या प्रसंगाला सामोरे जाईन आणि समोरच्याला दोन देऊन पण येईन.

आजी :हो गं बाई तुझा काय नियम नाही.

लाडो: नात कोणाची आहे.

आई: हो हो आजीचीच. जास्त बोलू नको
"गप्प बस! आणि शंभर प्रश्न विचारु नको"

आजी: ही पोरगी लईच प्रश्न इचारती बाई! बाई माणसानं येवढं बोलणं बरं नव्हं. मोठेपणी तू इंदिरा गांधी व्हणार.

आजी लाड करत: माझी इंदिरा गांधीच हाय.

नवरा: तू चल लाडो, तुला सोडून मी पुढे जातो.
अचानक दुपारी शाळा सुटली आजीची वाट न पाहता लाडो घराच्या वाटेला लागली.आणि आजी शाळेत पोहचली. लाडो नाही म्हटल्यावर इकडे आई ,आजीने आकांण्ड तांण्डव केले. पोरगी कुठे गेली. बाबा गाडी घेऊन घराकडे निघाले. सरांनी शोधाशोध केली त्यांचीही तारांबळ उडाली. आईला चक्कर आली. एकच गलका झाला. इकडे गोट्या शाळा सुटल्यावर दोन तासांनी घरी आला .

आई: काय शाळा आता सुटली वाटतं. जावा कपडे बदला. म्हणजेच मुलाने केव्हाही आले तर चालते. पुढे मुलगी काॅलेजात जाते. तिथेही असेच. दणकट भाऊ नुसताच खाऊन दणकट होतो. शाळेवरच शिक्षण थांबवितो.नाजुक बहिण मात्र भरपूर शिकते. काॅलेजात जाऊ लागते. भाऊ बहिणीच्या आधीच काॅलेजात पोहचतो. येथे ही परावलंबित्व बहिणीकडे कोण पाहतंय का? पाहतो. चुकून जरी कोणी पाहिले, तरी त्या पोराला ब .ब. बदडतो. का?तर माझी बहिण देखणी, नाजुक आहे. हे कोणी ठरवलं?त्यानेच
तिला कमजोर कोणी केले. आपल्या जवळच्या लोकांनीच हे मुलगी करु शकत नाही का? करु शकते, अनुभवावरुन सांगते. एका थपरांगीत चंद्र तारे दाखवू शकते. पण तिला घरच्यानींच पंगू करुन ठेवले. पुढे तिचे लग्न होते.

मुलगी:बाबा, अहो मी जरा बाहेर जाऊन येते.

घरचे पुरुष: नाही मी सोडतो.

मुलगी:मी जाते अहो. मलाही कळेल कसं जायच ते.

पुरुष: नाही नाही आमच्या घरच्या बायका अश्या एकट्या एकट्याने फिरत नाहीत.

मुलगी: मग स्कुटी घेऊन द्या, ती मला शिकवा.

पुरुष: आमच्या घरी आजपर्यंत बायकांनी गाडी चालवली नाही.

मुलगी: मग मी चालवते ना?

पुरुष : नाही. रहदारी वाढलीय, उगीच रिस्क नको.

पुरुष:तुला काय हवं ते सांग मी ते आणून देईन. कुठे हवं तिथे सोडेन.

मुलगी: म्हणजे मी तुमच्यावरच अवलंबून रहायचं का? समजा तुम्ही घरात नसताना मला गरज लागली तर मी तुम्ही येई पर्यन्त वाट पहायची का? त्या महेकर काकू आयुष्यभर नोकरी केली पैसे कमावले पण साधी स्कुटी चालवू शकल्या नाहीत. आज पुरुष सोईस्कर म्हणतो चालवायची होती आम्ही कुठे नको म्हणतोय. पण जेव्हा स्कुटी हातात घेतली तेव्हा त्याला स्त्री पेक्षा गाडी महत्वाची वाटली एकदा गाडी पडल्या बरोबर गाडी शिकवणे बंद केले शिवाय ऐकूण वेगळेच घ्यावे लागले. म्हणून त्यांनी गाडी विषय बंद केला.काल त्यांना परगावी जायचे होते. तिनं चार पिशव्या भरलेल्या होत्या. रिक्षा बोलवावी तर रिक्षा स्टाॅप लांब होता. स्कुटी,फोर व्हिलर उभी असताना त्यांची पंचाईत झाली. स्कुटी चालवता येत नाही. फोरव्हिलरची चावी मुलगा आॅफिसला घेऊन गेला होता. त्यावेळी महेकर काकी मला म्हणाल्या, "लाडो तू तेवढी गाडी चालवायला शिक बरं का? या मेल्या पुरुषांच्या पाया पडायला नको मी केलेली चुक तू करु नको.आज तू गाडी चालवली असतीस तर मला शेजारच्या मुलांची मदत घ्यावी लागली नसती. म्हणजेच काय कुठे ना कुठे कशी ना कशी स्त्री परावलंबी आहे."
तुम्ही सगळ्यांनी का छळ. मांडलाय स्त्रीचा? का ? तिला मोकळा श्वास घेऊ देत नाही. वर आणि तुमचे टोमणे. काय येतंय बायकांना? अरे, काही करु तरी द्या बायकांना!.
का? तुमच्या परावलंबी ओझ्याखाली चिरडताय आम्हाला ती प्रत्येक वेळी म्हणत असते. I can do it. प्रत्येक वेळी तिचा आवाज दाबला जातो. माझी आजी,आई, मावशी, काकू बहिण ,वहिनी सासू ,जाऊ , लेक सून यांच्याशी असंच वागत आलाय हा पुरुष वर्ग
पर्यायाने स्त्रीया सुध्दा तेवढ्याच कारणीभूत आहेत, एकमेकीचे पाय खेचायला.
सासूने म्हणायचे सूनेला मोकळीक दिली तर सून हातची जाईल,
आईने म्हणायचे मुलगी नाजूक आहे.
लेकीने म्हणायचे आई अशिक्षीत आहे.
जावेने म्हणायचे मला नाही मग हिलाच का मोकळीक? ह्याचा परिणाम म्हणून आज प्रत्येक स्त्री परावलंबी बनली आहे.
ज्या घरात पुरुष नाहीत त्या घरची बाहेरची कामं स्त्रीयांच करतात ना? तिथे कुठे अडले का? पुरुषावाचून. नाही ना? मग ज्या घरात पुरुषी वर्चस्व तिथे का? तिला पुरुषावर अवलंबून रहावे लागते.त्यांनी का तिला स्वावलंबी केलं नाही. म्हणूनच
स्त्री आणि परावलंबीत्व हे न सुटणारे कोडे आहे. ते असेच चालत राहील ही फक्त एक- दोन उदाहरणं झाली. असे कित्येक प्रसंग आहेत. जिथे स्त्रीचे परावलंबीत्व दिसून येते.

सौ.वैशाली शिवाजी चौगुले.
रा.बहिरेवाडी,ता.आजरा जि.कोल्हापूर.