स्त्री सक्षमीकरण... माझ्यापुरतं

Woman Empowerment... From My Doorstep
"नेमेचि येतो मग पावसाळा" तसं दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री पुरुष समानतेचा विषय गाजत असतो.

बरेच वर्षांपासून मी स्त्री पुरुष समानता ही संज्ञा ऐकते आहे. मुळात समानता हा शब्दच अतिशय फसवा आहे. त्याला परस्परांची तुलना होत असल्याचा दर्प येतो. स्त्री पुरुषांनी एकमेकांची कामे करणे इतका संकुचित अर्थ स्त्री पुरुष समानतेचा नक्कीच नाही.

मानसशास्त्रज्ञाच्या संशोधनानुसार एकमेकांची परस्परांशी तुलना करणे बरेचदा आत्मविकासाच्या दृष्टीने घातक आहे. मग स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली अशी तुलना कशाला?

स्त्रीने स्वतःची तुलना स्वतःशीच करून स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणे हे स्त्री-पुरुष समानता साधण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे.

समानतेचे सूत्र आम्ही पतीपत्नी आमच्या घरात अगदी "समानतेने" पाळतो. मी स्वतः नोकरी करते.मी ऑफिसमध्ये कधीही "स्त्री" असल्याचा बागुलबुवा उभा करीत नाही. वेळप्रसंगी रात्री उशीरापर्यंत थांबून काम करण्याचा प्रसंग येतो त्यावेळी स्वतःच्या "स्त्री"त्वाच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेऊन स्वतःचे कर्तव्य पार पाडते.

कार्यालयीन वेळेत साडीखरेदी, सेलमध्ये जाणे, मेकअप करणे,मेंदी काढणे अश्या "बायकी" गोष्टी टाळून पुरुष सहकाऱ्यांच्या चर्चेला निमित्त होणे शक्यतो टाळतेच.

घरीसुद्धा माझे पती माझ्या गैरहजेरीत आणि उपस्थितीत सुद्धा त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून घरगुती जबाबदाऱ्या पार पाडतात.

आमच्याकडे माझ्या मुलाला ही अमुक कामे पुरुषांची आणि तमुक स्त्रियांची अशी वर्गवारी माहित नाही ह्यातच सर्व आले.

पण याही पलिकडे जाऊन आम्ही स्त्रीसन्मानाचे काही संकेत कटाक्षाने पाळतो. आमच्या नातेवाईकांत /परिचितांत कुणाला पहिली /दुसरी मुलगी झाली तर कुठल्याही प्रकारची ( निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह ) तीव्र प्रतिक्रिया देणे टाळतोच. संबंधित व्यक्ती नाराज असेल तर तिचे कौन्सीलिंग करतो.

मी स्वतः लग्नप्रसंगी "पाय धुणे" आणि तत्सम विधी ज्यात वधूपक्षाला कमीपणा वाटेल अश्या गोष्टी स्वतःपुरत्या तरी कटाक्षाने टाळते.

नातेवाईकात "मुलगी बघणे" अश्या अपरिहार्य कार्यक्रमात पसंत नसलेल्या (किंवा असलेल्याही!) मुलीच्या शरीरयष्टीबद्दल, तिच्या शारीरिक रूपाबद्दल विनाकारण कुत्सित चर्चा करणे किंवा कधी अश्या ठिकाणी उपस्थित रहावे लागलेच तरी अनुद्गार न काढण्याचे पथ्य मी अवश्य पाळते. प्रसंगी मी ह्याबद्दल इतरांचा रोषही पत्करला आहे!

घरी नातेवाईक स्त्रियांसोबत मतभेदाचे प्रसंग आल्यासही त्यांचा स्वाभिमान असलेल्या त्यांच्या "माहेरचा" उद्धार न करताही मुद्देसूद वाद-संवाद करण्याचे कौशल्य मी हाताळते.

मी कुणी समाजसुधारक नाही किंवा स्त्री मुक्तीची पुरस्कर्तीसुद्धा नाही. त्यामुळे संपूर्ण समाजाची विचारधारा बदलवणे माझ्यासारख्या सामान्य स्त्री साठी कदाचित अशक्यच आहे.

परंतु चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी असे म्हणतात. म्हणून माझ्या स्त्रीजातीला प्रतिष्ठा मिळावी ह्याचे असे काही प्रयत्न मी स्वतःपासूनच सुरु केलेले आहेत.

माझ्या मनातील विचारांना उत्तुंग व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल "ईरा" चे मनःपूर्वक आभार!