Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

स्त्री मन समजायला कठीण असतं का?

Read Later
स्त्री मन समजायला कठीण असतं का?

कथेचे नाव :- स्त्री मन समजायला कठीण असतं का?
विषय :- स्त्रीला समजून घेणं खरचं कठीण असतं का हो?
फेरी :- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

***************************************************

       मानवी मन समजून घेणं म्हणजे एक मोठं कोडं असतं.मनाने काय विचार करावा? किती प्रमाणात करावा? कधी तो विचार सोडून द्यावा ह्यातलं काहीच पूर्णतः आपल्या हातात नसतं.मन कधी शांत असतं तर क्षणात त्यात विचारांचं काहूर उठतं.मन खुश असेल तर व्यक्ती आनंदी नाहीतर नाराज नि स्वतःच्या विचारचक्रात हरवलेली दिसते.हे मन कधी कुणी पाहिलं नाही पण सर्वांच्या मते माणसाला मन आहे हे नक्की.
   कुणाच्या मनात काय चालू आहे ह्याचा ठाव घेणं म्हणजे अशक्यच नाही का? त्यात बायकांच्या मनातील जाणून घेणं खूपच अवघड आहे.त्यांचं मन फुलपाखरासारखं सतत भ्रमंती करत असतं.

चला तर मग या कथेतून स्वानंदला आपल्या बायकोच्या मनातलं जाणून घेत तिला समजून घेता येतंय का पाहुयात.

स्वानंद आणि रवी जुने मित्र खूप दिवसांनी भेटले.दोघांच्या गप्पा मस्त सुरु होत्या.त्यातच घरचे सगळे बरे ना?अशी एकमेकांनी विचारपूस केली.रवीला स्वानंद आल्यापासूनच जरा नाराजच वाटत असतो. तो कुठल्यातरी विचारात हरवल्यासारखा दिसत असतो.त्याने विचारलं "काय रे सगळं ठीक ना"?
हो रे ठीक आहे सगळं.त्याने खूप खोलात जाऊन विचारता, स्वानंद बोलू लागला.मी जरा विचार करतोय की बायकोच्या मनातलं समजलं असतं तर किती भारी झालं असतं नाही का? मनात एकच विचार येत आहे...मला कसं कळेल तिच्या मनातलं, ज्यामुळे ती खुश राहील? माझं तिच्यावर खूप प्रेम आहे रे पण कामाच्या व्यापात मी तिला वेळ देऊ शकत नाही आणि ती म्हणते तसं कदाचित तिचं मन ओळखू शकत नाही. आधी ती हक्काने रागवायची माझ्यावर आता तेही करत नाही.आमच्यातील प्रेम कमी झालय का?

त्यावर रवी त्याला म्हणतो..."अरे बायकांच्या मनातलं ओळखता येणं खूप कठीण असतं.कधी त्यांना छान सिल्कची साडी नेली तरी त्यांना वाटतं,एवढा खर्च कशाला केलास?... प्रेमाने गुलाबाचं फुल किंवा गजरा आणला असतास तरी मी खुश झाले असते".
त्यांचं वाटणं, त्यांना काय पटतं हे समजायला कठीण जातं. म्हणजेच त्यांचं मन हे खूप चंचल असतं.कधीतरी त्या म्हणतात बघा त्या माझ्या मैत्रिणीचा नवरा किती तिची काळजी करतो,किती जीव लावतो तिला... कामात मदतही करतो नाहीतर तुम्ही?
स्वानंदला रवीचे बोलणे अगदीच पटत होते.
हो अरे,आमच्या लग्नाचा परवा वाढदिवस होता.मी गौरीला विचारलं..."तुला काय हवं ते सांग म्हणजे तुझ्या आवडीचं दिलं की तूहि खुश आणि मलाही समाधान मिळेल".तर मला म्हंटली काही नको तुम्ही फक्त त्या दिवशी सुट्टी काढा आपण एकमेकांसोबत वेळ घालवूयात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी सुट्टी काढली आणि तिला मस्त शुभेच्छा दिल्या तर मला म्हंटली की माझं गिफ्ट कुठे आहे.मग मी जाम पेचात पडलो.हे असं झालं की मला प्रश्नच पडतो हिच्या मनातलं मला कसं समजेल.
हे ऐकून रवीला नकळत हसू फुटले.हो रे त्यांना वाटतं की आपल्याला त्यांचे मन वाचता यावे.

पण हे सगळं असलं तरी,एवढं मात्र खरं की त्यांना हक्काचे असे आपणच असतो जिथे त्या त्याचं मन मोकळं करतात.तेव्हा शांत राहून ऐकून घ्यायचं, त्यातलं आपल्याला जे करणे शक्य असेल ते नक्की करावे.नाहीतर आपण आपल्या कामात व्यस्त होत जातो.त्यांचे म्हणणे ऐकायला वेळ मिळत नाही किंवा ऐकूनही बरेचदा आपण ते सोडून देतो.मग कालांतराने आपल्याला जाणवायला लागतं की आता ही पहिल्यासारखी आपल्याबरोबर बोलत नाही.तेव्हा समजून घ्यायचं की तिने तिचे मन तिच्या आवडत्या गोष्टींमध्ये रमवायला सुरुवात केली.

"प्रत्येक स्त्रीला बरेचदा आपला त्यांना खुश ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुद्धा खूप भावतो.त्यांच्या खूप काही अपेक्षाहि नसतात.
त्यांच्या सोबत कसं वागावं म्हणजे त्या समाधानी असतील ह्यावर जास्त विचार करण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीत तुझ्या वागण्यात बदल कर. एवढं मात्र लक्षात ठेव कि, बायका अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, त्यांचं आवर्जून केलेल्या कौतुकामुळे म्हणजेच काय मस्त जेवण बनवलं आहेस किंवा आज काय सुंदर दिसतीये, तू किती दमतेस आज मी चहा बनवतो आपल्यासाठी तू बस, चल आज थोडासा बदल म्हणून आपण दोघेच बाहेर जाऊया ह्यामध्ये त्या खूप खुश होतात.हे माझे अनुभवाचे बोल बरं का?
  त्या खूप करत असतात रे घरासाठी, आपल्यासाठी तेही बरेचदा स्वतःकडे लक्ष न देता, सगळ्यांची आई होऊन जाते बघ आपली बायको... तेव्हा तिला खुश ठेवणं हि आपलीच जबाबदारी नाही का? शेवटी घरची लक्ष्मी खुश तर संपूर्ण कुटुंब खुश असतं...
   रवीचे हे सगळं ऐकून स्वानंदला जाणवतं आपण ह्यातल्या बऱ्याच गोष्टी करायला विसरतो.म्हणूनच गौरी नाराज होत असेल... तिला मी गृहीत धरतो हेच माझं चुकतं.बायकोला गृहीत न धरता तिचं मन ओळखायला शिकायला हवं.
तो रवीला म्हणतो तू किती सुंदर समजून सांगितलंस मी नक्कीच माझ्यात तसा बदल करेल.असं म्हणून तो त्याचा निरोप घेतो.

त्या भेटीनंतर स्वानंद गौरीला आवर्जून वेळ देण्याचा प्रयत्न करू लागतो.तिने केलेल्या गोष्टींचे कौतुक करू लागतो.आणि हो तिला प्रत्येक वेळी तू पुढं जा मी तुझ्या कायम पाठीशी आहे ही हमी देतो.
जसेकी,कधी गौरीने कुठे जायचे ठरविले की स्वानंद लगेच मला काम असतं खूप तू असं काही ठरवत जाऊ नकोस म्हणून मोकळं व्हायचा.तो आता तिचं ऐकून शक्य तेवढा वेळ काढू लागला होता.मुलांचे आणि त्या दोघांचे वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस विसरणारा स्वानंद आता ते लक्षात ठेवून त्या दिवशी हौशेने साजरी करू लागला.जो स्वानंद नेहमी आपल्याला काय कमी आहे का पैशाची म्हणत गौरीला स्वतःचे बुटीक सुरू करण्यासाठी नकार देत होता.त्याकरता आता तिला पाठींबा देत तुही स्वतःच सुरु कर आणि स्वतःला सिद्ध करून दाखव म्हणत तिला साथ देऊ लागला.
जमेल तशी तिला घरातील कामात थोडीफार मदत करू लागला.
गौरीलाही हा स्वानंद मधला बदल खूप भावतो.दोघेही आता त्यांचे सहजीवन नव्या उमेदीने जगू लागतात.
स्वानंदलाही हे समजते की बायकोचं मन समजणं म्हणावं तितकं कठीण नसतं.

    खरचं प्रत्येक नवऱ्याने किंवा कुटूंबातील सदस्यांनी जर घरच्या लक्ष्मीच्या काय अपेक्षा आहेत ते समजून घेतलं आणि तिला ती दिवसभर झटत असलेल्या कुटुंबातल्या सदस्यांकडून चार कौतुकाचे शब्द ऐकायला मिळाले की ती भरून पावते. पुन्हा नव्या उमेदीने पदर खोचून कामाला लागते.बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे मन वढाय वढाय... असं चंचल बायकांचं मन असतं जे क्षणात नाराज होतं तसं क्षणात सगळं विसरून आनंदी देखील होतं.कारण सगळ्या स्त्रियांना आयुष्यात सगळकाही करायचं असतं.एक गोष्ट करून त्यांचं मन शांत बसू शकत नाही.त्यामुळेच त्या प्रत्येक नातंही तितक्याच सुंदरपणे जपतात.मोठमोठ्या जबाबदाऱ्या अगदी लीलया पेलताना दिसतात.फक्त त्यांना गरज असते ती नवऱ्याच्या भक्कम आधाराची आणि त्याने बोललेल्या चार गोड शब्दांची.

समाप्त.

  ©®सुप्रिया शिंदे महादेवकर

जिल्हा-पुणे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Supriya Vikram Mahadevkar

Professor

मी कविता,चारोळ्या,अभंग,कथा लिहिते.मला नवनवीन गोष्टी सतत शिकायला आवडतात.मी इंजिनियरिंग कॉलेजला प्रोफेसर आहे.कॉम्प्युटर इंजिनियरिंग मध्ये सध्या phd करत आहे.

//