स्त्री ला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो?

स्त्री आणि तिचं भावविश्व याचा मनोवेध घेणारा लेख...!

राज्यस्तरीय करंडक लेख स्पर्धा


विषय     :- स्त्री ला समजून घेणं खरंच
                कठीण असतं का हो?

          आई, पत्नी, प्रेयसी, सखी, बहीण अशा अनेक भूमिका बजावणारी ती जेव्हा असते आई-बाबांची लाडाची लेक तेव्हा कित्येकदा अगदी हसत हसत जन्मभर सोसत असते तिच्यावर लादला गेलेला निर्णयांचा अतिरेक...! जेव्हा असते त्याची प्रेयसी तेव्हा त्याच्या प्रेमाखातर विसरते स्वतःचं अस्तित्व आणि भावविश्व... असते सर्वस्वी ती त्यालाच अर्पण...! जेव्हा ती असते आपल्या लाडक्या भावाची बहिणाबाई तेव्हा करते ती ज्ञानेशाचा सांभाळ मुक्ताई होऊन...! पोटच्या लेकराएवढीच इतरांच्या मुलाबाळावर जीव ओवाळून टाकणारी ती कधी होते यशोदा माय तर कधी वासराची गाय! त्याला अभ्यासात... खेळात.. त्याचा मेळ बसविणारी, त्याचं मन जपणारी आणि त्याच्या मनातले भाव सहज टिपणारी ती हसतमुखी... त्याची मैत्रिण... त्याची सखी! त्याच्या छोट्या मोठ्या आवडी निवडीत स्वतःची सवड... स्वतःची उसंत हरविलेली ती... कुठलीही खंत न बाळगणारी... कुठल्याही पगाराविना अविरत कष्टाचं औदार्य जपणारी ती म्हणजे त्याची भार्या...!

          समाजाला तिच्याकडून एवढ्या असीम अपेक्षा असतात की या विविध भूमिका बजावताना तिच्याकडून झालेली एखादी चूक देखील "ती" कशी कमकुवत हे सिद्ध करायला पुरेशी ठरते! शिक्षण आणि त्यासोबत प्राप्त झालेल्या संधी यामुळे स्त्री आपले ध्येय... आकांक्षा... आणि आपल्या स्वप्नपूर्तीसाठी पुढे सरसावते आहे. राजकारण, समाजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, कला, साहित्य अशा एक ना दोन अनेक क्षेत्रात आज स्त्री आघाडीवर असल्याचे निदर्शनास येते. पण "तिला शिक्षीत करण्यामागचा उद्देश खरंच सफल झालाय का?" यावर मात्र क्वचितच बोललं जातं. पूर्वी चूल आणि मुल एवढं छोटं विश्व असणाऱ्या स्त्रीच्या फक्त विश्वाचा आवाका वाढलेला आहे... जबाबदाऱ्या आणि इतरांच्या तिच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु तिची कुचंबणा... अवहेलना... अपवाद वगळता आजही थांबलेली नाही. तिचं दिसणं... तिचं रंग-रूप... आणि तिचा बांधा...! आजही हेच निकष तिचं पुढील आयुष्य ठरवितात. किंबहुना आता त्यात तिचं शिक्षण... तिची कमाई... आणि त्यासोबतच घरकामाची सवय या बाबींची भर पडलेली दिसते. थोडक्यात काय तर सर्वगुण संपन्न अष्टपैलू रोबोट ज्याला आपलं भावविश्व नसेल अशी "ती" हवी असते त्याला सहचारिणीच्या रुपात!

          स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो? मुळात तिला समजून घ्यावं ही इच्छा असणारे आजही क्वचितच पहायला मिळतात. अशी इच्छा बाळगणारे पुरुष काय पण स्त्रिया देखील मोजक्याच! एक सून म्हणून आयुष्यभर कुचंबणा सोसलेली हजारात एखादीच सासू अशी असते जिला आपण सोसलेल आपल्या सुनेच्या वाट्याला येऊ नये असं मनोमन वाटतं आणि त्यासाठी ती झगडते देखील. एकमेकींना समजून घेण्याचा थोडा प्रयत्न नणंद-भावजय, सासू-सुन, आई-मुलगी यांनी केला तर अशी दोन स्त्रीयांमधली नाती देखील सख्या पक्क्या मैत्री इतपत वृद्धींगत होऊ शकतील. असंही पहावयास मिळतं की बरेचदा आयुष्यातल्या एखाद्या भूमिकेत स्त्रीची एवढी काही पिळवणूक होते की त्यानंतर येणाऱ्या सुखाच्या सरिंवर तिचा विश्वास बसणे अशक्यच असते. निसर्गाने स्त्रीला जास्त सहनशील आणि धैर्यशाली बनविलं आहे परंतु त्याच निसर्गाने तिच्यावर अशा काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत की त्या चक्रातून आयुष्याची वाटचाल होत असताना कैकदा कळत नकळत तिची चिडचिड होते... त्रागा होतो... तिने तिच्या स्वतःकडून इतरांसाठी जपलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण न झाल्याचं शल्य तिला बोचत असतं. अशा वेळी गरज असते ती तिला समजून घेण्याची. आपल्याला कुणीतरी समजून घेतंय ही भावनाच फार मोठा धीर देणारी असते.

          वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर होणाऱ्या बदलांमुळे स्त्रीचं मनोविज्ञान सांभाळणारी आणि तिला समजून घेणारी व्यक्ती तिच्या आयुष्यात असली तर तिच्या कष्टाचं चीज झाल्यागत तिला वाटत असतं. एखादी स्त्री कशी बावळट, मूर्ख... एक पत्नी म्हणून... प्रेयसी म्हणून कशी इमोशनल फूल याला दुजोरा देणाऱ्या कैक पोस्ट हल्ली व्हायरल होतात. स्त्रीची खिल्ली उडविण्याचा हा ट्रेंड तसा जुनाच! काळानुरूप पद्धतीत काय तो बदल झालेला.

         स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असलं तरीही अशक्य नक्कीच नसतं! काय म्हणताय... मित्र म्हणून... सखा म्हणून... जोडीदार म्हणून समजून घ्यायचंय तिला? आकाशात ऊंच भरारी मारताना कधीतरी तिला साथ देऊन बघा... तिच्यावर स्वतः एवढा विश्वास ठेवून बघा... स्वतःसाठी गगनभरारी घेताना देखील स्वतःपेक्षा जास्त ती तुम्हाला जपेल. स्त्रीच समर्पण कळलं की तिला समजून घेणं सोपं व्हायला लागतं!

          स्त्रीला प्राप्त झालेल्या निर्मीतीच्या क्षमतेमुळे देखील तिची सहनशीलता कमालीची ठरते. नऊ महिने आपल्या गर्भात उमलणार्‍या इवल्याशा जिवासाठी वाटेल ते सोसण्याची तिची तयारी असते. अशा वेळी गरज असते ती तिच्या आवडी निवडी जपण्याची. कुटूंबियांच्या सतत सेवेत असणाऱ्या "तिचा" हा गर्भारपणातील काळ काहिसा नाजूक काहिसा हळवा असा असतो. खरंच असतं का हो फारच कठीण अशावेळी तिला जपणं? पूर्वी लग्नानंतर अनेक सण समारंभ साजरे व्हायचे. त्या निमित्ताने नववधू कधी माहेरपण उपभोगायची तर कधी समवयस्क मैत्रिणींसोबत चैत्रगौरीत पिंगा धरायची... कधी भुला बाईच्या गाण्यांमधून मोकळी व्हायची तर कधी जात्यावरच्या ओव्यांमधून व्यक्त व्हायची. त्या त्या वेळेला वेळेत मिळालेले सहज सोपे मानसोपचारच होते ते जणू! काळानुरूप रीती परंपरेत बरेच बदल झालेले असले तरीही आज समाज शिक्षणाने प्रगल्भ झालायं त्यामुळे जोडीदार म्हणून स्त्रीला समजून घेणं अधिक सोपं झालंय यात शंका नाही.

          स्त्री... जी सोसते अनंत कळा तिला असतो फुलवायचा संसाररूपी नात्यांचा बाग अन् प्रेमाचा सुबक मळा!

          स्त्रीला का समजून घ्यायचं हे एकदा उमगलं की तिला समजून घेणं सोपं व्हायला लागतं. पिता.. पती... पुत्र या तीन नात्यांनी तिच्या भोवती बंदिस्त पिंजरा निर्माण करण्याऐवजी तिच्या पंखांना बळ दिले तर...? तर नात्यातली विण अधिक घट्ट होईल. 

          स्त्री...! जिच्याविना अधुरी असते विश्वातली प्रत्येक कहाणी अशी ती कधी हळुवार तर कधी भावुक... कधी प्रेमवेडी मस्तानी तर कधी लढवय्यी हिरकणी!

          स्त्री मग ती असोत कुठल्याही भूमिकेत  आजन्म ती जपत असते हृदयी अमृत! नयनी पाणी...! हृदयी अमृत! नयनी पाणी...! 


तृप्ती काळे
नागपूर टीम